स्वाईन फ्लू, नावाप्रमाणंच, हा डुकरांना होणा-या फ्लूमधून उत्पन्न झालेला एक विषाणू आहे. एखाद्या माणसाला एकतर स्वाईन फ्लूच्या रुग्णाकडून किंवा एखाद्या डुकराकडून संक्रमण होऊ शकतं. हा इन्फ्लुएन्झा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर फार थोडा वेळ जगतो आणि ह्याच कारणानं तो उन्हाळ्याच्या उष्णतेत जगू शकत नाही पण पाऊस आणि हिवाळ्यात दीर्घकाळ जगतो. म्हणून, त्याचा प्रसार मॉन्सून आणि हिवाळ्यात अधिक होतो. ऐकायला विचित्र वाटेल, पण अन्य कोणत्याही फ्लूपेक्षा स्वाईन फ्लूमुळं मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत नाहीत. पण, म्हणून आपण खबरदारी घ्यायची नाही असं मात्र नाही. हा विषाणू बरेचदा आपलं रुप बदलतो, आणि म्हणून तो एखादी लस लवकरच किंवा काही काळानं निरुपयोगी ठरवतो. हा विषाणू रुग्णाच्या खोकल्यातून, शिंका, हातरुमाल, बिछान्यावरील चादरी, इ. मधून पसरतो. अशी अनेक संक्रमणं आपल्या नकळत पसरतात. दुर्मिळ प्रसंगी न्यूमोनियामुळं श्वसनक्रिया निकामी झाल्यानं तो घातक ठरु शकतो. स्वाईन फ्लूची नेहमीची लक्षणं ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा बसणं आणि वाहणारं नाक ही आहेत. परंतु औषधं घेण्यात घाई करु नका. प्रत्येक फ्लूसमान आजारात टॅमीफ्लूसारखं विषाणूविरोधी औषध घेणं आवश्यक नाही. या औषधाचे स्वतःचे दुष्प्रभाव आहेत. पण, आपण सुनिश्चित रुग्णांच्या संपर्कात असाल, किंवा काही विशिष्ट जोखीम असेल तर, आपण शक्य तितक्या लवकर विषाणूविरोधी औषध घ्यावं पण यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्वाईन फ्लूची लक्षणं नेहमीच्या फ्लूसमान असू शकतात, म्हणून त्याची खात्री करणं आवश्यक आहे. तसं करण्यासाठी, नाक आणि घशातील नमुन्याची प्रयोगशाळा तपासणी पुरेशी आहे.
स्वाईन प्लूच्या रुग्णाने विशेष काळजी घेतली पाहिजे. बहुतांश रुग्णांमध्ये बरं होण्यासाठी घरी आराम करणं, द्रवपदार्थ पिणं आणि पॅरासिटेमॉल गोळ्या घेणं या पद्धती बहुधा पुरेशा ठरतात. डॉक्टर-दवाखान्यांसाठी धावपळ करण्याची गरज नाही. इंजेक्शनं किंवा सलाईनची देखील गरज नाही.
पण आपल्याला श्वास घेण्यात अडचण होत असेल, किंवा तीन दिवसांहून अधिक काळ टिकलेला ताप असेल तर आपण डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
पालकांनो, आपल्या मुलाला फ्लूसमान लक्षणं दिसत असतील, त्या मुलाचा श्वास जलद होत असेल किंवा घेण्यात अडथळा होत असेल, सतत ताप किंवा मूर्च्छा येत असेल तर आपण डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण ठराविक गोष्टींचं पालन करणं अत्यावश्यक आहेः
स्वाईन फ्लूवर आता इंजेक्शन आणि नाकात स्प्रेच्या स्वरुपात लसी उपलब्ध आहेत. पण, तज्ञांच्या मते लस ही प्रत्येकासाठी नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला स्वाईन फ्लू होण्याची जोखीम असेल तरच या लशीची शिफारस केली जाते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याविना लसी घेऊ नका.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/1/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...