অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यसन : तंबाखू

तंबाखू हा सर्वात प्राचीन व्यसनपदार्थ आहे. त्याचा फार पूर्वी चलन म्हणून वापर होत असे, इतके त्याचे महत्त्व होते. आताही तंबाखू व विडी-सिगारेट हे सर्वात जास्त प्रचलित व्यसन आहे. त्याचा वापरही अवाढव्य आहे. धूर ओढणे, चघळणे,तपकीर वगैरे पध्दतींनी तंबाखू वापरली जाते.

तंबाखू चे शारीरिक दुष्परिणाम

  1. निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुप्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो.
  2. रक्तवाहिन्यांवर होणा-या त्याच्या परिणामांमुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. (उदा. बोटे काळी पडून झडणे.) निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल, श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो.
  3. श्वसनमार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबंध आहे .धूम्रपान करणा-यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे.
  4. गरोदरपणी धूम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात.
  5. हृदयाच्या रक्तवाहिन्या निकोटीनमुळे खराब होऊन हृदयविकार बळावतो हेही सिध्द झाले आहे.
  6. रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाबही वाढतो
  7. श्वसनसंस्थेत कफ बळावणे, श्वासनलिका-उपनलिका अरुंद होणे वगैरे परिणाम होऊन श्वसनाचा कायमचा आजार मागे लागतो. त्यामुळे पुढे हृदयही बिघडते.

तंबाखू च्या धुळीत काम करणा-या कामगारांना सतत तंबाखू छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात (व्यवसायजन्य आजार). एकाच वेळी जास्त तंबाखू - धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ, उलटया, चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळयाच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठया होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो (अशक्तपणा, स्नायू उडणे) व शेवटी मृत्यू येऊ शकतो.

आधीच श्वसनाचे रोग, हृदयविकार, अल्सर, आम्लता, रक्तदाब इ. विकार असतील तर तंबाखू ने ते बळावतात.

तंबाखू

  1. धूम्रपानाचे परिणाम हे जास्त लवकर आणि घातक होतात. त्यामानाने तंबाखू चघळणे (कॅन्सर सोडता) कमी धोकादायक आहे.
  2. खरे तर दारूपेक्षा अधिक नुकसान तंबाखू ने (विशेषतः धूम्रपानाने) होते. कुटुंबाचा रोजचा तंबाखू चा खर्च एकदोन रुपयांपासून वीस-पंचवीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गरीब कुटुंबात हे मोठेच संकट असते. सिगारेटपेक्षा विडी स्वस्त असली तरी विडी- जास्त गरीब असल्याने नुकसान होतेच.
  3. तंबाखू ला जर आळा घालता आला तर वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठया प्रमाणात वाचेल. त्यासाठी तंबाखू पिकविणा-यांना आणि कारखानदारांना दुस-या उत्पन्नाचा शोध घ्यावा लागेल. पण तंबाखू -धूम्रपानावर बंदी घालणे अवघड आहे. तंबाखू चे आर्थिक साम्राज्य फार मोठे आहे.
  4. सिगारेट उद्योगाने एकेकाळी जाहिरातीने प्रचंड प्रसार करून घेतला. यातला धोका लक्षात आल्यावर अनेक देशांच्या सरकारांनी सिगरेटच्या जाहिरातीस बंदी केली. एवढेच नव्हे तर धूम्रपान हे आरोग्यास धोकादायक आहे. हा इशारा पाकिटांवर छापणे भाग पाडले. नव्या कायद्याप्रमाणे आता तंबाखू उत्पादनांवर धोक्याचे चित्र छापणे बंधनकारक झाले आहे.
  5. सरकारी कार्यालयातही धूम्रपानास आता बंदी आहे. बस, रेल्वे वगैरे ठिकाणी धूम्रपानाला बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणच्या धूम्रपानाला आता बंदी आहे.
  6. धूम्रपान करणा-याबरोबर जवळच्या माणसालाही धूम्रपानाचा फुकट तडाखा बसतो, कारण हवेत धूर पसरलेला असतो. प्रत्यक्ष धूम्रपानाप्रमाणे या फुकट धूम्रपानानेही आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यावाचून राहात नाहीत.
  7. धूम्रपानाची सवय सर्वसाधारणपणे विशीआधी किंवा विशीमध्ये लागते. बहुतेक वेळा इतरांचे पाहून किंवा मित्राचा आग्रह किंवा केवळ गंमत म्हणून सुरुवात होते. हळूहळू सवय लागते. धूम्रपानात इतर मादक पदार्थ मिसळून घेण्याचे प्रमाणही वाढत आहे.
  8. धूम्रपान ही एक गलिच्छ व आजारी करणारी सवय आहे हे लहानपणापासून मनावर ठसवले पाहिजे. धूम्रपानाने दात पिवळे पडतात. तोंडाला दुर्गंधी येते. अनेक आजार होतात,पैसे तर जातातच. हे सर्व मुलांच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

 

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate