(फेथ हीलिंग). व्याधी निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक उपचारपद्धती. रूग्णाची देवावरील अथवा उपचार करणाऱ्या चिकित्सकावरील श्रद्धा जागृत करून, त्याच्या मानसिक अथवा शारीरिक विकारांचे निवारण करण्याला श्रद्घोपचार असे म्हणतात. पुरातन काळापासून सर्वच मनुष्य-समाजांत श्रद्धोपचार कमी-अधिक प्रमाणात रूढ असल्याचे दिसून येते. आधुनिक काळात श्रद्धोपचारांचा अवलंब कमी झालेला आहे; तथापि काही दुर्धर दुखण्यांच्या बाबतींत श्रद्धोपचारांकडे वळण्याचा कल दिसतो.
श्रद्धा ह्या संज्ञेचे वेगवेगळे अर्थ करण्यात येतात. उदा.,
श्रद्धा ह्या संज्ञेचे वेगवेगळे अर्थ
- विश्वासपूर्ण अपेक्षा बाळगण्याची अभिवृत्ती (अॅन अॅटिट्यूड ऑफ ट्रस्टफुल इक्स्पेक्टन्सी).
- दैवी शक्तीशी सहेतुकपणे संबंध जुळविण्यासाठी व्यक्तीने आपल्या विचार-भावना-संकल्प यांच्या रूपाने समगपणे दिलेला प्रतिसाद ( देवावरील श्रद्धा ).
- ज्ञानातून व जाणिवेतून उगम पावणारी श्रद्धा.
श्रद्धोपचार यशस्वी होण्यासाठी पुढील गोष्टींची गरज असते
श्रद्धोपचार यशस्वी होण्यासाठी पुढील गोष्टींची गरज
- चिकित्सकाची अथवा रोगमुक्त करणाऱ्या शक्तीची रूग्णावर पडणारी छाप.
- ही शक्ती आपल्याला बरी करणार, असा रूग्णाला वाटणारा गाढा विश्वास.
- चिकित्सकाचा आत्मविश्वास, त्याला रूग्णाविषयी वाटणारी आस्था व त्याने रूग्णाला दिलेला आधार.
- उपचाराच्या वेळी असणारे श्रद्धोला पूरक असे वातावरण.
- चिकित्सकाचा रूग्णाला आधारदायी
हस्तस्पर्श, आशीर्वादसूचक हस्तमुद्रा किंवा प्रतीकात्मक वस्तूंची (प्रसाद, विभूती, दोरा, ताईत, कडे इ.) भेट. (६) शेवटी स्वयंसूचकतेचा ( ऑटो-सजेशन ) होणारा विकारावरील परिणाम.
श्रद्धोपचारांचे काही प्रकार
- जादूचे उपचार : आदिमानव अनुकंपीय जादूव्दारे (सिम्पथेटिक मॅजिक ) रूग्णावर दूर अंतरा-वरूनही उपचार करत असे. आदिम जमातीत, तसेच अज्ञानगस्त समाजात अशा उपचारांचा सर्रास वापर होतो.
- अंत:पोषण ( इन्क्यूबेशन ) उपचार : प्राचीन गीसमधील वैदयकदेवतेच्या मंदिरात निद्रिस्त अशा श्रद्धाळू पीडितांच्या कानांत धर्मोपदेशक व्याधिनिवारणसूचक संदेश देत.
- आधिदैविक श्रद्धोपचारांत होऊन गेलेले थोर संत, वैदय तसेच नातेवाईक यांच्या आत्म्यांशी, विशेष आत्मिक शक्ती असलेल्या मानवी माध्यमातर्फे संपर्क साधून त्यांच्या शक्तीचा वा मार्ग-दर्शनाचा उपयोग रोगनिवारणासाठी करण्यात येई. तसेच दैवी शक्ती अथवा थोर मृतात्मे ज्यांच्या अंगात येतात, त्यांचा कौल घेऊनही रोगनिवारणाचा प्रयत्न करीत.
- प्रतीकात्मक वस्तूंद्वारा श्रद्धोपचार : अतिभौतिक अथवा दैवी शक्तीशी संबंधित असलेल्या सांकेतिक किंवा प्रतीकात्मक वस्तूंच्या संपर्काने अथवा स्पर्शाने, त्या शक्तीच्या रोगनिवारणक्षमतेवर विश्वास ठेवणाृया रूग्णांना बरे वाटते. धार्मिक गंथ, विभूती, पवित्र पाणी ( उदा., गंगेचे ), प्रसाद, माळ; ख्रिस्ती धर्मातील क्रूसासारखी धार्मिक प्रतीके, दिवंगत संतादिकांचे तसेच गुरूजनांचे अवशेष (रेलिक्स ), मंतरलेले दोरे व ताईत इत्यादींचा अशा प्रतीकात्मक वस्तूंमध्ये समावेश होतो.
- लोखंडी अथवा अन्य प्रकारच्या वस्तूंमधील चुंबकशक्ती रूग्णाच्या प्रकृतीवर इष्ट परिणाम करते, अशी सूचना संमोहनाव्दारे देऊनही श्रद्धोपचार करण्यात येतो.
- संमोहनाविना सूचनोपचार : फक्त रूग्णाच्या श्रद्धेला आवाहन करून प्रभावी सूचना देता येतात. उदा., मानसोपचार.
- आध्यात्मिक, दैवी किंवा धार्मिक श्रद्धोपचारांत रूग्णाच्या देवाधर्मावरील व आधिदैविक शक्तीवरील दृढ विश्वासाला आवाहन करून, त्यांना विशिष्ट मंदिरे, चर्च, दर्गे तसेच तीर्थक्षेत्रांसारखी पवित्र स्थाने इत्यादींच्या धार्मिक वातावरणात रोगमुक्त करण्याचे प्रयत्न केले जातात.
- प्रार्थनेव्दारे श्रद्धोपचार : रोगमुक्तीसाठी इतरांनी केलेल्या सामुदायिक प्रार्थनेवर ( इंटरसेशन ). विश्वास ठेवून दैवी अथवा आधिदैविक कृपेची व उपचाराची याचना करणे.
- तोषक परिणाम ( प्लॅसेबो इफेक्ट ) : या प्रकारात उपायांवरील वा चिकित्सकावरील श्रद्धेमुळे रूग्णाची रोगमुक्तीची अपेक्षा पूर्ण होत असते. तोषक उपायांत गुणकारी वा अकिय अशा दोन्ही प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. चिकित्सक अथवा उपाय जितका प्रसिद्ध वा लोकप्रिय, तितका तोषक परिणाम मोठा ठरतो. उदा., गरज नसलेली इंजेक्शने.
- जेव्हा आचके, मूर्च्छा, पक्षाघात, संवेदनशीलतेचा लोप इ. मानसमूलक लक्षणे असतात, तेव्हा चिकित्सकाने दिलेला दिलासा व त्याने केलेले किंवा करावयास सांगितलेले साधे इलाज पण परिणामकारक ठरतात. चिकित्सकावरील श्रद्धेमुळे रूग्ण सूचनवश बनलेला असतो. इतर अनेकांना चांगला गुण आला हे पाहून वा ऐकून नवा रूग्ण अधिकच सश्रद्ध व सूचनावश बनतो. शास्त्रोक्त मानसोपचारात श्रद्धोपचारांचा वापर काही विशिष्ट रूग्णांपुरता केला जातो. श्रद्धोपचारांत रूग्णांचे व चिकित्सकाचे वैयक्तिक संबंध निगडित नसतात व रूग्णाच्या दुखण्याची पार्श्वभूमी समजण्याची गरज नसते. तसेच एकाच वेळी अनेक रूग्णांनाही बरे करता येते; पण मानसोपचारांत चिकित्सक व रूग्ण यांचे नाते आधी जडावे लागते. तसेच रूग्णाच्या वैयक्तिक जीवनात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, प्रसंग वगैरेंची माहिती चिकित्सकाला मिळवावी लागते. मानसोपचाराला दीर्घकाल लागतो; पण त्यामुळे झालेली सुधारणा टिकाऊ असते. श्रद्धोपचार लगेच यशस्वी होतो; पण पुष्कळ वेळा रोगनिवारण तात्पुरते ठरते.
लेखक : र. वै. शिरवैकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/12/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.