आपल्या अंगावर रक्तवाहक 'शिरा' (नीला) दिसतात त्या मुख्यतः पाऊल व हातावर. कृश चरबीरहित शरीर असेल तर या शिरा जास्त दिसतात. व्यायामाने अंग पिळदार झाले असल्यास देखील अशा शिरा दिसतात.
मात्र काही वेळा ही कारणे नसून देखील नीला फुगलेल्या व मोठया दिसतात. पोट,छाती, मांडया, दंड या नेहमी शिरा न दिसणा-या भागावरही शिरा दिसू लागल्या तर आजार संभवतो. म्हणजे या नीलांमधला रक्तप्रवाह तुंबून राहिला आहे असा निष्कर्ष काढता येईल. ज्या नीलांना अडथळा येईल त्या फुगतील. अशा निळसर फुगलेल्या नीलांवरून आतील प्रवाहात कोठेतरी अडथळा असू शकतो. किंवा यावरून हृदय रक्त वर नीट खेचत नाही हे अनुमान काढता येते. हा अडथळा लवकर दूर झाला नाही तर त्या त्या भागांत पाणी जमून सूज येते. उदा. पायातील नीला तुंबली असल्यास त्या पायाला सूज येते.
छातीच्या मध्यरेषेच्या डाव्या बाजूला हृदय असते. हृदय छातीच्या पिंज-याच्या फासळयांना लागूनच आत असते. जर शरीरावर चरबी फार नसेल तर त्याची हालचाल डोळयांना दिसते. चरबी फार असेल तर मात्र ही हालचाल वरून दिसत नाही. जेव्हा हृदयात दोष उत्पन्न होऊन ते रक्त ढकलण्याचा जास्त प्रयत्न करू लागते तेव्हा ती हालचाल वर दिसते. ही हालचाल नाडीच्या प्रत्येक ठोक्यासरशी दिसून येते. आपला हात हृदयावर ठेवूनसुध्दा ही हालचाल कळू शकते. तातडीच्या प्रथमोपचाराच्या वेळी हे तपासावे लागते.
आवाजनळी हृदयावर लावली तर नाडीच्या ठोक्यागणिक 'लब - डप' असा डबल आवाज ऐकू येतो. हृदयाच्या झडपांमध्ये दोष निर्माण झाला, की या आवाजाची पध्दत बदलते. यामुळे मध्येमध्ये ठोक्यागणिक 'थरथर' ऐकू येते. हृदयातल्या रक्ताच्या प्रवाहात उलटसुलट गती निर्माण झाल्यामुळे ही थरथर होते. आवाजनळी नसेल तर छातीला नुसता कान लावूनही लब- डप चा नेहमीचा आवाज किंवा थरथर ऐकू येते.
लेखक: डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ: आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/24/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...