सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले असतील तरच सांधेसूज म्हणता येईल. याबरोबर सांधेदुखी असेल किंवा नसेलही. सांधेदुखी स्वतंत्रपणे होऊ शकते. उदा. फ्लू,विषमज्वर, इत्यादी आजारांत सूज न येता सांधे दुखतात.
सूज म्हणजे 'आकार वाढणे' या अर्थाने घेतले तर सांधेसूज अनेक कारणांमुळे येते.
ही सांधेसूज बहुधा एका सांध्याला येते. गरमपणा,दुखरेपणा, हालचाल कमी होणे यांबरोबरच जंतुदोषाची इतर लक्षणे (ताप, इ.) दिसतात. ही सांधेसूज बहुधा रक्तावाटे जंतू येऊन तयार होते. या आजारात बहुधा मोठे सांधे (उदा. गुडघा) सापडतात. निश्चित निदान करण्यासाठी दुख-या सांध्यातून सुईने पाणी किंवा पू काढून तपासल्यास जंतूंचा प्रकारही कळू शकतो. योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास सांध्याची हालचाल सुधारते. उपचारास उशीर झाला तर मात्र सांध्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. सांधेसूजीवर योग्य निदान, तपासण्या, औषधोपचार, विश्रांती आणि व्यायाम याबद्दल चांगला तज्ञच मार्गदर्शन करू शकतो.
सांधा मुरगळणे, अपघात,सांध्यातील रक्तस्राव यामुळे येणारी सांधेसूज मार लागल्यानंतर लगेच व अचानक तयार होते. खूप वेदना, हालचालींवर मर्यादा ही प्रमुख लक्षणे असतात. आत रक्तस्राव झाला असेल तर सांध्याचा आकार अचानक मोठा होतो व सांधा गरम लागतो. मुरगळण्याबरोबर रक्तस्रावाची, अस्थिभंगाची शंका आल्यास तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. या बाबतीत उपचार नीट झाले नाही तर सांधा जखडण्याचा धोका असतो. अस्थिभंगाची खूण म्हणजे अस्थिभंगाच्या जागेवर दाबल्यावर दुखणे.
सांधा मुरगळला असेल तर दाबून इलॅस्टिक पट्टी बांधल्यास चार-पाच दिवसांत सूज कमी होते. याबरोबरच 'ऍस्पिरिन' देणे आवश्यक असते. मात्र सांधा पूर्णपणे बरा व्हायला एक-दोन आठवडेही लागू शकतात. तोपर्यंत सांध्याला विश्रांती देणे आवश्यक असते. हालचाल होऊ नये इतका दाब कपडयाच्या पट्टीने दिला की भागते.घरगुती उपचार म्हणून यावर कोरफडीचा गर किंवा आंबेहळद लावली जाते. यामुळे कातडी आखडल्यासारखी वाटते. अर्निका, सिंफायटम ही होमिओपथिक औषधे वेदनेवर चांगली लागू पडतात.
संधि म्हणजे सांधा; वात म्हणजे दुखणे. संधिवाताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
अशा आजारात काही प्रमाणात आनुवंशिकता दिसून येते, पण हा नियम नाही. तसेच बहुधा हा आजार तरूण वयात येतो व आयुष्यभर पुरतो. पण कधीकधी प्रौढ वयातही याची सुरुवात होते. हा दम्याच्या जातीचा आजार आहे. (दीर्घकाळ चालणारा, ऋतूप्रमाणे कमीजास्त होणारा आणि समूळ उपचार शक्य नसलेला.) या आजारात सांधे हळूहळू आखडतात. त्यात विकृती तयार होतात व हालचाल कमी होत जाते.
निदान व उपचारया बाबतीत तज्ज्ञाचीच मदत आवश्यक आहे. यावर कायमचा गुण येण्यासाठी आजतरी औषधोपचार नाही. सूज-वेदना कमी करणा-या अनेक औषधांपैकी निवडून कधी एका मागोमाग एक वापरून पाहून ठरवावे लागते. निदान सुरुवातीला, ऍस्पिरिन हे औषध लागू पडते. पण काही काळानंतर औषधे बदलावी लागतात.
होमिओपथी आणि ऍक्युप्रेशर या शास्त्रांत काही रुग्णांना आराम मिळाल्याची उदाहरणे आहेत. मात्र सरसकट गुणकारी उपचार अजूनही माहीत नाही. काही जणांना या शास्त्रांतल्या तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
सांधेहृदय तापाबद्दल आपण हृदय-रक्ताभिसरण संस्थेत माहिती घेतली आहे. हा आजार सांध्यांवर थोडा काळच राहतो. त्यामुळे सांध्यांचे कायमचे नुकसान होत नाही.
सांध्याचा कर्करोग फारसा आढळत नाही. पण सांध्याच्या ठिकाणी अचानक आणि टणक वाढ असेल तर कर्करोगाची शक्यता लक्षात ठेवून तज्ज्ञाकडे पाठवा.
उतारवयात सांध्याच्या हाडांची झीज होते व हाडांची टोके पसरट होतात. सांध्याचे पडदे सैल होणे,जाड होणे, व हाडे झिजून पसरट होणे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सांधेदुखी अथवा सांधेसूज येते. ही सांधेदुखी व सूज कायम वाढत जाते. यावरही औषध नाही. भारवाहक सांध्यांना (उदा. गुडघा,घोटा) हा त्रास विशेष करून होतो. म्हणून वजन जास्त असल्यास ते कमी करावे आणि भाररहित व्यायामप्रकार करावेत. भाररहित व्यायाम प्रकाराचे उदाहरण म्हणजे खुर्चीवर बसून खालीवर पाय हलवणे. याशिवाय वेदनेवर तात्पुरते ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्यावे. मात्र हा आजार पूर्णपणे बरा होणे अशक्य आहे.
सांधेरोपण शस्त्रक्रिया हा बराच खर्चीक उपाय आहे. पण 15-20 वर्षे यामुळे चांगला सांधा मिळतो. यासाठी कृत्रिम सांधा वापरला जातो. याचा खर्च सध्या पुष्कळ आहे. स्वत:च्या पेशी वापरून दुरुस्त करण्याचे नवे तंत्रही उपलब्ध आहे.
यातील गुडघेदुखीचा आजार बराच आढळतो. म्हणून इथे या आजाराची जास्त माहिती दिली आहे.
होमिओपथी निवड
ब्रायोनिया, कॉस्टिकम, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर
भारतात झीज होऊन सांधे सुजणे-दुखणे हा आजार मोठया प्रमाणात आढळतो. या आजारात सांध्यातल्या कूर्चेचे आवरण झिजून त्याचे टवके पडतात. निसर्गप्रक्रियेत ही झीज थोडी थोडी भरून येत असते. पण या सांध्यावर विशेष झीज होत असेल तर झीज व कूर्चा भरून येणे याचे समीकरण जुळत नाही. हाडांच्या भरून येण्याच्या प्रयत्नामुळे लहान लहान अस्थिपेशींच्या तुरीएवढया गुठळया तयार होतात या गुठळया सांध्यांमध्ये आणखीनच अडचण आणतात. या सर्व प्रक्रियेमुळे सांध्यांची अनियमित झीज चालूच राहते. सूज, वेदना, सांध्यांमध्ये आवाज ही सर्व लक्षणे दिसतात. एकूण रोगप्रक्रिया कमी अधिक वेगाने चालू राहते. हे आजार साधारणपणे उतारवयाचे असले तरी तरुण वयातही येऊ शकतात.
गुडघा हा या आजारातला मुख्य बळी असतो. याचे कारण म्हणजे गुडघा हा सर्वाधिक भार व मार सोसतो. गुडघ्यात हालचाल जास्त असते. धावणे, पळणे, उडया मारणे, वजन उचलणे या सर्व प्रकारात त्याची सर्वाधिक झीज होते. माणसाच्या उत्क्रांतीत उभे राहण्याचा भार जास्तीत जास्त गुडघ्यावरच आलेला आहे.
खाली कारणांनी गुडघा खराब होऊ शकतो.
लक्षणे व चिन्हे
सांध्याशी दुखणे हे याचे मुख्य लक्षण असते. याची सुरुवात झीज सुरु झाल्यानंतर उशिराने होते. हाडावरच्या कूर्चेस संवेदना नसते, त्यामुळे वेदना उशिरा जाणवते. गुडघे दुखी मुख्य जाणवते ते चढताना किंवा उतरताना, तसेच संडासला चवडयावर बसताना दुखते. भारतीय पध्दतीने संडासला बसताना, बसल्यावर उठताना गुडघे दुखतात.
काही वेळा गुडघा 'अडकतो' आणि वेदना होते. यावेळी गुडघ्यात हालचाल मर्यादित होते.
काही रुग्णांच्या बाबतीत सकाळी गुडघा अवघडतो, हेच प्रमुख लक्षण असते. थोडा वेळ विश्रांतीनेही गुडघा अवघडतो, मग हळूहळू मोकळा होतो. पायाचे स्नायू दुबळे असतील तर अवघडणे व वेदना जास्त असतात.
सांधा सुजणे, हालचाल मर्यादित होणे, हालचालीत कट् कट् आवाज येणे, इ. खुणाही आढळतात.
उपचार
या आजारावर उपचार करण्यासाठी प्रथम अस्थिरोग-तज्ज्ञास दाखवावे. योग्य सल्ला आवश्यक आहे. योग्य निदानासाठी क्ष-किरण चित्र उपयोगी असते. यापेक्षा आणखी काही तपासण्या लागू शकतात. दुर्बिणीने सांध्यात प्रत्यक्ष पाहून रोग निदान व वाटल्यास काही उपचार करता येतात.
हे आजार सहसा बरे होत नाहीत. काळाप्रमाणे वाढतच जातात. वेदना कमी करणे,कार्यक्षमता टिकवणे आणि पुढील नुकसान कमी करणे ही आपली उद्दिष्टे असतात.
नुसती सांधेदुखी ही अनेक कारणांनी येते. खूप श्रम, निरनिराळे ताप, विषाणूंमुळे होणारे आजार, अशक्तपणा, सांध्यावर जास्त ताण पडणे, इत्यादी अनेक कारणांनी सांधेदुखी होते. मूळ आजाराचे निदान होणे आवश्यक आहे. केवळ सांधेदुखी असेल तर ऍस्पिरिन व पॅमाल या गोळयांनी 3-4 दिवसात थांबते. आयुर्वेदात यावर गुग्गुळ उपयुक्त असते.
स्त्रियांची कंबरदुखी
ब-याच स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास असतो. कंबरदुखीचे सतत खाली वाकून काम,सतत बाळंतपणे, अशक्तपणा, कॅल्शियमची (चुना) कमतरता, ओटीपोटातले आजार, इत्यादी अनेक कारणे सांगितली जातात.
कंबरदुखी ही अनेकांची तक्रार असते. प्रत्येकाला कंबरदुखीचा अनुभव असतो. ती टाळता येते आणि सहसा उपचाराने बरीपण होते. मात्र मणक्यांच्या आजारामुळे कंबरदुखी असेल तर दीर्घकाळ त्रास होतो.
ही तक्रार तात्पुरती किंवा जुनाट असू शकते त्याप्रमाणे त्याचे स्वरुप व उपचार वेगवेगळे असतात.
आकस्मिक कंबरदुखी
ही कंबरदुखी सहसा स्नायू किंवा स्नायूबंध लचकल्यामुळे येते. कंबरेतील निरनिराळया सांध्यांच्या आजूबाजूला असलेल्या पडद्यांना इजा झाल्यानेही कंबरदुखी होऊ शकते.
खूप काम, विचित्र स्थितीत काम करणे, (उदा. सतत वाकून काम करणे, सतत ताठ बसून काम करणे, इ.) खेळात किंवा कामात अचानक हिसका बसणे, पडणे, वाहन जास्त चालवणे, इ. विविध कारणांनी आकस्मिक कंबरदुखी उद्भवते.
आकस्मिक कंबरदुखीमागे जास्त गंभीर कारणेही असू शकतात. यात मणक्यांचा आजार मुख्य असतो.
वयस्कर स्त्रियांना आहारात चुना कमी पडल्यास हाडांचा विरळपणा येतो. अशावेळी थोडयाशाही इजेने छोटे छोटे दबाव अस्थिभंग होतात. हे पण एक महत्त्वाचे कारण असू शकते.
लक्षणे व चिन्हे
वेदना, विशेषत: हालचालीमुळे वेदना हे प्रमुख लक्षण असते. उठताना, बसताना,वाकताना वेदना होणे हीच प्रमुख तक्रार असते. कधीकधी स्थिर अवस्थेतही वेदना असते. कधीकधी ही वेदना तीव्र असू शकते तर कधी सौम्य.
या कंबरदुखीसाठी सहसा लगोलग डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते. डॉक्टर वेदनाशामक औषध लिहून देतात व विश्रांती घ्यायला सांगतात.
हे उपचार रुग्ण स्वत:ही करू शकतो. 2/3 दिवसात आराम पडला नाही किंवा धोक्याची लक्षणे दिसली तर मात्र डॉक्टरकडे जावे लागते.
धोक्याची लक्षणे
पायामध्ये वेदना, पायातली शक्ती कमी होणे, लघवी-संडासवर नियंत्रण कमी होणे ही सर्व लक्षणे चेतारज्जूवर किंवा चेतांवर दाब पडल्याची लक्षणे आहेत. अशावेळी ताबडतोब डॉक्टरकडे न्यायला पाहिजे.
उपचार
नेहमीच्या कामात कंबर फक्त एकाच दिशेने म्हणजे पुढच्या बाजूस वाकते. यातल्या व्यायामाचे मुख्य तत्त्व असे, की कमर मागे वाकवणे, डाव्या-उजव्या बाजूस फिरवणे,निरनिराळया अवस्थांत विश्रांती देऊन स्थिर ठेवणे (आसने), आखडलेले स्नायू सैल करणे,इत्यादी मार्गांनी कमरेच्या सांध्यांवरचा ताण कमी केला जातो. नियमित व्यायामांनी या आजारात बराच आराम पडू शकतो.
कंबरदुखी हा टाळण्यासारखा आजार आहे. कंबर जड व अवजड होऊ नये म्हणून आपली जीवनशैली तशी ठेवली पाहिजे.
साधी कंबरदुखी आठवडयात बरी होते. मणक्याचा दोष असेल तर मात्र ती कायम राहते. मानदुखीप्रमाणेच मणक्यांमध्ये झीज व घर्षण दाह असतो. कंबरेच्या मणक्यांमध्ये चेतारज्जूचे फक्त टोक असते व इथे चेतारज्जू संपतो. मात्र त्यातून चेता दोन्ही बाजूंनी मणक्यांतून बाहेर येतात. मणक्यांच्या आजारांमुळे ह्या चेता चेमटल्या जातात व त्यामुळे वेदना होते.
ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते. मधून मधून ती जास्त होते. हालचालीने ही वेदना वाढते. मात्र सकाळी कंबर आखडणे या आजारात आढळत नाही. एकूणच विश्रांतीमुळे ही वेदना कमी होते.
याची वेदना पायांमध्ये लांबवर जाऊ शकते. याची खूण म्हणजे पाय सरळ अवस्थेत300 पर्यंत उचलला तर वेदना जाणवते. याचे कारण या अवस्थेत चेता ताणल्या जातात.
याचे निदान क्ष-किरण व इतर प्रगत तंत्रज्ञानाच्या सहायाने करता येते.
उपचार
यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. वेदना माफक असेल तर विश्रांती,कंबरपट्टा, वेदनाशामक गोळया एवढा उपचार पुरतो. जास्त वेदना असल्यास वजन लावून विश्रांती घेणे भाग पडते. क्वचित शस्त्रक्रिया लागू शकते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/7/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...