शिश्नाच्या बोंडावरची त्वचा मागे करून पहा. ब-याच जणांच्या बोंडावर पांढरट -करडा थर आढळतो. हा आंघोळीच्या वेळी स्वच्छ करून काढला पाहिजे. रोज स्वच्छता केल्यास हा थर राहात नाही. हा थर कायम राहिल्यास तिथे कर्करोग होण्याची शक्यता असते.
शिश्नावरील कातडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. ब-याच वेळा खरूज, नायटा, इत्यादी आजार शिश्नावर आढळतात. काही लिंगसांसर्गिक आजार शिश्नावर उघड दिसतात. शिश्नावरच्या पुढच्या आवरणावर जखम किंवा व्रण (दुखणारे किंवा न दुखणारे), लघवीच्या छिद्रावाटे पू, या सर्व लिंगसांसर्गिक रोगांच्या खुणा समजाव्यात.
मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजलेला व अस्वच्छ दिसतो.
मुस्लिम समाजात शिश्नाच्या तोंडावरची त्वचा सुंता करून काढून टाकतात. ही त्वचा शाबूत असेल तर त्याची तपासणी आवश्यक असते. उतारवयात या जागी कर्करोगाचा व्रण (जखम) किंवा छोटी गाठ असू शकते. न दुखणारा, न बरा होणारा व्रण असू शकतो. हा कर्करोग किंवा सिफिलिस हा लिंगसांसर्गिक आजार असू शकतो हे लक्षात ठेवा व डॉक्टरकडे पाठवा.
वृषण व बीजांड-त्वचेचे रोग (खरूज, नायटा) हे या जागेतही होऊ शकतात. ओलसर, घामट,कोंदट परिस्थितीमुळे या ठिकाणी खरूज नायटा फार लवकर होतात. अंडकोशांच्या किंवा वृषणाच्या दोन्ही बाजूंना एकएक याप्रमाणे बीजांडे (किंवा अंडगोल) असतात. वृषणाच्या नेहमीच्या आकारापेक्षा मोठा आकार आढळला तर पाणी किंवा पू झाला असल्याची शक्यता असते. तसेच हत्तीरोगाच्या प्रदेशात बीजांडे या रोगाने सुजून मोठी होतात.
पुरुषांच्या शुक्रपेशी आणणा-या वीर्यनलिका हाताला लागू शकतात. बीजांडकोश हाताच्या चिमटीत धरल्यावर ही नलिका चाबकाच्या बारीक वादीप्रमाणे कडक असल्यामुळे सटकते. पुरुष नसबंदी करताना दोन्ही बाजूंना ह्या नळया मध्ये कापून बांधतात. कापलेली टोके काही दिवसांनी गाठीसारखी टणक होतात.
जांघेतल्या रसग्रंथी निरोगी अवस्थेत सहसा जाणवत नाहीत. मांडीवर, पायावर कोठेही जखम,पू, गळू असेल तर त्या सुजून दुखतात, तेव्हा आजा-याला व तपासणा-याला दोघांनाही जाणवतात. मांडीवर, पायावर काही जंतुदोष नसेल आणि गाठी नसतील तर जननेंद्रियाची तपासणी करावी लागेल. लिंगसांसर्गिक रोगात (स्त्री व पुरुष) या गाठी सुजून येतात. लिंगसांसर्गिक रोगाच्या काही प्रकारांत त्या दुखतात तर काही प्रकारांत फुटून पू येतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/28/2020
जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. यो...
गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्रा...
कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेद...
[⟶ अंडकोश] स्रवणाऱ्या एका हॉर्मोनास [सरळ रक्तात मि...