অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यकृत – सूत्रण रोग

यकृताच्या ज्या चिरकारी (दीर्घकालीन) विकृतीत यकृत कोशिकांचा (पेशींचा) नाश, तंत्वात्मकता व पुनर्जनित ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाच्या) गाठी एकाच वेळी यकृतात आढळतात आणि ज्यामध्ये यकृताची अंतःस्थ रचना विस्कळीत झालेली असते, तिला ‘यकृत-सूत्रण रोग’ म्हणतात. अनेक कारणांमुळे उद्‌भवणाऱ्या या रोगात यकृतावरील परिणाम एकसारखाच–अपरिवर्तनीय व पूर्णपणे बरा न होणारा–असतो.

यकृत-सूत्रण रोगात दोन प्रमुख दुष्परिणाम आढळतात

  1. यकृत कोशिकांच्या क्रियाशीलतेचा नाश
  2. प्रवेशिका नीलेतील अतिरिक्त दाब.

संप्राप्ती

या रोगाची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

अल्कोहॉल : ब्रिटनमध्ये या रोगाचा व अल्कोहॉल अतिसेवनाचा घनिष्ठ संबंध असल्याचे आढळले आहे. प्रत्येक तीन रुग्णांपैकी दोन मद्यासक्त असतात. फ्रान्स व अमेरिकेत हे प्रमाण अधिक आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात २५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांनी ४ ते ३० बाटल्या लिकर (एथिल अल्कोहोलाचे जादा प्रमाण असलेले मद्य, उदा., व्हिस्की) दरमहा कित्येक वर्षे सेवन केल्याचे एका पाहणीत आढळले होते. मुस्लिमधर्मी राष्ट्रांतून व बहुतेक उष्ण कटिबंधीय प्रदेशांतून पाश्चात्य देशांपेक्षा यकृत-सूत्रण रोगाचे प्रमाण पुष्कळच कमी आहे. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक धोका असतो, तसेच दररोज मद्य सेवन करणाऱ्यांत अधूनमधून केव्हा तरी पिणाऱ्यांपेक्षा रोग होण्याची शक्यता अधिक असते. अल्कोहॉलाचा यकृतावरील दुष्परिणाम का व कसा होतो हे अद्याप अज्ञात आहे;मात्र ते हानिकारक निश्चितच आहे.

व्हायरस संसर्ग : व्हायरस-ब आणि-अ विरहित, ब-विरहितजन्य चिरकारी ⇨यकृतशोथा नंतर हा रोग झाल्याचे आढळते. व्हायरस-अ चिरकारी शोथ कधीच उत्पन्न करीत नाही.

चयापचयात्मक बिघाड

(शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींतील बिघाड). रक्तविवर्णता या जन्मजात आनुवंशिक दोषामुळे उद्‌भवणाऱ्या रोगात प्रमाणापेक्षा जादा लोह अभिशोषित होते व प्रथिनबद्ध लोहाचे प्रमाण वाढते. हीमोसिडेरीन या लोहयुक्त प्रथिनाचा यकृतात संचय होऊन यकृत-सूत्रण रोग उत्पन्न होतो. विल्सन रोग (एस्‌. ए. के. विल्सन या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा कौटुंबिक आनुवंशिकता असलेला आणि तांब्याच्या चयापचयात बिघाड उत्पन्न होणारा रोग) या विकृतीत तांब्याचा अतिसंचय रोगोत्पादक असतो.

औषधजन्य

मिथिल डोपा (अतिरक्तदाबावरील औषध) व मिथोट्रेक्झेट(कर्करोगावरील औषध) यांच्या दीर्घकालीन सेवनामुळे हा रोग होतो. फिनिल ब्युटाझोन(संधिवाताभ संधिशोथात वापरण्यात येणारे औषध) आणि सल्फॉनामाइडेही कधीकधी यकृत-सूत्रण रोगास कारणीभूत असल्याचे आढळले आहे.

पित्तस्थिरता

पित्त यंत्रणेत कोठेही दीर्घकालीन अवरोध उत्पन्न झाल्यास हा रोग होतो व त्याला ‘पैत्तिक यकृत-सूत्रण रोग’ म्हणतात.

रक्ताधिक्य

दीर्घकालीन यकृत रक्ताधिक्य रोगोत्पादक असू शकते. ही विकृती अत्यल्प प्रमाणातच आढळते, कारण रोग सुरू होण्यापूर्वीच पुष्कळ वेळा मृत्यू आलेला असतो.

प्रतिरक्षासंबंधित कारणे

(रोगप्रतिकारक्षमतेशी संबंधित असलेली कारणे). काही अज्ञात कारणांमुळे चिरकारी यकृतशोथाच्या रोग्यामध्ये अपसामान्य रक्तरस प्रतिपिंडे (हानिकारक बाह्य पदार्थांना प्रतिकार करण्यासाठी रक्तरसात तयार होणारी विशिष्ट प्रथिने) असल्याचे आढळले आहे. ही स्वार्जित प्रतिपिंडे स्वतः कोशिकांवर विषारी परिणाम करीत नाहीत; परंतु त्यांचे अस्तित्व यकृतनाश हा अपसामान्य प्रतिरक्षा यंत्रणेद्वारे होत असावा, असे दर्शविते. हल्ली तीव्रग्राहित लसीका कोशिका यकृतनाशास कारणीभूत असल्याबद्दल संशोधन चालू आहे.

अपपोषण

यकृत-सूत्रण रोगास अपपोषण प्रत्यक्ष कारणीभूत नसले, तरी ते दुय्यम कारण असू शकते.

प्रच्छन्न यकृत-सूत्रण रोग

कोणतेही निश्चित कारण नसताना उद्‌भवणाऱ्या या प्रकारात जवळजवळ ३०% रुग्णांचा समावेश होतो.

मधुमेह, अत्यवटुत्व, व्रणीय बृहदांत्रशोथ (मोठ्या आतड्याची व्रणोत्पादक दाहयुक्त सूज) या रोगांच्या रुग्णांमध्ये यकृत-सूत्रण रोगाचे प्रमाण अधिक आढळते.

विकृतिविज्ञान

  1. ढोबळ फरक : यकृत आकुंचित, थोडे वाढलेले किंवा प्राकृतिक (सर्वसाधारण आकारमानाचे) असू शकते. पृष्ठभाग बृहत्‌ ग्रंथिल (गाठीयुक्त), लघू ग्रंथिल किंवा मिश्र प्रकारात विभागलेला दिसतो. यकृत घट्ट लागते आणि कापताना खडबडीतपणा जाणवतो.
  2. सूक्ष्म फरक : यकृत कोशिकांचा ऊतकमृत्यू, प्रधानोतकाचा निपात, उरलेल्या कोशिकांचा पुनर्जननाचा प्रयत्न, तंत्वात्मक ऊतकाची वाढ, रक्ताभिसरणात बदल या गोष्टी प्रामुख्याने आढळतात. संपूर्ण रचनाच विस्कळित झालेली आढळते.

वर वर्णिलेले तीन ढोबळ प्रकार अस्थिर असतात आणि एकाचे दुसऱ्यात रूपांतर होण्याची नेहमीच शक्यता असते.

यकृत-सूत्रण रोगाची लक्षणे : (१) विलोमता, (२) नेत्रोत्सेध (नेत्रगोल नेहमीपेक्षा जास्त पुढे येणे), (३) कावीळ, (४) वाहिकास्फीती, (५) मुख दुर्गंधी, (६) पुं-स्तन वृद्धी, (७) स्नायू अपकर्ष, (८) यकृत आकार, (९) प्लीहा आकार, (१०) जलोदर, (११) विलोमता, (१२) लघू वृषण (पुं-जनन ग्रंथी), (१३) शोफ (द्रवयुक्त सूज), (१४) नीलारुण.

लक्षणे

लघू ग्रंथिल विकृती बराच काळपर्यंत लक्षणविरहित असू शकते. लक्षणांची सुरुवात नकळत किंवा एकाएकी होते. अशक्तता, थकवा, वजन कमी होणे ही बहुधा आढळतात. प्रगत रोगात गंभीर क्षुधानाश, मळमळणे व उलट्या होतात. षंढत्व, कामुकता नाश, स्त्रियांत अनार्तव (मासिक स्रावाचा अभाव) व पुरुषांत वेदनाकारक स्तनवृद्धी ही लक्षणे आढळतात. १५ ते २५% रुग्णांत (रक्ताची उलटी) हे प्रथम लक्षण असू शकते. ७०% रुग्णांत यकृत वृद्धी आढळते. वाहिकास्फीती (सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे विस्फारण), नीलारुण (त्वचेखाली आपोआप व जागजागी रक्तस्राव होणे) यांसारखी त्वचा लक्षणे, जीवनसत्त्वन्यूनताजन्य जीव्हाशोथ व ओष्ठविदारण ही लक्षणे आढळतात. कावीळ सुरुवातीस सौम्य व नंतर वाढत जाऊन गंभीर अवस्थेत जाते. छाती व डोक्यावरील केस अतिविरल होतात (विलोमता). ३५ ते ५०% रुग्णांत प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) आढळते. जलोदर व परिफुप्फुस निःसरण (फुप्फुसावरील पातळ पटलमय आवरणाच्या दोन थरांतील पोकळीत द्रव गोळा होणे) ही उशीरा आढळणारी लक्षणे आहेत. शेवटी शेवटी हस्तकंप व बेशुद्धी ही लक्षणे उद्‌भवतात. काही प्रमुख लक्षणांचा गोषवारा आकृतीत दर्शविला आहे.

प्रमुख उपद्रव

जठरांत्र मार्गाच्या (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणाऱ्या अन्नमार्गाच्या) वरच्या भागातून रक्तस्राव, कधी कधी रक्तापनयन (अती रक्तस्रावामुळे येणारी रक्तहीन अवस्था), यकृत कोशिकांच्या स्वनियंत्रित अनिर्बंध पुनर्जननातून कर्करोगोत्पादन हे गंभीर उपद्रव संभवतात. रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळे फुप्फुसाचे व पर्युदराचे (उदर पोकळीतील अंतर्गत इंद्रियांवर पसरलेल्या अस्तरासारख्या पातळ पटलाचे) संसर्गजन्य रोग उद्‌भवतात.

फलानुमान

(रोगाचे स्वरूप व लक्षणे यांवरून रुग्ण बरा होण्याच्या शक्यतेविषयीचे अनुमान). यकृत-सूत्रण रोग ही एक प्रगामी विकृती असून रोग गती निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबून असते. अल्कोहॉलजन्य रोगात व्यसनमुक्त रोगी पाच वर्षांपर्यंत जिवंत राहण्याचे प्रमाण ६०%, तर व्यसनाधीन व्यक्तींत ४०% असते. कावीळ, जलोदर, रक्तस्राव,मस्तिष्कविकृती (मेंदूशी संबंधित असलेली विकृती) ही लक्षणे गंभीर फलानुमान दर्शवितात. ग्रसिका अपस्फीतीतून (घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या नलिकेच्या विस्फारणातून) होणारा रक्तस्राव ५०% रुग्णांत मारक ठरतो.

उपचार

यकृत-सूत्रण रोग परिवर्तित करणारा किंवा रोगाची प्रगती रोखणारा कोणताही इलाज आज उपलब्ध नाही. सर्व उपचारांचा हेतू शरीर स्वास्थ्य सुधारणे व रोग्यास त्रासापासून मुक्त करून आराम पोहोचवणे हाच असतो. गंभीर उपद्रवाकरिता रुग्णालयीन उपचार आवश्यक असतात.

 

संदर्भ : 1. Datey, K. K.; Shah, J. S., Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.

2. Macleod, J. and others, Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Hongkong, 1984.

3. Petersdorf, R. G. and others, Ed., Harrison’s principles of Internal Medicine, Singapore, 1983.

4. Scott, R. B. and others, Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.

लेखक : य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate