অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नविषबाधा

अन्नविषबाधा : अन्नपदार्थांबरोबर किंवा अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला ‘अन्नविषबाधा’ म्हणतात. फणसाचे गरे, काही प्रकारचे मासे, अंडी इ. अन्नपदार्थ खाण्यात आल्याने काही लोकांच्या अंगावर खाजरी चकंदळे उठतात. मद्य हे थोड्या प्रमाणात घेतल्यास अन्न समजले जाते, त्याच्या अतिरिक्त सेवनानेही यकृताच्या तंतुमयतेचा विकार होतो. मोहरी, वेलदोडे व सुंठ यांसारख्या निरुपद्रवी वाटणाऱ्या पदार्थांचे मसाले खाल्ल्याने हा विकार होण्याचा संभव असतो. पण या सर्व विकारांना ‘अन्नविषबाधा’ म्हटले जात नाही. शिळ्या झालेल्या  अन्नातील प्रथिनांचे जंतूंमुळे विघटन झाल्याने विषारी पदार्थ निर्माण होतात व त्यांच्यामुळे जी लक्षणे उत्पन्न होतात  त्यांना या विषारी द्रव्यांवरून ‘अन्नविषबाधा’ असे प्रथम म्हटले जात असे. परंतु ही एक चुकीची समजूत होती. सूक्ष्मजंतूंमुळे अन्न कुजत असताना अतिशय अपायकारक पदार्थ निर्माण होतात. हे खरे. परंतु त्यांत एवढी दुर्गंधी  उत्पन्न होते व त्याची चव इतकी बिघडते की, त्या स्थितीस पोहोचलेले अन्न मनुष्यास तोंडात घालवणार नाही. मृत प्राण्यांच्या शरीरांतील प्रथिने विघटित होत असता निर्माण होणाऱ्या पदार्थांना ‘टोमेन’ म्हणत; म्हणून अन्नविषबाधेला ‘टोमेनविषबाधा’ ही म्हणत. दुसऱ्या महायुद्धात, शीतपेटीत सुरक्षित ठेविलेले बंद मांसाचे डबे घेऊन जाणाऱ्‍या जहाजास सुरुंग किंवा टॉर्पेडो लागल्यास तसेच किनाऱ्‍या वर उतरवून ठेवण्यात येत. अन्नाची तीव्र चणचण असल्याने यासारख्या मांसाच्या काटेकोर परीक्षणाकडे कानाडोळा केला जाई व हे मांस खाण्यात आलेल्या शिपायांना काही काल ज्वर व ⇨ अतिसाराची बाधा होत असे. परंतु हा परिणाम मांसातील विघटित प्रथिनांचा की काही अज्ञात जंतूंच्या अंतर्विषाचा, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

जंतूंनी, रासायनिक द्रव्यांनी, विषारी फळांनी, विषारी कवकांनी, दूषित शेल माशांनी अन्न दूषित झाले असल्यास जठर व आंत्र यांच्या तीव्र शोथामुळे (दाहामुळे) जी आकस्मिक लक्षणे होतात त्यांना ‘अन्नविषबाधा’ म्हणतात. मळमळणे, पोटात तीव्र वेदना होणे, स्पर्शाने किंवा दाबल्याने वेदना होणे, उलटी, अतिसार, अशक्तता व भोवळ ही लक्षणे सामान्यतः होतात. कवकाच्या विषबाधेत दृष्टी मंद होऊन मदात्ययाची ( अती मद्यपान केल्यासारखी) लक्षणेही दिसतात.

ही लक्षणे टोमेनमुळे होत नाहीत, हे आता सिद्ध झाले आहे. मनुष्याचे पचन तंत्र टोमेन पचवू शकते. विघटित होत असलेले अन्न जंतूंनी दूषित होते व त्यामुळे विषबाधा होते.

  1. विषयुक्त अन्न म्हणजे पालीसारखे काही प्राणी अथवा प्राणिज उत्सर्ग अन्नात मिसळलेले असणे, विषारी भूछत्र्या , बोरे, शंखजीव यांसारखे पदार्थ यांनीही अन्न विषयुक्त होते.
  2. मुख्यत: पुंजगोलाणू या जंतूंच्या व कर्कटीरूप किंवा कुपीसारख्या आकाराच्या जंतूंच्या वाढीमुळे अन्नात जंतुविष तयार होते. कॅडमियमाची कल्हई केलेल्या भांड्यात अन्न फार वेळ राहिल्यास ते कळकते व कॅडमियम-खनिज पोटात गेल्याने विषबाधा होते. डब्यामध्ये बंद करून ठेवलेल्या अन्नात हा दोष उत्पन्न होण्याचा संभव अधिक असतो. कल्हई फार कमी झालेल्या भांड्यात ताकासारखे आंबट पदार्थ ठेवल्यास तेही कळकण्याचा धोका असतो. या प्रकारे झालेल्या विषबाधेस ‘विषसम-अन्नाने झालेली बाधा ’असे म्हणता येते.
  3. विषाक्त अन्न खाण्यात आल्याने अन्नविषबाधा होते. याला ‘अन्नविषबाधा’ म्हटले तरी वास्तविक हा एक आंत्रज्वरासारखाच (टायफॉइडासारखाच) दूषित अन्नातील जंतूंमुळे होणारा रोग आहे. या जंतूंना ‘सालमोनेला-समूह जंतू ’म्हणतात. हे नाव ते जंतू शोधून काढणाऱ्‍या शास्त्रज्ञावरून पडलेले आहे. रासायनिक विघटनामुळे अन्नविषबाधा होते. ही समजूत चुकीची आहे.

वास्तविक आंत्रज्वर किंवा आमांश हे जसे स्वतंत्र रोग आहेत तसाच सालमोनेला जंतूंनी दूषित अन्नामुळे होणारी अन्नविषबाधा हाही स्वतंत्र रोग आहे. विशेषत: ज्यांचे मांस खाण्यासाठी उपयोगात आणले जाते अशा गाई, डुकरे अशा जनावरांत आढळणारा हा जंतू असून रोगाने पछाडलेले जनावर मारले गेल्यास त्याच्या मांसात हे जंतू वाढतात व मनुष्याने तसे मांस खाल्ल्यास त्याला रोग होतो. उंदरांच्या लेंड्यातूनही या रोगाचे जंतू पसरणे संभवते. कोंबड्या, बदके इत्यादींची अंडीही या प्रकारच्या विषबाधेस फार कारणीभूत होतात.

जंतूंनी होणाऱ्‍या विषबाधेत पुंजगोलाणूंनी होणारी विषबाधा विशेष आढळते. स्वत:ला रोगजंतूंपासून रोग न होणाऱ्‍या , परंतु दुसऱ्‍याला मात्र त्या जंतूंमुळे रोग उत्पन्न करू शकणाऱ्‍या व्यक्तीस रोगवाहक व्यक्ती म्हणतात. अशा व्यक्तीचा स्वयंपाक करणे, वाढणे यांसारख्या गोष्टींत संबंध आल्यास रोग होऊ शकते.

कुपीरूप जंतूंनी होणारी विषबाधा अधिक भयंकर असते, पण ती क्वचितच होते. जंतूंचे अंतर्विष पचन तंत्रावर तर परिणाम करतेच पण ते शोषिले जाऊन शरीराच्या इतर भागांसही अपाय करते. या जंतूंच्या वाढीसाठी ऑक्सिजन नसलेल्या वातावरणाची आवश्यकता असते त्यामुळे बंद केलेल्या डब्यातील अन्नातून ही विषबाधा होण्याचा अधिक संभव असतो.

निरनिराळ्या प्रकारच्या अन्नविषबाधा, त्यांची कारणे, बाधा होण्याची कारणे, रोगचिन्हे, ती सुरू होण्यास लागणारा काल व इतर विशेष कोष्टकात दिलेले आहेत.

अन्नविषबाधेचे प्रकार, कारणे, रोगचिन्हे व ती सुरू होण्यास लागणारा काल व इतर विशेष

अन्नविषबाधेचे प्रकार, कारणे, रोगचिन्हे व ती सुरू होण्यास लागणारा काल व इतर विशेष

प्रकार

कारणे

बाधा कशी होते

रोगचिन्हे

चिन्हे दिसण्यास लागणारा अवधी

इतर विशेष

१.

विषयुक्त अन्न

(अ)

पालीसारखे प्राणी, उंदरांच्या लेंड्या अन्नात पडल्याने

 

 

 

अन्नपदार्थ झाकून सुरक्षित ठेवणे आवश्यक

 

 

(आ)

भूछत्र्या, कवक, विषारी बोरे खाण्यात आल्याने

 

तीव्र पोटशूळ, अतिशय तहान, रक्तशर्करा एकदम कमी होते, ओठांची थरथर

६ ते १५ तास

 

 

 

(इ)

शंखजीवी पदार्थ खाल्ल्याने

 

५ मिनिटे ते १-२ तास

 

२.

विषसम अन्न

(१)

‘पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस)

रोगवाहक आचारी, वाढपी, असंरक्षित अन्न : विशेषत:बासुंदी बटाट्याची रायती-कोशिंबिरी, लोणची, नीरा, ताडी

मळमळ, उलट्या, तीव्र अतिसार, अशक्तता

 

१/२ ते ४ तास

रोग सांसर्गिक नसतो; लहान बालके व अशक्त वृद्ध व्यक्ती ह्यांत गंभीर स्वरूप होऊ शकते

 

 

 

(२)

कुपीरूप जंतू(क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम)

जंतू  वायुविहीन स्थितीत वाढतात; डब्यातून बंद केलेल अन्न विशेष धोकादायक; बीजाणू साध्या उकळण्याने मरत नाहीत

अशक्तता, द्दष्टिदोष(दोन प्रतिमा दिसणे), गिळताना व श्वास घेताना त्रास, उभे राहिल्यास तोल जाणे

१२ ते ४८ तास

अन्नविषबाधेचा अतिशय तीव्र प्रकार; उपयुक्त चिकित्सा नाही;बंद डब्यातील अन्न आतून उघडताना हवा बाहेर आल्यास फेकून द्यावे; इतर खाण्यापूर्वी ६-७ मिनिटे उकळू द्यावे

 

 

(३)

मृत-जंतू जंतूचे अंतर्विष

 

सत्वर व तीव्र

२ ते ६ तास

जंतू जिवंत नसल्याने वाढत नाहीत; रोगी बरा होण्याची शक्यता.

 

 

(४)

कॅडमियमाचे डबे व उकळलेले अन्न

 

पोटात वाब, तीव्र उलट्या व अतिसार

१/२ तास

 

३.

विषाक्त अन्न

(१)

अन्नजीवाणू-जंतू(सालमोनेला) कचित

मांसाच्या सांजोर्‍या, भाजलेली कोंबडी, वाळविलेली अंडी यांसारखे अपूर्ण शिजविलेले अन्न

जठर व आंत्र यांचा शोथ; ज्वर, मळमळ, उलट्या, शूळ, क्कचित तीव्रशूल

१२ ते ४८ तास

आंत्रज्वरासारखाच एक सांसर्गिक रोग; रोग्याने अन्न हाताळल्यास रोग फैलावण्याचा संभव

 

 

(२)

पुरीष मालाणू (स्ट्रेप्टोकॉकस फीकॅलिस)

उंदरासारख्या प्राण्यांच्या विष्ठेने दूषित अन्न ; गोड पदार्थांत जंतूंची शीघ्र वाढ होते

अतिसार, विष्ठेतून श्लेष्मा (चिकट स्राव)

५ ते १८ तास

अन्न शिजविणारे व वाढणारे यांच्यात स्वच्छता आवश्यक;५५०० से. तापमान अर्धा तास राहिल्यास जंतू मरतात

 

 

(३)

सालामोनेला जंतूंचे अंतर्विष; मृत-जंतू

 

विरामी शूल वेदना व अतिसार; ज्वर कमी अगर मुळीच नाही

२ ते ६ तास

क्वचित १ व ३ हे दोन्ही प्रकार एकाच वेळी होऊन निदान करणे कठीण होते

चिकित्सा

विषयुक्त अन्नामुळे होणारी विषबाधा होऊ नये अशी काळजी घेणे हे विषबाधेनंतर करण्याच्या उपायांहून अधिक महत्त्वा‍चे असते. जंतूंमुळे होणाऱ्‍या विषसम-अन्न-विषबाधेत (पुंजगोलाणूंच्या विषबाधेत) लक्षणांवरून चिकित्सा करतात. स्ट्रेप्टोमायसीनाचाही उपयोग करतात. कुपीरूपी जंतूमुळे झालेल्या विषबाधेत चिकित्सा विशेषेकरून यशस्वी होत नाही. जंतूंपासून सिद्ध केलेली  प्रतिविषेच उपयुक्त ठरण्याचा संभव असतो. परंतु क्वचितच होणाऱ्‍या या प्रकारच्या रोगात ती ऐन वेळी व पुरेशा प्रमाणात मिळणे असंभवनीय असते. अन्नविषजंतू किंवा सालमोनेलाने होणाऱ्‍या विषाक्त विषबाधेत क्लोरोमायसेटीन या द्रव्याचा उपयोग करतात व ते जंतुनाशक असल्याने ह्या चिकित्सेत पुष्कळ यश येते.

व्यक्तिगत काळजी

अन्न शिजवणाऱ्‍या व वाढणाऱ्‍या व्यक्तींनी व आपण स्वत: नेहमी स्वच्छ राहावे. नखांतून घाण न साठेल एवढीच नखांची लांबी ठेवलेली चांगली. अन्नपदार्थ हाताळण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवावे. अन्नपदार्थ उघडे ठेवू नये. त्यावर शिंकू-खोकू नये.

अन्नपदार्थासंबंधी

हात पुसण्याची, भांडी उचलण्याची व ताटे पुसण्याची फडकी स्वच्छ व शक्यतो वेगवेगळी असावीत. पदार्थ चमच्याने चाखून पाहिलेला असल्यास उष्टा चमचा अन्नात घालू नये. हातावर काही जखम, व्रण, इसब वगैरे असेल तर त्यामुळे अन्न संसर्गदूषित होणार नाही याची विशेष काळजी घेतल्यावाचून अन्नाला स्पर्श न करणे हितावह असते. मांजर, कुत्री  इ. घरगुती पाळीव प्राणी व उंदीर, झुरळे यांसारखे प्राणी यांना अन्नापर्यंत जाऊ देण्यात धोका असतो.

अन्न शीतपेटीत ठेवण्याची सोय असेल तर चांगलेच, परंतु अशी सोय नसली तर ते झाकून सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणे आवश्यक असते. ताटे, वाट्या व स्वयंपाकाची भांडी उपयोग संपल्याबरोबर स्वच्छ धुवून कोरडी करावीत. दूध व दूधापासून बनविलेले पदार्थ शीतपेटीतच चांगले राहतात. बिघडलेले किंवा नासलेले पदार्थ शीतपेटीतूनही काढून टाकावे.

घरीचे अन्न डब्यातून बंद करण्याची पद्धती भारतात फारशी रूढ  नाही. या पद्धतीत डबे बंद करण्यापूर्वी स्वच्छ धुऊन शक्य तर दाबयुक्त भांड्यांत उकळणे, अन्न निर्जंतुक असणे व अन्न भरलेले डबे पुन्हा गोठविण्यापूर्वी हवाबंद करणे आवश्यक असते. भारतात लोणची-मुरंब्यांसारखे पदार्थ स्वच्छ बरण्यांतून झाकून, फडक्याने बांधून ठेवतात. लोणच्यातील मोहरी, मीठ,तेल इ. पदार्थ व मुरंब्यातील साखरेची संहती (प्रमाण) जंतूंची वाढ होऊ देत नाहीत. इतर अन्नपदार्थ गोठवून व इतर काळजी घेऊन सुरक्षित ठेवावे लागतात.

लेखक : ना. रा. आपटे

पशूंतील अन्नविषबाधा

क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम या कर्कटीरूप किंवा कुपीरूप जंतूंमुळे कुजलेली हाडे खाण्यामुळे होणाऱ्‍या रोगास ‘विशिष्ट अन्नविषबाधा’ (बोट्युलिझम) म्हणतात. दक्षिण आफ्रिका व टेक्ससमधील काही भागात फॉस्फरसन्यूनता असलेल्या कुरणांत चरणाऱ्‍या गुरांमध्ये होणारा रोग स्थानिक प्रकारचा असतो. पश्चिम ऑस्ट्रेलियात या रोगामुळे असंख्य मेंढ्या मरून मोठे नुकसान झाले, पण रोगाचे कारण १९२८ मध्ये निश्चितपणे कळले. घोडी व मेंढ्या हाडे खाऊन आजारी पडतात, त्यांना एकाएकी पक्षाघात होऊन ती मरतात, असेही त्या वेळीच आढळले. कुजलेले वा सडलेले अन्न व घाणेरडे पाणी यांतही विषारी पदार्थ आढळले. सडलेले गवत खाऊन काही जनावरांना रोग झाला होता; ते गवत इतर जनावरांना चारण्याने तसाच रोग होतो, असे प्रत्ययास आले. रोगजंतू मेलेल्या जनावरांच्या प्रेतांत आढळतात व त्यांची वाढ ऑक्सिजनाशिवाय होत असल्यामुळे जंतू जमिनीत, तसेच जमिनीवर पडलेल्या हाडांत पुष्कळ दिवस जगू शकतात. हिवाळ्यात कुरणातील चराऊ गवत त्यातील फॉस्फरसमुळे पुष्टिकारक असते. नंतर मात्र त्याची होणारी न्यूनता मेलेल्या गाई-बैलांची हाडे चघळून, पूर्ण करण्याचे जनावरांचे प्रयत्न चालू असतात. हाडे चघळण्याची ही प्रवृत्ती खनिजांची उणीव भागविण्यापुरतीच असते. वाढीला आवश्यक असणारी खनिजे द्रव्ये, विशेषत: फॉस्फरस व कॅल्शियम, ही अन्नातून पुरेशी न मिळाल्यामुळे इतस्तत: पडलेली हाडे खाऊन गाई, म्हशी, घोडी, कुत्री, डुकरे व मेंढ्या ह्यांनी ही उणीव पुरी केल्यास हाडांमधून रोगजंतू शरीरात जाण्यामुळे त्यांना रोग होतो. बिघडलेल्या मूरघासातही (मुरविलेल्या वैरणीतही) जंतू असतात. तसेच उंदीर-घुशींमुळे साठविलेले अन्न दूषित होते; असे अन्न खाऊनही रोग संभवतो.

लक्षणे

दूषित पदार्थ खाण्यात आल्यानंतर थोड्याच तासांमध्ये जनावराचा मृत्यू होऊ शकतो किंवा क्वचित एकदोन दिवसांतही संभवतो. मृत्यू झाला नाही तर चारा न खाणे, मलावरोध, अशक्तता, शरीर लुळे पडणे ही लक्षणे होतात. कमरेखालील भागातील शक्ती नाहीशी झाल्यामुळे जनावराला उठता येत नाही, बळेच उठवले तर तोल जाऊन ते पडते व १० ते १५ दिवसांत मरण पावते. जनावर क्वचितच बरे होते. जबडा, जीभ व घसा ह्यांचा अंगवध होतो (लुळे पडतात). स्नायू अशक्त होतात. शरीरात गेलेल्या किंवा विमुक्त झालेल्या विषाच्या प्रमाणवर रोगलक्षणांचे गांभीर्य अवलंबून असते.

शवपरीक्षा

मेलेल्या जनावराच्या शरीरात रोगाची विशेष चिन्हे आढळत नाहीत. जनावर बरेच दिवस पडून राहिलेले असल्यास, त्याचे फुप्फुस व आसपासचा भाग रक्ताळलेला आढळतो.

निदान

रोगाचे निदान निश्चित करण्याकरिता रोगी जनावराच्या शेणातील दूषित द्रव्य गिनीपिग वा उंदीर यांस टोचल्यानंतर त्यांना रोगलक्षणे होतात.

औषधांचा विशेष उपयोग होत नाही, म्हणून प्रतिबंधक उपाय करणे हा एकच मार्ग आहे. त्याकरिता जनावरांना उत्तम चंदीचारा भरपूर प्रमाणात देतात. तसेच आवश्यक खनिज द्रव्ये प्रमाणशीर देतात, फॉस्फरसयुक्त कॅल्शियम अन्नातून देतात. जवळपास रोगप्रादुर्भाव असल्यास जनावरांना प्रतिविष टोचतात.

रोगप्रतिबंध

हिवाळ्यात हाडांचा भुगा खाऊ घातला तर रोग प्रतिबंध होतो, असे सर अर्नाल्ड थायलर यांना तसेच उंडर्स्टपूर्ट (दक्षिण आफ्रिका) येथील संशोधकांना आढळून आले.

लेखक : त्रिं. रं. खळदकर

 

संदर्भ : 1. Dewberry, E. B. Food Poisoning, London, 1959.

2. Ghosh, B. N. A. Treafish on Hygiene and Public Health, Calcutta, 1959.

3. Hagan, W. A.; Bruner, D. W. Infectious Diseases of Domestic Animals. Lodon, 1951.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate