मानव व मानवाशी शरीरक्रियात्मक साधर्म्य असलेले प्राणी यांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तीन स्तरांवर उपाययोजना करण्यात येतात :
(१) संसर्गाचा उद्गम,
(२) हवा पाणी, कीटक वा इतर प्राणी यांच्या साहाय्याने होणारे रोगाचे संक्रामण आणि
(३) संसर्गित व्यक्तीत वा प्राण्यात रोगाचा उद्भव.
यांपैकी तिसऱ्या स्तरात निरोगी व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढवणे आणि सर्वसाधारण प्रतिकारक्षमतेबरोबरच विशिष्ट प्रतिकारक्षमता तिला प्राप्त करून देणे यांचा समावेश होतो. साधारण प्रतिकारक्षमतेसाठी पोषणातील त्रुटींची भरपाई आणि सामाजिक व आर्थिक सुधारणा उपयुक्त असतात, तर विशिष्ट प्रतिकारक्षमतेसाठी लशींचा उपयोग करावा लागतो.
लशींचा वापर प्रथम करण्याचे श्रेय चीनला द्यावे लागेल. सु. २,५०० वर्षापूर्वी चीनमध्ये देवी झालेल्या रोग्याच्या फोडातील (जिंवत व्हायरसयुक्त) द्रव निरोगी व्यक्तीच्या त्वचेतून सोडून त्या व्यक्तीचे देवी रोगापासून रक्षण करीत, अशी नोंद आहे. १७१८ मध्ये लेडी मेरी माँटेग्यू यांनी तुर्कस्तानमध्ये देवीच्या फोडातील द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात टोचून देवीविरुद्ध प्रतिकारक्षमता प्राप्त करण्याची पद्धत पाहिली आणि ही पद्धत त्यांनी १७२१-२२ मध्ये इंग्लंडमध्ये लोकप्रिय केली. तथापि ही पद्धत अशास्त्रीय होती व जरी तीमुळे रोगावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य झाले, तरी बऱ्याच वेळा ती धोकादायक असे. देवीच्या रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या निरोगी व्यक्तींना पुढे कधीही देवीचा आजार झालाच, तर त्याची तीव्रता कमी असते, अशी प्रतिकारक्षमता प्राप्त करून देण्यासाठी मुलांना रुग्णाचा सहवास मिळू देणे किंवा प्रौढांना देवीच्या खपल्यांचा स्पर्श घडविणे यांसारख्या पद्धती व समजुती यूरोपात प्रचलित होत्या. या सर्वाचा अभ्यास करून व शास्त्रीय रीत्या संशोधन करून प्रथमतः लस तयार करण्याचे श्रेय ⇨एडवर्ड जेन्नर यांच्याकडे जाते. गायीचे दूध काढणाऱ्या गवळ्यांना देवीविरुद्ध प्रतिकारक्षमता प्राप्त झालेली असल्याचे १७७८ च्या सुमारास जेन्नर यांच्या लक्षात आले.
मानवातील देवीसदृश पण सौम्यतर अशा गोदेवी (व्हॅक्सिनिया) या रोगाची बाधा झालेल्या गायींच्या सतत सान्निध्यात राहिल्यामुळे गवळ्यांना ही प्रतिकारक्षमता प्राप्त झालेली असल्याचे पुढे त्यांना आढळून आले (यावरूनच व्हॅक्सिन-लॅटिन Vacca म्हणजे गाय-हा शब्द इंग्रजी भाषेत आलेला आहे). जेन्नर यांनी १७९६ मध्ये एका गवळीच्या शरीरावरील गोदेवीच्या फोडातील द्रव काढून तो जेम्स फिक्स या आठ वर्षाच्या मुलाला टोचला. सुमारे दीड महिन्यानंतर त्या मुलाला जेन्नर यांनी देवीच्या फोडातील द्रव टोचला तेव्हा रोगाचा उद्भव झाला नाही, असे आढळून आले. अशाच आणखी एका प्रयोगानंतर १७९८ मध्ये त्यांनी आपले निष्कर्ष ग्रंथरूपाने मांडले.
सौम्य रोगजनकता असलेल्या सूक्ष्मजंतूंचा उपयोग प्रतिकारक्षमता निर्मितीसाठी होऊ शकतो या जेन्नर यांच्या निरीक्षणांचा पुढे व्यापक प्रमाणावर उपयोग होईल, हे आढळून नंतर काही वर्षानीच ⇨लूई पाश्चर यांनी अशा प्रकारच्या सूचिकाभरणास (सुईद्वारे पदार्थ शरीरात घालण्याच्या क्रियेस) व्हॅक्सिनेशन ही संज्ञा जेन्नर यांच्या सन्मानार्थ दिली कालांतराने व्हॅक्सिन (लस) ही संज्ञा सर्व प्रकारच्या विशिष्ट रोगप्रतिबंधकांसाठी ( सूक्ष्मजंतू, व्हायरस यांच्यापासून निर्माण होणारे पदार्थ तसेच परागकणांचे अर्क वगैरे) वापरण्यात येऊ लागली. अशा प्रकारच्या पदार्थाला सौम्य रोगनिर्मितीसाठी व प्रतिबंधात्मक उपयोग करण्याला इनॉक्युलेशन ( अंतःक्रामण ) असे म्हणण्यात येऊ लागले. सामान्यतः जिथे जिथे प्रतिकारक्षमतेसाठी प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया [⟶ प्रतिजन ] कार्यवाहीत येते तिथे तिथे लस व अंतःक्रामण हे शब्द आता वापरण्यात येतात.
जेन्नर यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस देवीची लस तयार केल्यानंतर १८८० च्या सुमारास पाश्चर व ⇨ रॉबर्ट कॉख यांनी स्वतंत्रपणे संशोधन करून दुभती जनावरे व शेळ्यामेंढ्या यांत होणाऱ्या ⇨ संसर्गजन्य काळपुळी (अँथ्रॅक्स) या रोगाचा सूक्ष्मजंतू व त्यावरील लस शोधून काढली. पुढे १८८५ मध्ये पाश्चर यांनी प्येअर रू व शार्ल शांबेरलां या सहकाऱ्यांच्या मदतीने ⇨ अलर्क रोगावरील लस शोधून काढली. कोंबड्यांतील पटकी व डुकरांतील धावरे या रोगांवरील लसीही त्यांनी शोधून काढल्या.
ईस्ट इंडिया कंपनीने भारतात देवीच्या लशीच्या अंतःक्रामणाचा प्रचार केला. १८०४ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी स्वतःस व आपल्या कुटुंबियांत इंग्रज वैद्याकडून देवीची लस टोचून घेतल्याचा उल्लेख आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्लेगच्या साथीने भारतात लक्षावधी बळी घेतले.वॉल्डेमार हाफकीन या रशियन शास्त्रज्ञांनी १८९७ मध्ये भारतात प्लेगच्या लशीचा शोध लावून प्लेगला आळा घातला.
एकोणीसाव्या शतकात नवीन लशी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले. विसाव्या शतकाच्या मध्यास प्रतिजैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स) वापरात आल्यावर सूक्ष्मजंतूंवरील लशींकडील लक्ष कमी झाले; परंतु नंतर प्रतिजैव पदार्थाविरुद्ध सूक्ष्मजंतूत रोध विकसित झाल्याचे दिसून आल्यावर या लशींवरील संशोधनाकडे पुन्हा लक्ष देण्यात येऊ लागले.
इ. स. १९७० नंतरच्या दशकात वराह इन्फ्ल्यूएंझावरील लशीसंबंधीच्या विपरित प्रतिक्रियांमुळे काही प्रकारच्या लशींबद्दल जनतेतील उत्साह कमी झाला. तथापि पूर्वीच्या अनेक आपत्तींच्या नियंत्रणाचे श्रेय लशींच्या अंतःक्रामणाला देण्यात आलेले आहे. देवीचे निर्मूलन अंतःक्रामणामुळेच झालेले आहे. बालपक्षाघात (पोलिओ), घटसर्प, डांग्या खोकला, कांजिण्या व जर्मन गोवर ( वारफोड्या,रूबेल्ला ) या रोगांविरुद्धच्या लशींमुळेच विकसित देशांतील या रोगांचे मोठ्या प्रमाणत नियंत्रण करण्यात आलेले आहे . इन्फ्ल्यूएंझा, अलर्क रोग, प्रलापक सन्निपात ज्वर ( टायफस ज्वर ) व इतर रोगांविरुद्ध लशी विकसित करण्यात आलेल्या आहेत, पण फार मोठा धोका असलेल्या निवढक जनसमूहांकरिताच त्या वापरण्यात येतात. अलीकडे न्यूमोकॉकस व मेनिंगोकॉकस यांसारख्या सूक्ष्मजंतूंविरुद्धच्या प्रायोगिक लशींच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.
संसर्गजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारक्षमता खालील दोन पद्धतींनी निर्माण करता येतात.
(१) सक्रिय प्रतिकारक्षमतानिर्मिती : या क्रियेमध्ये शरीराला प्रतिजनाचा पुरवठा करून प्रतिपिंड निर्मितीला उत्तेजित केले जाते. या क्रोयेला काही कालावधी लागत असला, तरी तिचा परिणाम दिर्धकाळ टिकतो. रोगकारकाच्या अपेक्षित संक्रामणाची कालसंभाव्यता लक्षात घेऊन पुरेसे आधी लस देऊन ही क्रिया समाधानकारक रीत्या घडवून आणता येते.
(२) निष्क्रिय प्रतिकारक्षमतानिर्मिती : रोगकारकाचे संक्रामण होऊन त्यामुळे परिणामभूत होणारी विषाक्तता सुरू झालेली असेल, तर प्रतिजन देऊन थांबणे शक्य नसते. प्रतिजनाविरुद्धचे प्रतिपिंडच उपलब्ध असल्यास ते मोठ्या प्रमाणवर द्यावे लागतात. यासाठी अन्य प्राण्यांच्या ( उदा., घोड्याच्या ) शरीरात तयार करविलेले प्रतिपिंड देतात. हे प्रतिपिंड आता जरी शुद्धतर स्वरूपात म्हणजे गॅमाग्लोब्युलीन अथवा अन्य विविध घटकांच्या [⟶ प्रतिपिंड]स्वरूपात उपलब्ध असले, तरी त्यांचा आढळ रक्तद्रवात (रक्तातील कोशिका-पेशी-काढून टाकल्यावर उरणाऱ्या द्रवात, सीरममध्ये) असल्याने सुरुवातीपासून अशा सिद्धींना लस (सीरम) ही संज्ञा वापरली गेली आहे. मराठीमध्ये हीच संज्ञा सक्रिय प्रतिकारक्षमतानिर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या व्हॅक्सिनांसाठी देखील प्रचलित आहे. प्रतिपिंड व तद्भव पदार्थामध्येही प्रतिजनक्षमता (प्रतिजन म्हणून क्रिया करण्याची क्षमता) असल्याने दोन्हीचा ( व्हॅक्सिने व सेरा यांचा) विचार एकत्र करता येईल.
लशी निरनिराळ्या प्रकारच्या असून प्रतिजनक्षमता असलेले पदार्थ निर्माण करण्यासाठी जिवंत अथवा मृत सूक्ष्मजंतू व व्हायरस, त्यांच्यापासून तयार होणारी विषे अथवा विषाभ य़ांचा उपयोग केला जातो. जिवंत सूक्ष्मजंतू वा व्हायरस अनुयोजित (नैसर्गिक रीत्या एखाद्या प्राण्यात न वाढणाऱ्या पण त्यात कृत्रिम रीत्या वाढविलेल्या) वा हतप्रभ (निष्प्रभ किंवा क्षीण केलेल्या) अवस्थेतच मृत निष्क्रिय अवस्थेत वापरण्यात येतात. लस द्यावयाच्या रुग्णाला कमीत कमी अपाय पोहचावा व त्याच्या शरीरतील रक्तात मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड तयार व्हावेत हे उद्दिष्ट साधण्यासाठी रोगकारक कोणत्या अवस्थेत वापरावयाचा, हे संशोधनाने व प्रयोगान्ती ठरविले जाते. उच्चतम प्रतिजनक्षमता साधत असतानाच वरील पदार्थाची विषकारकता व अधिहृषता [ॲलर्जी ] कमी करणे आणि जिवंत सूक्ष्मजीव वापरल्यास त्याची रोगकारक प्रवृत्ती कमीत कमी शक्यतेच्या पातळीवर आणणे, ही उद्दिष्टे लसनिर्मितीत सतत डोळ्यासमोर ठेवण्यात येतात. सर्व लशींच्या बाबतीत सुरक्षितता, अपसामान्य विषारीपणा, निर्जंतुकता, रोगप्रतिबंधकक्षमता व आगंतुक द्रव्यांचा समावेश नसणे याच्यासंबंधीच्या योग्य त्या चाचण्या घेऊन मगच त्या लशी उपयोगात आणल्या जातात.
विषाभ लशी : सूक्ष्मजंतूंपासून होणार रोग प्रायतः सूक्ष्मजंतूंनी उत्सर्जिंत केलेल्या बाह्यविषांमुळे होतात. घटसर्प व धनुर्वात या रोगांच्या बाह्यविष निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या द्रव माघ्यमातील संवर्धनापासून विषसंपन्न असा अर्क मिळू शकतो. यातील सूक्ष्मजंतू गाळून काढून टाकतात व या विषाची फॉर्मलिनाबरोबर दोन-तीन आठवडे नियंत्रित परिस्थितीत विक्रिया केल्यावर विषाभ प्राप्त होते. त्यात विषारी गुणधर्म शून्य असून प्रतिजनक्ष्मता चांगली असते. रासायनिक पद्धतीने त्याचे निष्कर्षण ( घन अथवा द्रव पदार्थाबरोबर मिश्रणाच्या रूपात असलेला पदार्थ वेगळा करण्याची प्रक्रिया) करून तुरटी वा तत्सम ॲल्युमिनियम संयुगांच्या साह्याने विषाभाचे रूपांतर अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) व मंद गतीने अमिशोषित होईल (पृष्ठभागी धरून ठेवला जाईल) अशा पदार्थात करतात. यामुळे त्याची प्रतिजनक्षमताही वाढते.
मृत सूक्ष्मजंतू लशी : ज्या सूक्ष्मजंतूच्या कोशिकेतील प्रतिजन सौम्य रीत्या विषकारक असतात व जेव्हा ते सोयीस्करपणे वेगळे करता येत नाहीत तेव्हा असे सूक्ष्मजंतूच मृत अवस्थेत लस तयार करण्यासाठी वापरले जातात. आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर) किंवा पटकी यासारख्या रोगाच्या सूक्ष्मजंतूचे आगर या घन माध्यमावर केलेले संवर्धन खरवडून काढून मिठाच्या निर्जंतुक विद्रावात त्याचे संधारण (द्रवात मिसळलेल्या पण न विरघळलेल्या स्थितीतील स्वरूप) तयार केले जाते. संवर्धनासाठी द्रव माध्यम वापरल्यास त्याचे ⇨केंद्रोत्सारण करून सूक्ष्मजंतूयुक्त घन पदार्थ अलग करतात व त्याचे मिठाच्या निर्जंतुक विद्रावात संधारण तयार करतात. बहुप्रतिकारकक्षमतेची लस हवी असल्यास जरूर त्या निरनिराळ्या जातींच्या सूक्ष्मजंतूंचे अलग अलग संवर्धन करून मग त्या संवर्धनांचे मिश्रण करतात. संधारण द्रवातील सूक्ष्मजंतूंची संख्या मोजून तो पुरेशा विरलनाने प्रमाणित करण्यात येतो. नंतर उष्णता किंवा जंतुनाशक द्रव्ये वापरून सूक्ष्मजंतू मारले जातात. मृत सूक्ष्मजंतूच्या कोशिकांवरील प्रतिजन रेणूंची क्षमता अबाधित राहते. या कोशिकांच्या इतर घटक द्रव्यांमुळे रुग्णात तीव्र प्रतिक्रिया (असात्म्यता) निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोशिकांचे अपघटन करून अंशात्मक सूक्ष्मजंतू वापरण्याच्या द्दष्टीने प्रगती होत आहे. हीमोफायलस प्रजातीतील⇨मस्तिष्कावरणशोथ निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या पृष्ठभागावरील कार्बोहायड्रेट प्रतिजन अलग करून त्याचा वापर लसनिर्मितीसाठी करता येऊ लागला आहे.
काही रोगांच्या बाबतीत मृत सूक्ष्मजंतूंपासून केलेल्या लशी वापरून जरूर तितक्या प्रतिपिंडे तयार होऊ शकत नाहीत. अशा वेळी जिवंत सूक्ष्मजंतू हतप्रभ करून म्हणजेच त्यांची रोगकारकता कमीत कमी करून किंवा पूर्ण नष्ट करून त्याची जिवंत लस वापरली, तर प्रतिपिंडनिर्मिती दीर्घ काळ चालू राहाते व वरचेवर लशीच्या मात्रा द्याव्या लागत नाहीत. देवीच्या लशीमध्येच (मात्र हा रोग व्हायरसामुळे होतो) हे तत्व प्रथम वापरण्यात आले आहे. क्षयरोगावरील बीसीजी लस ही हतप्रभ-जिवंत सूक्ष्मजंतू प्रकारची आहे. जिवंत सूक्ष्मजंतू हतप्रभ करण्यासाठी त्यांचे ग्लिसरीन, पित्त, बटाट्याची पेस्ट वा मांसरस यांमध्ये रोपण करून त्याचे संवर्धन करण्यात येते. अशा प्रकारे वाढविलेले सूक्ष्मजंतू रोगबाधा निर्माण करण्यास असमर्थ होतात; परंतु त्यांच्यातील प्रतिजनक्षमता कायम राहते. हे सूक्ष्मजंतू नंतर अलग करून त्यांचे मिठाच्या निर्जंतुक विद्रावात तयार केलेले संधारण लस म्हणून वापरतात. सूक्ष्मजंतू हतप्रभ करण्याची क्रिया व जिवंत लशींची साठवण या दोन्ही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. अपुऱ्या हतप्रभ क्रियेमुळे रोगकारकता अवाधित राहिल्यास लशीबरचा लोकांचा विश्वास उडतो, हे बीसीजी लशीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्ययास आले.
या लशींचे हतप्रभ-जिवंत व असांसर्गिक असे दोन ठळक वर्ग आहेत.
या लशी तयार करण्याचे तत्त्व सूक्ष्मजंतूच्या लशींप्रमाणेच आहे; पण व्हायरसांची वाढ कृत्रिम माध्यमात होऊ शकत नाही. त्यांच्या वाढीकरिता जिवंत कोशिकांचीच आवश्यकता असून याकरिता कोंबडीच्या अंड्यातील भ्रूण, ससे, गिनीपिग, पांढरे उंदीर व माकड या प्राण्यांचा वापर करतात. या प्राण्यांच्या शरीरात अथवा शरीरातील ठराविक कोशिका अलग करून त्यांवर व्हायरसांची वाढ केली जाते. आठ दिवस उबविलेल्या अंड्याच्या भ्रूण भागात जिवंत व्हायरस टोचण्यात येतात. आणखी सहा दिवसांच्या उबवण क्रियेनंतर भ्रूण काढून घेतात, तो एकजिनसी करतात आणि मग लस अलग करतात. या लशी अस्थिर असल्याने त्या शीत-शुष्क करून प्रत्यक्ष द्यावयाच्या वेळी पुन्हा मूळ अवस्थेत आणतात. अंड्यातील भ्रूणाचा हा उपयोग आता मागे पडत असून मानवी ऊतकातील कोशिकांमध्ये वाढविलेल्या व्हायरसांचा लसनिर्मितीसाठी उपयोग होत आहे. साधा गोवर आणि जर्मन गोवर यांसारख्या काही लशी तयार करण्यासाठी ही पद्धत वापरता येते.⇨ऊतकसंवर्धन तंत्र वापरून कोणत्या प्राण्याच्या कोणत्या ऊतक कोशिका माध्यम म्हणून वापरून कोणत्या सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकेल, यासंबंधी संशोधन करण्यात येत आहे. ऊतकसंवर्धन तंत्र वापरून वाढविलेल्या कोशिकांचा माध्यम म्हणून उपयोग करून बनविलेल्या लशी अधिक शुद्ध स्वरूपात असल्याने त्या आनुषंगाने होणारे प्रतिकूल परिणाम टाळता येतात.
हतप्रभ-जिवंत लशींचे दिलेल्या व्यक्तीत पुनरुत्पादन होत असल्याने असांसर्गिक लशींपेक्षा त्यांच्यामुळे व्यापक व अधिक मोठ्या कक्षेतील प्रतिपिंड निर्मितीस आणि टी-लसीका कोशिकांशी संबंधित प्रतिकार क्षमता प्रतिसाद [⟶ रोग प्रतिकार क्षमता] उत्पन्न होण्यास चालना मिळते. नैसर्गिक संसर्गमार्गाने जिवंत व्हायरस लशी दिल्याने स्थानिक प्रतिकारक्षमता प्राप्त होण्याची शक्यता असते व हा निश्चितपणे एक फायदा आहे. तथापि पूर्वी हतप्रभ-जिवंत व्हायरस लशींच्या बाबतीत रोगकारकता पूर्ववत प्राप्त होणे, संसर्गाचा नैसर्गिक प्रसार होणे, व्हायरसामध्ये चटकन किंवा वारंवार बदल होणे, व्हायरस व्यतिकरण (अन्य व्हायरसाच्या पूर्वसंसर्गामुळे व्हायरसाच्या गुणन क्रियेस प्रतिबंध होणे) यांसारख्या समस्या उद्भवलेल्या आहेत.
यांत निष्क्रियित 'मृत' व्हायरस लशी, उप-एककी लशी, संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेले)पेप्टाइड व जैव-संश्लेषित (मूळ घटकांपासून सजीवाने तयार केलेल्या) पॉलिपेप्टाइड लशी आणि प्रति-आत्मरूपी प्रतिपिंड लशी यांचा अंतर्भाव होतो. मृत व्हायरस लशीमध्ये रसायनांनी वा प्रारणाने (तरंगरूपी ऊर्जेने) संस्करण करून ज्यांची संसर्गकारकता नष्ट केलेली आहे असे व्हायरस कण असतात. या व्हायरस कणांची प्रतिकारक्षमता प्रतिक्रिया उत्पन्न करण्याची व संसर्गापासून रक्षण करण्याची क्षमता अबाधित राहते. उप-एककी लशींमध्ये पूर्ण व्हायरस कणांपासून मोकळी केलेली व मग इतर अप्रस्तुत घटकांपासून शुद्ध केलेली प्रतिकारक्षमताजनक व्हायरस प्रथिने असतात. संश्लेषित पेप्टाइड लशीत कार्बनी रसायनशास्त्रीय संश्लेषणाने तयार केलेले व्हायरस प्रथिनांचे तुकडे असतात. वाहकद्रव्याबरोबर युग्मित केलेली संश्लेषित पेप्टाइडे व्हायरसांचे निराकरण करणारे प्रतिपिंड उत्पन्न होण्यास चालना देतात (किंवा प्रतिपिंड प्रतिसादांचे निराकरण करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करतात). जैव-संश्लेषित पॉलिपेप्टाइड लशी म्हणजे मानवी वा प्राणी व्हायरस प्रतिजन
मानवातील व्हायरसजन्य रोगांच्या प्रतिबंधाकरिता वापरण्यात येणाऱ्या काही लशी |
|||
रोग |
व्हायरसाची अवस्था |
देण्याची पद्धत वा मार्ग |
विशेष |
बालपक्षाघात (साबिन) बालपक्षाघात (सॉल्क) गोवर जर्मन गोवर गालगुंड गालगुंड (फिनलंड) देवी पीतज्वर इन्फ्ल्यूएंझा इन्फ्ल्यूएंझा अलर्क रोग ॲडिनोव्हायरस संसर्ग जपानी ब मस्तिष्कशोथ कांजिण्या यकृतशोथ-ब(हेप्टॅव्हॅक्स-बी) यकृतशोथ-ब (इन्स्टिट्यूटपाश्चर) सायटोमेगॅलोव्हायरस रोग |
हतप्रभ – जिवंत निष्क्रियित हतप्रभ – जिवंत हतप्रभ – जिवंत हतप्रभ – जिवंत निष्क्रियित व्हॅक्सिनिया व्हायरस हतप्रभ – जिवंत हतप्रभ – जिवंत निष्क्रियित निष्क्रियित हतप्रभ – जिवंत निष्क्रियित हतप्रभ – जिवंत उप-एककी ((HBsAg) उप-एककी ((HBsAg) Pre-S पेप्टाइडासह हतप्रभ – जिवंत |
तोंडाने अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय अंतस्त्वचीय अधस्त्वचीय मुखग्रसनीत अधस्त्वचीय अधस्त्वचीय तोंडाने कॅपसूल स्वरूपात अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय अधस्त्वचीय |
सर्वसाधारण मानवी जनसमूहाच्या रोगप्रतिकारक्षमता निर्मितीसाठी शिफारस केलेली. फक्त साथी, प्रवास व लष्करी सेवा यांत किंवा निवडक अतिधोक्यात असलेले जनसमूह यांकरिता शिफारस केलेली. प्रायोगिक लस; बालरोग परिचारिका व मूत्रपिंडरोपण करणे आवश्यक असलेले रुग्ण यांवर चाचण्या |
असून त्यांचे संश्लेषण यीस्टमधील अथवा प्राणिकोशिकांमधील पुनःसंयोगित डीएनए प्लॉस्मिडांपासून [⟶रेणवीय जीवविज्ञान] सूक्ष्मजंतूत पुनःसंयोगित डीएनए प्लॉस्मिडापासून संयोगी क्रियांचे भाग म्हणून केले जाते. प्रति-आत्मरूपी प्रतिपिंड लशींच्या तंत्रात 'रोगप्रतिकार नियामक जालकां'च्या अस्तित्वाचा उपयोग करून घेतला जातो (या जालकांची संकल्पना ⇨नील्स काय येर्ने यांनी १९७४ मध्ये प्रथम मांडली). या जालकांत बाह्य प्रतिजनाला प्रतिसाद म्हणून होणाऱ्या प्रतिपिंडाच्या निर्मितीमुळे प्रतिपिंडांच्या विरुद्ध इतर प्रतिपिंड उत्पन्न होतात. या दुसऱ्या गटातील काही प्रतिपिंडांत (यांनाच प्रतिआत्मरूपी प्रतिपिंडे म्हणतात) बाह्य प्रतिपिंडांची प्रतिमा आपल्या संरचनेचा भाग म्हणून असू शकते. असे असेल, तर प्रति-आत्मरूपी प्रतिपिंडाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) मूळ प्रतिजनाच्या अंतःक्षेपणाच्या समान होईल व त्यामुळे त्याच प्रकारच्या संरक्षक प्रतिपिंडांच्या निर्मितीस चालना मिळेल. याचाच अर्थ प्रत्यक्ष रोगकारक पदार्थ न वापरता अंतःक्रामण करणे शक्य होईल. या तंत्राचा उपयोग करून यकृतशोथ -ब, कर्करोग व उपार्जित रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स) या रोगांवरील लशी तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
जिवंत लशीपेक्षा असांसर्गिक लशी सामान्यपणे अधिक सुरक्षित अधिक स्थिर असल्या, तरी प्रतिजनाची उच्च संहती असलेल्या त्यांच्या अनेक मात्रा आतड्याखेरीज इतर शरीरभागात द्याव्या लागतात. असांसर्गिक लशींमुळे कोशिकांचा सरळ नाश होत नसला, तरी त्यांच्यामुळे अतिसंवेदनाशीलतेची प्रतिक्रिया उद्भवू शकते. फॉर्मॅलीन वा प्रारण यांनी व्हायरस मारून तयार केलेल्या लशींमध्ये क्रियाशील राहिलेले संसर्गकारक कण असू शकतात व त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे (उदा., बालपक्षाघात लस, लाळ रोग लस). संश्लेषित पेप्टाइडाचे तुकडे सध्या खर्चिक, उत्पादन करण्यास कष्टदायक व नैसर्गिक व्हायरस प्रथिनांइतके प्रतिकारक्षमता प्रतिसाद उत्पन्न करण्याच्या दृष्टीने कमी परिणामकारक असले,तरी इन्फ्ल्यूएंझासारख्या प्रतिकारक्षमताकारक प्रतिजन ठळकपणे लक्षणीय असलेल्या व्हायरसांविरुद्ध ते सुसाध्य होऊ शकतील.
ब या रोगास कारणीभूत असलेल्या व्हायरसांची वाढ करण्यासाठी योग्य ते माध्यम न मिळाल्याने हा रोग झालेल्या रुग्णांच्या रक्तापासून प्रतिजन गोळा करून त्याचा लसनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. रक्तदात्याच्या शरीरातील इतर व्हायरसांचा, विशेषतः एड्सच्या व्हायरसाचा, लशीमध्ये शिरकाव होण्याची शक्यता शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर नाहीशी झाली आहे. तरीही याला पर्याय म्हणून जननिक अभियांत्रिकीच्या [⟶ रेणवीय जीवविज्ञान] साह्याने यकृतशोथ - ब ची लस बनविणे आता शक्य झाले आहे व हळूहळू हीच पद्धत सर्व व्हायरस लशींसाठी उपयोगात येईल असे दिसते.
लशींचे अंतःक्रामण शरीरास प्रतिपिंड किंवा विषम जातीय प्रतिजन पुरविते आण त्यामुळे प्रतिपिंडाचे रक्तातील व ऊतकांतील अनुमाप (प्रमाण) वाढू लागते. कोशिकीय व देहद्रवीय अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रणा अनुक्रमे टी-व बी-लसीका कोशिकांमार्फत कार्यप्रवृत्त होतात. यापुढील प्रतिकारक्षमता प्राप्त होण्याचे मार्ग खालीलप्रमाणे असतात.
(१) प्रतिपिंडांकडून : विषाचे निष्प्रभावीकरण; सूक्ष्मजंतू व व्हायरस यांचा आश्रयीच्या कोशिकांत प्रवेश होण्यास रोध; महाभक्षी कोशिकांच्या सूक्ष्मकणांच्या भक्षणकार्यास ऑप्सोनिनीकरणाच्या प्रक्रियेतून (भक्षी कोशिकांची क्रिया होण्यास परकीय कोशिका अधिक ग्रहणक्षम बनविणाऱ्या ऑप्सोनीन या रक्तद्रवातील प्रतिपिंडाच्या प्रक्रियेतून) साह्य; पूरक द्रव्याच्या द्वारे सूक्ष्मकणांचे विलयन होण्यास मदत; नैसर्गिक मारक कोशिकांच्या साह्याने सूक्ष्मजंतू कोशिकांचे भंजन.
(२) कोशिकांकडून : प्रतिजनामुळे उद्दीपित झालेल्या टी-कोशिकाच्या गुणनामुळे अनेक प्रकारचे परिणाम घडून येतात. साहाय्यक टी कोशिका बी-कोशिकांना मदत करून प्रतिपिंडनिर्मितीस अप्रत्यक्ष रीत्या उत्तेजित करतात व उपरोक्त सर्व क्रियांना हातभार लावतात. एवढेच नव्हे, तर दुसऱ्या प्रकारच्या टी-कोशिकांना इंटरल्युकीन या संयुगांच्या माध्यमाद्वारे उत्तेजन देऊन कोशिकाविलयन घडवून आणतात. सूक्ष्मजंतूंच्या ज्या जाती (उदा., मायकोबॅक्टिरिया, ब्रूसेला, साल्मोनेला) कोशिकांतर्गत वाढतात, त्याच्या नाशास ही प्रणाली उपयुक्त ठरते व या कामीही महाभक्षी कोशिकांचे सहकार्य होते.
व्हायरसांची वाढ रोखण्यासाठी टी-कोशिकांचा एक उपसंच रुग्णातील व्हायरसग्रस्त कोशिकांचा नाश करतो, तर दुसरा लिंफोकाइन या द्रव्यांकरवी महाभक्षी कोशिकांना सक्रियित करून व्हायरस कणांचे भक्षण घडवून आणतो. यामुळे व्हायरसांचे अन्य कोशिकांकडे होणारे स्थलांतरण रोखले जाते. याशिवाय टी-कोशिका इंटरफेरॉन-२ या द्रव्याची निर्मिती करून संदेशक आरएनएचे प्रतिलेखन [⟶न्यूक्लिइक अम्ले] रोधतात व व्हायरसांच्या गुणनास अटकाव करतात.
अंतःक्रामणाच्या पद्धती व वेळा : वहुतेक सर्व लशी अधस्त्वचेत (त्वचेखाली) किंवा स्नायूमध्ये दिल्या जातात; परंतु बीसीजीची व देवीची (देवीचे निर्मूलन झाल्यामुळे आता वापरात नाही) लस अंतस्त्वचेत (त्वचांतर्गत) देतात. त्वचेच्या स्तरांमध्ये लशीतील सूक्ष्मजीवांची (वा कणांची) वाढ होते व कोशिकीय प्रतिकारक्षमता यंत्रणेला उत्तेजन मिळते. बालपक्षाघाताची निष्क्रियित व्हायरसयुक्त सॉल्क लस स्नायूमध्ये देतात; परंतु जास्त लोकप्रिय अशी जिवंत व्हायरसयुक्त साविन लस मुखावाटे देतात. या लशीमुळे रक्तद्रवातील अपेक्षित प्रतिपिंड पातळी केवळ एका मात्रेतच साधता येते, असे समशीतोष्ण प्रदेशात आढळते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांमध्ये मात्र तीन ते पाच मासिक मात्रा देऊनच हा परिणाम साधता येतो. लशींमध्ये असणारेबृहत्-रेणू व त्यापासून उद्भवणारी असात्म्यता लक्षात घेऊन थेट रक्तात कोणतीही लस दिली जात नाही. अतिगंभीर परिस्थितीमध्ये निष्क्रिय प्रतिकारक्षमतेसाठी वापरली जाणारी प्रतिपिंड लस किंवा गॅमा-ग्लोब्युलीन ही अर्थातच याला अपवाद होत. इन्फ्ल्यूएंझाची लस मुखग्रसनीद्वारे [⟶ ग्रसनी] वायुकलिलीय (घन वा द्रव कणांच्या वायूतील संधारणाच्या) रूपात देतात.
अनेक प्रकारच्या रोगांपासून एकाच वेळी संरक्षण मिळावे म्हणून बहुप्रतिकारक्षमतेच्या (बहुप्रतिरक्षात्मक) लशी व लसमिश्रणे वापरण्याचा प्रघात आहे; उदा., घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात (त्रिप्रतिकारक्षमतेची लस) किंवा आंत्रज्वर-पटकी अथवा सर्पदंश यांवरील बहुप्रतिकारक्षमता लशी. मिश्रलस दिली, तर तिच्यातील प्रत्येक घटकाला मिळणारा प्रतिसाद प्रत्येक लस वेगवेगळी दिल्यास मिळणाऱ्या प्रतिपिंड-प्रतिसादाशी तुलनीय असतो. रोगसंसर्गाची जास्तीत जास्त शक्यता असलेली अपेक्षित वेळ लक्षात घेऊन त्याआधी लसीचा वापर केला जातो आणि साथीच्या काळी अगर इतर वेळी जेव्हा जास्त धोका उद्भवेल तेव्हा (उदा., प्रवास, शस्त्रक्रिया, अपघाती जखम) पूरक मात्रा दिल्या जातात.
गर्भवती अवस्थेत धनुर्वात विषाभ, नवजात अर्भकास बीसीजी व एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्रिप्रतिकारक्षमतेची लस वबालपक्षाघात लस यांच्या तीन ते पाच मात्रा आणि गोवराच्या लशीची मात्रा असे कार्यक्रम प्रचलित आहेत [⟶ बाल्यावस्था व बालसंगोपन]. या कार्यक्रमांत अनुभवानुसार वरचेवर सुधारणा केली जाते. पुढे शैशवात व बाल्यावस्थेत या लशींच्या पूरक मात्रा व प्रौढास फक्त धनुर्वाताची लस फक्त जखम झाली असता देतात. रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास करण्यापूर्वी जरूरीप्रमाणे पटकी, पीतज्वर अथवा अन्य लशी वापरता येतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता पटकीची लस घेणे अनिवार्य नाही. जर्मन गोवराचा गर्भावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलींना पौगंडावस्थेत लशीची एक मात्रा देणे आता पाश्चात्त्य देशांत रूढ होत आहे.
एखाद्या हट्टी संसर्गजन्य रोगाचे रुग्णातून निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्मजीवाच्या विशिष्ट विभेदाची लस तयार करून ती वापरण्याची पद्धत प्रतिजैव औषधांच्या वापरामुळे आता मागे पडली आहे.
लशींच्या अंतःक्रामणातील निषिद्धे व सावधगिरी : लशींचे कार्य प्रतिकारक्षमता यंत्रणेद्वारे होत असल्याने या यंत्रणेवर फार ताण पडणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळेच कोणताही ज्वर असताना लस देणे टाळतात. बाल्यावस्थेतील अंतःक्रामणाचा कार्यक्रम तसा लवचिक असतो व ताप उतरेपर्यंत लशीची मात्रा पुढे ढकलली तरी चालते. दोन मात्रांमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसेल, तर पूर्ण कार्यक्रम मालिकेची पुनरावृत्ती करण्याची जरूरी नसते. याशिवाय जिवंत लशींचा वापर गर्भवतींमध्ये व (प्रतिकारक्षमतादमनकारी औषधे, स्टेरॉइड द्रव्ये, किरणोत्सार इत्यादींमुळे) प्रतिकारक्षमता यंत्रणा क्षीण झालेली असताना टाळणे आवश्यक आहे.⇨जलिका-अंतःस्तरीय तंत्राच्या कर्करोगातही अशी लस धोक्याची ठरू शकते. सूक्ष्मजंतूंची रोगकारकता वाढून तीव्र संक्रामणाचा धोका संभवतो.
याखेरीज अंड्यातील भ्रूणावर वाढविलेल्या व्हायरसांपासून तयार केलेल्या लशीमुळे (उदा., पीतज्वर) अंड्याची असात्म्यता असणाऱ्या व्यक्तीस प्रतिक्रियेचा त्रास होऊ शकतो. निओमायसीन, पॉलिमिक्सीन यांसारखे प्रतिजैव पदार्थ वापरलेल्या गोवर,गालगुंड यांच्या लशी वालकांना देताना असाच उपद्रव होण्याची शक्यता असते.
संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणात लशींची उपयुक्तता व भावी संभाव्य प्रगती : देवीच्या लशीच्या शोधानंतरच्या दीड-दोनशे वर्षांच्या काळात अनेक रोगांवर विविध प्रकारच्या लशी तयार करण्यात आल्या. त्यामुळे आणि बऱ्याच अंशी राहणीमानातील सुधारणा, आरोग्यविषयक शिक्षण, जंतुनाशके, प्रतिजैव पदार्थ, आहारघटकांची पूर्तता इत्यादींमुळे घटसर्प, गोवर, आंत्रज्वर,क्षय, पटकी, पीतज्वर यांसारख्या रोगांची तीव्रता कमी झाली आहे. कुष्ठरोग, आमांश व हिवताप यांसारखे सूक्ष्मजंतू वा प्रजीव (एककोशिक प्राणी; प्रोटोझोआ) यांच्यामुळे होणारे रोग तसेच विविध प्रकारचे कृमी यांवर यशस्वी लशी तयार करणे शक्य झालेले नाही. ट्रिपॅनोसोमासारखे परोपजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणारे सजीव) पृष्ठभागावरील प्रतिजनामध्ये वरचेवर बदल घडवून प्रतिपिंडांपासून आपले संरक्षण करीत असतात, असे दिसून आले आहे. ऊतकसंवर्धनाची यशस्वी तंत्रे,जननिक अभियांत्रिकी व बहुप्रतिकारक्षम प्रतिपिंडनिर्मिती यांमुळे यांतील काही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
जेन्नर यांनी देवीच्या लशीत वापरलेला व्हॅक्सिनिया व्हायरस जननिक अभियांत्रिकीच्या तंत्राद्वारे नवीन पुनःसंयोगित संकरित व्हारयरस लशींमध्ये उपयोगात आणण्याच्या दृष्टीने प्रयोग करण्यात येत आहेत. व्हॅक्सिनिया हा खूप मोठा व्हायरस असून त्याच्या जननिक वृत्ताचे २,२५,००० क्षारकयुग्मे असलेल्या डीएनए रेणूत संकेतन झालेले असते. या व्हॅक्सिनिया डिएनएपैकी ५% एकतर अतिरिक्त असते (रेणूच्या दोन टोकांना डीएनए श्रेणींची पुनरावृत्ती झालेली असते) किंवा ऊतकसंवर्धनात व्हॅक्सिनिया व्हायरसाच्या गुणनाला अगदी अनावश्यक असलेल्या काही जीनांचे डीएनए संकेतन करतो. व्हॅक्सिनिया थायमिडीन किनेज जीन हा अशा अनावश्यक जीनांपैकी एक असून प्रतिकाक्षमताजनक जीन घालण्याकरिता एक लक्ष्य म्हणून त्याचा उपयोग करण्यात आला आहे. उदा., डीएनए पुनःसंयोजन तंत्राद्वारे व्हॅक्सिनिया व्हायरसातील थायमिडीन किनेज जीनमध्ये इन्फ्ल्यूएंझा हीमॅग्लुटीनीन जीन घालण्यात आला. नंतर पुनःसंयोगित व्हॅक्सिनिया व्हायरसाचा उपयोग ग्रहणक्षम आश्रयित इन्फ्ल्यूएंझा हीमॅग्लुटीनीन जीन वाहून नेण्यासाठी करण्यात आला. त्यापुढील हीमॅग्लुटीनीन जीनाच्या अभिव्यक्तीमुळे (ओळखता येणाऱ्या परिणामामुळे) संरक्षक प्रतिकारक्षमता प्रतिसाद उत्पन्न होतो, असे दिसून आले. इन्फ्ल्यूएंझा हीमॅग्लुटीनीन जीनखेरीज इतर विविध परकीय जीन घातलेल्या व्हॅक्सिनिया व्हायरसापासून लशी बनविण्यात आलेल्या आहेत. यात यकृतशोथ-ब व्हायरसापासून लशी बनविण्यात आलेल्या आहेत. यात यकृतशोथ-ब व्हायरस पृष्ठीय प्रतिजन,हरपिझ सिंप्लेक्स व्हायरस ग्लायकोप्रथिन डी, अलर्क रोग, ग्लायकोप्रथिन, प्लास्मोडियम नोलेसी स्पोरोझाइड प्रतिजन वगैरे जीन घालण्यासाठी संशोधन करण्यात आलेले आहे. संकरित व्हॅक्सिनिया पुनःसंयोगितांची परकीय डीएनए सामावून घेण्याची क्षमता खूप मोठी आहे. जीनांची पूरक वगळणी न होता, तसेच व्हायरसाच्या वृद्धीच्या त्वरेत वा संसर्गकारकेतेत घट २५,००० क्षारकयुग्मे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ही मर्यादा ३५,००० क्षारकयुग्मांपर्यंत वाढविता येणे शक्य आहे, असे दिसून आले आहे. यामुळे व्हॅक्सिनिया व्हायरस रोगवाहकांत एकाच वेळी अनेक जीन घालण्याची व त्यांची अभिव्यक्ती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याचा नवीन संकरित पुनःसंयोगित व्हायरसाच्या बहुप्रतिकारक्षम लशींच्या भावी विकासावर निश्चितपणे महत्त्वाचा दूरगामी परिणाम घडून येईल. अशी बहुप्रतिकारक्षमतेची लस दिलेल्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता यंत्रणा व्हॅक्सिनिया व्हायरसातील इतक्या मोठ्या प्रमाणातील परकीय प्रतिजनांचा स्वीकार करील की नाही, हे प्रयोगांवरूनच कळून येईल.
व्हायरसजन्य रोगांच्या (उदा., इन्फ्ल्यूएंझा) साथींमध्ये दर वेळी व्हायरसाचे स्वरूप बदलत असल्याने एकदाच लस देऊन दीर्घ काळ प्रतिकारक्षमता मिळण्याची शक्यता कमी असते म्हणून या रोगांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर अंतःक्रामण शक्य झालेले नाही. त्या त्या साथीच्या वेळी विशिष्ट लस मोठ्या प्रमाणावर तयार केली, तर बरेचसे नियंत्रण होऊ शकते. तरीसुद्धा अशा रोगांमध्ये कायम स्वरूपाची इजा होण्याची वा मृत्यूची शक्यता कमी असल्याने संशोधकांनी आपले लक्ष मुख्यतः इतर महत्त्वाच्या रोगांवर (उदा., अलर्क रोग, बालपक्षाघात, यकृतशोथ, एड्स) केंद्रित केलेले आहे.
कर्करोग व संतति-प्रतिबंधक यांसाठी लशी बनविण्याचे कार्य अजून प्राथमिक अवस्थेत आहे. प्रतिपिंडनिर्मितीद्वारे परिणाम घडविणाऱ्या असात्म्यता दशेमध्ये हिस्टामीनविरोधी प्रतिपिंड तयार करून उपयोगी पडतील अशा लशी अंशतः यशस्वी ठरलेल्या आहेत. अर्भकाच्या ऱ्हीसस प्रतिजनामुळे [⟶ ऱ्हीसस घटक] मातेत तयार होणारे प्रतिपिंड व त्यांचा पुढील भावंडांवर होणारा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी प्रति-डी-इम्युनोग्लोब्युलीन परिणामकारक ठरले आहे.
भारतात सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, कसौली; हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबई; किंग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन, मद्रास;बीसीजी व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट, मद्रास या व इतर सरकारी संस्था विविध प्रकारच्या लशींची निर्मिती करतात. कलकत्ता येथील बेंगॉल इम्युनिटी कंपनी व बेंगॉल केमिकल ॲण्ड फार्मास्युटिकल वर्क्स या राष्ट्रीयीकृत कंपन्या तसेच ग्लॅक्सो लॅबोरेटरीज,मुंबई; सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे वगैरे खाजगी कंपन्याही लसनिर्मिती करतात.
श्रोत्री. दि., शं.; बर्डे. आ. श्री.
मानवाप्रमाणेच पाळीव पशूंत सूक्ष्मजीवांच्या संसर्गामुळे साथीचे रोग उद्भवतात. पशुवैद्यकामध्ये अशा साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे; कारण वैयक्तिक रोगोपचार करणे वऱ्याच वेळा अशक्य किंवा आर्थिक दृष्ट्या न परवडणारे असते. बहुसंख्य जनावरांचे कळप पाळण्यात येत असल्याने साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी लागण झालेली जनावरे मारून टाकून व निरोगी जनावरांना लस टोचून अनेक देशांनी पशूंच्या भयानक साथींच्या विविध रोगांचे संपूर्ण उच्चाटन करण्यात यश मिळविले आहे.
लूई पाश्चर यांनी १८८१ मध्ये मेंढ्यांच्या संसर्गजन्य काळफुळी रोगाचे बीजाणू स्वरूपातील सूक्ष्मजंतू विशिष्ट तापमानाला (४२°-४३° सें.) हतप्रभ करून जगातील पहिली हतप्रभ-जिवंत सूक्ष्मजंतू लस तयार केली. यानंतर पशूंच्या साथीच्या रोगांच्या विविध रोगकारक सूक्ष्मजीवांचा शोध लागत गेला व त्यांचा वापर करून लशी तयार करण्यात आल्या.
मानवी वैद्यकाप्रमाणेच पशुवैद्यकात लस तयार करण्यासाठी रोगकारक सूक्ष्मजंतू वा व्हायरस मृत, हतप्रभ, अनुयोजित अगर निष्क्रिय अवस्थेत वापरतात. सूक्ष्मजंतूंची वाढ करण्यासाठी कृत्रिम माध्यम वापरतात. व्हायरसांच्या वाढीसाठी अंड्यातील भ्रूण, उंदराची पिले, ससे यांसारखे प्राणी किंवा ऊतकसंवर्धन तंत्रातील जिवंत कोशिका यांपैकी एखाद्या माध्यमाचा उपयोग करतात. गायीगुरांतील गळसुजी रोगाचे पाश्चुरेला मल्टोसिडा हे सूक्ष्मजंतू मांसाच्या अर्कामध्ये ग्लुकोज, मीठ व जीवनसत्त्वे घालून तयार केलेल्या माध्यमावर वाढवून नंतर फॉर्मॅलिनने मारून या रोगावरील लस तयार करण्यात आली. कोंबड्यांच्या मानमोडी (रानीखेत) रोगाचे व्हायरस अंड्यातील भ्रूणावर सोडून व तो भ्रूण मेल्यावर त्यातून जिवंत व्हायरस काढून पुन्हा दुसऱ्या अंड्यातील भ्रूणावर सोडून आणि अशा प्रकारे ५०-६० आवर्तनानंतर व्हायरस हतप्रभ झाल्यावर त्यांचा वापर करून या रोगावरील लस तयार करण्यात आली. गायीगुरातील बुळकांड्या रोगाचे व्हायरस शेळीमध्ये टोचून ती मेल्यावर तिच्यातील रोगकारक व्हायरस काढून पुन्हा दुसऱ्या शेळीत टोचले आणि अशा काही आवर्तनांनंतर त्या व्हायरसाचा शेळी - अनुयोजित विभेद मिळाला. व्हायरसाचा हा विभेद गायीगुरांत टोचल्यावर अतिसौम्य स्वरूपात रोगोद्भव झाला; पण मूळ रोगकारक व्हायरसाविरुद्ध प्राप्त झालेली प्रतिकारक्षमता रोगनिवारण करण्याइतकी मिळाली. शेळी अनुयोजित व्हायरस विभेद लस म्हणून वापरात आहे [⟶ बुळकांड्या]. अलर्क रोगावरील लस म्हणजे विशिष्ट शक्ती असलेल्या रोगकारक व्हायरसाच्या विभेदापासून तयार केलेली लस होय. या विभेदाचे व्हायरस मेंढीला टोचतात. मेंढीला पक्षाघात झाल्यावर तिच्या मेंदूचे संधारण तयार करून त्यात फॉर्मॅलीन घालून त्यातील व्हायरस निष्क्रिय केले जातात. या संधारणाचा लस म्हणून वापर करतात. याखेरीज पशुवैद्यकात विषाभ व प्रतिपिंडयुक्त रक्तद्रव यांचाही लस म्हणून उपयोग करतात. एकापेक्षा अधिक रोगांच्या लशींचे एकत्रीकरण करून तयार केलेल्या मिश्रलशीही वापरात येत आहेत.
जनावरांमध्ये लशीचे अंतःक्रामण अधस्त्वचीय पद्धतीने करतात. शेळ्यामेंढ्याच्या देवीची लस देण्यासाठी शेपटीच्या सुरुवातीच्या खालच्या भागावर किंवा कानाच्या आतील भागावर तीक्ष्ण चाकूने त्वचेखालील अधिस्तरातील कोशिकांपर्यंत खोलवर ओरखडे काढतात आणि त्यांमध्ये लशीचे एक-दोन थेंब चाकूचे पाते आडवे घासून जिरवितात. कोंबड्यांमध्ये मांडीवरील दहा-बारा पिसे उपटून काढून पिसांच्या उघड्या झालेल्या पुटकांमध्ये लस ब्रशाने घासून लावतात. कोंबड्यांच्या एक दिवसाच्या पिलांसाठी बनविलेल्या मानमोडी रोगाविरुद्धच्या लशीचे दोन थेंब पिलाच्या नाकात सोडतात. श्वासाबरोबर लस श्वसन तंत्रात पोहोचते. गायीगुरांमधील नासागुहा व श्वासनाल यांतील व्रण व सूजयुक्तदाह ही लक्षणे असलेल्या ऱ्हीनोट्रॅकाइटीस या रोगावर नाकाद्वारे लस देतात. कोंबड्या व मेंढ्या सोडल्यास इतर जनावरांमध्ये साथ नसताना लस टोचण्याची प्रथा नाही.
भारतामध्ये बुळकांड्या रोगाच्या साथींनी लाखो जनावरे प्रतिवर्षी मृत्युमुखी पडत असत. प्रामुख्याने या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस तयार करण्याच्या संशोधनासाठी त्यावेळच्या केंद्र शासनाने १८८५ मध्ये इझ्झतनगर (उत्तर प्रदेश) येथे इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली. या संस्थेनेचे बुळकांड्या रोगावरील शेळी-अनुयोजित लस तयार केली. त्यानंतर गळसुजी, फऱ्या इ. रोगांवरील लशींचे उत्पादनही सुरू केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बहुतेक सर्व राज्यांमध्ये अशा संस्था स्थापन करण्यात आल्या. या संस्थांमध्ये लसनिर्मिती बरोबरच स्थानिक गरजेनुसार संशोधनही चालू असते. संकरित गायी लाळ रोगाला अतिरोगग्राही असल्यामुळे या रोगाविरुद्धच्या लशीच्या उत्पादनासाठी इझ्झतनगर येथील संस्थेची एक शाखा बंगलोर येथे १९७४ च्या सुमारास उघडण्यात आली. याच सुमारास उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान या संस्थेने वाघोली (जि. पुणे) येथे प्रामुख्याने लाळ रोगावरील लशीच्या उत्पादनासाठी प्रयोगशाळा काढली. १९७० नंतर जनावरांच्या रोगांवरील लशी तयार करणाऱ्या काही खाजगी संस्थाही स्थापन झालेल्या असून त्यांत वेंकटेश हॅचरीज, पुणे व हेक्स्ट कंपनी या प्रमुख होत.
जगामध्ये पाळीव पशूंच्या अनेक सांसर्गिक रोगांवरील लशी तयार करण्यात आलेल्या आहेत. यांतील कित्येक रोग भारतामध्ये आढळून आलेले नाहीत. भारतामध्ये पशूंच्या पुढील रोगांविरुद्धच्या लशी तयार करण्यात येतात :
गायी व म्हशी : बुळकांड्या, फऱ्या, गळसुजी, संसर्गजन्य काळपुळी, लाळ रोग, अलर्क रोग, ब्रूसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस (प्रायोगिक); शेळ्या: देवी, फऱ्या, अलर्क रोग; मेंढ्या : आंत्रविषवाधा, देवी, फऱ्या, गळसुजी, अलर्क रोग; डुक्कर : गळसुजी,फऱ्या; कोंबड्या: मानमोडी, देवी, मर्क रोग, स्पायरोकीटोसिस (प्रायोगिक); कुत्रा: अलर्क रोग, डिस्टेंपर; मांजर: अलर्क रोग;घोडा: साउथ आफ्रिकन हॉर्स सिकनेस, धनुर्वात, अलर्क रोग.
दीक्षित, श्री. गं.
पहा : प्रतिजन; प्रतिपिंड; रेणवीय जीवविज्ञान; रोगप्रतिकारक्षमता; रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक.
संदर्भ : 1. Barrett, J. T. Texbook of Immunology, London, 1988.
2. Dick, G. Practical Immunisation, Lancaster, 1986.
3. Humphrey, J. H.; White, R. G. Immunology ofr Students of Medicine, Oxford, 1977.
4. Monteflore, D. G. and others, Tropical Microbiology, London, 1984.
5. Wilson, G.; Dick, H. M. Topley and Wilson's Principles of Bacteriology, Virology and
Immunity, Vol. 1, London, 1983.
6. Woolf, N. Cell, Tissue and Disease, London, 1986.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2020
पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना स...
हेल्थफोन निर्मित लासिकरण चित्रफित
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूल...
पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच'कावी...