অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेहातल्या तपासण्या

लघवीतील साखरेची तपासणी

ही तपासणी सोपी आहे. खालीलपैकी एक पध्दत वापरता येईल.

बेनेडिक्टचे निळे औषध

(सुमारे पाच मि.ली) काचेच्या परीक्षानळीत उकळून घेऊन त्यात लघवीचे पाच थेंब टाकल्यावर मूळ रंग बदलून हिरवा, तपकिरी, लाल,काळा यांपैकी बदल झाल्यास लघवीत साखर आहे असा निष्कर्ष काढता येईल. रंग निळाच राहिल्यास साखर नाही असे ठरते.

डिपस्टिक

ही दुसरी पध्दत आहे, त्यात टोकाला विशिष्ट रासायनिक पदार्थ लावलेली पट्टी वापरतात. ही पट्टी लघवीत बुडवून काही सेकंदांनंतर पाहायची असते. विशिष्ट रंग बदलावरून साखर आहे किंवा नाही ते समजू शकते. चाळिशीनंतर दर वर्षी लघवी तपासून घेणे केव्हाही चांगले.

ग्लुकोमीटर

हे कोणालाही सहज वापरता येईल असे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. याची किंमत एक हजार रुपयांच्या आसपास असते. यात रक्ताचा एक ठिपका रासायनिक पट्टीवर घ्यायचा असतो. उपकरण चालू करून ही पट्टी त्यात सरकवायची असते. यानंतर रक्तातल्या साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण आकडयांमध्ये दिसते.

स्वत:च तपासणी करण्यासाठी हे उपकरण अनेक लोक वापरतात. आपण आपल्या बोटावर टोचून रक्ताचा थेंब काढणे सुरुवातीला त्रासदायक वाटेल. पण याची सवय होते. या उपकरणामुळे रुग्ण स्वत: रक्तातली साखर तपासणी कधीही स्वत:च करू शकतो.

रक्ततपासणी

रक्तातील साखर वाढल्यावर सामान्यपणे लघवीतही साखर उतरते. पण काही व्यक्तींची रक्तातील साखर वाढलेली नसतानाही लघवीत साखर कधीकधी उतरते. (उदा. गर्भारपण किंवा किशोरवयीन मुलांमध्ये) त्यामुळे लघवीत साखर असली तरी मधुमेह निदानासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे लागते. रक्ततपासणीचे नीलेतून 2 नमुने घ्यावे लागतात. रक्ततपासणीमध्ये प्रथम उपाशीपोटी रक्तातील साखर तपासतात व जेवणानंतर दोन तासांनी परत रक्त नमुना तपासतात. उपाशीपोटी व जेवणानंतरच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाचा एकदा संबंध पाहिल्यानंतर पुरेसे निदान होते. पुढे रुग्णाच्या उपचाराची देखरेख लघवीतील व रक्तातील (जेवणानंतर दोन तासांनी) साखर तपासणी पुरेशी असते.

नीलेतील रक्तातील साखरेचे प्रमाण उपाशीपोटी 125 पेक्षा कमी व जेवणानंतर 2तासांनी 200 च्या खाली असल्यास मधुमेह नाही असे समजावे. मात्र बोटात टोचून रक्त घेतल्यास हेच आकडे 110 व 200 असे धरावेत. यापेक्षा जास्त साखर प्रमाण आढळल्यास मधुमेहाची शक्यता धरावी.

ग्लायकेटेड हिमोग्लोबिन तपासणी

या तपासणीमध्ये गेल्या महिन्याभरात रुग्णाची रक्तातील साखर नियंत्रणात होती की नाही याचा अंदाज येतो. मात्र रक्तपांढरी (ऍनिमिया) तसेच गर्भारपणात ही तपासणी अचूक ठरत नाही.

मधुमेहातल्या तपासण्या व उपचार..

प्रत्येक मधुमेही रुग्णाचा उपचार ठरवून घ्यायला लागतो. यासाठी डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमध्ये सुसंवाद पाहिजे. ही एक कायमची जबाबदारी आहे. याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

1. शरीरातली साखर आणि मेदाम्ले (स्निग्ध पदार्थ) यांचे योग्य नियंत्रण.

2. शरीराचे वजन योग्य राखणे.

3. समतोल आहार आणि व्यायामाची सवय

4. मधुमेहाची लक्षणे/तक्रारी न उद्भवता जीवन जगणे.

5. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदा-या आणि व्यवहार सांभाळणे, यामध्ये मधुमेहाची बाधा न येऊ देणे.

6. मधुमेहातून येणारे पुढचे आजार (अतिरक्तदाब, डोळा, मूत्रपिंड, यांचे आजार टाळणे)

7. यशस्वी उपचारासाठी आवश्यक गोष्टींचे ज्ञान मधुमेही रुग्णाला असणे.

मधुमेहाचे उपचार तज्ज्ञानेच करावेत. मात्र एकदा तज्ज्ञाने ठरवून दिल्यानंतर संबंधित व्यक्तीही नीट काळजी घेऊ शकते. मधुमेह हा 'कायमचा' आजार असल्यामुळे स्वतः रुग्णाची जबाबदारी यात बरीच असते, उपचारातली तत्त्वे नीट समजावून घेणे आवश्यक आहे. उपचाराची चार अंगे आहेत ती अशी : आहार, व्यायाम, इन्शुलिन संप्रेरक किंवा इतर औषधे आणि इतर काळजी.

आहार

अन्नपदार्थांची निवड, समतोल प्रमाण आणि आवश्यक बंधने समजून घेऊन वजन नियंत्रण करणे निकडीचे असते. आहाराचे तक्ते मिळतात.

मधुमेही व्यक्तीची उष्मांकाची व प्रथिनांची गरज इतरांपेक्षा काही वेगळी नसते. पण जेवढी गरज असेल त्यापैकी उष्मांक कसे पुरवायचे हाच मुद्दा असतो. समजा 2000कॅलरीची (उष्मांक) गरज असल्यास ती 500 ग्रॅम पिठूळ पदार्थातूनही भागते (एक ग्रॅम पिठूळ पदार्थ = चार उष्मांक) किंवा ही गरज केवळ 250 ग्रॅम स्निग्ध पदार्थातूनही मिळू शकते. मात्र मधुमेही व्यक्तीला हे पिठूळ : स्निग्ध पदार्थाचे परस्पर प्रमाण ठरवून घ्यायला लागते. लागणा-या एकूण उष्मांकापैकी 60 टक्के पिठूळ पदार्थातून, 18 टक्के स्निग्ध पदार्थातून तर 22 टक्के प्रथिनांपासून मिळेल अशा बेताने आहार आखून घ्यायला लागतो. याचे तयार तक्ते मिळतात

आहारात ताबडतोब रक्तातील साखरेत वाढ करू शकतील असे पदार्थ टाळणे अथवा कमी ठेवणे आवश्यक असते. (उदा. साबुदाणा, भात, साखर, मध, उसाचा रस, इ.) हे तत्त्व पाळून अन्नपदार्थ बदलते ठेवता येतात. उदा. पिठूळ पदार्थापैकी आज भात, उद्या भाकरी, परवा चपाती असे जेवण आवडीप्रमाणे बदलता येते. असे वेगवेगळे पदार्थ असलेले जेवणाचे तक्ते तयार मिळतात. याबरोबर हेही लक्षात ठेवावे, की आहारातले बहुतेक पदार्थ (काही अपवाद सोडता) मिश्र असतात. उदा. भात म्हटला, की त्यात पिठूळ पदार्थाबरोबर प्रथिनेही येतात. तूरडाळ म्हटली, की पिठूळ पदार्थाबरोबर प्रथिने, शेंगदाण्यात प्रथिनांखेरीज पिठूळ पदार्थ आणि तेल, इत्यादी घटक असतातच. हे पदार्थ योग्य प्रमाणात खायला काहीच हरकत नाही. आवडीप्रमाणे भाज्या, पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्यायला हरकत नाही, कारण त्यामुळे उष्मांक वाढत नाहीत. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेवणे आवश्यक असते.

वजन नियंत्रण यासाठी दोन पध्दती आहेत. आदर्श वजन - (अ) आपली उंची (से.मी.)-100 x9/10 या गणिताने आदर्श शरीर वजन मिळते. उदा. एखाद्याची उंची 170 से.मी. असेल तर आदर्श वजन पुढील प्रमाणे काढता येईल.170-100x9/10 = 70 x9/10 = 63 किलो.

(ब) बॉडी मास इंडेक्स - यात वजन कि.ग्रॅ/उंची2 (मीटरमध्ये) यानुसार जो आकडा येईल तो 18-23 या दरम्यान असल्यास ठीक समजावे.

3. व्यायाम

व्यायामामुळे शरीरातील इन्शुलिन-निरुपाय कमी होऊन इन्शुलिनचा योग्य वापर होतो. त्यामुळे रक्तातली साखर कमी राहते. याचबरोबर हृदयाला योग्य व्यायाम मिळतो. शरीरवजन कमी राहते आणि आनंद मिळतो. मात्र 'हवेसे' म्हणजे दमसांसाचे व्यायाम जास्त चांगले. (उदा. सायकल चालवणे,पोहणे, मध्यम गतीने पळणे,चालणे.) मात्र वजन उचलणे,बुलवर्कर, इ. व्यायाम याला फारसे उपयोगी नाहीत. नियमित सौम्य व्यायामाने (उदा. चालणे, संथ सायकल चालवणे या प्रकारचे व्यायाम) मधुमेही व्यक्तीस उत्साह टिकून राहण्यास व रक्तातल्या साखरेचा नीट वापर व्हायला चांगली मदत होते. विशेषतः प्रौढ मधुमेहात याचा फार चांगला उपयोग होतो. मात्र व्यायामात संयम पाळणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त श्रम झाल्यास रक्तातले साखरेचे प्रमाण एकदम घटून चक्कर किंवा बेशुध्दी येऊ शकते. यासाठी व्यायामाची नेहमीची वेळ, व्यायाम किती काळ करायचा, कोणता व्यायाम करायचा यासंबंधी सर्व तपशील डॉक्टरकडून ठरवून घेणे आवश्यक असते.

औषधोपचार

मधुमेहाच्या लवकर येणा-या प्रकारात (तरुण मधुमेह) इन्शुलिन संप्रेरकाचा नियमित वापर बहुधा अटळ असतो. ठरावीक प्रमाणात ठरावीक प्रकारचे इन्शुलिन रोज घेऊन रक्तातील साखरेची पातळी व शरीरातील रासायनिक क्रिया योग्य पातळीवर राखता येतात. इन्शुलिनचे इंजेक्शन ठेवायला शीतकपाट (फ्रीज) लागते. इन्शुलिनचा रोजचा ठरावीक डोस इन्शुलिन सिरींजचा वापर करून वैद्यक-प्रशिक्षित कार्यकर्त्याकडून देणे मधुमेही व्यक्तीला अगदी उपयुक्त ठरू शकेल. प्रौढ व्यक्ती स्वत: इंजेक्शन घेणे शिकू शकतात. मधुमेही व्यक्तीला इन्शुलिन किंवा औषध गोळया चालू असतील तर जेवण नियमित असणे फारच आवश्यक आहे. उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी अचानक उतरू शकते. एखाद्या वेळेस जेवण कमी झाल्यास गोळी टाळावी हे बरे.

गोळी, इंजेक्शनचा वापर वेळापत्रक आणि इतर दिनचर्या (जेवण-व्यायाम) हे सर्व ठरल्याप्रमाणे करावे लागते. औषध घेऊन जेवण न केल्यास रक्तातील साखर कमी होऊन (ग्लुकोजची कमतरता निर्माण होऊन) चक्कर येते. तसेच औषध चुकल्यास साखर वाढू शकते.

हल्ली इन्शुलिनच्या विशेष सिरिंजेस मिळतात. त्यावर किती युनिट ते छापलेले असते. 40 युनिटसाठी तीच सिरिंज वापरावी. 100 साठी 100 ची सुई त्याबरोबरच येते. यामुळे वेदना अजिबात होत नाही. खांदा, पोट, कमर, मांडी यापैकी ठरावीक जागेवर त्वचेखाली इंजेक्शन द्यायचे असते.

प्रौढ मधुमेहात इन्शुलिनची गरज थोडयाच जणांना लागते. बहुतेकांना तोंडाने घ्यायच्या गोळयांचा उपचार पुरतो. यासाठी दोन प्रकारची औषधे आहेत. यातले कोणते औषध किती द्यायचे याबद्दल डॉक्टर ठरवतील. या गोळयांनी शरीरातल्या साखरेचा वापर सुधारतो व रक्तातल्या साखरेची पातळीही खाली येते. याबरोबरच योग्य आहारविहाराची व कधीकधी इन्शुलिन संप्रेरकाची गरज असते.

आपल्याला मधुमेह आहे, कोणता औषधोपचार चालू आहे हे रुग्णाने नवीन डॉक्टरला भेटताना आधी सांगून टाकावे. खरे म्हणजे अशी चिट्ठीपण खिशात किंवा डायरीत बाळगावी. यामुळे अपघात वगैरे प्रसंगानंतर रुग्णालयात अशा माहितीचा विशेष उपयोग होतो.

इतर काळजी

मधुमेह हा एकदा जडला, की न जाणारा आजार असून त्यात औषधोपचार व आहारविहाराबरोबरच अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. पायांची नखांची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

मधुमेहात मज्जातंतू कमकुवत होऊन कधी कधी संवेदना कमी होतात. बधिरपणा येतो. भाजणे किंवा इतर इजा झालेली पटकन समजून येत नाही व जखम लवकर बरी होत नाही म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. उदा. योग्य पादत्राणे वापरणे.

डोळयांची काळजी

मधुमेहात नेत्रपटलांना इजा होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळ मधुमेह असेल तर डोळयांच्या डॉक्टरांकडे वर्षातून एकदा तपासणी व्हावी. नेत्रपटलांमध्ये होणारे बदल वेळीच लक्षात आले तर अंधत्व टाळता येते.

जखमा

जखमा टाळाव्यात-जखमा होतील असे काम टाळावे व जखमा झाल्याच तर लगेच स्वच्छता, मलमपट्टी करावी. जंतुदोष झाल्यास मधुमेहातल्या जखमा फार दीर्घकाळ चालतात. जखम चिघळत राहिली तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असल्याची शक्यता असते. म्हणून लघवी व रक्त तपासणी आवश्यक ठरते. अशा वेळी तज्ज्ञाकडे पाठवले पाहिजे.

लघवीची तपासणी

दर आठवडयास लघवीची तपासणी करून साखर आहे किंवा नाही याची शहानिशा करून त्याप्रमाणे नोंद ठेवणे आवश्यक असते. यामुळे औषधांचा डोस कमीजास्त करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळते. हे गावपातळीवर कार्यकर्त्याने अथवा रुग्णाने स्वतः करणे सहज शक्य आहे. याची माहिती वर येऊन गेलेली आहे. शंका असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका यांचेकडून शिकता येईल.

आनुवंशिकता

मधुमेह हा काही प्रमाणात आनुवंशिक आहे आणि काही प्रमाणात जीवनपध्दतीवर अवलंबून आहे. तरुण मधुमेह जास्त आनुवंशिक असतो. दोन मधुमेही व्यक्तींनी लग्न केले तर होणा-या संततीस मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. अशी लग्ने टाळावीत. पण खरे तर लग्न करायच्या वयात प्रौढमधुमेह आहे किंवा नाही हे समजणे सहसा शक्य नसते. त्यामुळे ही काळजी वेळीच घेता येत नाही. मात्र लवकर येणारा मधुमेह असल्यास जोडीदार निवडतना काळजी घ्यायला हवी.

दारू आणि मधुमेह

दारूने मधुमेही व्यक्तींना साखरेचा जास्त चढउतार होतो; म्हणून त्यांनी दारू टाळावी. (दारूमुळे साखरेसारखीच शक्ती मिळते, त्यामुळे एकूण उष्मांकांचा पुरवठा वाढतो.) दारूप्रमाणेच मांसाहार व धूम्रपानही टाळणे आवश्यक आहे. गोड औषधातही साखर असते म्हणून अशी औषधे घेताना तेवढे अन्न कमी करणे आवश्यक आहे.

मधुमेह रुग्ण शोधण्यासाठी

मधुमेह लवकरात लवकर शोधण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात.

  1. 40 वर्षे वयानंतर प्रत्येक व्यक्तीची लघवी व रक्त तपासणी करावी.
  2. अशी तपासणी दर तीन वर्षांनी करावी.
  3. काही व्यक्ती जास्त वजनदार/लठ्ठ असतात, त्यांची निदान दरवर्षी तपासणी करावी.
  4. ज्यांचे वजन आदर्श वजनाच्या 120% पेक्षा अधिक आहे किंवा शरीरवजनभार 27पेक्षा जास्त आहे अशांची तपासणी दरवर्षी करावी.
  5. ज्यांचे रक्ताच्या नात्यात मधुमेही व्यक्ती आहे अशांची तपासणी तिशीनंतर दरवर्षी करावी.
  6. ज्यांचा रक्तदाब 145/90 पेक्षा जास्त आहे अशांचीही मधुमेह तपासणी करावी.
  7. ज्या स्त्रीचे बाळ जन्मताना 3.5 किलोंपेक्षा जास्त वजनाचे आहे तिचीही अशी तपासणी करायला पाहिजे.
  8. मधुमेह प्रतिबंध
  9. मधुमेही व्यक्तींनी आपसात लग्न करू नये.
  10. ज्यांच्या रक्ताच्या नात्यात मधुमेह आहे अशांनी पण शक्यतो आपसात विवाह टाळावा.
  11. आदर्श वजन, शरीरभार ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
  12. यासाठी आहार, व्यायाम यांचा समतोल ठेवायला पाहिजे.
  13. मधुमेह लवकरात लवकर शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्वांनाच लक्षणांची व कारणांची नीट माहिती पाहिजे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate