बरेच पुरुष, विशेषतः वयात येणारी मुले स्वप्नदोषाची तक्रार करतात. झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे. यात दोष असा काही नाही व असे होणे अगदी नैसर्गिक आहे. जवळजवळ सर्व मुलांना वयात येताना हा अनुभव येतो. याने अशक्तपणा, नपुसंकपणा येतो वगैरे भीती अगदी चुकीची आहे. असे काही होत नाही. मात्र चुकीची माहिती व भीती यामुळे ही मुले मन:स्ताप व दुःख सहन करतात. आईवडिलांशी बोलण्याचे धाडस होत नाही व आजूबाजूची मुलेही त्याच गैरसमजाने पोळलेली असतात. ही माहिती योग्य पध्दतीने शाळेतच मिळायला पाहिजे. असाच प्रकार लैंगिक संबंधाची संधी कमी असलेल्या पुरुषांबाबत होऊ शकतो. याने वीर्य कमी होणे वगैरे काही होत नाही; रक्तही कमी होत नाही.
वीर्य परत परत निर्माण होते हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे अज्ञान हेच दु:खाचे मूळ असते. 'धातू जाणे' हा पुरुषांच्या भीतीचा आणखी एक विषय आहे. याबद्दल खालील मुद्दे लक्षात ठेवा. बहुतेक वेळा वरील 'स्वप्नदोष' हेच त्याचे खरे कारण असते. काही जण लिंग ताठरताना सुरुवातीस लाळेसारखा चिकट पदार्थ येतो त्याला 'धातू'म्हणतात. खरे म्हणजे हे वीर्य नसते. शरीरसंबंध सोपा व्हावा म्हणून निसर्गाने दिलेले वंगण असते. काही पुरुषांच्या लघवीतून फॉस्फेटसारखे क्षार बाहेर पडतात, अशा वेळी लघवी पांढरी धुरकट होते. यालाही गैरसमजाने 'धातू' समजले जाते.
प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष झाल्यास त्यातला 'पू' लघवीनंतर बाहेर पडतो, यालाही 'धातू'समजले जाते. वीर्यकोशांची सूज-पू असेल तरीही असाच अनुभव येतो. प्रॉस्टेट, वीर्यकोश, इ. च्या जंतुदोषात गुदद्वारातून बोट घालून दाबल्यावर मूत्रनलिकेतून हा पांढरट पदार्थ बाहेर पडताना दिसतो, यावरून निदान होऊ शकते. यावर अर्थात वेगळा उपचार करावा लागेल. बहुधा हा जंतुदोष लिंगसंसर्गाने झालेला असतो व जननसंस्थेत सौम्य स्वरूपात रेंगाळत राहतो.
थोडक्यात 'धातू जाणे' हा काही भयानक प्रकार नाही, ब-याचदा तो आजार नसतोच. बरेच भोंदू डॉक्टर या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हजारो रुपये उकळतात. आपण याबद्दल योग्य माहिती दिली पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 8/7/2020
धातू कालार्थ रूपे
धातू कालार्थ रूपे
कर्मणि व प्रयोजकरुपे उदाहरणे
कर्मणि व प्रयोजकरुपे