दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक इलाज, नैसर्गिक दात वाकडेतिकडे असल्यास ते व्यवस्थित करणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक दात पडल्यास त्या जागी कृत्रिम दात बसविणे इत्यादींचा समावेश दंतवैद्यकात होतो. दंतवैद्यक हा एक स्वतंत्र व्यवसाय असून सर्वसाधारण दंतवैद्याशिवाय या शास्त्रातील काही विषय अधिक प्रगत झाल्यामुळे त्या विषयांचे विशेषज्ञही तयार झाले आहेत.
दात हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानवी वैद्यकाच्या इतर शाखांप्रमाणे दंतवैद्यकातही झपाट्याने प्रगती झाली आहे. दातांच्या निरनिराळ्या विकृतींचे सांगोपांग व मूलभूत संशोधन होत असल्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिबंधात्मक आणि चिकित्सात्मक इलाज करणे शक्य झाले आहे. नव्या संवेदनाहारक औषधांच्या शोधामुळे वेदनारहित दंतोपचार करता येऊ लागले आहेत. नैसर्गिक दातावरहुकूम हुबेहुब कृत्रिम दात बनविण्यात व ते तोंडात बसविण्याच्या कलेमध्ये प्रगती झाल्यामुळे दंतविहीन व्यक्तींना वरदानच मिळाले आहे. दंतवैद्याकडून दात काढून घेण्याकरिता हिरडयांमध्ये संवेदनाहारक अंतःक्षेपण (इंजेक्शन) घेताना सुईने टोचावे लागते. आता ही औषधे सुईशिवाय उच्च दाबाखाली हिरड्यांत शिरविण्याच्या पद्धतीचा शोध लागला आहे.
कमीतकमी ५,००० वर्षांपासून सुसंस्कृत समाजात हल्लीचेच दंतरोग होत आलेले आहेत, असे ऐतिहासिक पुराव्यावरून दिसून येते. याचा सर्वांत प्राचीन पुरावा ईजिप्तमधील इ. स. पू. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या आणि आजही उपलब्ध असलेल्या शुष्क शवांचा (विशिष्ट पद्धतीने जतन केलेल्या प्रेतांचा, ममींचा) आहे. त्यांच्या तपासणीत दात किडणे, दातात पू होणे, गळवे होणे इ. प्रकार आढळले आहेत. जगातील सर्वांत जुनी कवळी त्यात सापडली आहे. इट्रुस्कन (इ. स. पू. ११००), फिनिशियन (इ. स. पू. ३००) वगैरे प्राचीन संस्कृतींच्या उत्खननात मिळालेल्या सांगाड्यांतही तीच परिस्थिती आढळली आहे. त्यांमध्ये सोन्याच्या तारा, पट्ट्या व हस्तिदंत वगैरेंचा उपयोग करून बसविलेले कृत्रिम दर्शनी दात सापडले आहेत.
सर्वांत प्राचीन लिखित पुरावा इ. स. पू. १६०० मधील ईजिप्शियन पपायरसाचा (सायपेरस पपायरस या जलवनस्पतीपासून बनविलेल्या कागदासारख्या पदार्थावरील लेखाचा) आहे. यामध्ये दंतरोग आणि जबड्यांचे अस्थिभंग यांचा उल्लेख आहे. तदनंतर पाश्चिमात्य देशांतील प्राचीन भिषग्वर्य हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४००), सेल्सस (इ. स. ६०) व गेलेन (इ. स. १३०–२००) यांच्या ग्रंथांत दंतरोगांची माहिती व उपचार दिले असून दात काढण्याच्या क्रियेचाही उल्लेख आहे. हे ग्रंथ पंधराव्या शतकापर्यंत निदान, साध्यासाध्य विचार व चिकित्सा या बाबतींत यूरोपात प्रमाण मानले जात होते.
भारतातील चरक, सुश्रुत (इ. स. पू. ६००) आणि वाग्भट (इ. स. ८००) यांच्या वैद्यकावरील प्राचीन ग्रंथांतून मुख्य रोग या विभागात दंतरोगांविषयी बरीच माहिती आहे. दात काढण्याच्या क्रियेचा व हत्यारांचाही त्यांत उल्लेख आहे.
प्राचीन काळी कृत्रिम दात बसविण्याचे काम वैद्य लोक करीत नसून सोनार किंवा तत्सम कारागीर करीत व ते सुद्धा फक्त समोरचे शोभेचे दात बसवीत आणि फक्त श्रीमंतांनाच ते शक्य असे.
यूरोपात अठराव्या शतकापर्यंत लाकूड, हस्तिदंत वगैरेंपासून कोरून तयार केलेले दात, लहान प्राण्यांचे दात, कधीकधी दुसऱ्या व्यक्तीचे दात हे कारागीर वापरीत. लढाईत मरण पावलेल्या सैनिकांचे दात उपटून विकल्याची उदाहरणेही नमूद आहेत.
सोळाव्या व सतराव्या शतकांत वैद्यकाच्या शास्त्रशुद्ध पायाभरणीस सुरूवात झाली. याच सुमारास दंतरोगावरील स्वतंत्र लेखनास व दंतवैद्यकाच्या स्वतंत्र व्यवसायास मान्यता मिळावयास सुरूवात झाली. केवळ दंतवैद्यकास वाहिलेला पहिला ग्रंथ प्येअर फोशेर्द या फ्रेंच वैद्यांनी १७२८ साली प्रसिद्ध केला. तत्पूर्वी लाइपसिक येथे १५३० मध्ये दंतवैद्यकावरील पहिले पाठ्यपुस्तक प्रसिद्ध झाले होते. पंधराव्या शतकाच्या सुरूवातीस फ्रान्समध्ये न्हावी शस्त्रक्रियातज्ञाचे काम करीत व दंतोपचारही करीत. या शतकात शस्त्रक्रियातज्ञांचे स्वतंत्र स्थान मान्य होऊन त्यांना अधिकृत परवाना देण्याची प्रथा सुरू झाली. म्हणून पुष्कळसे काम न्हाव्यांकडून काढून घेण्यात आले, तरीही दंतोपचार तेच करीत. याच काळात १५८८ च्या सुमारास फ्रान्स विद्यापीठात दंतवैद्यकाच्या शिक्षणाकरिता विद्यार्थी घेणे सुरू झाले. १६२२ च्या सुमारास ‘शस्त्रक्रियातज्ञ–दंतवैद्य’ (सर्जन–डेंटिस्ट) अशी पदवी प्रचारात आली होती. इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात दंतवैद्यकास स्वतंत्र व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली. या विषयावरील पहिले इंग्रजी पाठ्यपुस्तक १६८५ मध्ये प्रसिद्ध झाले.
प्येअर फोशेर्द यांच्या ग्रंथानंतर अठराव्या शतकातच आणखी दोन ग्रंथ या विषयावर प्रसिद्ध झाले. १७५६ मध्ये जर्मन दंतवैद्य फीलिप प्फाफ व १७७१ मध्ये इंग्लिश शरीररचनाशास्त्रज्ञ व शस्त्रक्रियातज्ञ जॉन हंटर यांनी ते लिहिले होते. १७९९ मध्ये जोसेफ फॉक्स यांची लंडनच्या गाय रूग्णालयात शस्त्रक्रियातज्ञ–दंतवैद्य म्हणून नेमणूक झाली. याच सुमारास या रुग्णालयाशिवाय इतर काही संस्थांमधून दंतवैद्यक हा विषय शिकविण्यास सुरूवात झाली. इंग्लंडमधील काही दंतवैद्यांनी गरिबांच्या सेवेकरिता स्वतंत्र दंतोपचार केंद्रे स्थापिली होती. या केंद्रांत शिकाऊ विद्यार्थी घेण्यात येत. १८५८ मध्ये ओडोन्टोलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेने पहिली दंतवैद्यकीय शाळा स्थापिली व त्यानंतर कॉलेज ऑफ डेंटिस्ट्स ऑफ इंग्लंड या संस्थेची दुसरी शाळा निघाली. या दोन्ही खाजगी स्वरूपाच्या होत्या. १८७८ मध्ये पहिला दंतवैद्यक कायदा संमत करण्यात आला व दंतवैद्यांच्या नावांची रीतसर नोंदणी करण्यात येऊ लागली; परंतु कायद्याप्रमाणे शिक्षण नसलेल्यांना हा व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली नव्हती.
अमेरिकेत १७९० च्या शेवटास दंतवैद्यकास स्वतंत्र व्यवसाय म्हणून मान्यता प्राप्त झाली. १८०० मध्ये पहिले पाठ्यपुस्तक निघाले होते. डेंटल सोसायटीची पहिली सभा १८३४ मध्ये भरली होती. या सुमारास हा व्यवसाय पूर्ण शिक्षित, अर्धशिक्षित व भोंदूच्या हातात होता. दंतवैद्यकाच्या दोन शाळा काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पहिली यशस्वी शाळा १८४० मध्ये बॉल्टिमोर येथे स्थापन झाली. त्यानंतर अनेक शाळा निघाल्या व त्या खाजगी होत्या. १८६७ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाशी संलग्न असलेली पहिली दंतवैद्यकाची शाळा निघाली.
याच सुमारास कॅनडातही दंतवैद्यकाच्या संघटित रचनेस सुरूवात झाली होता. १८६८ मध्ये आँटॅरिओ प्रांतात पहिला दंतवैद्यकीय कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार नावनोंदणीकरिता पाच वर्षे प्रत्यक्ष अनुभवाची अट होती.
भारतीय वैद्यकाची प्रगती अनेक वर्षे खुंटलेली राहून त्यातील शस्त्रक्रिया विभागाचा लोप झालेला आहे. त्यामुळे भारतास आधुनिक दंतवैद्यक सर्वच्या सर्व उसने घ्यावे लागले आहे. आधुनिक वैद्यकाच्या शिक्षण संस्था भारतात १८४० च्या सुमारास निघाल्या, परंतु दंतवैद्यकाचे एकही विद्यालय १९२० पर्यंत निघाले नव्हते. त्या सुमारास बरेचसे अर्धशिक्षित, मोजके पाश्चात्य पदवीधर, चिनी व जापानी लोक मोठ्या शहरांतून दंतवैद्यकी करीत. भारतीय तरूणांना शिक्षणाभावी या व्यवसायात पडण्याची संधी नसावी याची खंत वाटून रफिउद्दीन अहमद (१८९०–१९६५) या अमेरिकेहून पदवी घेऊन आलेल्या दंतवैद्यांनी पहिले दंतविद्यालय १९२० साली कलकत्ता येथे काढले. त्यांना भारतीय दंतवैद्यकाचे जनक म्हणतात. पुढील दहा वर्षांत मुंबई व कराची येथे दोन खाजगी दंतविद्यालये निघाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिले सरकारी विद्यालय १९३२ मध्ये लाहोरला निघाले. दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्याची दंतवैद्यांची गरज बऱ्याच प्रमाणात या खाजगी विद्यालयातील पदवीधरांनी भरून काढली. १९४८ पर्यंत कोणासही दंतवैद्यकीचा व्यवसाय करता येत होता. त्या वर्षी दंतवैद्य कायदा संसदेने संमत केला व त्यानुसार दंतवैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्यास पदवीची सक्ती करण्यात आली आणि त्यांच्या नावनोंदणीस सुरूवात झाली.
पुढारलेल्या देशांत दंतवैद्यकाची बरीच प्रगती झाली असून दर्जाही वाढला आहे. बहुतेक सर्व देशांत दंतवैद्यांना परवाना व नावनोंदणीची सक्ती आहे. सरकारशिवाय इतर काही मान्यवर संस्थांना शिक्षण, परीक्षा व पदव्या देता येतात. कॅनडा आणि अमेरिका या देशांत खाजगी व्यवसायात पडण्यापूर्वी ठराविक वर्षे सरकारकरिता काम करण्याची सक्ती आहे. रशियामध्ये सर्वच दंतवैद्य कायमचे सरकारी नोकरच असतात. ब्रिटनमध्ये माता–बाल संगोपन केंद्रे आणि शालेय दंतवैद्यक सेवा यांकरिता दंतवैद्यांच्या नेमणूका स्थानिक स्वराज्य संस्था करतात. सैनिकांकरिता दंतवैद्यकीय सेवेची खास योजना असते.
जपानमध्ये १८९० साली पहिले दंतविद्यालय निघाले व त्यानंतर अमेरिकन पद्धतींचा तेथे अवलंब करण्यात आला. तेथे दंतवैद्यकास वैद्यकाची एक शाखा असे कधीच मानण्यात आले नव्हते. आज दंतवैद्यकात जपान आपल्या संशोधनामुळे व चिकित्सा तंत्रामुळे अग्रेसर गणला जातो.
भारतातही दंतवैद्यकीचा दर्जा वाढत आहे. मुंबई, कलकत्ता, मद्रास, लखनौ, केरळ, पाटणा इ. वीस विद्यीपीठांत दंतवैद्याच्या शिक्षणाची सोय असून कलकत्ता व मुंबई येथे खाजगी संस्थांनाही पदविका देण्याची परवानगी आहे. सर्वसाधारणपणे वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ करण्यापूर्वी जे विषय शिकावे लागतात, तेच विषय दंतवैद्यकीय शिक्षणापूर्वी शिकावे लागतात. चार वर्षांच्या पदवीपूर्व शिक्षणक्रमानंतर बी. डी. एस्. (बॅचलर ऑफ डेंटल सायन्स) पदवी मिळते. मुंबई, लखनौ, मद्रास, बंगलोर, गुजरात यांसारख्या विद्यापीठांत पदव्युत्तर विशेष विषय शिकवण्याचीही सोय असून उत्तीर्ण झालेल्यांना एम्. डी. एस्. (मास्टर ऑफ डेंटल सायन्स) पदवी देण्यात येते. या विशेष विषयांमध्ये पुढील विषयांचा समावेश होतो. (१) वक्रदंत चिकित्सा (वेडेवाकडे दात सरळ करणे, ऑर्थोडोंटिक्स), (२) परिदंतबंधन आणि त्याच्या विकृती व उपचार (पेरिओडोंटिक्स), (३) कृत्रिम दात बसविणे (प्रॉस्थोडोंटिक्स), (४) मुखातील शस्त्रक्रिया, (५) दातांची क्ष–किरण चिकित्सा (रेडिओडोंटिक्स), (६) दंतवैद्यकीय शस्त्रचिकित्सा, (७) दंत–विकृतीविज्ञान व सूक्ष्मजंतुविज्ञान, (८) बाल–दंतवैद्यक (पेडोडोंटिक्स). वरील विषयांच्या यादीवरून दंतवैद्यकाच्या प्रगतीची सहज कल्पना येते. भारतात सध्या २० पेक्षा जास्त दंतवैद्यालये असून तेथे उत्तम दर्जाच्या शिक्षणाची सोय आहे. भारतात दंतवैद्यकाच्या प्रगतीकडे लक्ष पुरविणाऱ्या चार नोंदणीकृत संस्था आहेत : (१) द डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, (२) इंडियन डेंटल असोशिएशन, (३) इंडियन अकॅडेमी ऑफ डेंटिस्ट्रि आणि (४) इंडियन ऑर्थोडोंटिक सोसायटी.
इंडियन डेंटल अॅसोसिएशन ही संस्था १९४६ मध्ये नोंदविण्यात आली. १९४८ च्या कायद्याप्रमाणे नोंदणी झालेल्या कोणाही दंतवैद्यास या संस्थेचे सभासदत्व मिळते. तिच्या एकूण २२ प्रांत शाखा आणि ४५ स्थानिक शाखा आहेत. संस्थेमार्फत दंतवैद्यास वाहिलेले जर्नल ऑफ इंडियन डेंटल अॅसोसिएशन हे मासिक प्रसिद्ध होते.
पाश्चात्य देशांत सार्वजनिक दंतवैद्यकीय सेवेकडे विशेष लक्ष पुरविण्यात येते. तेथे दंतवैद्यकीय आरोग्यवैज्ञानिक, दंतवैद्यकीय मदतनीस व तंत्रज्ञ आणि परिचारिका यांना खास प्रशिक्षण देण्यात येते. सार्वजनिक दंतारोग्य हा खास विषयही शिकवला जातो.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल डेंटल फेडरेशन नावाची संस्था १९०० सालापासून काम करीत असून तिच्यामार्फत एक त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते. जगातील पहिले दंतवैद्यकविषयक नियतकालिक १८३९ मध्ये प्रसिद्ध झाले. १९७० च्या सुमारास निरनिराळ्या २९ भाषांतील ७७० नियतकालिके प्रसिद्ध होत होती. अमेरिकन काँग्रेसने नॅशनल डेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची दंतवैद्यकीय संशोधन करणारी संख्या स्थापन करण्यास १९४८ मध्ये मान्यता दिली. याशिवाय खाजगी संस्थांत व विद्यालयांतही संशोधनावर भर देण्यात येत असून दात किडणे व परिदंतबंधनविकृती यांसारख्या नेहमी आढळणाऱ्या परंतु ज्यांचे कारण अजूनही अज्ञान आहे, अशा रोगांवरील संशोधनास जोराची चालना मिळाली आहे.
आ. १. दंतवैद्यकीय खुर्ची व उपकरणे : (क) रोग्याने बसावयाची दंतवैद्यकीय खुर्ची; (आ) दंतवैद्यकीय उपकरणे : (१) गिरमिट, (२) दिवा, (३) पायाने दाबता येणारी बटने.
दंतवैद्यकीय उपकरणांत पूर्वीपेक्षा पुष्कळच सुधारणा झालेली आहे. दंतवैद्यकीय खुर्ची, दात काढावयाचे चिमटे, कृत्रिम दात, दात कोरावयाचे यंत्र (दंत गिरमिट) इत्यादींमध्ये प्रगती झाली आहे. जुन्या दंत गिरमिटामुळे उष्णता उत्पन्न होऊन वेदना होत. त्या कमी करण्याकरिता पाणी व हवेचा वापर करून उपकरण थंड ठेवता येते. नवी गिरमिटे अतिशय वेगाने (मिनिटास २ लक्ष फेरे) फिरतात व काम अतिशय जलद होऊन वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे ती संवेदनाहारकाशिवाय वापरणे शक्य झाले आहे.
या शाखेमध्ये दात वाकडेतिकडे येऊ नयेत म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक इलाज, ते तसे आल्यास शक्यतो सरळ करणे, जबडा व चेहरा यांची त्यामुळे होणारी विद्रुपता शक्यतो घालविणे या गोष्टींचा समावेश होतो. दात वेडेवाकडे आल्यास वरच्या आणि खालच्या दातांचे चर्वण पृष्ठभाग एकमेकांशी संलग्न होत नाहीत. याला ‘दंतचर्वणविकृती’ म्हणतात. केवळ दात वाकडेतिकडे असतात असे नसून वरच्या आणि खालच्या दंतकमानी एकमेकींशी नीट टेकतही नाहीत. यांत्रिक उपकरणे, प्रत्यास्थी (अपाय न होता देता येईल इतपत) ताण आणि रोग्याच्या चर्वणसवयीतील दोष काढण्याचा प्रयत्न यांचा प्रथम काही महिने उपयोग केला जातो. त्यामुळे वाढ आणि स्नायूंच्या क्रियाशीलतेत योग्यते बदल घडून येण्यास वेळ मिळतो. या इलाजांचा अंतिम परिणाम दातांचे एकमेकांशी असलेले चर्वण संबंध नीट प्रस्थापित करणे, स्नायूंचे कार्य योग्य चालणे, योग्य अस्थिवाढ आणि सार्वदेहिक आरोग्य यांवर दिसून येतो. दात व जबड्यांचे संबंध नीट झाले म्हणजे चेहऱ्यावरील भावदर्शनास, शब्दोच्च्यारास आणि चर्वणास मदत होते.
आ. २. वेडेवाकडे दात सरळ करण्याकरिता बसविलेला दंतचाप : वरच्या दातांवर दंतचाप बसविलेला असून तो दैनंदिन व्यवहारांत कोणतीही अडचण देत नाही.
परिदंतबंधनविकृतिविज्ञान : या शाखेमध्ये दातांचा आधार असलेल्या दातांच्या जवळील हिरड्या वगैरे ऊतकांच्या (समान कार्य व रचना असलेल्या पेशींच्या समूहांच्या) विकृतींच्या प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक उपायांचा अभ्यास केला जातो. यातच पूर्वी सर्वसामान्यपणे ‘पायोरिया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोगाचा समावेश असतो. या विकृतींची माहिती पुढे दिली आहे.
कृत्रिम दंतस्थापनशास्त्र : या शाखेत कृत्रिम दात बसविण्याशिवाय अपघात, जन्मजात विकृती, मुखातील शस्त्रक्रिया इत्यादींमुळे उत्पन्न झालेल्या विकृती योग्य ते कृत्रिम भाग बनवून दुरूस्त करण्याच्या शास्त्राचा अभ्यास केला जातो. कृत्रिम दात बसविणे ही दंतवैद्यकाची एक मोठी शाखा असल्यामुळे तिचे उपविभाग पाडले आहेत : (१) संपूर्ण कवळी बसविणे, (२) अपूर्ण (काही दातांची) कवळी बसविणे आणि (३) कृत्रिम कायमचे (न काढावे लागणारे) दात बसविणे आणि जरूर तेथे दंतमूल निरोगी व योग्य असल्यास कृत्रिम शिखरे बसविणे.
सध्या चिनी मातीचे व अक्रिलिक प्लॅस्टिकांचे (पॉलिमिथिल मेथॅक्रिलेटाचे) दात वापरात आहेत. ते बसविण्याकरिता मुख्यतः अक्रिलिक प्लॅस्टिकाचा उपयोग केला जातो. याशिवाय सोने, क्रोम–कोबाल्ट मिश्रधातू, अगंज (स्टेनलेस) पोलाद वगैरेंचाही उपयोग करतात.
दंतवैद्यकाची अलीकडे प्रचारात आलेली ही एक शाखा असून तीमध्ये अस्थिभंग, जबड्याची अर्बुदे (गाठी) आणि द्रवार्बुदे (द्रवयुक्त गाठी), उगवण्यात अडचण आलेले किंवा जबड्यात वाकडेतिकडे अडकून राहिलेले दात व त्यांमुळे वेदना, सूज वगैरे दुष्परिणाम होत असल्यास काढून टाकणे, कवळ्या बसविणे सुलभ होण्याकरिता जबड्याच्या हाडावरील उंचवटे कमी करून त्यांना योग्य आकार देणे, पुरेसा आधार नसल्यास धातूच्या पट्ट्या बसविणे, जबड्यांच्या हाडांचा काही भाग नष्ट झालेला असल्यास दुसरीकडील हाडांचे तुकडे वगैरे बसवून पुनर्रचना करणे. खंडौष्ठ (जन्मजात वरचा ओठ तुटलेला असणे) आणि ⇨ खंडतालू (जन्मजात टाळूचे दोन भाग कायम राहणे) यांसारख्या जन्मजात विकृतींवर इलाज करणे इ. विकृतींवरील शस्त्रक्रियांचा समावेश होतो.
दातांच्या विकृतींकरिता लागणाऱ्या विशिष्ट क्ष–किरण चिकित्सेचा अभ्यास या शाखेत केला जातो. त्याकरिता विशिष्ट व सुवाह्य अशी नवी उपकरणे उपलब्ध आहेत.
किडलेल्या दातांचे संपूर्ण नाशापासून संरक्षण करणे (विशेषेकरून शिखराच्या नाशापूर्वी) व त्याकरिता लागणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे योग्य असा खळगा तयार करणे, योग्य त्या पदार्थांनी तो भरून काढणे वगैरेंचा समावेश या शाखेत होतो.
दात, जबडे व तोंडातील श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत अस्तर) यांच्या विकृतींचा अभ्यास, त्यांचे निदान व इलाज यांचा समावेश या शाखेत होतो. सार्वदेहिक रोगामुळे या भागावर होणाऱ्या दुष्परिणामांचा समावेशही त्यात असतो. रोगाची कारणे, सूक्ष्मदर्शकीय ऊतक तपासणी, क्ष–किरण चिकित्सा, रोगलक्षणे इत्यादींची सांगड घालणे हे दंत–विकृतिवैज्ञानिकाचे काम असते.
लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे व त्यांच्या दंतविकारावर इलाज करणे हे या शाखेचे कार्य असते. चेहऱ्याच्या व मुखातील कमानींच्या छोट्या आकारमानास शोभणारे व योग्य असे दुधाचे दात ही निसर्गाची योजना आहे. या दातांच्या आरोग्यावरच नंतर येणाऱ्या कायम दातांची रचना, आरोग्य वगैरे अवलंबून असते.
दंतविकार : दोन प्रमुख दंतविकारांची माहिती येथे दिली आहे.
मानवी विकारांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणास आढळणारा हा एक विकार आहे. दातांच्या शिखरांवरील दंतवल्कात (पांढऱ्या, घट्ट व अतिशय कठीण पदार्थात; एनॅमलात) बहुधा सुरू होणाऱ्या व दाताचा हळूहळू नाश करणाऱ्या विकाराला दात किडणे म्हणतात. अमेरिकेत ९७% लोकांमध्ये किडलेले दात आढळतात.सुधारलेल्या समाजात हा विकार अधिक आढळतो. रानटी लोकांमध्ये त्याचे प्रमाण फार कमी असते; त्यांनी आधुनिक विशेषतः पाश्चात्य लोकांच्या आहाराचा स्वीकार केल्यानंतर हे प्रमाण एकदम वाढल्याचे आढळले आहे. शर्करायुक्त चिकट पदार्थ उदा., गोड बिस्किटे, चॉकोलेटे, जाम, जेली आणि इतर चिकट व गोड मिठाई प्रमाणापेक्षा जादा सेवन करण्याऱ्यांचे दात अधिक किडतात. एवढेच नव्हे तर साखरेचा दर माणशी वार्षिक वापर व दात किडण्याचे प्रमाण सम प्रमाणात वाढतात. लहान मुलांच्या खाण्यात विशेषतः पाश्चात्त्य देशांतील मुलांच्या खाण्यात वरील पदार्थ अधिक येत असल्यामुळे दात किडण्याचे प्रमाणही बरेच आढळते. ७०–७५% मुलांचे दात किडके आढळतात. भारतातही शहरांतील मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ७० ते ८५% मुलांचे दात किडके आढळतात. पहाणीत असेही आढळले की, ७४,००० मुलांच्या तपासणीनंतर फक्त ७८ मुलांनीच दंतोपचार करून घेतले. यावरून दंतविकाराकडे फार दुर्लक्ष होत आहे हे लक्षात येते.
आ. ३. दात किडणे : (अ) दाताच्या किडीची सुरूवात : (१) खोल गेलेली कीड; (आ) एका दाताची कीड शेजारच्या दातात पसरते : (१) किडलेला दंतगर,(२) दंतमूलातील कीड, (इ) कीड दंतगरात पलरून दंतमूलाच्या टोकाशी विद्रधी (गळू) बनतो : (१) विद्रधी (वरील आकृतीत काळा भाग कीड दर्शवितो).ज्या वयात वाढ झपाट्याने होत असते त्या वेळी दात किडल्याने चर्वण नीट होत नाही. परिणामी पचनात कमतरता येऊन शरीराचे पोषण व वाढ यांत बिघाड उत्पन्न होतो. याशिवाय तीव्र वेदना, गळवे होणे, हिरड्यांची सूज, ताप येणे इत्यादींमुळे अभ्यास व खेळ यांत व्यत्यय येतो. किडलेले दात अवेळी काढावयास लागल्यामुळे कायम दात वाकडेतिकडे येण्याचा संभव असतो. वरील कारणांमुळे लहान मुलांच्या दंतविकारावर वेळीच इलाज करणे महत्त्वाचे असते.
दात किडण्याची सुरूवात बहुधा दंतवल्क असलेल्या पृष्ठभागापासून होते. चर्वण पृष्ठभागावर असलेल्या खड्ड्यांमधून व दोन दातांच्या फटीतून अन्न साठून राहण्याची शक्यता असते. या जागी लॅक्टोबॅसिलाय व स्ट्रेप्टोकोकाय या सूक्ष्मजंतूंचा पातळ थर असल्यास ते पिठूळ व शर्करायुक्त पदार्थापासून अल्पावधित लॅक्टिक अम्ल व तत्सम अम्ले तयार करतात. प्रत्येकाच्या तोंडात ही क्रिया चालूच असते. या अम्लांचे उदासिनीकरण (अम्लता नाहीशी होण्याची क्रिया) तोंडातील लाळेमुळे होत असते. तसे न झाल्यास अम्ले जास्त वेळ टिकून राहिल्याने दंतवल्क विरघळून खड्डा पडतो. अशा खड्ड्यातील अन्नकण नेहमीच्या दात स्वच्छ करण्याच्या क्रियेमुळेही निघून जात नाहीत. अम्ले व सूक्ष्मजंतू हळूहळू दंतवल्काचा नाश करतात व खड्डा वाढत जातो. अशा मोठ्या खड्ड्यातून अन्नकण अडकल्याचे लक्षात येऊ लागते. कधीकधी हिरड्यांतही हे अन्नकण घुसतात व त्या दुखू लागतात. हिरड्यांचा सूक्ष्मजंतुजन्य शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो. दंतवल्कानंतर दंतिनातही कीड फैलावते. थंड, उष्ण वा गोड पदार्थांनी कळा येऊ लागतात. किडीबरोबर सूक्ष्मजंतू दंतगरात पोहोचतात व तेथेही शोथ उत्पन्न करतात यामुळे वेदना अधिक तीव्र होतात. हळूहळू दंतगराचा नाश होतो आणि सूक्ष्मजंतू दंतमूलाच्या पोकळीतून हाडात प्रवेश करतात. त्यामुळे तेथे अधूनमधून गळवे किंवा क्वचित प्रसंगी अस्थिमज्जाशोथही (हाडांच्या पोकळीत असणाऱ्या मृदू द्रव्याचा शोथही) उद्भवतो.
एकदा सुरू झालेल्या किडीवर कोणतेही औषधी उपचार उपयुक्त नसतात. किडका भाग काढून टाकून त्यात सोने–चांदीची मिश्रधातू, भाजलेली चिनी माती, संश्लेषित संधानके (कृत्रिम रीतीने तयार केलेली सिमेंटे) वगैरे भरून दात पूर्ववत करता येतो. सरूवातीसच हा इलाज केल्यास तो दात पुष्कळ दिवस टिकतो. कीड दंतगरापर्यंत गेली असल्यास दंतगर काढून टाकून व दंतमूलातील पोकळी निर्जंतुक करू नंतर दात भरतात. कीड लवकर लक्षात येण्याकरिता वारंवार निदान वर्षातून दोन वेळा दंतवैद्याकडून दात तपासून घेणे आवश्यक असते.
दात किडण्यावर सर्वोत्तम इलाज म्हणजे त्यास प्रतिबंध करणे हाच होय. दात योग्य प्रकारे स्वच्छ करणे (यात ब्रश वापरण्याची पद्धत, दंतमंजनाचा प्रकार वगैरेंचा समावेश असतो), कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा टाकून तोंड स्वच्छ करणे, दोन जेवणांमध्ये चॉकोलेटे, बिस्किटे इ. शर्करायुक्त पदार्थांचे सेवन वर्ज्य करणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांना भरपूर दूध दिल्यास दात किडण्याचे प्रमाण कमी होते. असे आढळून आले आहे. दुधाचे दात पडावयाचेच म्हणून त्यांच्या किडण्याकडे दुर्लक्ष करणे सर्वथा अयोग्य ठरते. अशी आबाळ नंतर येणाऱ्या कायमच्या दातांवर दुष्परिणाम करते. पिण्याच्या पाण्यातील फ्ल्युओरीन व दात किडण्याचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.ज्या ठिकाणी पाण्यात फ्ल्युओरीन कमी असते तेथे दात किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा ठिकाणी दहा लाखात १ भाग सोडियम फ्ल्युओराइड मिसळल्यास दात किडण्याचे प्रमाण ३० ते ४०% कमी झाल्याचे आढळले आहे. फ्ल्युओराईडयुक्त दंतमंजन, गोळ्या वगैरेंचेही प्रयोग चालू आहेत. अपुरे कॅल्सिकरण (कॅल्सियम लवणांनी युक्त होण्याची क्रिया) झालेल्या दातामधील कीडीचे प्रमाण अधिक आढळले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतील शास्त्रज्ञांच्या गटाने दात किडण्याच्या कारणांमध्ये कोणत्याही विशिष्ट कारणाचा उल्लेख केलेला नसून काही कारणे मिळून हा विकार उद्भवतो, असे मत प्रदर्शित केले आहे. परिसरीय, पोषणज व आनुवंशिक कारणे, तसेच प्रत्येकाची सार्वदेहिक आणि मुखाची स्थिती या सर्वांचा दात किडण्याशी संबंध असावा. दात किडण्यावरील दोन प्रमुख इलाजांची माहिती खाली दिली आहे.
दाताचा किडलेला भाग कायमचा नाश पावतो म्हणजेच या जागी नवीन ऊतक येऊन तो पूर्वीसारखा केव्हाही तयार होत नाही. कीड वाढली म्हणजे जो खड्डा बनतो तो साफ करणे, जरूर पडल्यास मोठा करणे व तो योग्य त्या पदार्थाने (उदा., चांदी, सोने, संश्लेषित पोर्सेलीन वगैरेने) भरून काढून दाताचा आकार शक्यतो चर्वणयोग्य बनविण्याला दात भरणे म्हणतात. दंतवैद्यकातील ही एक शस्त्रक्रियाच असून तिचे दोन विभाग करतात. पहिल्यात खड्डा योग्य त्या आकाराचा बनवून आणि त्यातील किडका भाग काढून तो भरण्यास योग्य केला जातो. याकरिता गिरमिट वापरतात. गिरमिटांचे निरनिराळ्या आकारांचे फाळ उपलब्ध आहेत. ही क्रिया वेदनारहित व्हावी म्हणून संवेदनाहारक (स्थानिक बधिरता आणणारी) औषधे वापरतात. शिवाय अतिजलद फिरणाऱ्या गिरमिटामुळे वेदना कमी करता येऊ लागल्या आहेत. दुसऱ्या विभागात साफसूफ केलेल्या खड्ड्यात योग्य तो पदार्थ भरला जातो. कोणता पदार्थ वापरावयाचा हे रोग्याचे वय, नुकसानीचे प्रमाण, किडलेल्या दाताचे जबड्यातील स्थान इत्यादींवर अवलंबून असते.
चांदीचे पारदमेल (चांदी, पारा, कथिल आणि थोड्या प्रमाणात तांबे व जस्त असलेली मिश्रधातू), सोने, संश्लेषित पोर्सेलीन किंवा प्लॅस्टिक दात भरण्याकरिता वापरतात. ज्या दातावर चर्वणक्रियेचा अधिक भार पडतो (उदा., दाढा) त्यांचे खड्डे भरण्याकरिता सोने किंवा चांदी योग्य असते. पुढच्या म्हणजेच नेहमी दिसणाऱ्या दातांकरिता पोर्सेलीन किंवा प्लॅस्टिक वापरतात कारण हे पदार्थ रोग्याच्या इतर दातांच्या रंगाशी जुळणारे असे उपलब्ध होऊ शकतात. कधीकधी कीड खोल दंतगरापर्यंत गेलेली असते. अशा वेळी दंतगर काढून त्या ठिकाणी दंतवैद्य प्रथम धातू, ⇨ गटापर्चा किंवा संधानक यासारखा पदार्थ भरतो व वरच्या किडणाऱ्या भागाची भरणी वर दिलेल्या कोणत्याही पदार्थाने करतो. एकमेकांविरूद्ध असलेले किडके दात किंवा एकमेकांशेजारी दात भरावयाचे असल्यास दोन्ही ठिकाणी एकाच प्रकारच्या धातूचे भरणे योग्य असते. कारण तसे न केल्यास धातूंच्या विद्युत् विभवातील (पातळीतील) फरकामुळे सौम्य विद्युत् धक्का बसण्याची शक्यता असते.
ज्या वेळी दात प्रमाणापेक्षा जादा किडलेला असतो किंवा त्यापासून जवळच्या चांगल्या दाताला कीड लागण्याचा संभव असतो त्या वेळी दात काढून टाकावा लागतो. दात दुखावून अर्धवट सुटल्यास किंवा फार हलू लागल्यासही काढून टाकावा लागतो. दंतवैद्यकातील ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया असून पूर्वी तिचा उल्लेख ‘दात उपटणे’ अशा शब्दांनी करीत. अलीकडे या शस्त्रक्रियेचा वापरही अगदी शेवटचा उपाय म्हणून केला जातो. पूर्वी सर्वच किडके दात फक्त ‘उपटून’ टाकीत. आता नवीन तंत्रे आणि औषधे विशेषकरून प्रतिजैव (अँटिबायोटिक) औषधे यांच्या योग्य वापरामुळे दात न काढता शक्यतो टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. दात काढण्याच्या शस्त्रक्रियेला दंतवैद्यकात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून तिचा खास अभ्यास ‘एक्झोडोटिक्स’ या दंतवैद्यकाच्या शाखेत केला जातो. कधीकधी पायोरियामध्ये आणि वक्रदंत चिकित्सेतही दात काढून टाकावा लागतो.
दात काढण्यापूर्वी नोव्होकेनसारखे स्थानिक बधिरता आणणारे अंतःक्षेपण किंवा संपूर्ण बेशुद्धावस्था आणणारा नायट्रस ऑक्साइड वायू, फिनोथाल इ. औषधे वापरतात. दात बधिर केल्यानंतर चाकूसारख्या हत्याराने दंतवैद्य दातापासून हिरडी सुटी करतो. त्यानंतर योग्य त्या चिमट्याने किंवा उचकटण्याच्या विशिष्ट हत्याराने दात काढून टाकतो. हाडाला व दाताभोवतालच्या सर्व मऊ ऊतकांना अजिबात वा शक्यतो कमी इजा व्हावी या उद्देशानेही दात काढण्याची क्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे असते. अजिबात न उगवलेला दात, वरच्या दाढेचे मूळ उत्तर हन्वस्थीच्या (वरच्या जबड्याच्या हाडाच्या) कोटरात गेलेले असल्यास दात काढण्याची शस्त्रक्रिया अधिक अवघड असते. कधी कधी या शस्त्रक्रियेपूर्वी क्ष–किरण चिकित्सा करून दंतरचनेचा अभ्यास करणे भाग असते. अंतर्घटित (आतील बाजूस घट्ट बसलेली) दाढ काढावयाची असल्यास पुष्कळ वेळा रूग्णास रूग्णालयात दाखल करून घेणे हितावह असते. हृद्रोगासारख्या चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारचा रोग असलेल्या रूग्णाने प्रथम वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच दात काढण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी.
दातासभोवतालच्या मऊ ऊतकांच्या विकारांना दंतबंधनविकार म्हणतात. या ऊतकांमध्ये हिरड्या आणि दंतबंध यांचा समावेश होतो. हिरड्या दाट तंतुमय ऊतक व रक्तवाहिन्या मिळून बनलेल्या असतात व त्या प्रत्येक दाताच्या ग्रीवेसोबती (मानेसारख्या भागाभोवती) कॉलरसारख्या बसलेल्या असतात. दंतमूलावरील आच्छादनासारख्या मऊ ऊतकाला दंतबंध म्हणतात. हिरड्यांच्या पृष्ठभागावर स्तरित (थरयुक्त) स्तंभाकार उपकलेचे (पातळ अस्तराचे) आच्छादन असते.
शोथाची सुरूवात सौम्य प्रकारची असून हिरड्यांतून रक्त वाहणे हे प्रथम लक्षण असते. हा विकार वेदनारहित असल्यामुळे नेहमी तो बळावेपर्यंत दुर्लक्ष होते. विकार बहुधा चिरकारी प्रकारचा असून सूक्ष्मजंतू, दातावरील कीटण (कॅल्शियम फॉस्फेट व कार्बोनेट तसेच कार्बनी–सेंद्रिय–द्रव्ये यांचे लाळेच्या क्रियेद्वारे साचलेले थर) व दातांच्या फटींमधील अन्नाचे कण त्यास कारणीभूत असतात म्हणून दात स्वच्छ न करणे हे या विकाराचे प्रमुख कारण असते, असे म्हणणे सार्थ ठरते. हिरड्यांचा शोथ खाली दंतमूलावरील दंतबंधापर्यंत हळूहळू फैलावतो. दंतबंध दंतमूलापासून अलग होऊन दाताभोवती पू गोळा होऊ लागतो.
अतिवृद्विजन्य शोथ या प्रकारात हिरड्या फुगीर व मोठ्या होतात. मधुमेह, काही रक्तविकार, धातुजन्य विषबाधा व अपपोषणज विकार यांसारख्या सार्वदेहिक विकारांमध्ये हा विकार आढळतो. हॉर्मोनविकार [⟶ हॉर्मोने] व गर्भारपणात आढळणाऱ्या या विकारामध्ये तंतुमय ऊतकाची अधिक वाढ झालेली आढळते. कधीकधी अपस्मार (फेफरे) या रोगामध्ये डायलँटीन सोडियम (डायफिनिलहायडॅन्टाइन सोडियम) नावाचे औषध काही वर्षे सतत घ्यावे लागल्यामुळे अशी अतिवृद्धी झाल्याचे आढळले आहे. व्यवस्थित न बसलेल्या कृत्रिम कवळीच्या घर्षणामुळेही हिरड्यांचा शोथ होऊन त्या फुगतात.
वरील सर्व विकारांवरील प्रमुख इलाज म्हणजे कारण शोधून काढून योग्य तो इलाज करणे हाच होय. वेळोवेळी दातावरील कीटण दंतवैद्यांकडून काढून घेणे, दैनंदिन दात सफाई, सूक्ष्मजंतूंची वाढ न होऊ देणे, यांत्रिक क्षोभ होत असल्यास (उदा., कृत्रिम कवळी, वाकडा किंवा तुटलेला दात वगैरे) तो न होऊ देणे वगैरे इलाज करतात.
आ. ४. दंतबंधनविकार-पायोरिया : (अ) निरोगी दात; (आ) हिरड्यांची सूज; (इ) अस्थीच्या खोबणीत असलेला दात : (१) हिरडी, (२) हिरडीमागील पोकळ जागा, (३) अस्थी, (४) दंतमूलात शिरणारी रोहिणी, (५) नीला, (६) तंत्रिका (मज्जा).
पायोरिया : या नावाने सर्वसामान्यपणे ओळखल्या जाणाऱ्या दाताच्या विकाराविषयी १९३५ सालानंतर बरेच संशोधन झाले असून दंतवैद्यकाच्या परिदंतबंधनविकृतिविज्ञान नावाच्या शाखेत या विकाराचा खास अभ्यास केला जातो. पायोरिया या मूळ शब्दाचा सरळ अर्थ ‘पू वाहणे किंवा गळणे’असा आहे.
हिरड्यांच्या कडा, जवळील ऊतक, दंतबंधन, हाडामधील दात बसविलेल्या पोकळ्या या सगळ्यांच्या पूजन्य शोथास पायोरिया म्हणतात. अमेरिकन दंतवैद्य जॉन एम्. रिम्झ (१८१०–५५) यांनी पायोरियाच्या उपचारांचा पाया घातला म्हणून अमेरिकेत हा विकार ‘रिम्झ विकार’ म्हणूनही ओळखला जातो. निरोगी दात हाडाच्या पोकळीत घट्ट बसावेत म्हणून ऊतकाचे धागे दाताच्या ग्रीवेपर्यंत गेलेले असतात. त्यांपैकी काही धागे हिरड्यांतही गेलेले असतात. हिरड्या व दात यांमध्ये कडेच्या जवळ थोडी फट असते. या फटीत सूक्ष्मजंतू वाढू नयेत म्हणून हिरड्यांच्या रक्तातून वाहणाऱ्या भक्षिकोशीका (सूक्ष्मजंतू व इतर बाह्यद्रव्यांचे कण पचवून टाकून त्यांचा नाश करणाऱ्या पेशी) सतत कार्यान्वित असतात. या भक्षिकोशिका रक्तप्रवाहातून बाहेर पडण्यास चर्वणक्रियेची मदत होते. वाढत्या वयोमानाबरोबर तंतुमय ऊतकाच्या धाग्यांपैकी काही तुटतात व ऱ्हास पावतात.
दाताला नेहमी चिकटून असणारी हिरडीची कड सैल पडून फट वाढते. दातावर साचलेले कीटण, वाढलेली फट, तंतूमय ऊतक ऱ्हास या कारणांमुळे सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास मदत होते. भक्षिकोशिका असमर्थ ठरून पायोरियास प्रारंभ होतो. याशिवाय खालचे व वरचे दात एकमेकांशी नीट न जमणे (चर्वण पृष्ठभागावरील खळगे व उंचवटे योग्य प्रकारे न मिळणे), सार्वदेहिक शरीरस्वास्थात बिघाड, सतत तोंडाने श्वासोच्छवास करण्याची सवय, अयोग्य आहार, फटीतील अन्नकण काढून न टाकणे इत्यादींमुळेही पायोरिया होण्यास मदत होते. आनुवंशिकता हेही एक कारण असण्याचा संभव आहे. दातात काड्या, टाचण्या वगैरे घालण्याची सवय, पान–तंबाखूचा अतिरेक, किडके दात भरताना किंवा कृत्रिम कवळीमधील तारा किंवा इतर आधार अयोग्य बसविणे यांमुळे हिरड्यांना इजा होण्याचा संभव असतो. चर्वणाचा अभाव (उदा., नेहमी अती मऊ पदार्थ खाण्याची सवय); शिसे, पारा यांसारख्या धातूंचा विषारी परिणाम व अधिहर्षता (अलर्जी) यांची पायोरिया होण्यास मदत होते.
आ. ५. पायोरियाचे दुष्परिणाम : (१) पायोरिया, (२) अन्ननलिका, (३) जठर (अग्निमांद्य, अपचन), (४) श्वासनलिका, (५) हृदय (सूक्ष्मजंतुजन्य अंतर्हृद शोथ), (६) फुफ्फुस (फुफ्फुसशोथ), (७) चिरकारी संधि-विकार, (८) मेंदू (तंत्रिका दौर्बल्य), (९) लसीका ग्रंथी (अपसामान्य वाढ), (१०) मूत्रद्रोण शोथ).दुष्परिणाम : दंतमूलाच्या लांबीच्या अर्ध्या भागावरील दंतबंधने नष्ट झाल्यावर दात हलावयास लागतो व कालांतराने पडतो. हिरड्यांतून पू वाहू लागतो. अधूनमधून गळवे बनून तीव्र वेदना होतात. कधीकधी दात बसविलेल्या खाचेतच पू साठतो. लसीका (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ) व रक्तवाहिन्या यांच्याद्वारे सूक्ष्मजंतूंचे संक्रामण सर्व शरीरभर पसरून निरनिराळ्या व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता असते. पू गिळल्यामुळे जठरक्रियेवर दुष्परिणाम होतो.
स्थानिक कारणे दूर करणे, प्रकृतिदोषावर योग्य उपचार करणे, दात स्वच्छ ठेवून त्यावर कीटण चढू न देणे व वाढल्यास दंतवैद्याकडून वेळोवेळी काढून टाकणे जरूर असते. दात स्वच्छ करताना हिरड्या मालिश केल्यासारख्या चोळल्यास घट्ट होतात. दातांत व हिरड्यांस व्यायाम होण्याकरिता सर्वच आहार मऊ न ठेवता त्यात काही कठीण पदार्थही असावेत. चर्वण नीट व सावकाश करण्याची सवय ठेवावी.
रोग प्रथमावस्थेत असताना म्हणजे हिरडी व दात यांमधील फूट अत्यल्प वाढलेली असताना कीटण काढून टाकल्यास व इतर संभाव्य कारणे काढून टाकल्यास रोग बरा होण्याची शक्यता असते. विकार बळावल्यास पुवाचा स्त्राव व वारंवार गळवे होऊ लागल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे पुष्कळ वेळा दात काढून टाकावे लागतात. कधीकधी हिरड्यांचा काही भागच काढून टाकून दात व हिरडी यांमध्ये फट किंवा पोकळीच न उरेल अशी शस्त्रक्रिया करतात. पडलेल्या दातांची जागा दंतवैद्याकडून कृत्रिम दात बसवून भरून काढण्याने उरलेल्या आजूबाजूच्या नैसर्गिक दातांची मूळ स्थिती टिकून राहते.
लहान मुलांचे दात दुधाचे दात असतात व ते पडणारच आहेत अशा वृत्तीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वथा चूक असते. दुधाचे दात किडणे किंवा ते योग्य वेळेपूर्वीच पडणे लहान मुलांच्या चर्वणक्रियेत बिघाड उत्पन्न होण्यास कारणीभूत असतात. वेळेपूर्वीच दुधाचे दात पडल्यास येणारे कायमचे दात वाकडेतिकडे येतात. त्यामुळे दंतचर्वणविकृती उत्पन्न होते व चेहऱ्याच्या विद्रुपतेचे ते एक कारण बनते.
मुलाला पुढचे दात आल्यापासूनच माता–पित्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष पुरविणे जरूर असते. वयाच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटास जवळजवळ दुधाचे सर्व दात आलेले असतात. या वयापासून मुलाला मऊ केसांचा छोटा ब्रश आणि सुखावह दंतमंजन वापरण्यास शिकविता येते. सुरूवातीचे काही महिने त्याकडे पालकाने लक्ष पुरविणे जरूर असते. आहारातील खाद्यपदार्थात काही जाड्याभरड्या (म्हणजे मुद्दाम चावून मऊ कराव्या लागणाऱ्या) पदार्थांचा समावेश असावा. दुधाचे दात आल्यानंतर एकदा आणि नंतर वेळोवेळी दंतवैद्याकडून तपासणी करून घेतल्यास पुढे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळणे शक्य असते.
प्रत्येक जेवणानंतर दात ब्रशाने साफ करणे हितावह असते. निदान प्रत्येक वेळी स्वच्छ पाण्याने खळखळून चुळा टाकणे जरूर असते. दातांच्या फटीतील अन्नाचे सर्व कण निघून जावे हा याचा मुख्य उद्देश असतो. जंतुनाशक औषधांनी युक्त असलेले दंतमंजन वापरावे. ब्रश वापरणाऱ्यांनी तो आडवा तिडवा दातावर घासू नये त्यामुळे दंतवल्कावर वाईट परिणाम होतोच शिवाय सर्व अन्नकण निघतही नाहीत. वरच्या दातावर ब्रश वरून खाली व खालच्या दातावर खालून वर फिरवावा. चर्वणपृष्ठभाग साफ करण्यास विसरू नये. दातांच्या सफाईस दिलेला वेळ, ब्रशाचा योग्य वापर आणि जेवणानंतर प्रत्येक वेळी सफाई करणे या गोष्टी दाताच्या किडीला प्रतिबंध करतात.
संदर्भ : 1. Deway, M. Practical Orthodontics, London, 1955.
2. Fenn, H. R. B. and others, Clinical Dental Prosthetics, Toronto, 1953.
3. Goldman, H. M. Perodontia, London, 1953.
4. Grossman, L. I. Ed. Lippincott’s Handbook of Dental Practice, London, 1958.
5. Hollander, L. N. Modern Dental Practice, Philadelphia, 1967.
6. Mead, S. V. Oral Surgery, London, 1954.
7. Salzman, J. A. Practice of Orthodontics, Philadelphia, 1966.
8. K. H. Oral Pathology, London, 1954.
लेखक : ग. कृ. किनरे / य. त्र्यं. भालेराव,
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि ...
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही ...
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्...
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्...