शरीरातील इंद्रियांच्या विकारांवरील एका चिकित्सेला ‘तुंबडी लावणे’ म्हणतात. ज्या विकारांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) किंवा रक्त एकाच ठिकाणी गोळा होण्याची क्रिया प्रामुख्याने आढळते, त्याच विकारांकरिता ही चिकित्सा पद्धती एके काळी वापरात होती. या चिकित्सेचा हेतू रक्त शरीराच्या पृष्ठभागाकडे खेचून घेणे किंवा दूषित रक्त शरीराबाहेर काढून टाकणे, हा असे. तुंबडी लावण्याचे दोन प्रकार वापरात होते : (१) शुष्क आणि (२) आर्द्र. शुष्क तुंबडी लावण्यासाठी दूषित भागावरील त्वचेवर पैशासारखा गोल पदार्थ ठेवून त्यावर कापूर ठेवून तो पेटवितात. जाळ झाल्याबरोबर त्यावर धातूची लोटी उलटी ठेवतात. लोटीतील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आतील हवेचा दाब कमी पडतो व त्वचा आत ओढली जाते. लोटीचे काठ जाड व गोल असले म्हणजे त्वचेला इजा होत नाही.
पैसा, कापूर व लोटी ऐवजी कपासारखे जाड काठाचे काचेचे भांडे आणि स्पिरिट वापरूनही तुंबडी लावता येते. अगोदर स्पिरिटचे २–३ थेंब भांड्यात टाकून ते पेटवतात व जाळ संपता संपता ते उपडे करून त्वचेवर दाबून धरतात. ज्या ठिकाणी तुंबडी लावायची ती जागा गरम पाण्याने प्रथम स्वच्छ धुऊन टॉवेलने कोरडी केल्यास साधारण दमट त्वचेवर तुंबडी चांगली बसते. खालील त्वचा सुजून लाल दिसू लागलीम्हणजे तुंबडी काढून टाकतात. एका टोकावर रबरी चेंडू बसविलेल्या तुंबड्याही मिळत.
आर्द्र तुंबडी लावण्याकरिता प्रथम वर दिल्याप्रमाणे सर्व क्रिया करतात. काचेचे भांडे काढून टाकल्या जागी म्हणजेच सुजून लाल झालेल्या त्वचेवर बोथट हत्याराने लहान लहान ओरखडे काढतात. कधीकधी चाकूने छोटे छेदही घेतात. त्यांमधून रक्त बाहेर येऊ लागताच त्याच जागी दुसरी तुंबडी बसवितात. या दुसऱ्या तुंबडीत ८५ ते ११५ घ.सेंमी. रक्त गोळा होईपर्यंत ती ठेवतात. आर्द्र तुंबड्या बहुधा जेथे त्वचा जाड असते अशा जागी (उदा., मान, कटिभाग, पुरुषांचे वक्षस्थळ वगैरे) लावीत.
ही चिकित्सा पद्धती पाश्चात्त्य देशांत वापरात नाही. भारतात कित्येक वैदू लोक त्वचाविकार आणि नारूसारख्या विकारांवर तुंबड्या लावण्याचा उपचार करतात.
लेखक : वा. रा. ढमढरे / य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
वातावरणातील उष्णता फार वाढल्यामुळे होणार्या विका...
शरीरातील स्नायू ताठ होऊन त्यांचे प्रचंड, अनियंत्रि...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्...
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...