অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उलटी

उलटी

पचनसंस्थेत जठरामधील क्रिया मंदावली किंवा जठराच्या आतल्या आवरणाचा दाह झाला तर त्यातले अन्न बाहेर टाकण्याची क्रिया होते. जठरातले अन्न पुढे आतडयात जाण्यास काही अडथळा आला तरी उलटी होते. उलटी होण्याची नुसती 'भावना' असेल तर तिला 'मळमळ' म्हणतात. (कोणी याला कोरडी उलटी म्हणतात).

उलटी होते तेव्हा जठरात अन्न असेल तसे पडते. जठरात अन्न नसेल तर केवळ पाझरलेले पाचकरस उलटून पडतात. याला पित्ताची उलटी असेही म्हणतात.

काही वेळा शिसारीने उलटी होते. (उदा. रक्तपात पाहून)

उलटीच्या रंगावरून/ आणि पदार्थावरून आतल्या बिघाडाचा थोडाफार अंदाज करता येतो. उलटीत रक्त असेल तर उलटीला लाल रंग येईल. उलटीत रक्तस्राव होण्याची अनेक कारणे असतात. रक्तस्रावाची प्रवृत्ती किंवा जठराला भोक (अल्सर फुटून) पडले आहे असा निष्कर्ष असू शकतो.

उलटीची प्रमुख कारणे

 • जठराचा दाह : खाल्लेल्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन उलटी होते. अपचन हे ही सामान्य कारण आहे.
 • पाझर वाढणे : रोगजंतूंमुळे पचनसंस्थेतले पाझर वाढून उलटी होते. (उदा. गॅस्ट्रो,कॉलरा, इ.)
 • इतर कारणे : गरोदरपणी अंतःस्रावी (हार्मोन्स) पदार्थाच्या प्रभावाने उलटी होते.
 • दुस-याला झालेली उलटी किंवा अपघात पाहून घृणा किंवा मानसिक दाबामुळे उलटी होते.
 • अन्नमार्गात अडथळा : आतडयाला पीळ पडणे, जंतांमुळे वाट अडणे, कॅन्सर किंवा तशाच गाठीमुळे वाट बंद होणे, आतडयाची हालचाल बंद झाल्यामुळे अन्न पुढे न सरकणे, इत्यादी.

सतत व जास्त प्रमाणात उलटी होत राहिल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन बेशुध्दी किंवा मरण ओढवू शकते. पचनसंस्थेच्या प्रकरणात याबद्दल जास्त माहिती दिली आहे.

उलटीवरील उपचार

उपचाराआधी उलटी कशामुळे होत आहे हे आधी शोधावे. जठरात नको असलेले पदार्थ उलटीद्वारे पडल्यानंतर बहुधा उलटी आपोआप थांबते. जर पचनसंस्थेतल्या अडथळयामुळे उलटी होत असेल तर आधी अडथळा काढण्याचीच निकड असते. उलटी होण्याचे कारण पोटातील जळजळ वगैरे असेल तर बिनतिखट पदार्थ, दूध किंवा आम्लविरोधी पदार्थ, (सोडा) वगैरे घेऊन उलटी थांबते.

पटकी किंवा गॅस्ट्रो असेल तर तोंडावाटे साखर-मीठपाणी देऊन हळूहळू उलटी थांबते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे कमी होणारे प्रमाणही पूर्वीसारखे बरोबर होते.

उलटीत रक्त पडत असेल तर धोका संभवतो. यासाठी ताबडतोब रुग्णालयात न्यावे.

 • पोटात नको असलेला पदार्थ गेला तर मळमळ व उलटीने तो बाहेर पडायला मदतच होते. उदा. अपचन, काही विषारी पदार्थ (उदा. कीटकनाशक) अशा वेळेला आवश्यक वाटल्यास उलटी होण्यास काहीतरी मदत करावी. (उदा. दोन बोटांनी घशात दाबून उलटी काढणे, मिठाचे पाणी प्यायला देणे.) नको असलेला पदार्थ पडून गेल्यावर बहुतेक वेळा मळमळ थांबते. न थांबल्यास थोडेसे दूध, एखादे बिस्किट वगैरे देऊन पाहावे. त्यानेही न थांबल्यास मळमळ थांबण्याची प्रोमेझिनची किंवा डोमपेरिडोनची गोळी द्यावी. प्रोमोझिन ऐवजी सूतशेखरची मात्राही चालते.
 • मळमळ, उलटी काही आजारामुळे होत असेल तर त्या आजारावर उपचार केला पाहिजे. लहान मुलांना जुलाब, उलटया होत असल्यास मीठ-साखर पाणी द्यावे. पटकीमध्येही हा उपाय चांगला लागू पडतो. मात्र यामुळे उलटी थांबण्याची  अपेक्षा नसते.
 • गरोदरपणात सकाळच्या वेळी मळमळ, उलटी होते. पोटात थोडेफार कोरडे अन्न गेले, की ती आपोआप थांबते. न थांबल्यास वरीलप्रमाणेच सूतशेखरची गोळी घ्यावी. यानेही मळमळ थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागेल.
 • जठरदाहामुळे उलटी होत असल्यास आम्लविरोधी गोळया (ऍंटासिड) चघळायला द्या. इथेही सूतशेखर चालू शकते. तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत.
 • उलटी थांबत नसल्यास, उलटीत रक्त (लाल किंवा काळा-करडा रंग) दिसल्यास,उलटीबरोबर ताप, पोटदुखी, कावीळ, बेशुध्दी, मान ताठरणे यांपैकी खाणाखुणा आढळल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.

घरगुती उपाय, आयुर्वेद, होमिओपथी

 • मळमळ, उलटी यांवर पुढीलप्रमाणे सोपा उपाय आहे. मातीचे ढेकूळ चुलीत लालसर भाजून चटकन पाण्यात बुडवून काढावे. हे पाणी चमचा चमचा दिल्याने उलटी, मळमळ कमी होते, असा अनुभव आहे.
 • आणखी एक उपाय असा - पडलेली मोरपिसे जाळून त्यांची काळसर राख करावी. चिमूटभर राख चमचाभर मधातून हळूहळू चाटवल्यास उलटी थांबते. असे दोन-तीन वेळा करावे. मोरपिसे मिळतात त्या मोसमात गोळा करून राख करून ठेवली तरी चालते. सूतशेखर मात्रा साध्या उलटीवर चांगली लागू पडते.
 • उलटी झाल्यावर लगेच फार पाणी देऊ नये, चमचाचमचा करून द्यावे म्हणजे ते चांगले जिरते. लिंबू, संत्री, मोसंबी यांचा रस आणि साखर-मीठ घालून पाणी देत राहिल्यास थकवा राहतो.
 • आणखी एक उपाय म्हणजे व्हॉमिटॅब नावाची तयार गोळी मिळते. ही गोळी चघळून रस गिळण्यास सांगावे. दोन-तीन गोळयांचा रस पोटात गेला, की उलटी थांबते.

होमिओपथी निवड

आर्निका, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, चामोमिला, फेरम फॉस, लॅकेसिस,लायकोपोडियम ,मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला,सिलिशिया, सल्फर, थूजा

मळमळ-उलटी

मळमळ म्हणजे आपल्या पोटातून काहीतरी उलटून पडेल अशी भावना. काहीजण याला 'कोरडी उलटी' म्हणतात (इतर शब्द- उमळणे, उचमळणे). मळमळ मुख्यत: तीन प्रकारच्या कारणांनी होते.

 1. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात असला की मळमळ होते (उदा. विषारी पदार्थ, काही औषधे, अपचन, फार तेलकट पदार्थ, दारू वगैरे)
 2. पचनसंस्थेच्या काही आजारांमध्ये मळमळ होते (उदा. कावीळ)
 3. पचनसंस्थेच्या आजाराशिवाय इतर संस्थांचे आजार व बदल यांमुळे येणारी मळमळ. उदा. गरोदर असताना पहिल्या तीन-चार महिन्यांत मळमळ होते किंवा बस, बोट वगैरे लागल्याने मळमळ होते. काहींना झोपाळयावर बसल्यावर तर काहींना अपघात बघून उलटी होते. काही जणांना दुस-या कोणाला उलटी झालेली पाहून मळमळते. अनेक औषधांमुळे मळमळ होऊ शकते.

मळमळ होण्याचे कारण पाहून त्याप्रमाणे उपचार करावा.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ: आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 8/16/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate