(चिकित्साधाम, सॅनिटेरियम). चिरकारी (दीर्घकालिक) मानसिक अथवा शारीरिक रुग्णांची आणि रोगांतून नुकतेच बरे झालेल्यांच्या स्वास्थ्यसंवर्धनाची व्यवस्था असलेल्या संस्थेला आरोग्यभुवन असे म्हणतात.
ख्रिस्ताचा पुनरावतार मानणाऱ्या सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्टस या संस्थेने सॅनिटेरियम हा शब्द प्रथम बनविला. मानसिक किंवा क्षयी रुग्णांची चिकित्सा करणाऱ्या संस्थांपासून या संस्थेचे वेगळेपण स्पष्ट करावे हा त्यांचा हेतू होता. आरोग्यभुवन हे मुख्यतः स्वास्थ्यरक्षण व संवर्धन यांचा पुरस्कार करणारे भुवन व्हावे असा मूळ उद्देश असावा. आज मात्र आरोग्यभुवन व चिकित्साधाम हे समानार्थी व समकक्षी शब्द झाले आहेत.
आरोग्यभुवने व रुग्णालये यांत आणखी एक महत्त्वाचा भेद आहे. सामान्यपणे रुग्णांलयात अल्पकालिक रुग्ण व चिरकारी रोगाने पछाडलेले रुग्ण यांची परिचर्या करणारी विशिष्ट आलये असतात. निदान अशा रुग्णांसाठी एकाच आवारात निरनिराळे विभाग बांधलेले असतात किंवा कमीतकमी एकाच इमारतीत वेगवेगळी दालने असतात. सांसर्गिक रोगांच्या रुग्णांना तर शक्य तितके अलग ठेवणे इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने पुढारलेल्या शहरांतून त्यांच्यासाठी वेगळी रुग्णालये, एवढेच नव्हे तर अशा रुग्णालयांतही वेगवेगळ्या सांसर्गिक रोगांसाठी वेगवेगळी दालने किंवा विभाग बांधलेले असतात.
आरोग्यभुवने ही मुळात केवळ स्वास्थ्यसंवर्धनासाठी असावी अशी कल्पना होती. आरोग्यभुवने व चिकित्साधामे ही आता समानार्थक झाली असली, तरी त्या दोहोंतही चिरकारी रुग्णांचीच परिचर्या करण्याचा उद्देश असतो. आरोग्यभुवनात रोग बरा होऊन पुन्हा पूर्वीसारखा जोम व शक्ती येण्याच्या कालात रुग्णांना ठेवीत, पण आता ज्या रुग्णांच्या व्याधीचे स्वरूप फार गंभीर किंव दुःसाध्य नाही, पण ज्यांना दीर्घकाल किंवा विशिष्ट हवेत परिचर्या करणे उपयुक्त किंवा आवश्यक आहे अशा मानसिक शाररिक रुग्णांनाच त्यातं प्रवेश दिला जातो. मानसिक व्याधींच्या रुग्णांना पूर्वी मानसिक रुग्णालयात किंवा आश्रयस्थानात ठेवले जाई, पण ज्यांच्या रोगाचे स्वरूप उन्मादी नाही व जे आत्मघाती किंवा परघाती प्रवृत्ती दाखवीत नाहीत, अशा रुग्णांना पाश्चात्य देशांतून आरोग्यभुवनात प्रवेश दिला जातो. भारतात मानसिक व्याधींच्या रुग्णांना अद्यापिही मानसिक आश्रयगृहांतच (आता त्यांना मानसिक व्याधितांची रुग्णालये म्हणू लागले आहेत) प्रविष्ट करून घेत असले, तरी त्यातील निरुपद्रवी रुग्णांना वेगळ्या प्रकारे वागविले जाते. या रुग्णांलयांचे पूर्वीचे कारागृहासारखे असलेले स्वरूप आता पार बदललेले आहे. कायद्यानुसार अशा रुग्णालयात रोगी अनिच्छेने दाखल करण्यात येतो. पण स्वेच्छेने अशा संस्थांत प्रवेश घेणारे रुग्णही प्रगत देशांत आढळतात व त्यांची तशा संस्थांतून आवश्यक ती परिचर्या व चिकित्सा केली जाते. काही सामान्य रोगांच्या रुग्णालयांतही मानसिक व्याधीच्या रुग्णांना प्रवेश असणारी दालने आता उघडली जाऊ लागली आहेत. पूर्वी धोकादायक किंवा घातकी समजले जाणारे रुग्णही नव्या शामक किंवा शांतक औषधांनी व मानसिक चिकित्सा केल्याने स्वतःच्या मनावर व व्यवहारावर ताबा ठेवण्यास समर्थ बनून समाजात परतू शकतात. काहीजण तर स्वतःचा नोकरीधंदा संभाळून इतर लोकांप्रमाणेच कौटुंबिक जीवन जगू शकतात.
मानसिक व्याधीचे रुग्ण भारतात अद्यापि आरोग्यभुवनांत किंवा चिकित्साधामांत घेतले जात नाहीत. पण नैसर्गिक चिकित्सेने किंवा योगासनांनी रुग्ण परिचर्या करणाऱ्या निसर्गधामांत त्यांना घेतात व आरोग्यभुवन या मूळ कल्पनेशी ते सुसंगत आहे. जलचिकित्सा, प्रारणचिकित्सा व आहार आणि व्यायाम (भारतात योगासने) चिकित्सा करणाऱ्या निसर्गधामांना आरोग्यभुवनेच समजले जाते.
क्षयासारख्या काही व्याधींमध्ये रुग्णापासून कौटुंबिक व इतर निकटवर्तीयांचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेप्रमाणे रुग्णालाही विशिष्ट प्रकारच्या रुक्ष किंवा कोरड्या हवेत जेथे वारा व सूर्यप्रकाश भरपूर आहे अशा ठिकाणी दीर्घकाल ठेवण्याची आवश्यकता असते. तंत्रिक तंत्र रोग (मज्जासंस्थेचा विकार) झालेल्या काही रुग्णांना अशा प्रकारे अलग ठेवण्याची आवश्यकता नसली, तरी त्यांनाही दीर्घकाल चिकित्सेची आवश्यकता असतेच. क्षय रोगाच्या रुग्णांच्या चिकित्सेचे तर स्वनिवासी व चिकित्साधामी असे स्पष्ट भेद कल्पिलेले असून त्यातील दुसऱ्या प्रकारचे रुग्ण चिकित्साधामांतून प्रविष्ट केले जातात. अमुक एका प्रकारच्या हवेतच क्षयाची चिकित्साधामे असली पाहिजेत यावर जरी आता फारसा भर देण्यात येत नसला, तरी वैद्याच्या सल्लाने स्वतःच्या घराच्या जवळपासच असलेल्या का होईना पण चिकित्साधामात प्रवेश घेतल्याने रुग्णाला पुष्कळ फायदा होतो. दोन-तीन तपांपूर्वी मिरज, तळेगाव, मदनापल्ली अशा ठिकाणी चिकित्सेसाठी जात असत, आता ते आवश्यकच आहे असे मानण्याचे कारण नसले, तरी त्या त्या चिकित्साधामांतून दिली जाणारी परिचर्या व चिकित्सा यांचे महत्त्व मुळीच कमी होत नाही. अशा ठिकाणी रुग्णाचा शारीरिक व मानसिक ताण कमी होतो व आहार, औषधी व इतर प्रक्रिया सुसंबद्ध आणि पूर्वनियोजित योजनेप्रमाणे केल्या जातात. याचे रोग-परिहारात फार महत्त्व आहे. रोग्याला स्वतःची शक्ती व त्याबरोबरच रोग-प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व आपले स्वास्थ्य पुन्हा बिघडू नये म्हणून आपली दिनचर्या कोणत्या प्रकारची राखणे आवश्यक आहे याचे पद्धतशीर ज्ञान प्राप्त होते. वैद्याच्या सल्ल्याने तो बरा होऊन घरी परतला म्हणजे आपल्या रोगाचा पुनरुद्भव होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याप्रमाणे आपल्यापासून इतरांना रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय करावयास हवे हेही तो जाणतो.
क्षयाचा नुकताच प्रादुर्भाव झालेल्या तसेच काही प्रकारच्या चिरकारी रुग्णांना चिकित्साधामात होणारी चिकित्सा अतिशय उपयुक्त असते. क्षयाच्या जंतूंची वाढ शीघ्र होत असलेल्या किंवा ज्वराचे प्रमाण तीव्र असलेल्या रुग्णांना तिचा मुळीच उपयोग नसतो.
चिकित्साधामांत रुग्ण आला म्हणजे प्रथम काही दिवस त्याला विश्रांती देऊन त्याचे विश्रांतिस्थितीतील तापमान नोंदतात व इतर आवश्यक त्या परीक्षा केल्या जातात. ज्वर येत असेल, तर रुग्ण निर्ज्वरी होईपर्यंत शय्याविश्रांती आग्रहाने लादली जाते, दिवस-भराच्या हालचालींमुळे ज्वरांश ३७० से. पर्यंत वाढत असेल, तर फिरून शय्याविश्रांती आवश्यक समजतात. चिकित्साधामातून क्षयाच्या निरनिराळ्या चिकित्सांचा क्रम थोडाफार वेगळा असू शकतो; पण मुख्य फरक रुग्णाला क्रमशः व्यायाम द्यावा की नाही हा असतो. जेवणापूर्वी व नंतर एक तासाची विश्रांती सक्तीने देतात. तीन महिन्यांत रुग्णांवर चिकित्सेचा गुणकारी परिणाम होतो की नाही हे सामान्यपणे समजते. अवश्य तर कफातून क्षयकारक जंतू जाणे बंद होईपर्यंत (आणखी कमीत कमी ती महिनेपर्यंत) हा काळ वाढवितात. महाराष्ट्रातील पांचगणी, लोणावळा, मिरज, जयसिंगपूर, औंध (जि.पुणे), तळेगाव दाभाडे इ. स्थळे चिकित्साधामासाठी प्रसिद्ध आहेत.
लेखक : ना. रा. आपटे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/22/2020