प्रिय मित्रांनो आपण आता हृदयवेदनेबद्दल जाणून घेऊ या. छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत. – उदा. स्नायू किंवा बरगड्यांना इजा, जठरातील आम्लता,न्यूमोनिया आणि हृदयविकार. ही वेदना साध्या दुखण्यापासून तीव्र कळेपर्यंत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. हृदयवेदना म्हणजे खरे तर हृदयविकाराचा पहिला टप्पा असतो. हृदयवेदनेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे विशिष्ट श्रमाने निश्चितपणे जाणवणारी म्हणजे सश्रमहृदयवेदना. ही वेदना आणि विश्रांतीने थांबते. दुसरा प्रकार विश्रांतीतही होणारी म्हणजे विनाश्रम हृदयवेदना. हा दुसरा प्रकार आजाराची म्हणजे पुढची पायरी असते.
हा आजार हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधे साठलेल्या चरबीच्या थरामुळे होतो.यामुळे रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत हे चालून जाते पण श्रमाने वेदना जाणवते. रक्तवाहिनीतला अडथळा अधिक मोठा असेल तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शास्त्रीयदृष्ट्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या 6 पायऱ्या आहेत. सश्रम हृदयवेदना ही त्यातली पहिली आहे.
विशिष्ट श्रम किंवा भावनिक ताण, अतिथंडी, जास्त जेवण किंवा धूम्रपानानंतर सश्रम हृदयवेदना जाणवते. वेदना अर्धा ते 5 मिनिटे टिकते. याची जागा छातीच्या डाव्या बाजूस असते.
ही वेदना त्या बाजूचा खांदा, हात, मानेचा भाग, जबडा तसेच पाठीकडे आणि बेंबीकडे घुसल्यासारखे वाटते. पण ही वेदना वरती जबडा किंवा खाली बेंबी यांच्या पलीकडे जात नाही.
ही वेदना विश्रांतीने आणि नायट्रोगिलसरीन औषधाने थांबते हे महत्त्वाचे.
ताबडतोब विश्रांती आणि नायट्रोग्लिसरीन यामुळे वेदना थांबते. धीराने घेणे महत्वाचे असते.
यासाठी नायट्रोग्लिसरीन गोळी किंवा फवारा जिभेखाली द्यावा. यामुळे 2-5 मिनिटांत वेदना थांबते. या औषधाने रक्तवाहिन्या विस्फारून रक्तप्रवाह सुधारतो. अशा रुग्णाने हे औषध कायम बरोबर बाळगावे.
या औषधाची चिकटपट्टीपण मिळते.
कपभर पाण्यात विरघळणारी ऍस्पिरीन गोळी सोडून ते पाणी प्यावे.यामुळे रक्त पातळ आणि प्रवाही राहते.
हृदयवेदना ही हृदयविकाराचीच प्राथमिक पायरी आहे. म्हणून आपल्या डॉक्टरांना वेळीच कळवले पाहिजे. आवश्यक वाटल्यास रुग्णालयात दाखल व्हा.
वैद्यकीय सल्ल्यानुसार कार्डिओग्राम, स्ट्रेस टेस्ट, इको टेस्ट किंवा एन्जिओग्राफी करावी लागेल.
रक्तवाहिनीत अडथळा मोठा असेल तर एन्जिओप्लास्टी किंवा हृदयाची बायपास शस्त्रक्रिया देखील करावी लागेल.
निरोगी आहार विहार, एरोबिक व्यायाम, धूम्रपान आणि ताणतणावापासून दूर राहणे, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण, वजन आटोक्यात ठेवणे या एकत्रित उपायांनी हृदयविकार टाळता येतो.
एकदा हृदयवेदना जडली की झटका येऊ नये म्हणून बरीच काळजी घ्यावी लागते. नायट्रोग्लिसरीन हा केवळ प्राथमिक उपचार आहे. पुढचा धोका टाळण्यासाठी योग्य तपासण्या करायला पाहिजेत.
कोणतीही हृदयवेदना असली तरी धावपळ न करता आणि घाबरून न जाता एका जागी शांत राहावे. यामुळे हृदयाला आहे त्या रक्तप्रवाहाचा नीट उपयोग करता येईल.
आपली प्रथमोपचाराची औषधे नेहमी बरोबर ठेवा. आपला रक्तदाब आणि रक्तातील साखर यावर लक्ष असू द्या.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/23/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...