অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅडिसन रोग

अ‍ॅडिसन रोग

अ‍ॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्काच्या बाह्यकात (बाह्य स्तरात) उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकाचे (रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावाचे) न्यूनत्व अथवा अभाव झाल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला ‘अ‍ॅडिसन रोग’ असे म्हणतात.

टॉमस अ‍ॅडिसन यांनी या रोगाचे प्रथम वर्णन केले, म्हणून या रोगाला त्यांचे नाव पडले. हा रोग वयाच्या तिशीपूर्वी व साठीनंतर सहसा आढळत नाही.

अधिवृक्क बाह्यकात क्षयजंतूचा संसर्ग झाल्यानेच हा रोग होतो, अशी पूर्वी समजूत होती. अधिवृक्कावरील शस्त्रक्रिया, जंतुसंसर्ग आणि अर्बुदोत्पत्ती (पेशींच्या अतिरिक्त वाढीमुळे होणारी निरुपयोगी गाठींची उत्पत्ती) या कारणांनीही हा रोग होतो. सापेक्षतः ह्या रोगाचे प्रमाण अगदी अल्प असते.

अधिवृक्क-बाह्यकात उत्पन्न होणारी कॉर्टिकॉइड, ग्‍लुकोकॉर्टिकॉइड, स्त्री-मदजन (एस्ट्रोजन) आणि पौरुषजन (अँड्रोजन) ही प्रवर्तके या रोगात मुळीच उत्पन्न होत नाहीत किंवा अगदी स्वल्प प्रमाणातच उत्पन्न होतात.

लक्षणे

त्वचेचा रंग बदलून ती काळपट तपकिरी रंगाची होते. अशक्तता, भूक न लागणे, मळमळ, ओकाऱ्या, शरीराचे वजन कमी होऊन अत्यंत अशक्तपणा येणे, रक्तदाब कमी होणे, पांडुरोग (रक्तातील तांबड्या पेशींचे, हीमोग्‍लोबिनाचे किंवा दोहोंचे प्रमाण अथवा रक्ताचे एकूण घनफळ कमी झाल्यामुळे होणारा रोग) आणि मानसिक औदासीन्य ही लक्षणे दिसतात.

लक्षणे उत्तरोत्तर वाढतच जातात. त्वचेच्या आधारस्तरात कृष्णरंजक (काळपट रंग, मेलॅनीन) पदार्थ अधिक साठून राहिल्यामुळे त्वचा काळपट तपकिरी दिसू लागते.

चेहरा, मान, हाताची मागची बाजू, कंबर, तोंडातील श्लेष्मकला (नाजूक अस्तर) व हिरड्या या सर्व ठिकाणी त्या रंगाचे डाग दिसू लागतात व ते वाढत जातात.

रक्तात सोडियम व क्लोराइड यांचे प्रमाण फार कमी होते, पोटॅशियमाचे प्रमाण वाढते. रोगाच्या लक्षणांचे आवेग (झटके) येतात व त्या आवेगांच्या वेळी हे रक्तदोष अधिक दिसतात. त्वचेचा रंग, रक्तदाब कमी होणे व आत्यंतिक अशक्तता यांमुळे रोगाचे निदान करणे शक्य होते. मूत्र व रक्तपरीक्षेची निदानाला मदत होते.

चिकित्सा

पोटात मीठ अधिक प्रमाणात दिल्यास किंवा नीलेतून मिठाच्या विद्रावाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यास प्रकृती सुधारते.

या रोगावर १९२९ पर्यंत परिणामकारक उपाय उपलब्ध नव्हता, त्यामुळे एकदा रोग झाला की सर्व रोगी दगावत. त्या वर्षी स्विंगल आणि फायफर यांनी जनावरांच्या अधिवृक्क-बाह्यकाचा अर्क तयार करून त्याचे रोग्यांत अंतःक्षेपण केले, त्याचा परिणाम चांगला दिसू लागला.

या अर्काचे फार मोठ्या प्रमाणात अंतःक्षेपण करावे लागे, ही मोठी अडचण होती. त्यानंतर कॉर्टिसोन, डेसॉक्सिकॉर्टिकोस्टेरोन वगैरेंचा शोध व उत्पादन होऊ लागल्यापासून त्यांचे अंतःक्षेपण केल्यास अथवा पोटात गोळ्या दिल्यास पुष्कळ गुण येतो. कॉर्टिसोनापासून तयार केलेली अनेक औषधेही गुणकारी ठरलेली आहेत.

डेसॉक्सिकॉर्टिकोस्टेरोन अ‍ॅसिटेट या पदार्थांच्या गोळ्यांचे त्वचेखाली रोपण केल्यासही (आत ठेवल्यासही) गुण येतो. हा गुण सहा ते आठ महिने टिकू शकतो. त्यानंतर पुन्हा रोपण करावे लागते.


लेखक : वा. रा. ढमढेरे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/23/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate