अॅलोपॅथी हा शब्द प्रथम झामूएल हानेमान (होमिओपॅथीचे जनक) यांनी वापरला. अॅलोपॅथी याचा अर्थ विषम (भिन्न) उपचारपद्धती (Allos-निराळी, वेगळी; Pathy त्रास, रोग).
हानेमान यांनी विकसित केलेल्या सम-उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आणि तार्किक दृष्टीने, कदाचित कमी उपयुक्त या अर्थाने त्यांनी अॅलोपॅथी हा शब्द त्याकाळी युरोपात प्रचलित असलेल्या उपचार पद्धतीकरिता (रोग व त्याच्या त्रासापेक्षा विषम पद्धतीने केलेले उपचार, या अर्थाने) वापरतात. परंतु, मुळात वैज्ञानिक प्रगतीचा आधार घेऊन त्या प्रगतीबरोबरच अॅलोपॅथी उपचार पद्धती विकसित होत गेली. तसेच इतर उपचार पद्धतींतील अनेक चांगल्या गोष्टी व उपचार (त्यांवर संशोधन व संस्करण करून) अॅलोपॅथी तिच्यात समाविष्ट करून घेतले गेले. त्यामुळे आज ही उपचारपद्धती जागतिक पातळीवर सर्वमान्य, प्रगत, आधुनिक व पूर्णत: वैज्ञानिक म्हणून मान्यता पावली आहे. आज अॅलोपॅथी हा शब्द सर्व आधुनिक उपचारांकरिता वापरला जातो.
इतिहासकाळापासून माहीत असलेल्या व उपयुक्तता सिद्ध झालेल्या अनेक उपचारपद्धतींची मिळून सध्या अस्तित्वात असलेली अॅलोपॅथी पद्धत तयार झाली आहे. या उपयुक्त पद्धती वैज्ञानिक कसोटीवर घासून पाहिल्या गेल्या. रोग, त्यांची कारणे, रोगांची लक्षणे, रोगांमुळे शरीरात होणारे बदल व त्यांवरील उपचार यां- संबंधी सखोल वैज्ञानिक संशोधन केले गेले. त्यासाठी तेव्हा उपलब्ध असलेले ज्ञान व विज्ञानाच्या इतर क्षेत्रांतील संशोधन यांचाही उपयोग करण्यात आलेला आहे. उदा., भिंगे व सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या वापरांमुळे सूक्ष्म जीवासंबंधी माहिती मिळू लागली. त्यातून पुढे एकपेशीय प्राणीविज्ञान, कवक-विज्ञान इ. विज्ञानांचा उदय झाला. अनेक रोग निर्माण करण्यास निरनिराळे सूक्ष्मजीव कारणीभूत असतात व त्यांच्यामार्फत रोगप्रसार होतो, हे समजू लागले. त्यातून पुढे प्रतिबंधक लशी, रोगजंतुनाशके व प्रतिजैविके यांचा शोध लागला व त्यांचा वैद्यकीय उपचारांत उपयोग होऊ लागला.
याबरोबरच सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे, रोगामुळे शरीरात सूक्ष्म पातळीवर (ऊती व पेशींमध्ये) कोणते व कसे बदल होतात, हे समजू लागले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे विषाणूंचे (वायरस) अस्तित्व समजले आणि त्यामुळे उद्भवणार्या अनेक रोगांवरील संशोधनाला चालना मिळाली.
याप्रमाणेच जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी विषयांतील प्रगतीबरोबर या शास्त्रांचे ज्ञान व पद्धतींचा उपयोग वैद्यकशास्त्रात केला गेला आहे. या ज्ञानावर आधारित तंत्रविज्ञानाचा उपयोग करून बनवलेली अनेक उपकरणे व यंत्रे आज वैद्यकीय निदान व उपचारांसाठी वापरण्यात येत आहेत. उदा., क्ष-किरण तपासणी व उपचार, श्राव्यातीत ध्वनिप्रतिमा दर्शन, गुहांत दर्शन, संगणकीय अक्षीय छेदप्रतिमा, चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमा दर्शन (एम् आर्. आय्. = मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) इत्यादी.
पूर्वी, उपचार केवळ औषधे व साध्या-सरळ शस्त्रक्रियांपुरते मर्यादित होते. आता, औषधे तयार करण्यापासून, विशिष्ट पद्धतींनी ती रोग्याला देण्यापर्यंतच्या पद्धती शास्त्रीय पद्धतीने विकसित केल्या आहेत. तसेच शस्त्रक्रियांमध्येही, दुर्बिणीद्वारे छोट्या छेदातून शस्त्रक्रिया, लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि आता यंत्रमानवाद्वारे दूरनियंत्रणाने शस्त्रक्रिया यांसारखी गुंतागुंतीची पण रुग्णाच्या दृष्टीने कमी आसाची तंत्रे विकसित केली गेली आहेत व जात आहेत.
या सर्व आधुनिक वैद्यकाचा आता अॅलोपॅथीमध्ये समावेश केला जातो. अॅलोपॅथीमध्ये अनेक पद्धती व तंत्रांचा समावेश होत असला, तरी या उपचारपद्धतीची काही सर्वसाधारण वैशिष्ट्ये सांगता येतील:
या दृष्टीने सर्व क्षेत्रांतील आधुनिक संशोधनाचा उपयोग करणारी, आधुनिक व वैज्ञानिक अशी अॅलोपॅथी ही पद्धती आहे. तसेच या काही वैशिष्ट्यांमुळे वैद्यकीय निदानपद्धती, उपचारपद्धती व विचारसरणीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. उदा., लशीकरण व प्रतिजैविके यांमुळे संक्रमणजन्य रोगांच्या प्रमाणातील लक्षणीय घट, हृदयरोग, मेंदूरोग इत्यादींचे निदान व उपचार; वंध्यत्वनिदान व उपचार; कर्करोगावरील उपचार व अतिगंभीर अवस्थेतील रुग्णांवरील उपचाराची तंत्रे हे अॅलोपॅथीचे योगदान आहे. या सर्वांमुळे वाढलेले सरासरी आयुर्मान व त्यामुळे वाढती जागतिक लोकसंख्या हेही अॅलोपॅथीचे परिणाम आहेत.
अंतिम सुधारित : 10/7/2020
सूचिचिकित्सा : (सूचिवेध चिकित्सा). प्राचीन चिनी वै...
ॲलोपॅथी अथवा विषम चिकित्सा, होमिओपॅथी अथवा समचिकित...
व्याधी निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक उपचार...