बृह्दांत्राच्या (मोठ्याआतड्याच्या) शेवटच्या दोन भागांस अनुक्रमे गुदांत्र आणि गुदमार्ग असे म्हणतात. गुदमार्ग ज्या द्वाराने उघडतो त्याला गुदद्वार असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत मानवाचे गुदांत्र व गुदद्वार यांचीच माहिती दिली आहे.
गुदांत्राची रचना बृह्दांत्राच्या इतर विभागासारखीच असते; मात्र तेथे इतरत्र दिसणारी वलयाकार पिशव्यांसारखी रचना नसते अथवा वपाजाल प्रवर्धही (उदरातील इंद्रियांवरील पडद्याचे बृहदांत्राला लटकलेले चरबी साठलेल्या पिशव्यांसारखे भागही) असत नाहीत. गुदांत्राच्या बाह्यस्तरात स्नायूंचे दोन पट्टे असून त्यांपैकी एक पट्टा अग्रभागी आणि दुसरा पश्चभागी असतो. गुदांत्राच्या पहिल्या १/३भागावरच पर्युदराचे (उदरातील इंद्रियांवरील पडद्यासारख्या पटलाचे) आवरण असते. गुदांत्राचा बाह्यस्तर तंत्वात्मक ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचा) असून मध्यस्तरात स्नायूंचे दोन स्तर असतात. एक स्नायुस्तर उभा व दुसरा गोल वलयाकार असतो. सर्वांत आतील स्तर श्लेष्मकलेचा (बुळबुळीत अस्तरासारख्या ऊतकस्तराचा) असून त्या स्तराला उभ्या घड्या पडल्यासारख्या असतात. गुदांत्रात जेव्हा मल येतो तेव्हा गुदांत्राचा विस्तार होऊन त्या घड्या नाहीशा होतात. याशिवाय गुदांत्राच्या ३/४ भागात श्लेष्मकलेला आडव्या घड्या असून त्यांतील कोशिकांमुळे (पेशींमुळे) मलातील द्रव पदार्थ शोषिले जातात.
गुदमार्ग यांमधील संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकांनी भरलेली पोकळ जागा असते. गुदमार्गाच्या मध्यस्तरात जाड वलयाकृती स्नायू असून हे स्नायू नेहमी आकुंचित असल्यामुळे गुदमार्ग नेहमी बंद असतो. मलोत्सरणाच्या वेळी मात्र त्यात गुदकुंभिकेतील मल येत असल्यामुळे गुदमार्ग त्यावेळी उघडतो. गुदमार्गाच्या आतल्या स्तरावरील श्लेष्मकलेवर ६ ते १० उभ्या व लांब घड्या असतात; त्या घड्यांना ‘गुदमार्गस्तंभ’ असे म्हणतात. या प्रत्येक स्तंभात लहान रोहिणी व नीला असून त्या नीलांच्या विकृतीमुळेच मूळव्याध उत्पन्न होते. या स्तंभांची खालची टोके श्लेष्मकलेच्या गोल घड्यांनी जोडल्यासारखी दिसतात. याच जागी भ्रूणावस्थेत (अंड्याचे फलन झाल्यानंतरच्या जीवाच्या विकासाच्या आद्य अवस्थेत) गुदमार्गाच्या बाह्य व अंतःस्तरांचा संयोग होतो. या भागाच्या पार्श्वभागी अंतस्थ आणि बाह्य आकुंचक स्नायू असून त्यांच्यामुळे गुदद्वारावर नियंत्रण होते.
अंड्याच्या निषेचनानंतर (फलनानंतर) सु. २० दिवसांनी भ्रूण लांबट आकाराचा होऊन त्याची दोन्ही टोके दुमडल्यासारखी दिसू लागतात आणि सु. ३० ते ३५ दिवसांनी मागचे टोक प्रसार पावून त्याला पिशवीसारखा आकार येतो. ही पिशवी भ्रूणाच्या अंतःस्तराने बनलेली असून तिच्या बाहेर भ्रूणाच्या मध्य आणि बाह्य स्तरांचा पडदा असतो. या अंतःस्तरीय पिशवीसच वृक्कमार्ग (मूत्रपिंडापासून निघणारा मार्ग) आणि आंत्र जोडलेले असते म्हणून तिला ‘मूत्रपुरीष-कोश’ असे म्हणतात. या कोशाच्या पुढल्या भागापासून मूत्राशय आणि मागच्या भागापासून गुदांत्र व गुदमार्ग तयार होतो. बाह्य आणि मध्य स्तरांनी बनलेला पडदा भ्रूणाच्या दहाव्या ते बाराव्या आठवड्यांत नाहीसा होऊन गुदमार्ग आणि गुदद्वार जोडले जातात. हा पडदा योग्य वेळी नाहीसा न झाल्यास गुदमार्ग गुदद्वाराशी जोडला जात नाही व त्यामुळे ‘अच्छिद्री गुदद्वार’ ही विकृती दिसते.
(२) मूत्रमार्ग व मलमार्ग यांचे एकत्रीकरण : मूत्रपुरीष-कोशापासून मूत्रमार्ग व मलमार्ग वेगळा न झाल्यास दोहोंचा मिळून एकच उत्सर्गमार्ग (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचा मार्ग) तसाच राहतो. शस्त्रक्रियेने ही विकृती दुरुस्त करता येते.
(३) तीव्र गुदकंडू : गुदद्वाराभोवतीच्या त्वचेला अनावर खाज सुटून मनुष्य अस्वस्थ होतो. या विकाराला अनेक कारणे असतात. त्यांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे स्वच्छतेचा अभाव. अतिस्थूल व्यक्ती, वृद्ध आणि संधिवात असलेल्या व्यक्तींमध्ये त्वचा स्वच्छ करण्याची क्रिया नीट न झाल्यामुळे खाज सुटते. अशा वेळी साबण, कापसाचे बोळे व गरम पाणी यांचा उपयोग केल्यास खाज कमी होते. कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), कृमी इत्यादींचा त्वचेला संसर्ग झाल्यास खाज सुटते, त्याकरिता संसर्गाचे मूळ स्वरूप शोधून काढून त्यावर योग्य उपचार केल्यास खाज थांबते. मधुमेह व मानसिक विकारांतही हा विकार दिसतो. मूळ रोगावर उपचार केल्यास हा विकार बरा होतो.
(४) भगंदर : गुदद्वाराच्या आतील श्लेष्मकलेपासून आत खोलपर्यंत पू तयार होऊन तो गुदद्वाराभोवती कोठेतरी बाहेर पडून नालव्रण (पन्हळीसारखी जखम) तयार करतो, त्याला 'भगंदर' असे म्हणतात. या नालव्रणाला अनेक फाटे आणि शाखा असतात. ते सर्व उघडून शस्त्रक्रियेने खरडून काढावे लागतात [→ भदंगर ].
(५) गुदविदर : गुदद्वाराच्या चुंबळीला चिरम्या पडून असह्य वेदना होतात. मलोत्सर्गानंतर तर या वेदना फारच त्रास देतात. मल फार घट्ट आणि कठीण व टणक झाल्यास उत्सर्गाच्या वेळी चुंबळीवर ताण पडून चिरम्या पडतात. मलमे, स्नेहल (तेल व चरबीयुक्त) आणि वेदनानाशक औषधांनी गुण न आल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
(६) गुदस्खलन : चिरकारी (दीर्घकालीन) आमांशात अथवा आमातिसारात (आवयुक्त अतिसारात) गुदांत्रातील श्लेष्मकला सैल पडून ती शौचाच्या वेळी गुदद्वाराच्या बाहेर येते. त्यालाच ‘आंग बाहेर आले’ असे म्हणतात. मूळ विकारावर उपचार केल्यास हा विकार बरा होतो.
(७) मूळव्याध : गुदमार्गस्तंभांतील नीलांच्या विकृतीमुळे हा विकार उद्भवतो. [→ मूळव्याध ].
(८) सौम्य व मारक अर्बुदे : गुदद्वार व गुदांत्र यांमध्ये सौम्य व मारक अर्बुदे (नवीन ऊतकाची वाढ होऊन तयार होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) क्वचित होतात [→ कर्करोग ].
संदर्भ : Davies, D. W.; Davies, F., Eds., Gray’s Anatomy, London, 1962.
अभ्यंकर, श. ज.
स्त्रोत:मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) मिळू...
जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या भाग...
मूळव्याध : गुदद्वार, गुदमार्ग व गुदांत्राचा खालचा ...
ग्रसिकेची लांबी, रचना व कार्य निरनिराळ्या प्राण्या...