অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग चिकित्सा

ज्या रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तिला ‘योगचिकित्सा’ म्हणतात. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथी ही जशी वैद्यकीय शास्त्रे असून, रोगोपचार हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे,तसा योगशास्त्राचा चिकित्सा हा प्रमुख हेतू नाही, हे निर्विवाद आहे; परंतु शतकानुशतके योगाचा चिकित्सेकरिता उपयोग करण्यात आलेला आहे.

मूळ संस्कृत शब्द ‘युज्‌’ या जुळणे अथवा जोडणे या अर्थाच्या शब्दावरून ‘योग’ हा शब्द बनला असून,जीवात्मा व परमात्मा यांना जोडणे किंवा एकत्र आणणे अशा अर्थी तो योगशास्त्रात वापरला जातो. योगाचा हा हेतू व तो साधण्याचे सिद्धांत अतिप्राचीन आहेत. महर्षी पतंजलींनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकात या शास्त्राची मांडणी केली. त्यांनी योगसूत्र या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र अत्यंत मोजक्या शब्दांत संपूर्ण व मुद्देसूद मांडले आहे.

पातंजल योगसूत्रात ‘यमनियमासन-प्राणायाम-प्रत्यहारधारणाध्यान समाधयोऽष्टांगानि’ असा उल्लेख आहेत. त्यापैकी यम, नियम,आसन आणि प्राणायाम ही पहिली चार अंगे शरीरासंबंधी असल्यामुळे त्यांचा शरीरस्वास्थ्याशी, तर उरलेल्यांचा मनःस्वास्थ्याशी संबंध येतो. पहिल्या चार अंगांच्या अभ्यासाने शरीराची विशिष्ट तयारी करण्यात येऊन मनाची व चित्‌शक्तीची ताकद वाढवण्यास मदत होते.’ ‘सुदृढ शरीर तरच सुदृढ मन’ अशी योगाची धारणा आहे. योगशास्त्रात किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानात मन व शरीर एकाच संयुगाचे घटक मानले जातात. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र ⇨आयुर्वेदातही हीच संकल्पना रूढ आहे.

योगशास्त्र मूळात वैद्यकशास्त्र नाही हे प्रथम लक्षात घेऊनच त्याचा चिकित्सेकरिता उपयोग करावयास हवा. हठयोग-प्रदीपिका या ग्रंथात हुषार वैद्याने वैद्यकशास्त्रानुसार योग्य ते उपचार योजावेत आणि शिवाय योग्य ते योगोपचारही करावेत, असे सांगितले आहे. कोणतीही चिकित्सा परिपूर्ण नाही, किंबहुना अपूर्णता हा प्रत्येक चिकित्सेचा स्थायीभावच आहे. योगचिकित्सेतही अपघातजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग यांवर उपचार नाहीत.

योगोपचारासंबंधी अधिक माहिती

योगोपचारासंबंधी अधिक माहिती देण्यापूर्वी लोणावळा येथील कैवल्यधाम या संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद आणि अनेक वर्षे यांच्या सहवासात योगावर संशोधन व अभ्यास केलेले सं. ल. विणेकर यांचे काही विचार समजावून घेणे आवश्यक आहे. रोग व रोगचिकित्सा याबद्दलच्या यौगिक संकल्पनांविषयी ते म्हणतात : योगाबद्दलची सर्वसाधारण कल्पना म्हणजे ते मन आणि चित्‌शक्ती यांसंबंधीचे एक शास्त्र आहे एवढीच आहे; परंतु पतंजलींच्या योगसूत्रांच्या सखोल अभ्यासानंतर हे सहज लक्षात येते की,त्यात शरीर व मन दोन्ही अखंड असल्याचेच सांगितले आहे. योगाच्या शरीरक्रिया विज्ञानविषयक संकल्पनेप्रमाणे दोन्हींमध्ये समस्थिती राखणारी यंत्रणा असून तिच्या समकालिक कार्यवाहीमुळे (‘समाधि’मुळे), प्राकृतिक बाह्य व अंतःस्थ उद्दीपनांना (क्लेशांना) न जुमानता, प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात अनुयोजनाची अथवा समायोजनाची शक्ती असते. शरीर व मन नेहमी कार्य संतुलनाचा प्रयत्न करीत असताना कोणतेही बाह्य किंवा अंतःस्थ प्रक्षोभक (मग ते यांत्रिक, रासायनिक, विद्युत्‌, जैविक किंवा मानसिक असले तरी) थोडाफार मनःशरीरक्रियात्मक बदल (‘विक्षेप’) घडवून आणते. हा बदल अथवा विक्षेप किती काळ टिकावायचा ते प्रक्षोभकाचा जोर आणि शरिराची मनःकायिक समस्थितीची क्षमता यांवर अवलंबून असते. योगोपचारांचा उद्देश शरीराला व मनाला समस्थिती संतुलित ठेवण्यास किंवा बिघडली असल्यास शक्य तितक्या लवकर पूर्ववत होण्यास मदत करणे हा असतो.

रोग अथवा व्याधी हा असाच समस्थिती संतुलनाचा बिघाड आहे. योगाचा उद्देश समाधी हा आहे. समाधीच्या उलट व्याधी म्हणजे ऐकमत्याभाव अथवा बिघाड. अविरोधता व एकत्रीभवन साधणे हा योगाचा सतत हेतू असतो.

रोगोपचाराकडे दोन निरनिराळ्या दृष्टिकोनांतून बघता येते : एकात प्रक्षोभक कारण शोधून ते नाहीसे करणे व शरीराची पूर्वावस्था येण्याकरिता दुसरे काहीही न करणे, तर दुसऱ्यात शरीराला स्वतःलाच प्रक्षोभकाविरुद्ध लढा देण्यास समर्थ बनवून स्वप्रयत्नांनी रोगावर विजय मिळूवन देणे. योगाचा रोगाकडे व इतर सर्व बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन एकच आहे : स्वशरीर अधिक बळकट करून रोगनाश करणे, प्रक्षोभकाचा शोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अधिक चांगले.

योगशास्त्र वैद्यकासारखे चिकित्साशास्त्र नसले, तरी वैद्यकातील आरोग्यरक्षण, व्याधि-निवारण, व्यक्तिमत्वविकास यांसारख्या विषयांमुळे त्याचा व वैद्यकाचा जवळचा संबंध असल्याचे लक्षात येते. अलीकडील योगशास्त्रावरील नव्या ग्रंथांतून योगोपचार व षट्‌क्रिया यांचा संबंध दाखविण्यात येतो; परंतु या क्रिया जेव्हा हठयोगात समाविष्ट झाल्या, तेव्हापासूनच योगाचा चिकित्सात्मक उपयोग सुरू झाला, असे म्हणता येते.

हठ-प्रदीपिकेप्रमाणे षट्‌क्रिया केल्याने मेदवृद्धी (स्थूलता) नाहीशी होते, कफ-दोष नाहीसा होतो व मलशुद्धी वगैरे साध्य होतात;त्यानंतर केलेला प्राणायाम (श्वसन नियंत्रण) विनासायास साध्य होतो. षट्‌क्रियां मुळे अन्न, हवा व मल यांचे मार्ग शुद्ध होतात आणि शुद्ध शरीर म्हणजेच वात, पित्त व कफ या त्रिदोषांचे संतुलन असलेले शरीर, प्राणायामास योग्य असते. ज्यांना दोषबाधा नसेल त्यांना षट्‌क्रिया करण्याची आवश्यकता नाही, असेही हठयोगात स्पष्ट सांगितले आहे.

षट्‌क्रिया

धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली व कपालभाती या शुद्धिक्रिया आहेत.

  1. धौती : ज्या क्रियेत शरीर भाग धुवून किंवा पुसून स्वच्छ करतात तिला ‘धौती क्रिया’ म्हणतात. निरनिराळी साधने (वस्त्र, रबरी नळी इ.) वापरून शरीराचे अंतर्भाग धुता येतात. मुखापासून गुदद्वारापर्यंत अन्नमार्ग व पर्यायाने मलमार्ग शुद्ध होतो. ह्या प्रकारांमध्ये दंतमूल धौती, जिव्हामूल धौती, हृद धौती (येथे हृद म्हणजे ‘जठर’) इत्यादींचा समावेश आहे.
  2. बस्ती : बस्ती या शब्दाचा मूळ अर्थ ‘मूत्राशय’ असा आहे. बोकडाचे मूत्राशय पिशवीप्रमाणे पाणी किंवा जलमिश्रित औषधी द्रव्ये साठविण्याकरिता वापरून, त्या पिशवीला नळी जोडून ते द्रव्य गुदद्वारातून गुदाशयात ढकलून साफ करण्याकरिता वापरीत. या क्रियेला साधानावरून ‘बस्ती क्रिया’असे नाव मिळाले आहे. या क्रियेचे अनेक प्रकार आहेत. बद्धकोष्ठ बरे होणे, मोठ्‌या आतड्‌याचेरुधिराभिसरण सुधारणे, मूळव्याधीस प्रतिबंध इ. फायदे बस्तीमुळे होतात.
  3. नेती : नाक स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘नेती’ म्हणतात. नाकाचा आतील भाग स्वच्छ करण्याकरिता पाणी, सुताची दोरी वगैरेसाधने वापरतात आणि त्यावरून ‘जल नेती’, ‘सूत्र नेती’, ‘रबर नेती’ इ. नावे या क्रियेच्या प्रकारांना दिली आहेत. श्वसनमार्गातीलमहत्त्वाचा नासामार्ग स्वच्छ होऊन श्वसन सुधारणा, नाकातील मांसांकुर किंवा हाडे न वाढणे इ. फायदे होतात.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate