लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूंशी प्रथमच संबंध येतो. यात फुप्फुसात एक ठिपक्याइतका डाग तयार होतो. बालकाची प्रतिकारशक्ती अजून तयार झाली नसल्याने छातीतल्या रसग्रंथीपर्यंत वेगाने जंत पोचतात. यामुळे छातीतल्या रसग्रंथी सुजतात. या सर्व घडामोडीत मुलाला सहसा त्रास होत नाही. यामुळे रोगाला रसग्रंथीतच अटकाव होतो. काही महिन्यांनी असा आजार पूर्ण बरा होतो. याची वरून काहीही लक्षणे-चिन्हे नसतात.
असा प्रथम क्षयरोग आजार फक्त छातीचे क्ष-किरण चित्र व कातडीवरची विशेष परीक्षा (टीटी) करूनच कळू शकतो. काही वेळा याबरोबर छातीतल्या रसग्रंथी सुजल्याने गिळायला थोडाफार त्रास होतो.
भारतात बहुसंख्य व्यक्तींना हा प्राथमिक आजार होऊन गेलेला असतो. तो कळत पण नाही. मात्र काही बालकांचा प्राथमिक आजार बरा होत नाही. यातून खालीलप्रमाणे दोन फाटे फुटतात.
(अ) काही मुलांमध्ये प्रतिकारशक्ती मुळात अपुरी असते. यामुळे क्षयरोग रसग्रंथीच्या पलीकडे निरनिराळया इतर अवयवांत (मेंदू, मणके, सांधे, हृदय, इ.) पसरतो. ज्या अवयवांचा आजार होतो त्याप्रमाणे लक्षणे-चिन्हे असतात.
(ब) याउलट काही मुलांमध्ये फुप्फुसातच जागच्या जागी आजार वाढत राहतो. या फुप्फुसांच्या आजारात न थांबणारा खोकला, बारीक ताप, रोडपणा, वाढ मंदावणे, कुपोषण,इत्यादी लक्षणे आढळतात.
ब-याच मुलांमध्ये हा सौम्य चिवट आजार कळून येत नाही. मुद्दाम शंका घेऊन खास तपासणी केली तरच निदान होते. यासाठी छातीचा क्ष किरण फोटो उपयुक्त असतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/12/2020
आजीबाईचा बटवा-इतर आजारांसाठी
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
या लहान वृक्षाचा प्रसार कोकण, उत्तर कारवार, कर्नाट...
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्...