बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच. एखाद्या लोकसमूहाच्या संदर्भात एखाद्या आजाराचा अभ्यास करणे याला 'समूहरोगशास्त्र' म्हणता येईल. आजारांच्या संशोधनात हे अगदी महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक रोगाचे संपूर्ण चित्र माहीत व्हायचे असेल तर समूहरोगशास्त्राच्या अंगाने अभ्यास करावा लागतो. आपण साधे हिवतापाचे उदाहरण घेऊ या. यातही आपण फक्त मलेरियात कोणकोणती लक्षणे येऊ शकतात असे प्रश्न धरून माहिती काढू या. यासाठी आपल्याला एखाद्या लोकसमूहातल्या (उदा. एका गावातल्या) किती लोकांना मलेरिया झाला आहे हे आधी काढावे लागेल. रक्तनमुन्यात हिवतापाचे जंतू सापडणे ही मलेरियाची मुख्य खूण मानू या. अशा सर्व लोकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात किंवा दिसत नाहीत याची पहाणी करावी लागेल. यानुसार काही लोकांना कसलाच त्रास नाही, तर काहींना थंडीताप, तर काहींना नुसता ताप- कणकण, लहान मुलांमध्ये ताप, खोकला, इत्यादींपैकी काहीही लक्षणे दिसतील. यावरून मलेरियाच्या लक्षणांचे बरेच खरे चित्र आपण काढू शकतो. केवळ एका रुग्णावरून आपल्याला ही माहिती झाली नसती. वैद्यकीय पुस्तकात दिलेली विस्तृत माहिती या पध्दतीने तयार झालेली असते. आपण आपल्या रोगनिदान तक्त्यातल्या लक्षणांचे चित्र अशाच पध्दतीने मांडले आहे.
समूहरोगशास्त्रात पाच प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. लोकसमूहात रोग (1) कोणाला होतो, (2) कधी होतो, (3) कोठे होतो, (4) कसा व का होतो आणि, (5) यावर काय करायचे. हे ते पाच प्रश्न. पहिल्या तीन प्रश्नांवरून (कोणाला, कधी व कोठे आजार होतो) थोडेफार वर्णनात्मक ज्ञान होते. रोग का होतो व मग त्यावर काय केले पाहिजे या दोन प्रश्नांना 'शोधक समूहरोगशास्त्र' म्हणता येईल. यावरून आपल्याला रोगांच्या कारणांचा आणि उपायांचा शोध करता येतो.
हल्ली समूहरोगशास्त्रात केवळ रोगांचा अभ्यास नसून कोठल्याही आरोग्यविषयक प्रश्नाचा अभ्यासही केला जातो. उदा. शाळेतील मुलांच्या वजन-उंचीचे प्रमाण, वाढीचे प्रमाण,इत्यादी माहितीसाठी या शास्त्राचा उपयोग होईल. एखाद्या औषधाचा उपयोग होत आहे की नाही हे शोधण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
समूहरोगशास्त्रात अनेक प्रकारची नवनवीन तंत्रे निघाली आहेत. आपल्याला स्वतः शिकताना यातील काही साधे ठोकताळे वापरता येतील. उदा. जखमांवर एखाद्या वनस्पतीचा किती प्रमाणात उपयोग होतो ह्याबद्दल आपण काही अंदाज बांधू शकतो. समजा आपण जखमांसाठी येणा-या रुग्णांचे नीट वर्गीकरण केले आणि कोरफडीचा वापर केला. यातून नेमक्या कोठल्या जखमा त्याने ब-या होतील किती दिवसांत ब-या होतील, कोणत्या जखमा ब-या होत नाहीत, इत्यादी गोष्टी कळतील. एवढे कळल्यावर निदान आपण कोरफड कोठल्याही जखमेवर चालते असे म्हणणार नाही. असा अभ्यास केल्यावरच आपल्या विचारांत शास्त्रीयता येत जाईल.
दुसरे उदाहरण साथरोगांच्या अभ्यासाचे आहे. साथी कशा पसरतात व काय उपाययोजना करायला पाहिजे याचे उत्तर समूहरोगशास्त्रातून शोधता येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/22/2020
नवीनच आवड निर्माण झालेल्या खगोलप्रेमींनी खगोलशास्त...
मराठी लोकसाहित्यविषयक अभ्यास या विषयी माहिती.
कलासाधनेसाठी केला जाणारा शरीररचनेचा व शारीरप्रमाणा...
लोकसाहित्याचा अभ्यास या विषयी माहिती.