किटॉसीस मधुमेहात साखरेचा वापर नीट होत नाही. म्हणून शरीराला साखरेव्यतिरिक्त इतर पदार्थापासून (म्हणजे प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांपासून) कार्यशक्ती तयार करून वापरण्याची सवय होते. हे पदार्थ जास्त वापरल्याने काही दोष निर्माण होतात. यामुळे रक्तातील आम्ल घटकांचे (किटो आम्ल) प्रमाण वाढते. किटो आम्लांचे हे प्रमाण फार वाढले तर एकदम गंभीर परिस्थिती तयार होते. खूप घाम, चक्कर, श्वसनाचा वेग वाढणे,बेशुध्दी व योग्य वेळी उपचार न झाल्यास मृत्यू संभवतो. अशा रुग्णाच्या श्वसनाला एक विशिष्ट गोड वास असतो. काही व्यक्तींमध्ये मधुमेहाची पहिली ओळखच या गंभीर प्रकाराने होते. अशी लक्षणे दिसल्यास व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात पाठवले पाहिजे.
मधुमेहात आणखीही एक गंभीर धोका असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण उपचारामुळे अचानक कमी झाले तर पेशींचे कामकाज मंदावून ग्लानी (चक्कर) येते. खूप डोके दुखणे,छातीत धडधड, घाम, भीती, थरथर, मळमळ, खूप भूक, थकवा, चक्कर, डोळयाला अंधारी, गोंधळलेली मानसिक अवस्था, कधीकधी झटके आणि बेशुध्दी, इत्यादी परिणाम साखरेचे प्रमाण उतरल्याने होतात. मधुमेहात कडक उपास किंवा जास्त व्यायाम यांपैकी कशानेही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. ही अवस्था ओळखता आल्यास रुग्णाला साखर (साधी)किंवा ग्लुकोज खायला दिल्यास लगेच आराम पडू शकतो. हा प्रथमोपचार अगदी साधा आणि जीवरक्षक आहे.
रक्तातील किटो आम्लता वाढणे किंवा साखरेचे प्रमाण कमी होणे या दोन्हीही अवस्था धोकादायक असतात. यावर ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते.
मधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
लवकर येणारा मधुमेह (तरुणमधुमेह) अगदी जन्मजातही असू शकतो. पण हा आजार बहुधा तिशीपर्यंत दिसून येतो. हा मधुमेह अगदी वेगाने वाढतो. यात रुग्णाचे वजन कमी राहते. उशिरा येणारा मधुमेह (प्रौढमधुमेह) सहसा चाळिशीनंतर येतो. यात वजन वाढण्याची प्रवृत्ती असते.
वयाचा आणि स्थूलतेचा एवढा फरक सोडला तर या दोन प्रकारांत इतर अनेक चिन्हे, लक्षणे समान असतात.
यांपैकी काहीही लक्षणे व चिन्हे असल्यास तज्ज्ञाकडे पाठवून तपासणी करून घेणे आवश्यक असते. लघवीची तपासणी सोपी असते. पण लघवीत साखर आढळली नाही तरी मधुमेहाची शंका राहतेच. कारण काही व्यक्तींच्या बाबतीत रक्तातील साखर वाढली तरी मूत्रपिंडे साखर सहसा लघवीत उतरू देत नाहीत. म्हणून सर्वच रुग्णांच्या बाबतीत रक्तातल्या साखरेची तपासणी करणे आवश्यक असते.
मात्र प्राथमिक तपासणी म्हणून लघवीच्या तपासणीचा मोठा उपयोग आहे. ही तपासणी सहज करता येते. (गरोदरपणात लघवीत काही प्रमाणात साखर आढळणे नैसर्गिक आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.)
याबरोबर रक्तातील किटोआम्लांचे प्रमाण वाढणे किंवा साखरेचे प्रमाण खूप कमी होणे या दोन धोक्यांचे भान ठेवले पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/24/2020
आई बनण्याची इच्छा असणा-या स्त्रियांसाठी मधुमेह म्ह...
आयुष्यातील वय सरतासरता स्त्री चाळीशीत प्रवेश करते....
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. मधुमेह या आजारात...