অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुल्म

(ट्यूमर). पोटातील गाठीला गुल्म म्हणतात. गुल्मात वायुगोळा, स्त्रियांत होणारे रक्तगुल्म (रक्तार्बुद),प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) व आंत्रांत्रनिवेशासारखी तीव्र गाठ ह्यांचा समावेश होतो. गुल्माची कारणे, रोगलक्षणे व चिकित्सा कारणानुवर्ती आहेत. त्याकरिता अर्बुदविज्ञान, आंत्रांत्रनिवेश, व प्लीहा या नोंदी पहाव्यात.

आपटे, ना. रा.

आयुर्वेदीय वर्णन कारणे

जो मनुष्य ज्वर, ओकारी, अतिसार इत्यादींनी तसेच वमन, विरेचन, आस्थापन (औषधांचा बस्ती),रक्तसृती इ. कर्मांनी अशक्त व कृश झाला असता रुक्ष, लघू, शीतादि वातूळ अन्न खातो, जो भूक लागली असता अन्नाच्या ऐवजी थंड पाणी पितो, जो जेवणानंतर चालणे, पोहोणे इ. शरीराला ताण देणारी संक्षुब्ध करणारी कर्मे करतो, जो होत नसताना मुद्दाम वांती करवितो व मलमूत्रादींचे आलेले वेग मुद्दाम धारण करतो आणि पंचकर्मांची स्नेहन, स्वेदन इ. पूर्वकर्मे न करताना वमन विरेचनादी शोधन कर्मे जो करतो, शरीर शुद्ध झाल्यानंतर लागलीच जड, विदाही, अभिष्यंदी पदार्थ खातो, अशा त्या अशक्त मनुष्याच्या अशक्त झालेल्या आमाशय, ग्रहणी, बस्ती, हृदय, फुप्फुसे इ. अवयवांच्यामध्ये वरील आहाराने दुष्ट झालेले वातप्रधान दोष दुष्ट होऊन वरील कारणांनी अशक्त झालेल्या अवयवाच्या भागात जाऊन स्थिर ठेवतात व तेथे शक्यरूप होतात. त्यामुळे शूल उत्पन्न होतो. त्या अशक्त अवयवांचे व त्यांच्या अशक्त झालेल्या भागांचे पोषण न होता तेथेही वातूळ द्रव्यांनी वात, विदाही द्रव्यांनी पित्त व अभिष्यंदी द्रव्यांनी झालेला कफ संचित होतो. हे अवयव सतत कर्मकर असल्यामुळे ह्या दोषांनाही ते बाहेर घालविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अधिक कृश, आकारांनी पातळ, रुक्ष झाल्यामुळे कठीण, खरखरीत होतात. त्यामुळे त्याचा आकारही वाढतो. जुन्या रबरी फुग्याचा आकार वाढतो तसा तो आकार वरूनही स्पर्शाला लागतो. त्याच्यावर केव्हा केव्हा रुक्ष, काळसर, अरुण अशा वर्णांच्या शिरांचे जाळेही निर्माण झालेले असते. त्याला गुल्म म्हणतात. ज्या एका दोषाचे किंवा अधिक दोषांचे किंवा दुष्ट रक्ताचे तेथे वास्तव्य व शल्यत्व आधिक्याने असेल त्या तऱ्हेने त्या दोषाचे त्याला नाव दिले जाते. आहार, पान, मल, रस, रक्त ह्यांचे वहन त्या त्या अवयवातून स्वाभाविक रीतीने होत नाही, आवरण होते.

वरीलप्रमाणे आंत्राचा, बस्तीचा, हृदयाचा, रक्तवाहिनीचा, श्वासवाहिन्यांचा भाग ढिला, ताणलेला, वर उचलून आलेला असा राहतो. त्यामुळे तो तिथे वरूनही स्पर्शाला समजतो. उदरामध्ये व छातीच्या फासळ्यांच्या मधल्या भागातही असा भाग हाताला लागतो. ह्यालाच गुल्म असे म्हणतात. त्यातून नैसर्गिक रीतीने ऊर्ध्ववहन, अधोवहन जे असेल ते होत नाही, अडते.

चिकित्सा

गुल्माच्या कारणांचा विचार केल्यास तो शरीराला क्षीण करणाऱ्या कारणांनी प्रामुख्याने होत असतो. म्हणून ह्यात मुख्य दोष वात असतो. हा कमी करण्याकरिता व क्षीणता नाहीशी करण्याकरिता तेल व तूप अशा स्निग्ध द्रव्यांचाच अर्थात, औषधाने सिद्ध द्रव्यांचाच उपयोग त्या त्या गुल्माच्या स्थानाला अनुसरून करावा लागतो. गुल्म जर नाभीच्या वरच्या भागात म्हणजे आमाशय,फुप्फुस, गल ह्या भागांत असेल, तर स्नेह पिण्याला देणे हितकर होते. जर नाभीच्या खालच्या भागात म्हणजे मोठे आतडे,पक्वाशय, मलाशय, बस्ती, योनी ह्या भागांत असेल, तर बस्ती देणे चांगले आणि नाभीमध्ये (ग्रहणीमध्ये) असेल, तर स्नेहाचे बस्ती आणि पान उपयुक्त होईल.

वातज गुल्माची अवस्थानुरूप चिकित्सा ज्यामध्ये मळाच्या गाठी असून शौचाला व वात सरण्याला अवरोध होतो, पोट फुगलेले असते व तीव्र वेदना असतात तसेच जो रुक्ष आणि शीत अशा कारणांनी झालेला असतो त्याला वातरोग चिकित्सेत सांगितलेली तेले द्यावीत. ही तेले आहारामध्ये पिण्याला, अभ्यंगाला आणि बस्तीला वापरावीत. नंतर स्निग्ध झालेल्या रोग्याला शेक द्यावा. ह्यामुळे स्त्रोतसे मऊ होऊन वाढलेला वात कमी होतो. अवरोध नाहीसा होऊन मल व वात ह्यांचे अनुलोमन होते. पोट फुगणे व वेदना नाहीशा होतात.

वातिक गुल्मामध्ये मल आणि वात ह्यांचा अवरोध असेल व अग्नी चांगला असेल, भूक लागत असेल तर पौष्टिक असे अन्नपान द्यावे. अर्थात ते स्निग्ध आणि उष्ण द्यावे. वातज गुल्मांवर पुनःपुन्हा हे उपचार स्थानाला अनुसरून केले पाहिजेत. मात्र कफ आणि पित्त यांचा प्रकोप होणार नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. ह्याकरिता नियंत्रण असणे जरूर आहे. म्हणजे प्रमाणाने हे उपचार केले पाहिजेत.

कोणत्याही दोषाचा गुल्म असला, तरी बस्तिकर्म हे सर्वांत श्रेष्ठ आहे. बस्तिकर्माने गुल्मामधला मुख्य दोष जो वात तो जिंकला जातो. हिंग्वादी, हपुषादि, दशमूलादि, त्र्यूषणादि, लशूणादि, षट्पल ही सिद्ध तुपे द्यावीत.

वातगुल्मामध्ये भूक लागत नसेल, अरुची असेल, तोंडाला पाणी सुटत असेल, जडपणा असेल व तंद्रा असेल तर कफ दोष वाढलेला आहे असे समजून हलकेसे वमन देऊन कफ काढून टाकावा.

वरील चिकित्सा करूनही शूल, पोट फुगणे आणि मलमूत्राविरोध असेल, तर गुल्माचे स्थान स्निग्ध झाले आहे की नाही हे पाहून ज्या औषधांची तुपे तयार करावयास सांगितली आहेत त्यांचेच काढे, गोळ्या व चूर्णे करून यांपैकी योग्य त्यांचा उपयोग करावा. गुल्म झालेला अवयव जर स्निग्ध नसेल, तर वरील औषधांनी सिद्ध केलेली तुपेच वापरावीत. चूर्णे इ. वापरू नयेत. ती चूर्णे बोर, डाळिंब, ऊन पाणी, ताक, मद्य, आंबट कांजी किंवा दह्यावरची निवळी ह्यांच्याबरोबर सकाळी किंवा जेवणाच्या अगोदर द्यावीत. कफवाताचा संबंध असताना ह्या चूर्णास महाळुंगाच्या रसाच्या भावना देऊन त्यांच्या गोळ्या करून त्या द्याव्यात. तसेच वैश्वानर चूर्ण, शार्दूल चूर्ण, त्रिकटूदि चूर्ण इ. चूर्णे निरनिराळ्या अवस्थांत द्यावीत.

वातगुल्माबरोबर श्वास, कास, हृद्रोग इ. विकार असतील, तर त्या त्या प्रमाणे योग उपयोगात आणावेत. उदा., वातज गुल्माबरोबर वात, हृद्रोग, अर्श, योनिशूल, मलावरोध हे विकार असतील तर सुंठ, गूळ, काळे तीळ ही एक, दोन आणि चार ह्या प्रमाणात घेऊन कोमट दुधाबरोबर द्यावीत.

वातगुल्मात कफाचे बल असेल, तर मद्याच्या निवळीबरोबर आणि पित्ताचे बल असेल, तर दुधाबरोबर एरंडेल प्यावे व पित्त अतिशय वाढून दाह होत असेल, तर सस्नेह अनुलोमन करणारे असे विरेचन द्यावे. हे करूनही तेवढ्याने दाह कमी झाला नाही तर रक्तसृती करावी. नलिनी घृत द्यावे. वातगुल्मामध्ये पोट फुगलेले असेल, गृध्रसी, विषमज्वर, हृद्रोग, विद्रधी, शोष असेल तर लसूणसिद्ध दूध द्यावे. शूल आणि अवरोध असेल, तर चित्रकादि काढा हिंग, सैंधव व बिडलोण घालून द्यावा. दाह आणि वेदना असतील, तर पुष्करादि काढा द्यावा. अशा रीतीने वातगुल्मात निरनिराळ्या अवस्थांप्रमाणे ग्रंथोक्त उपचार करावेत.

वातगुल्मी मनुष्याचा आहार

कोंबडा, मोर, तित्तिर, करकोचा व रानचिमणी यांचे मांस; साळी, मद्य व तूप यांचा आहारात उपयोग करावा. उष्ण, द्रव व स्निग्ध पदार्थांचे मितभोजन वातगुल्म झालेल्या रोग्यास द्यावे. ते हितावह आहे व पिण्याकरिता वारुणीची निवळ व धण्याचे उकळलेले पाणी उत्तम आहे.

 

स्त्रोत-मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate