न्यूमोनिया म्हणजे 'फुप्फुसाची सूज' (क्षयरोगाची सूज दीर्घ मुदतीची असते.) न्यूमोनिया हा अचानक येणारा अल्पमुदतीचा तीव्र आजार आहे. उपचार न केल्यास मृत्यू येऊ शकतो. न्यूमोनिया हा सूक्ष्मजंतूंमुळे होणारा आजार आहे. हा आजार कोणत्याही वयांत येऊ शकतो.
पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त आढळते.भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात. (लहान मुलांच्या प्रकरणात याबद्दल जास्त माहिती दिली आहे.) अंथरुणाला खिळलेल्या वृध्द माणसांनाही किंवा मोठया शस्त्रक्रियेनंतर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
सतत जास्त ताप, खोकला, छातीत दुखणे, दम लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
पाच वर्षाखालील मुलांमध्ये दर मिनिटास 50 पेक्षा जास्त वेगाने श्वास चालत असल्यास (धाप) व बरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची दाट शक्यता असते. न्यूमोनियाचे निदान सोपे आहे. वेळीच उपचार झाल्यास प्राण वाचू शकतील. रडणा-या लहान मुलांना आवाजनळीने तपासणे अवघड असते. यातून चुकीचा समज होऊ शकतो. मुलांच्या रडण्याचा आवाज व श्वसनाचा आवाज वेगळा काढणे फार अवघड असते. ताप व श्वसनाचा वेग एवढयावरून मुलांमध्ये निदान करता येते.
मुलांच्या तपासणीत ताप व श्वसनाचा वेग तपासणे आवश्यक आहे. यापुढील वयातल्या रुग्णांच्या छातीवर बोटाने ठोकून पाहिल्यास फुप्फुसाच्या सुजलेल्या भागावर 'ठक्क' असा आवाज येईल. आवाजनळीने त्या भागात बारीक बुडबुडयांचा आवाज येतो. अशा व्यक्तीला छातीत दुखत असल्यास त्या जागी या खुणा आढळतात.
मोठया माणसांना 5 दिवस तोंडाने ऍंमॉक्सी किंवा कोझाल दिल्यास आजार बरा होऊ शकेल. न्यूमोनिया आढळल्यास उपचार चालू करून मग तज्ज्ञाकडे पाठवावे. यामुळे उपचार लवकरात लवकर होऊन आजाराची तीव्रता कमी होईल.
मुलांचा न्यूमोनिया हा आजार स्वतंत्र प्रकरणात दिला आहे. इतर वयात न्यूमोनियाचे जंतू अनेक प्रकारचे असतात व काही प्रकार जास्त घातक असतात. त्यामुळे शक्यतो तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे. जंतुविरोधी औषधांबरोबरच पॅमाल, ऍस्पिरिन,विश्रांती व हलका आहार द्यावा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...