অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोगनिदान

रोगनिदान

वैद्यकीय उपचाराआधी रोगनिदान करावे लागते. रोगनिदान म्हणजे कोणता आजार आहे हे ठरवणे आणि रोगाची तीव्रता किती आहे याचा अंदाज घेणे. आयुर्वेदामध्येही स्वतंत्र रोगनिदान पध्दती आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाचे एकूण लक्षणचित्र लक्षात घेऊन औषधनिदान केले जाते. (होमिओपथीत वेगळे रोगनिदान नाही). आधुनिक (म्हणजे इंग्रजी) वैद्यकशास्त्रात गेल्या शंभर-दीडशे वर्षात रोगनिदानाचे शास्त्र तयार झाले. रोगनिदान जास्त अचूक होत गेले तशी औषधोपचारांची अचूकताही वाढत गेली. रोगनिदान ही वैद्यकशास्त्रातली अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. पण देशातल्या काही अर्धशिक्षित वैद्यकीय व्यवसायात तरी रोगनिदान ही फार दुर्लक्षित बाब आहे. आरोग्यकार्यकर्त्याचा तर याच्याशी काहीही संबंध नसतो असाच गैरसमज आहे. आरोग्यसेवा यशस्वी होण्यासाठी किमान काही प्राथमिक रोगनिदान करणे ही आवश्यक गोष्ट आहे.

अनेक दुखण्यांवर आपण प्राथमिक वैद्यकीय मदत करणे अपेक्षित आहे. तापखोकला,जुलाब,उलटीडोकेदुखीपोटदुखी अशी लक्षणे तर नेहमीच आढळतात. याशिवाय छाती दुखणेसूजचक्कर अशीही लक्षणे कधीकधी आढळतात. आता नुसता तापखोकला,जुलाबइत्यादी शब्दांना रोगनिदानाशिवाय फारसा अर्थ नाही. ही लक्षणे ज्यामुळे आली आहेत तो रोग ओळखणे शक्य झाल्याशिवाय प्राथमिक आरोग्य सेवा शक्य नाही.

या प्रकरणात रोग-निदानपध्दतीसंबंधी काही सर्वसाधारण माहिती आहे. बरीच रोगलक्षणे निरनिराळया शारीरिक संस्थांशी निगडित असतात. (उदा. जुलाबउलटी म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित). अशा शरीरसंस्थांशी संबंधित रोगलक्षणांवरून रोगनिदान कसे करायचे हे त्या त्या प्रकरणात दिले आहे. या माहितीबरोबर प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास प्राथमिक रोगनिदान आपण नक्की चांगले करू शकू.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate