कधीकधी पू-जनक जंतूंमुळे बीजांडे व बीजांडांच्या मागे असणा-या एका लहान पिशवीला सूज येते. जंतुदोष झाल्यास त्या बाजूच्या बीजांडाचा आकार वाढणे, गरमपणा, दुखरेपणा, इत्यादी खाणाखुणा दिसतात. यावर ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते. मात्र उपचार तज्ज्ञाकरवीच व्हावेत. कधीकधी यात पूही भरतो. गालगुंड झाल्यावर कधीकधी बीजांडांना सूज येते. विशेष करून तरुण वयात गालगुंड आले तर ही शक्यता जास्त असते. याने पुरुषाला वंध्यत्वही येऊ शकते.
कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेदना, ताप व बीजांडास सूज अशी लक्षणे असतात. पेनिसिलिन किंवा टेट्राच्या गोळया व ऍस्पिरिन, इ. उपचाराने हा आजार आटोक्यात येऊ शकतो. 1-2 दिवसांत आराम पडला नाही तर पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवा.
अंडकोशाची त्वचा हत्तीरोगामुळे सुजून निबर होते. याने संपूर्ण वृषणच मोठे दिसते. याचा आकार खूपच वाढू शकतो. एकदा वाढ झाल्यावर यावर काहीही औषधोपचार होऊ शकत नाही. मात्र सूज शस्त्रक्रियेने काढून टाकता येते.
बीजांडांच्या भोवती एक पातळ दुपदरी आवरण असते. यात काही कारणाने (कधीकधी जन्मजात) पाणी साठून अंडकोश मोठा दिसतो. अशा वेळी दुखरेपणा, गरमपणा नसतो. अंधारात अंडकोशावर बॅटरी लावून पाहिले असता लालसर गाभा दिसतो. आतल्या पाण्यातून प्रकाशकिरण आरपार जात असल्याने व त्वचा पातळ असल्याने असे होते. हा दोष जन्मजात असेल तर झोपेत (म्हणजे आडव्या अवस्थेत) कोशातले पाणी पोटात परत जाते. मात्र दिवसा पाणी परत कोशात उतरते. त्यामुळे आकार कमी-अधिक बदलता राहतो. या दोषावर शस्त्रक्रिया हाच उपाय असून यात पाणी जमलेली पिशवीच काढून टाकतात.
अंडकोशात काही वेळा पोटातली आतडी उतरतात. मुळात बीजांडे ही पोटाच्या पोकळीत तयार होतात. जन्माच्या थोडे आधी हळूहळू जांघेतून उतरून अंडकोशात येतात. याच मार्गाने पाणी किंवा आतडयाचा भाग अंडकोशात येऊ शकतात. हर्निया म्हणजे असा उतरलेला आतडयाचा भाग. हा भाग बोटाने परत (उदरपोकळीत) सारता येतो. जरा दाब वाढल्यावार तो परत येतो. यावर देखील शस्त्रक्रियाच करावी लागते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/28/2020
महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, इ. पूर्वेकडील जिल्ह...
मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजले...
[⟶ अंडकोश] स्रवणाऱ्या एका हॉर्मोनास [सरळ रक्तात मि...
हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्...