पीतज्वर हा व्हायरसजन्य तीव्र स्वरुपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी, कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत. गंभीर अवस्थेत रुग्णास रक्ताच्या उलट्या, मूत्रातून प्रथिनांचे उत्सर्जन व कावीळ यांचा त्रास होतो. रक्ताभिसरण-शैथिल्य ओढवते. मागोमाग रुग्ण त्वरित दगावतो
आफ्रिका व दक्षिण अमेरिका या खंडांतील उष्ण कटिबंधीय भरपूर पाऊस असलेल्या भूभागात तो मुख्यत्वे आढळतो. नागरी पीतज्वर आणि अरण्यातील पीतज्वर असे याचे रोगपरिस्थितिविज्ञानदृष्ट्या दोन प्रमुख प्रकार आहेत. नागरी प्रकारात ईडिस ईजिप्ताय या डासाव्दारे एका रुग्णापासून दुसऱ्यास संसर्ग होतो, तर अरण्य पीतज्वर मुख्यत: दाट जंगलाच्या मध्यभागी वस्ती करणाऱ्या माकड आणी त्यासारख्या इतर प्राण्यांत होतो आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या डासांव्दारे त्याचा प्रसार होतो. काही कारणामुळे हे डास माणसास चावल्यास माणसास रोग होऊन त्यासोबत तो नागरी भागात येतो.(कारणपरंपरा). पीतज्वरास कारण असलेले व्हायरस हे संधिपाद प्राण्यांद्वारा प्रसार होणारे व्हायरस असून ‘ब’ गटात मोडतात. त्यांचे सर्वसाधारण आकारमान ३८ मिलिमायक्रॉन (१ मिलिमायक्रॉन = १०-९ मी.) असते. नव्याने शरीरात शिरलेले व्हायरस तंत्रिकाकर्षी (मज्जा कोशिका-पेशी-समूहांचे आकर्षण असणे) व अंतस्त्याकर्षी (छाती व उदर यांतील अंतर्गत इंद्रियांचे आकर्षण असणे) अशा दोन्ही गुणधर्मांनी युक्त असतात. यकृत, मूत्रपिंड, हृदय इ. अवयवांच्या शोथाव्दारे (दाहयुक्त सुजेव्दारे) अंतस्यार्कर्षण प्रगट होते, तर तंत्रिकाकर्षण केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या शोधाने दिसून येते. उंदराच्या मेंदूत व्हायरस पुनः पुन्हा एकातून दुसऱ्यात असे वाढवीत गेल्यास त्यांचे अंतस्त्याकर्षण नष्ट होऊन ते फक्त तंत्रिकाकर्षी उरतात. या गुणधर्माचा उपयोग करुन कोंबडीच्या गर्भातून बनविलेल्या ऊतकसंवर्धन (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या समूहाची कृत्रिम रीत्या वाढ करण्याच्या) माध्यमात १७ डी व्हायरस जाती पुन:पुन्हा वाढवून पीतज्वरविरोधी लस बनविण्यात येते. संपूर्ण जगभर ठिकठिकाणची सर्व माणसे या रोगास पात्र असून रोगलक्षणे अंतस्या्यकर्षणामुळे होतात. माकडाच्या काही जाती (उदा., ऱ्हीसस) या रोगास अत्यंत संवेदनाशील असून ताबडतोब मरतात, तर काही जाती रोगातून बऱ्या होतात. पांढरे उंदीर हेही व्हायरसाच्या तंत्रिकाकर्षी गुणधर्मास अत्यंत संवेदनशील असतात.
नागरी पीतज्वराचा प्रसार ईडिस ईजिप्ताय या डासाव्दारे होतो. हा डास मुख्यत्वे घरादारात वावरतो. दिवसा उजेडी चावतो. घरातील व आजुबाजूच्या साठलेल्या वा साठवलेल्या पाण्यात वाढतो. रोगाचा प्रसार डासाच्या मादीकडून होतो. डास रोग्याला चावल्यानंतर व्हायरस डासाच्या शरीरात शिरतात. १० ते २० दिवसांच्या कालावधीनंतर हा डास निरोधी व्यक्तिस चावून रोगाचा प्रसार करु लागतो.
अरण्य पीतज्वराची बाधा कारणपरत्वे जंगलात गेलेल्या माणसास (शिकारी, लाकूडतोडे वगैरे) तेथील दूषित डास चावल्यामुळे होते. खूप पाऊस पडत असलेल्या जंगलात हा रोग माकडांमध्ये सततच अस्तित्वात असतो. तेथून रोगाच्या साथी नागरी भागात पसरतात. १९३४ नंतर या रोगाच्या मोठया साथी पसरलेल्या नाहीत. बंदरात अथवा विमानतळावर रोगाचा उद्रेक झाल्याचे आढळून आले, तर ताबडतोब विलग्नवासाची (रुग्ण इतरांपासून वेगळा ठेवण्याची, क्वारंटाइनची) कडक दक्षता घेण्यात येते. भारतात याचा अद्यापपर्यंत कधीही उद्रेक झालेला नाही; परंतु याचा प्रसार करणारे ईडिस ईजिप्ताय हे डास येथे भरपूर आहेत व सर्व जनतेत रोगाचा पूर्वसंपर्क नसल्यामुळे प्रतिकारक शक्ती अजिबात नाही. तेव्हा हा रोग येथे उद्भवल्यास फार भयंकर साथ उद्भवू शकेल.बहुसंख्य रोग्यांत रोगाचे स्वरुप सौम्य, किंचित डोकेदुखी व थोडा ताप एवढ्यापुरतेच मर्यादित असते. रोगी काही दिवसांत बरा होतो. संसर्गाच्या दृष्टीने हे रोगी महत्वार्चे असतात. डासावाटे ते रोगप्रसार करु शकतात. म्हणूनच त्यांना झालेल्या सौम्य वा क्षुल्लक रोगाचे निदान होणे महत्त्वा चचे असते. पीतज्वर क्षेत्रात अशा रोग्यांचे अचूक निदान होणे अत्यंत महत्वाह्चे असते. रोगाचा परिपाककाल (व्हायरस शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष लक्षणे दिसेपर्यंतचा काळ) तीन ते सहा दिवसांचा असून सुरुवात एकदम होते. पूर्व लक्षणे काहीही नसतात. रोगाचा पहिला टप्पा तीन दिवसांचा असतो, त्यास शोथावस्था म्हणतात. तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, कसकस, पाय दुखणे, थकवा इ. त्रास होतो. चेहरा व डोळे लाल होतात. प्रकाशाकडे बघवत नाही. जिभेचा शेंडा लाल होतो. सुरुवातीस कावीळ नसते. ताप एकदम ४०० से. पर्यंत किंवा त्यापेक्षा वर चढतो. त्या प्रमाणात नाडीचा वेग वाढत नाही. सुरुवातीस नाडी वाढली, तरी नंतर कमी होते. पोटात मळमळते, उलट्या होतात, अस्वस्थ वाटते, बध्दकोष्ठ होते. रक्तातील पांढऱ्या कोशिकांची संख्या कमी होते.
तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मूत्रातून एकदम मोठया प्रमाणात प्रथिने जाऊ लागतात. यानंतर किंचित सुधारणा होऊन चौथ्या दिवसापासून ‘विषावस्थेस’ सुरुवात होते. ताप उतरतो, डोकेदुखी थांबते. रोगी अस्वस्थ व चिडचिडा होतो. हळूहळू शरीर पिवळे पडते व कावीळ वाढत जाते. सर्व तीव्र आजारी रोग्यांत कावीळ असतेच. निरनिरळ्या अवयवांत रक्तस्राव होतात. हिरड्या सुजतात आणि दाबल्यावर त्यांतून रक्त येते. घोळणा फुटतो, त्वचेखाली सूक्म्ढ किंवा मोठे रक्तस्रािळव आढळतात. जठर, आतडी, गर्भाशय यांतून गंभीर स्वरुपाचा रक्तसत्राव होऊ शकतो. नाडी दर मिनिटाला ५० पर्यंत कमी होते. हृदय स्नायुशोथामुळे रक्तदाबन्यूनत्व व हृदविस्तार हे विकार उद्भवू शकतात. उलट्या होतच असतात. जठरात रक्तस्राव जाल्यास रक्ताची उलटी होते. मूत्रातून प्रथिनोत्सर्जन वाढलेले असते. अखेरीस उचकी, खूप उलट्या, रुधिरज कृष्णमल (शौचास काळे होणे) या गोष्टी होतात; रोगी बेशुध्द होतो व दगावतो. तीव्र आजारी रोगी बरा होऊ लागतो तेव्हा सातव्या-आठव्या दिवसापासून प्रकृतीस उतार पडतो. प्रथिनोत्सर्जन थांबते. बरा झाला म्हणजे तो कायमचा बरा होतो. शरीरात कायमची रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते व रोगाचा पुनरुद्भवच होत नाही.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/30/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...