मुडदूस हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.
1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व 'ड' कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो. हा मुख्यतः हाडांचा आजार असून त्यात हाडे व स्नायू दुबळे होऊन वाढ खुंटते. कपाळाचे हाड फुगणे, मनगटाची हाडे जाड होणे, पायांना बाक येणे, पोट मोठे दिसणे, इ. लक्षणे दिसतात. बरगडया आणि छातीचे मधले हाड यांचे सांधे सुजल्यासारखे मोठे दिसतात. त्यामुळे गळयात एक माळच घातल्याप्रमाणे दिसते (याला 'मुडदूस माळ' असे म्हणता येईल.) अशीच माळ जीवनसत्त्व 'क' कमी पडल्यानेही होते, मात्र त्यावर दाबल्याने दुखरेपणा जाणवतो तसा मुडदूस माळेत जाणवत नाही. या आजारात मुलांना श्वसनसंस्थेचे आजार वारंवार होतात.
जीवनसत्त्व 'ड' चा डोस दुधात मिसळून पाजणे हा यावरचा चांगला उपाय आहे. मात्र एकदा हाडांचा आकार बदलला की तो आजार कमी झाल्यावरही तसाच राहतो. वयाच्या दोन वर्षांनंतर मुले सूर्यप्रकाशात हिंडायला लागतात. त्यामुळे मुडदूस 2 वर्षे वयानंतर राहत नाही.
प्रौढ स्त्रियांमध्ये पण जीवनसत्त्व 'ड' कमी पडू शकते, विशेषकरून गरोदरपणात असे होऊ शकते. अशा स्त्रियांना हाडे दुखणे, स्नायूंचा अशक्तपणा, कमरेच्या हाडांमध्ये विकृती (वाकडेपणा), इ. त्रास होतो; बाळंतपण अवघड जाते. अशी हाडे दुबळी आणि मऊ होतात आणि सहजपणे मोडतात. अशा मातांच्या दुधातही जीवनसत्त्व 'ड' कमी असते म्हणून त्यांच्या बाळांनाही लवकर मुडदूस होतो. उपचार म्हणून जीवनसत्त्व-ड, चुना (कॅल्शियम) व रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात थांबणे एवढे पुरते.
असाच आजार वृध्द माणसांनाही होऊ शकतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 3/25/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...