অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोगांचे सोपेपणावरून वर्गीकरण

रोगांचे सोपेपणावरून वर्गीकरण

सोबतच्या तक्त्यामध्ये आजारांचे पाच गट पाडले आहेत.

गट पाडताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या आहेत. :

रोग ओळखायला किती सोपा आहे त्यावरचे उपचार किती सोपे आहेत आणि तो आजार ओळखणे, उपाय करणे यांत किती निर्धोकता आहे. अधिक (+) च्या खुणांनी या बाबींचे वजन दाखवले आहे. एक चौथी बाब म्हणजे त्या आजारांचे समाजात सर्वसाधारण प्रमाण किती आहे हे दाखविले आहे. योगायोगाने साध्या आणि मध्यम (गट 1 व 2) आजारांचे समाजातले प्रमाण इतर गटांच्या मानाने जास्त आहे. गंभीर आजार-अपघातांचे प्रमाण आधीच्या गटांच्या मानाने कमी आहे.

ओळखायला व उपचार करायला अगदी सोपा आणि निर्धोक असलेला पहिला 'साध्या'आजारांचा गट तर तुम्ही प्रथम पातळीवर स्वतः हाताळायला काहीच अडचण नाही. त्या मानाने ओळखायला आणि उपचाराला जास्त प्रशिक्षण आणि कौशल्य लागणारा 'मध्यम'आजारांचा गटदेखील तेवढी काळजी घेऊन तुम्ही हाताळायला हरकत नाही. पण धोके लक्षात ठेवून हे काम करायला पाहिजे. तिसरा व चौथा गट आहे 'आकस्मिक' गंभीर आणि 'दीर्घ' महत्त्वाच्या आजारांचा.

हे रोग लवकरात लवकर ओळखणे म्हणजे निम्मी लढाई जिंकण्यासारखे आहे. हे काम आपण सर्वांनी नीट केले तर भारतातल्या वैद्यकीय सेवेची पुनर्रचना होऊ शकेल. असे झाले तर खरोखरच ज्यांना तज्ज्ञसेवेची गरज असेल असेच रोगी डॉक्टरांकडे जातील आणि बहुतांश रोग प्राथमिक पातळीवर बरे होतील.

'आरोग्यकार्यकर्ते' आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, कुटिर रुग्णालये, सिव्हिल हॉस्पिटल्स यांचे परस्पर संबंध सजीव आणि सुसंगत न्याय्य व्हायचे असतील तर अशीच व्यवस्था व वर्गीकरण आवश्यक आहे. पाचवा गट आहे अपघातांचा. इथे गरज आहे ताबडतोब योग्य ते प्रथमोपचार देऊन रुग्णास हॉस्पिटलला पाठवण्याची. आता या प्रथमोपचाराचा तपशील ठरवणेही आवश्यक आहे. तज्ज्ञ-सुसज्ज सेवा जेवढी जवळ असेल तेवढी प्रथमोपचारांची गरज कमी. याउलट जेवढे अंतर जास्त तेवढी प्रथमोपचारांची गरज जास्त. उदा. सर्पदंशाची घटना घडल्यावर योग्य सेवा मिळायला 3-4 तासांचा अवधी लागणार असेल तर गावातल्या प्रशिक्षित आरोग्यकार्यकर्त्यांनी प्रथमोपचारात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. कारण हे इंजेक्शन देण्यामधल्या धोक्यापेक्षा, न देऊन तसेच तासनतास घालवण्यातला धोका कितीतरी पटींनी अधिक आहे. प्रथमोपचाराची गरज, वाव, तपशील या मुद्यांवर विचार करायला पाहिजे.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate