অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जीवोतक परीक्षा

(बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेल्या तपासणीस जीवोतक परीक्षा म्हणतात. विकृतिविज्ञानातील (रोगोद्‌भवामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील) ही परीक्षा एक आवश्यक तपासणी असते. अर्बुदांच्या (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या आणि शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठींच्या) निदानाकरिता ती अपरिहार्य असते. याशिवाय क्षय, महारोग, रक्तदोष, मूत्रपिंड विकार व यकृत विकार, आतड्याच्या अंतस्तराची विकृती, स्नायू अपकर्ष (ऱ्हास) व त्वचा रोग यांच्या निदानाकरिता जीवोतक परीक्षा उपयुक्त असते. काही विकृतींत सर्व शरीरातील लसीका ग्रंथींबरोबरच (रक्तद्रवाशी साम्य असलेला द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील आवरणयुक्त लसीका पेशींच्या पुंजक्यांबरोबरच) प्लीहाही (पानथरीही) वाढते. अशा वेळी लसीका ग्रंथींची जीवोतक परीक्षा निदानाकरिता बहुमोल ठरते. गर्भाशय अंतःस्तराचे हॉर्मोनजन्य (वाहिनीविहीन ग्रंथीपासून रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावांमुळे होणारे) विकार आणि गर्भाशय कर्करोग यांचे जीवोतक परीक्षांद्वारे लवकर निदान करणे सोपे झाले आहे. पुरुषांच्या अशुक्राणुता (शुक्राणू म्हणजे पुं-जनन पेशी तयार होण्यात किंवा उत्सर्जित होण्यात दोष निर्माण होणाऱ्या) विकाराकरिता वृषणाची (पुं-जनन ग्रंथीची) जीवोतक परीक्षा करतात.

या परीक्षेकरिता ऊतक निरनिराळ्या प्रकारांनी मिळवितात

(१) प्रत्यक्ष तुकडा कापून घेणे.

(२) चोषणाद्वारे ऊतक मिळविणे.

(३) खास बनविलेल्या सूचिकांचा उपयोग करून ऊतक मिळविणे (आकृतीत यकृतातील ऊतक मिळविण्याच्या सिल्व्हरमॅन सूचिका दाखविल्या आहेत).

(४) वरच्या थरातील उतक कोशिका (पेशी) तपासणीकरिता खरवडून मिळविता येतात, तसेच त्या स्थानपतित होऊन स्राव, निस्राव किंवा

शरीरभाग धुऊन घेऊन घेतलेल्या द्रवातही मिळू शकतात. या परीक्षेस स्थानपतित कोशिकाविज्ञान असे म्हणतात. या परीक्षेमुळे विशिष्ट भागातील कर्करोगाचे निदान तो प्रसारक्षम बनण्यापूर्वीच करता येते. उदा., गर्भाशय ग्रीवेचा (गर्भाशयाच्या मानेसारख्या चिंचोळ्या भागाचा) कर्करोग.

(५) अतिजलद फिरणारे छिद्रणयंत्र वापरून अस्थी वा मऊ ऊतक नसलेल्या अर्बुदांचे जीवोतक मिळविता येते.

जीवोतक मिळविल्यानंतर त्याची तपासणी, स्थूल परीक्षा, प्रतिरक्षाविज्ञानीय (रोगप्रतिकारशक्तीबाबतच्या शास्त्रातील)परीक्षा आणि सूक्ष्मदर्शकीय परीक्षा या प्रकारांनी केली जाते. अनुस्फुरण सूक्ष्मदर्शक (जंबुपार म्हणजे वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरणांचा उपयोग करणारा व या किरणांचे दृश्य प्रकाशात रूपांतर करणाऱ्या म्हणजे अनुस्फुरक द्रव्याने अभिरंजित केलेली परीक्ष्य वस्तू दृश्यमान करणारा सूक्ष्मदर्शक) किंवा⇨इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यासारख्या आधुनिक उपकरणांनी या तपासणीत मौलिक भर घातली आहे.

जीवोतक परीक्षेसंबंधी पुढे दिलेली तत्त्वे पाळावयास हवीत

(१) ऊतक मिळविल्यानंतर शक्य तितक्या लवकर किंबहुना ताबडतोब त्याचे स्थिरीकरण (आतील घटक जिवंतपणी होते तसेच राहतील असे संस्करण) व्यवस्थित आणि योग्य रीतीने झालेच पाहिजे. त्याकरिता विकृतिवैज्ञानिकाशी आगाऊ विचारविनिमय करणे जरूर असते.

(२) मारक अर्बुदांचा तपासणीकरिता घेण्यात येणारा तुकडा पुरेसा असावा व त्यात निरोगी ऊतकाचा काही भाग असू देण्याची काळजी घ्यावी.

(३) विकृतिवैज्ञानिकाकडे जीवोतक तपासणीकरिता पाठविताना निदानात्मक परीक्षा वृत्तांत सोबत पाठवावा.

(४) जीवोतक परीक्षा संशयास्पद असल्यास शस्त्रक्रिया विशारद आणि विकृतिवैज्ञानिक या दोघांनी एकत्र विचारविनिमय करणे हितकारक असण्याची शक्यता असते.

(५) निदानात्मक परीक्षेनंतर अर्बुद मारक असल्याची दाट शंका आल्यास किंवा विकृतिवैज्ञानिकाचा तपासणी वृत्तांत अनपेक्षित असल्यास जीवोतक परीक्षा वारंवार केल्यास उपयुक्त ठरण्याची शक्यता असते.

जीवोतक परीक्षा केवळ निदानाकरिताच उपयुक्त आहे असे नव्हे, तर योग्य इलाज योजण्याकरिताही ती महत्त्वाची असते. स्तनीय मारक अर्बुदावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर शस्त्रक्रिया विस्तार क्षेत्र ठरविणे, क्ष-किरण उपचार चालू असताना रोगाची प्रगती व उपचारांचा प्रभाव अजमावणे यांकरिता ही परीक्षा उपयुक्त असते. मारक अर्बुदाचा तुकडा कापण्याने रोग फैलावेल असा काही शास्त्रज्ञांचा या परीक्षेवर आक्षेप होता. परंतु प्राण्यावरील प्रयोगान्ती तो निराधार असल्याचे आढळून आले आहे. मात्र यकृत किंवा प्लीहा यासारख्या शरीरभागातून तुकडा घेतेवेळी रक्तस्राव होण्याची शक्यता लक्षात घेणे जरूर असते.

 

संदर्भ : 1. Bailey, H.; Love, M. and others, A Short Practice of Surgery, London, 1962.

2. Wakeley, C.; Harmer, M.; Talor, S., Eds. Rose and Carless Manual of Surgery, London, 1960.

भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate