क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असतात. या किरणांना वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते. साधे प्रकाश किरण (ऊन किंवा लाईट) हे पातळ कागद , कपडा यातून थोडया प्रमाणात आरपार जातात. मात्र जाड कापड, कागद यामुळे प्रकाश किरण पूर्णपणे अडतात. पण क्ष-किरण हे मात्र यापेक्षा भेदक असतात. पत्र्याचा पातळ थर, कागद, कापड त्वचा,इत्यादी अडथळे भेदून ते पलीकडे जाऊ शकतात. क्ष-किरणांची ताकद (भेदकता) जशी वाढवू तसे हाडांसारखे पदार्थही भेदले जाऊ शकतात. या तत्त्वाचा उपयोग करून क्ष-किरण चित्र काढले जाते. त्वचा, मांस, हाडे, हवा यांची क्ष-किरण अडण्याची शक्ती व घनता वेगवेगळी असते. क्ष किरणांमुळे पलीकडे ठेवलेल्या फिल्मवर या भागांचे वेगवेगळे चित्र उमटते. सामान्य लोक भाषेत यालाच 'फोटो काढणे'असे म्हणतात.
क्ष-किरण तंत्राने एकेकाळी वैद्यकीय उपचारात मोठी क्रांती झाली. छाती,पोट, हात,पाय,कवटी, इत्यादी अनेक भागांची विशिष्ट आजारांसाठी क्ष-किरण तपासणी करता येते. क्षयरोग, मुतखडे, अस्थिभंग, कॅन्सरचे काही प्रकार, हाडांची सूज, आतडीबंद, आतडयांना छिद्र पडणे यामुळे क्ष-किरणतंत्र आता मोठया प्रमाणावर वापरले जाते.
बेरियम नावाचे विशिष्ट औषध प्यायला देऊन पचनसंस्थेची खास चित्रे काढता येतात. यामुळे जठरव्रणाचे निदान होऊ शकते. क्ष-किरण अडवणारे आणखी एक औषध शिरेतून देऊन मूत्रपिंड ते कसे बाहेर टाकतात याचे चित्र घेतले जाते. मूत्रपिंडाचे कामकाज,अडथळे, इत्यादी तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. पचनसंस्थेतल्या हवेच्या रचनेवरून आणि स्थानावरून पचनसंस्थेला छिद्र पडणे किंवा आतडीबंद झालेला ओळखता येते. शरीरात बाहेरची एखादी नको असलेली वस्तू गेली असेल (उदा. मुलांनी एखादी टाचणी, पिन, नट गिळणे) क्ष किरण चित्राने कळू शकते. तसेच शस्त्रक्रियेत एखादी धातूची वस्तू चुकून आत राहिली असेल तर तीही यात दिसू शकते.
अस्थिसंस्थेच्या आजारांचे निदान करताना तर क्ष-किरण चित्र नेहमीच वापरले जाते. क्ष-किरण चित्राच्या या रोगनिदानक्षमतेमुळे अनेक गंभीर आजारांचे निदान होऊ शकते,त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येते. हल्ली आपण स्कॅन तंत्राबद्दल ऐकतो. हा ही क्ष किरणाचाच प्रकार आहे. ऍंजिओग्राफीतही क्ष-किरणांचाच वापर होतो.
क्ष-किरण चित्रांचा वापरही गरजेपेक्षा अधिकच होत आहे. चांगली काळजी घेतली नाही तर क्ष-किरण शरीरावर दुष्परिणाम करू शकतात. क्ष-किरण हा एक किरणोत्सर्ग आहे. अणुबाँबमुळे किरणोत्सर्ग एकदम आणि प्रचंड प्रमाणावर होतो. क्ष-किरण हा अगदी अल्प प्रमाणावर घडवून आणलेला किरणोत्सर्ग आहे. जर त्वचेवर एकाच ठिकाणी क्ष-किरणांचा मारा केला तर त्वचेवरच्या पेशी मरून त्या ठिकाणी एक व्रण तयार होतो. हा व्रण लवकर बरा होत नाही. काही दिवसांनी या व्रणाच्या ठिकाणी कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. तसेच क्ष-किरणांमुळे शरीरातल्या काही थोडया पेशी मरू शकतात. असे जास्त प्रमाणावर झाले तर शरीराला घातक असते. क्ष-किरणांमुळे पेशींमध्ये कर्करोगाची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. पण हे कॅन्सर शक्यतेचे प्रमाण अत्यल्प आहे.
लहान मुले, अर्भके, गर्भावस्थेतल्या पेशी यांच्यावर या क्रमाने क्ष-किरणांनी जास्त हानी होते. स्त्री-पुरुष बीजांडांच्या पेशींवर क्ष-किरण पडल्यास एक तर त्या मरतात किंवा त्या विकृत होतात. अशा विकृत बीजपेशीमुळे पुढच्या संततीत अनेक व्यंगे येऊ शकतात. हे सर्व परिणाम काही काळानंतर होत असल्याने आणि क्ष-किरण अदृश्य असल्याने हा धोका आपल्याला जाणवत नाही. पण हा धोका निश्चित असल्याने क्ष-किरणांचा वापर अगदी जपून केला पाहिजे. यासाठी पुढील सूचना महत्त्वाच्या आहेत
या तंत्रापेक्षा स्कॅन तंत्राने शरीरातील इंचाइंचावरचे चित्र काढता येते. विशेषकरून मेंदूच्या आजारात याचा फार चांगला उपयोग होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
काही आजारात जठर, उदर, श्वासनळया, इत्यादी पोकळयांची...
सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला किंवा मुद्रित झ...
हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या...
दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून...