हा आजार स्प्रिंगसारख्या विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात. ह्या रोगाची पुळी पुरुषांच्या शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली येते. स्त्रियांमध्ये ही पुळी योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर उठते. ही पुळी फुटून त्या जागी व्रण तयार होतो. हा व्रण 1-2 से.मी.व्यासाचा, न दुखणारा, बुडाशी जाडसर व निबर असतो.
हा व्रण आल्यानंतर एका आठवडयात एका किंवा दोन्ही बाजूंच्या जांघेत अवधाण येते. या गाठी न दुखणा-या आणि रबरासारख्या सटकणा-या असतात. हळूहळू त्या एकमेकांत गुंतून एकच मोठी गाठ तयार होते.
जननेंद्रियावरील व्रण उपचाराशिवायही 1-2 महिन्यांत नाहीसा होतो. परंतु गरमी (सिफिलिस) रोग आत वाढतच राहतो. हा व्रण हाताने चाचपून तपासताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. (यासाठी रबरी मोजे वापरावे लागतात) स्पर्श झाल्यास डेटॉलने हात न धुतल्यास तपासणा-यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
या आजारात वेळीच उपचार न झाल्यास यानंतर अंगावर न खाजणारे चट्टे येणे,तोंडात व्रण तयार होणे, शरीरात ठिकठिकाणी अवधाण येणे, इत्यादी त्रास सुरू होतो. गुदद्वाराच्या बाजूलाही व्रण उठतात. ही लक्षणे प्राथमिक आजार बरा झाल्यावर 1-3महिन्यात उमटतात आणि 1-3 महिन्यांत बरी होतात.
यानंतर काही महिने काहीच होत नाही. यापुढे रोग शरीरावर न दिसता आत पसरतो. काही वर्षानंतर या आजाराचे हृदय, मेंदू, हाडे यांवर दुष्परिणाम दिसतात. हाडांमध्ये या रोगाचे व्रण किंवा गाठी तयार होतात. हृदयाच्या झडपा निकामी होणे, महारोहिणीला फुगार येऊन ती कमकुवत होणे, मेंदू व चेतासंस्था निकामी होत जाणे, इत्यादी दूरगामी परिणाम होतात.
आईस या रोगाची बाधा झाली असेल तर गर्भावर वाईट परिणाम होतात. चवथ्या-पाचव्या महिन्यात गर्भपात, वारंवार गर्भपात, उपजत मृत्यू, मूल जगल्यास त्याला जन्मजात व्यंगे (विकृत हाडे, यकृत सूज, अंगावर चट्टे, इ.) असू शकतात.
यावरून सिफिलिस हा एक अत्यंत गंभीर रोग आहे हे स्पष्ट होईल. मात्र वेळीच पुरेसा उपचार झाल्यास हा पूर्णपणे बरा होऊ शकतो व पुढचे नुकसान टळू शकते.
जननसंस्थेच्या तपासणीत न दुखणारा व्रण असणे, जांघेत गाठी येणे यावरून प्राथमिक सिफिलिसचे निदान सोपे असते. मात्र नंतरच्या अवस्थेत तो ओळखणे अवघड असते. स्त्रियांमध्ये व्रण आलाच तर तो अंतर्भागात असल्याने सहसा लक्षात येत नाही.
वारंवार गर्भपात होणे, उपजत मृत्यू, बाळास जन्मजात व्यंगे इत्यादींवरून स्त्रियांमध्ये या आजाराची शंका घ्यायला पाहिजे.
गरोदरपणाच्या तपासणीत यासाठी रक्ततपासणी केली जाते.
रोगनिदान करतानाही रक्ततपासणी करतात. पती आणि पत्नी दोघांचीही तपासणी आवश्यक असते. उपचारही दोघांवर करावे लागतात.
या आजाराच्या निदानासाठी व्रणाच्या द्रवाच्या सूक्ष्मदर्शक तपासणीत जंतू चटकन ओळखू येतात. पण रक्तावर व्ही.डी.आर.एल. तपासणी ही जास्त प्रचलित आहे. लागण झाल्यावर महिन्याभरात ही तपासणी उपयुक्त ठरते. याचबरोबर एचायव्ही-एड्ससाठी एलायझा तपासणी करावी. हे दोन्ही आजार एकत्र येऊ शकतात. दोन्ही आजार एकत्र असतील तर उपचारांमध्ये अर्थातच बदल करावा लागतो.
सिफिलिसचे उपचार डॉक्टरच करतील. परंतु आपल्याला त्याची काही माहिती असणे आवश्यक आहे. पेनिसिलीनची इंजेक्शने 10-15 दिवस रोज (किंवा एकाच दिवशी मोठा डोस) याप्रमाणे दिली जातात. पेनिसिलीन उपचार काही कारणाने शक्य नसल्यास डॉक्सीच्या गोळया रोज 2 याप्रमाणे 15 दिवस घेतल्यास उपयोग होतो. याशिवाय इतरही अनेक औषधे लागू पडतात. पण डॉक्टरशिवाय कोणीही याचा उपचार करू नये. या आजारात पुष्कळ गुंतागुंत असते. अर्धवट उपचार झाले तर रोग शिल्लक राहतो व दुष्परिणाम टळू शकत नाहीत. उपचार योग्य झाले तर व्रण लगेच बरा होतो. पण व्रण सहा ते आठ आठवडयांत आपोआपही जाऊ शकतो. यामुळे रुग्णाचा गैरसमज होतो. ब-याच रुग्णांना योग्य उपचार मिळू शकत नाहीत आणि रोग आत वाढत राहतो.
आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पती-पत्नीपैकी कोणालाही आजार असला तरी उपचार दोघांनाही होणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीपासून आजार आला असेल त्या व्यक्तीसही उपचार होणे आवश्यक असते.(उदा. वेश्या) व्यवहारात मात्र हे फारसे पाळले जात नाही. त्यामुळे हा रोग पसरत राहतो.
रोगनिदानात या आजारांपैकी दुसरा प्रकार जरी दिसत असला तरी यासोबत गरमी आहे किंवा नाही याची पक्की खात्री करणे आवश्यक असते. कारण एकाच वेळी अनेक प्रकारचे लिंगसांसर्गिक आजार होणे अगदी शक्य आहे. 'गरमी' रोगनिदानातून सुटणे योग्य नाही. त्यासाठी रक्ततपासणी आवश्यक ठरते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/22/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...