অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्तपेढी

ज्या ठिकाणी बहुधा मोठ्या रुग्णालयाच्या खास विभागात रक्तदात्याकडून गोळा केलेले रक्त त्यावर योग्य प्रक्रिया करून विशिष्ट रीतीने साठवले जाते आणि आवश्यक तेव्हा रुग्णाकरिता पुरवले जाते, त्याला ‘रक्तपेढी’ म्हणतात.

पहिली आधुनिक रक्तपेढी १९३७ मध्ये शिकागो येथील काउंटी रुग्णालयात बर्नार्ड फान्टस यांनी स्थापन केली. १९३८ मध्ये न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय आणि बेलिव्ह्यू रुग्णालयात रक्तपेढी उघडण्यात आली. त्यापूर्वी १९१८ मध्ये ओ. एच्‌. रॉबर्ट्‌सन या वैद्यांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी साठवणीतील रक्ताचा ⇨रक्ताधानाकरिता पहिला प्रयोग केला होता. रक्तवाहिनीतून बाहेर पडताच क्लथन होणे (गोठणे) हा रक्ताचा नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे ते द्रव्य स्वरूपात ठेवणे व दीर्घकाळ टिकवणे यांमध्ये यश आल्यानंतर तसेच त्याचा औषधी उपयोग सिद्ध झाल्यानंतर ते साठवण्याच्या कल्पनेला चालना मिळाली. दुसऱ्या महायुद्धानंतर रक्ताधानाचे महत्त्व निर्विवादपणे सिद्ध झाले व रक्तपेढी हा सर्व सुसज्ज रुग्णालयांचा अविभाज्य भाग बनला.

रक्तपेढीमध्ये रक्त गोळा करणे, साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे, रक्तदात्याची निवड करणे आणि दाता व ग्राहक यांचा रक्तगट ठरवून त्यांच्या रक्ताची संयोज्यता ठरवणे ही प्रमुख कामे केली जातात. यांशिवाय आधुनिक रक्ताधानाकरिता लागणारे रक्तघटक निरनिराळे करणे व त्याकरिता लागणाऱ्या यंत्रणेची देखभाल करणे हे महत्त्वाचे कामही रक्तपेढीत केले जाते. रुग्णाच्या रक्ताची तपासणी करून त्याच्या रक्तस्रावाचे निदान करणे व योग्य उपाय सुचवणे ही कामेही आधुनिक रक्तपेढीत होतात.

रक्ताधान तंत्र सुरुवातीस वापरण्यात आले तेव्हा दात्याचे रक्त सरळ ग्राहकाच्या रक्तप्रवाहात मिसळीत. हल्ली हे तंत्र वापरत नाहीत. बहुतेक रक्तपेढ्या साठवलेल्या रक्ताचा व रक्तघटकांचा पुरवठा करतात.

रक्तदात्याची निवड

रक्तपेढीमध्ये दोन प्रकारचे दाते येतात : (१) स्वेच्छेने रक्तदान करणारे आणि (२) रक्त विकणारे अथवा धंदेवाईक. पाश्चात्त्य देशांतून स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून दोन्हींपैकी हे दाते अधिक धोकारहित असतात. प्रत्येक दात्याचा आरोग्यासंबंधीचा पूर्वेतिहास, रक्तदाब, नाडी, शारीरिक तापमान, वजन, रक्तारुण (तांबड्या कोशिकांतील-पेशींतील-ऑक्सिजनवाहक रंगद्रव्य, हीमोग्लोबिन) प्रमाण आणि ⇨उपदंशासंबंधीची रक्तरस परीक्षा आवश्यक असतात. अलीकडेच लक्षात आलेल्या एड्स वा रोगप्रतिकारक्षमता-न्यूनताजन्य लक्षणसमूह (ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशिअन्सी सिंड्रोम) या व्हायरसजन्य रोगाबद्दल धास्ती उत्पन्न झाल्यापासून सर्वच रक्ताची (विशेषेकरून पाश्चात्त्य देशांतून) फारच काळजीपूर्वक तपासणी केली जाते.

वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान, सर्वसाधारण वजन ५० किग्रॅ., शारीरिक तापमान ३७0·५० से., नाडी गती ५० ते १०० च्या दरम्यान, रक्तदाब (आकुंचन ९० ते १८० मिमी. व प्रसारणात्मक ५० ते १०० मिमी.) असलेली निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. काही रोग रक्तदान करण्यास कायम बंदीकारक आहेत; उदा., व्हायरसजन्य ⇨यकृतशोथ, ⇨आंदोलज्वर वा ब्रूसेलोसिस. कोष्टक क्र. १ मध्ये काही रोगांच्या किंवा परिस्थितींच्या बाबतीत ठरवलेला रक्तदान बंदीकाल दिला आहे.

कोष्टक क्र. १. काही रोगांच्या किंवा परिस्थितींच्या बाबतीत ठरवलेला रक्तदान बंदीकाल

रोग किंवा परिस्थिती बंदीकाल
हिवताप ३ वर्षे
अलर्क (पिसाळ) रोगावरील उपचाराकरिता लस टोचल्यानंतर १ वर्षे
जर्मन गोवर २ महिने
दोन रक्तदानांमधील काल ८ ते १२ आठवडे
दम्याची लक्षणे असल्यास ७२ तास
अल्कोहॉल सेवन १२ तास

ब्रिटनमध्ये वर्षातून फक्त दोन वेळाच रक्तदान करावे, असे सुचविले गेले आहे, तरीही काही निरोगी पुरुष चार वेळा रक्तदान करतात.

दात्याची रक्तदानापूर्वी लेखी संमती घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे भोजनापूर्वी रक्त घेतात. प्रथम थोडे रक्त प्रयोगशालेय तपासणीकरीता घेतात. त्यातील रक्तारुणाचे प्रमाण स्त्री दात्यामध्ये १२·५% व पुरुषात १३·३% असणे आवश्यक असते.

आ. १. रक्तपेढीत मिळू शकणारे रक्ताचे प्रकार व घटक (रक्तघटकांसंबंधीच्या स्पष्टीकरणासाठी ‘रक्त’ ही नोंद पहावी; संधारण-द्रवात विखुरलेल्या अवस्थेतील मिश्रण, अवक्षेप-न विरघळणारा साखा).दात्यास उताणे झोपावयास सांगून बहुधा डाव्या बाहूवर रक्तदाबमापकाचा पट्टा बांधून, रक्तदाब ९० ते १०० मिमी. राहीपर्यंत दाब वाढवण्याने नीला फुगतात. तसेच बाहेर पडणाऱ्या रक्ताचा प्रवाह वेग उत्तम असतो. रक्त काढावयाच्या उपकरणाची सुई खुपसण्यापूर्वी योग्य जागा निवडून ती पूर्णपणे निर्जंतुक करणे अत्यावश्यक असते. भारतात अजूनही काचेच्या बाटल्यांतून रक्त गोळा करतात. प्रत्येक बाटलीत ४० ते ४५ मिलि. एसीडी (ॲसीड-सायट्रेट-डेक्स्ट्रोज) विद्राव (रक्तक्लथनरोधक) असतो. प्रगत देशांतून प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात. काचेच्या बाटलीतील रक्त अम्लीय बनते तसेच तीतील तांबड्या कोशिका तळाशी गोळा होतात.

एक एकक रक्त गोळा होण्यास जवळजवळ पाच मिनिटे लागतात. रक्त दिल्यानंतर दात्याने दहा मिनिटे आराम खुर्चीत स्वस्थ बसणे हितावह असते. तसेच एखादे शीत पेय, फळांचा रस किंवा चहा पिणे उत्तम. दाता जाण्यापूर्वी रक्त काढलेली जागा काळजीपूर्वक तपासली पाहिजे. कधीकधी दात्यामध्ये पुढील उपद्रव संभवतात : (१) स्थानीय त्वचाशोथ (त्वचेची दाहयुक्त सूज), (२) रक्तार्बुद (रक्ताने बनलेली गाठ), (३) सूक्ष्मजंतू संसर्गनीलाशोथ, (४) मध्यलोप (तात्पुरती शुद्ध हरपणे), (५) हृद्‌रोहिणीरोध आणि (६) वायुअंतर्कीलन (रक्तप्रवाहात वायू शिरल्यामुळे रक्तप्रवाह बंद पडणे).

साठवण:गोळा केलेल्या रक्ताचे योग्य साठवण हे प्रत्येक रक्तपेढीचे महत्त्वाचे कार्य आहे. रक्त दीर्घकाळ टिकावयाचे असेल, तर त्याचा नैसर्गिक चयापचय (सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडी) थोपवता आला पाहिजे. संपूर्ण रक्त ६७·५ मिलि. एसीडी विद्राव असलेल्या प्लॅस्टिक पिशवीत ४५० मिलि. पर्यंत साठवतात. साठवण तापमान २ ते ६0 से. असते. या तापमानात कमी किंवा जास्त बदल झाल्यास प्रगत देशांतून दृक्‌-श्राव्य धोका सूचना आपोआप मिळण्याची सोय केलेली असते. एसीडीपेक्षा सीपीडी (सायट्रेट-फॉस्फेट-डेक्स्ट्रोज) विद्राव्य अधिक उत्तम ठरला आहे. साठवण मर्यादा तीन आठवड्यांची असते. प्रत्येक पिशवीच्या खूणचिठ्ठीवर ABO आणि Rh रक्तगट स्पष्टपणे नमूद करणे अत्यावश्यक आहे.

ताज्या रक्तावर प्रक्रिया करण्याच्या आधुनिक तंत्रामुळे रक्तपेढीतून विशिष्ट घटक सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. आ. १ मध्ये रक्तपेढीत मिळू शकणारे रक्त प्रकार व घटक दर्शविले आहेत.

आ. २. रक्तघटक मिळविण्याची कृती : चार कप्प्यांच्या प्लॅस्टिक कोषाचा उपयोग करून (१) तांबड्या कोशिकाचे सांद्रण, (२) बिंबाणू सांद्रण, (३) शीत अवक्षेप आणि (४) एकाच दात्याचा रक्तरस मिळविण्याची कृती.तिजलद शीत केंद्रोत्सारण [⟶ केंद्रोत्सारण] तसेच अत्याधुनिक प्रथिन विलगीकरण तंत्र यांमुळे रक्तघटक उपचारात मोठी प्रगती झाली आहे. आधुनिक स्तंभ-वर्णलेखन पद्धतीमुळे [⟶ वर्णलेखन] रक्तघटक सहज वेगळे मिळविता येतात. भारतामध्ये अजून याकरता लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध नाही. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये व मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये असलेली यंत्रसामग्री अद्ययावत नाही. प्लॅस्टिक पिशव्यांच्या कोषांचा उपयोग करून काही रक्तघटक मिळविण्याची कृती आ. २ मध्ये दिली आहे.

क्त अधिक काळपर्यंत टिकविण्याकरिता वर उल्लेखिलेल्या दोन रक्तक्लथनरोधी विद्रावांशिवाय हेपारीन विद्रावही वापरतात. हृदयावरील शस्त्रक्रियांच्या वेळी विशिष्ट यंत्राद्वारे शरीरबाह्य रक्ताभिसरण तंत्र वापरावे लागते. त्या वेळी हेपारीनमिश्रित रक्ताचा उत्तम उपयोग होतो.

साठवणीतील संपूर्ण रक्तात कोणते बदल एकविसाव्या दिवशी आढळतात हे कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे.

कृत्रिमरक्त

रक्त फार काळ टिकत नसल्याचे आढळल्यानंतर रक्ताला पर्याय शोधण्याकडे लक्ष वेधले गेले. जपानी शास्त्रज्ञांनी संश्लेषित (कृत्रिम) रक्त तयार केले. अंड्यातील पीतक (पिवळा बलक), स्टार्च व परफ्ल्युओरो रसायने यांच्या मिश्रणापासून बनवलेल्या या द्रवाला त्यांनी फ्ल्युओसोल-डीएनए असे नाव दिले. हे कृत्रिम रक्त नैसर्गिक रक्तापेक्षा अधिक ऑक्सिजन वाहून नेऊ शकते. अमेरिकेतही परफ्ल्युओरोकार्बने वापरून कृत्रिम रक्त बनविण्यात आले. रॉबर्ट अँडरसन या शास्त्रज्ञांनी एका गंभीर पांडुरोगी रुग्णावर कृत्रिम रक्त वापरून रक्ताधान करण्याची परवानगी घेतली. कारण हा रुग्ण ‘जेहोवाझ विटनेसिस’ या ख्रिश्चन धर्मपंथाचा अनुयायी होता व त्याला नैसर्गिक रक्ताधानाची धार्मिक बंदी होती. या रुग्णास दोन लिटर कृत्रिम रक्त देण्यात आले. ते सर्व त्याच्या शरीरातून दोन आठवड्यांत उत्सर्जित झाले; परंतु याच काळात त्याच्या अस्थिमज्जेने (लांब हाडांच्या पोकळीतील मऊसर पदार्थाने) उत्तम रक्त्तोत्पादन केले होते व रुग्ण बचावला होता. कृत्रिम रक्तामध्ये प्रतिक्रियांचा धोका नसतो; परंतु त्यात नैसर्गिक रक्ताची क्लथनशक्ती नसते. याशिवाय इतर काही गुणधर्मांचा अभाव असल्यामुळे केवळ तात्पुरता उपचार म्हणूनच कृत्रिम रक्ताला स्थान आहे.

शवरक्त

रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन शवातील रक्त वापरण्याची कल्पना सुचली असावी. आकस्मिक मरण पावलेल्या व्यक्तीच्या शवामध्ये रक्तक्लथन क्रियेत महत्त्वाच्या असलेल्या फायब्रीन

कोष्टक क्र. २. साठवणीतील संपूर्ण रक्तात एकविसाव्या दिवशी आढळणारे बदल.

घटक

ताजे रक्त

२१ दिवस साठवलेले रक्त

pH मूल्य

रक्तारुण (रक्तरसातील) मिग्रॅ. / १०० मिलि.

पोटॅशियम मिलिइक्वि. / लि.

सोडियम मिलिइक्वि. / लि.

अमोनियम म्यूग्रॅ. / १०० मिलि.

बिंबाणू घ. मिमी. मध्ये

कारक VIII

जीवनक्षम तांबड्या कोशिका

७·० ते ७·२०

 

१५०

५०

२,००,०००

१०० %

१०० %

६·७१ ते ६·८४

 

१००

२१

१४०

७००

७०%

(pH मूल्य याच्या स्पष्टीकरणासाठी ‘पीएच मूल्य’ ही नोंद पहावी; मिलिइक्वि.-मिलिइक्विव्हॅलंट म्हणजे एक मिलि. प्रसामान्य विद्रावातील विरघळलेल्या पदार्थाचे ग्रॅममधील वजन; म्यूग्रॅ.- मायक्रोग्रॅम = १०-६ ग्रॅ.)

या प्रथिनाचे उत्स्फूर्त अघटन (घटक अलगहोण्याची क्रिया) होते. त्यामुळे रक्तक्लथन न होता ते बराच काळपर्यंत द्रव राहते. १९३० मध्ये युडिन यांनी साठ वर्षे वयाच्या, कवटीभंगाने अकस्मात मृत झालेल्या व्यक्तीच्या शवाचे ४२० मिली. रक्त काढून ते एका मृत्युमुखी पडण्याच्या बेतात असलेल्या तरुण रुग्णाच्या शरीरात रक्ताधानाकरिता वापरले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी असे १,००० शवरक्त रक्तधानाचे प्रयोग केले. १९६० मध्ये टारासॉव्ह यांनी मॉस्कोमधील एका संस्थेत ३० वर्षांत २४,००० रक्ताधाने शवरक्त वापरून केली गेल्याचे प्रसिद्ध केले. शवरक्तातील तांबड्या कोशिका प्राकृतिक (सर्वसाधारण) जीवन मर्यादेपर्यंत जगू शकतात; परंतु क्लथनकारक, बिंबाणू व श्वेत कोशिका त्यात कमी असतात. भावनिक नाखुषी तसेच शवपरीक्षेत जाणारा वेळ या शवरक्त वापरण्यातील प्रमुख अडचणी आहेत.

रक्तपेढ्यांचीसद्यस्थिती

प्रगत देशांतून रक्तपेढ्यांचे कार्य स्वेच्छेने स्थापन झालेल्या संस्था करतात. अमेरिकेत रेड क्रॉस संस्था हे कार्य फार मोठ्या प्रमाणावर करते. जवळजवळ ४० लक्ष ऐच्छिक रक्तदानांतून गोळा केलेले रक्त देशभरातील ४,१०० रुग्णालयांना (मुलकी व लष्करी) गरजेप्रमाणे पुरवले जाते. अमेरिकन संरक्षण विभाग जरूर तेव्हा रेड क्रॉसच्या रक्त पुरवठ्यावर अवलंबून असतो. कॅनडामध्ये नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन सर्व्हिस रेड क्रॉसमार्फत चालवली जाते. कॅनडामधील सर्व रुग्णालयांना ही संस्था रक्त पुरवठा करते. त्यामध्ये (१) रक्तावर प्रक्रिया करण्याकरिता प्रत्येक प्रांतात एक सुसज्ज प्रयोगशाळा, (२) तंत्रज्ञ, यंत्रसामग्री व इतर नोकर वर्ग रेड क्रॉस पुरवते, (३) नागरिक स्वेच्छेने रक्तदान करतात आणि (४) रुग्णालये रक्त व रक्तघटक रुग्णाकडून कोणतेही शुल्क न घेता वापरतात.

अलीकडील एड्स रोगाच्या धास्तीमुळे पाश्चात्त्य देशांतील रक्तपेढ्यांवर अनिष्ट परिणाम झाला आहे. आत्मरक्तधानाकरिता स्वतःच्या रक्ताचा साठा भावी उपयोगाकरिता करून ठेवण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

भारताची रक्तपुरवठ्यासंबंधीची स्थिती चिंताजनक आहे. मुळातच भारतीयांना रक्तदान धोकादायक वाटते. अगदी जवळचे नातेवाईकदेखील रक्त देण्यास नाखूष असतात. एकट्या मुंबई शहराला दर वर्षी दीड लाख बाटल्या (प्रत्येकी ३०० मिलि.) रक्त लागते. तेथेही रक्तावर प्रक्रिया करण्याकरिता आधुनिक सामुग्री उपलब्ध नाही. जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी रक्तपेढ्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे लाखो खेड्यांपर्यंत रक्त व रक्तघटक पोहोचणे अवघड आहे.

रक्तपेढ्यांच्या कार्याचे सुसूत्रीकरण व रक्तदानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र ॲसोसिएशन ऑफ ब्लड बँक्स’ नावाची संस्था स्थापन झालेली आहे. काही खाजगी संस्था आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या काही शाखा चालवीत असलेल्या रक्तपेढ्या या संस्थेच्या सभासद आहेत. या संस्थेतर्फे १९८५ मध्ये ३६४ रक्तदान शिबिरे भरविण्यात आली होती आणि ३०,७११ एकके रक्त गोळा करण्यात आले होते.

 

संदर्भ : 1. Alstead, S.; Girwood, R. H., Ed. Textbook of Medical Treatment, Edinburgh, 1974.

2. Sabiston. D., C., Ed., Davis-Christopher Textbook of Surgery, Tokyo, 1972.

भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate