ट्रिपोनेमा पर्टेन्यू नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या अरतिज (संभोगाशी संबंधित नसलेला) परंतु सांसर्गिक असलेल्या रोगाला ‘यॉज’ म्हणतात. मूळ आफ्रिकन शब्द ‘यॉ’ असा असून त्याचा अर्थ ‘रासबेरी’ असा आहे. या रोगात त्वचा व अस्थी या भागांवर कणार्बुदे (कणमय पेशी समूहांनी बनलेल्या गाठी) तयार होतात व ती या फळासारखी दिसतात म्हणून या रोगास ‘यॉज’ हे नाव मिळाले आहे. त्याचे दुसरे नाव ‘फ्राम्बेझिया’ असे असून ते फ्राम्बोइस या रासबेरी या अर्थाच्या फ्रेंच शब्दावरून पडले आहे. कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यानच्या उष्ण कटिबंधीय भागात आढळणारी ही विकृती दक्षिण अमेरिका, वेस्ट इंडीज व उत्तर आफ्रिका या प्रदेशात आणि भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, ब्रह्मदेश, मलेशिया व फिलिपीन्स या देशांच्या काही भागांतून प्रदेशनिष्ठ स्वरूपात आढळते. उत्तर अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथेही ती कधी कधी आढळते.
इ. स. १९५०–६० या काळात जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाविरुद्ध पेनिसिलीन उपचाराची मोठी मोहीम हाती घेतली होती. १५·२ कोटी लोकांची तपासणी करून ४·६१ कोटी रुग्णांवर उपचार करून हा रोग जगाच्या काही भागांतच मर्यादित करण्यात यश मिळाले होते. अलीकडेच काही पश्चिम आफ्रिकी देशांतून यॉजचा पुन्हा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे व जागतिक आरोग्य संघटनेने १९८० पासून पुन्हा पेनिसिलीन उपचाराची मोहीम सुरू केली आहे.
त्वचेवर गोल लालसर पिटिका उत्पन्न होते. तिला ‘माता यॉज’ म्हणतात. पिटिकेचे लवकरच गाठीत रूपांतर होते. गाठीचे २ ते ५ सेंमी. व्यासाचे कणार्बुदीय किंवा अंकुरार्बुदीय स्वरूप बनते. पिटिका एक किंवा अनेक असू शकतात. दुय्यम सूक्ष्मजंतू संसर्गामुळे गाठी फुटतात व व्रण तयार होतात. त्यांतून स्राव वाहतो व त्याभोवती माश्या घोंगावत असतात. मूल मात्र हिंडत फिरत असते. संबंधित ⇨लसीका ग्रंथी वाढतात व स्पर्शासह्य बनतात. इतर सार्वदेहिक लक्षणे क्वचितच आढळतात.
२ ते ४ महिन्यांनतर आणि कधी कधी पाठोपाठ काखा, सांधे व बाह्येंद्रिये या ठिकाणच्या ओलसर त्वचेवर प्रसारित अंकुरार्बुदे उद्भवतात. तळपायावर व तळहातावरही अशी अर्बुदे होतात. चालणे व हातांचा वापर वेदनामय होतो. पायावरील अर्बुदांमुळे चाल खेकड्यासारखी बनते म्हणून याला ‘खेकडा यॉज’ म्हणतात. निरनिराळ्या अवस्थांतील ही अर्बुदे ६ ते ८ महिने टिकतात व बहुधा व्रणाशिवाय बरी होतात. मणिबंधातील (मनगटातील) अस्थी सोडून बाकीच्या बोटांच्या हाडांवर दुष्परिणाम होतो. नाकाची हाडे सुजतात व या सुजलेल्या नाकाला ‘गुन्डू’ म्हणतात. कधी कधी लांब हाडांवरही परिणाम होतो. पायातील अंतर्जंघास्थीवर (नडगीच्या हाडावर) परिणाम होऊन ‘खड्गाकार अंतर्जंघास्थी’ ही कायमची विद्रुपता तयार होते.
यॉज : हाताच्या कोपराच्या सांध्याजवळील त्वचेतील गाठी व अर्बुदे.
तृतीयावस्था
उपचार न केलेल्या रुग्णांपैकी १०% रुग्णांमध्ये काही वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा गाठी उत्पन्न होतात. त्यांची संख्या कमी असते व त्यांत सूक्ष्मजंतूंची संख्या कमी असल्यामुळे संक्रामकता कमी असते. दुय्यम सूक्ष्मजंतू संसर्गातून व्रण तयार होतात. ⇨उपदंशातील अर्बुदासारखी दिसणारी ही अर्बुदे अती ऊतकनाशक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांचा नाश करणारी) असतात. या अवस्थेत अस्थीवरही दुष्परिणाम होतात; परंतु ते द्वितीयावस्थेपेक्षा कमी वेदनामय असतात. चेहऱ्यावरील हाडांच्या दुष्परिणामामुळे नासास्थी व तालु-अस्थी नाश पावून चेहरा विद्रूप बनतो. याला ‘गॅन्गोसो’ या गेंगाणे किंवा नाकात बोलणे या अर्थाच्या स्पॅनिश शब्दावरून ‘गॅन्गोसा’ म्हणतात.संक्रामणशील व असंक्रामक अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना २·४ मेगॅ-एकक बेंझाथिन पेनिसिलीन-जी एकाच मात्रेत देतात. १० वर्षांखालील मुलांना १·२ मेगॅ-एकक पुरतात. पेनिसिलीनाची अधिहर्षता (ॲलर्जी) असणाऱ्यांना टेट्रासायक्लीन किंवा एरिथ्रोमायसीन योग्य मात्रेत देतात. जेवढी मात्रा रुग्णांना देतात तेवढीच संपर्कित व्यक्तींनाही देतात.
संदर्भ : 1. Datey, K. K.; Shah, S. J. Ed., A. P. I Textbook of Medicine, Bombay, 1979.
2. Petersdorf. R. G. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine,
Singapore, 1983.
3. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Tokyo, 1984.
लेखक : य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...