(इसोफेगस; गलेट). ग्रसनीपासून (घशापासून) जठरापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या मांसल नलिकेस ग्रसिका म्हणतात. ग्रसिकेची लांबी, रचना व कार्य निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळे असते. काही प्राण्यांत ती अन्न बारीक करण्याचे कार्य करते. काहींमध्ये तिच्या काही भागांत अन्न तात्पुरते साठवले जाते.
मानवी शरीरात अन्न वाहून नेण्याचे कार्य करणारी ही नलिका सु. २५ सेंमी. लांब असून तिचा व्यास १·२५ ते २·५० सेंमी. असतो. तिचा सुरुवातीचा व शेवटचा भाग मध्यरेषेच्या डाव्या बाजूस असतो. सुरुवातीचा भाग ग्रीवेत (मानेत), मधला वक्षात (छातीत) व शेवटचा (२·५० सेंमी.) उदरात असतो. निष्क्रियावस्थेत ग्रसिका संपूर्ण चपटी असते. पृष्ठवंशाला (पाठीच्या कण्याला) अग्रपश्च (पुढून पाठीमागील) पातळीत जसे बाक असतात तसेच अग्रपश्च बाक ग्रसिकेलाही असतात. दहाव्या वक्षीय कशेरुकाजवळ (मणक्याजवळ) मध्यपटलातील (छाती व पोटाच्या पोकळ्यांमधील पटलातील) ग्रसिकाछिद्रातून ती उदरात शिरते व जठरास मिळते. दोन्ही प्राणेशा तंत्रिका (मेंदूपासून निघणारी दहावी प्रमुख मज्जा) ग्रसिकेबरोबरच उदरात शिरतात. डावी तंत्रिका ग्रसिकेच्या अग्रभागी व उजवी पश्चभागी असते. ग्रसिका तीन ठिकाणी संकुचित झालेली असते. (१) सुरुवातीस मुद्रिका-उपास्थीजवळ (कंठाच्या खालच्या बाजूस असलेल्या अंगठीच्या आकाराच्या कुर्चेजवळ; कृंतक म्हणजे वरच्या व खालच्या जबड्यातील पुढच्या प्रत्येकी चार पटाशीसारख्या दातांपासून १८ सेंमी. अंतरावर), (२) महारोहिणी चाप (महारोहिणीच्या मार्गावर खाली जाण्याच्या वेळचे वळण) तिच्या अग्रभागी येतो तेथे (कृंतक दातांपासून २८ सेंमी. अंतरावर) आणि (३) मध्यपटातील छिद्राजवळ (कृंतक दातांपासून ४३ सेंमी. अंतरावर). मान, वक्ष आणि उदर या तीन शरीर भागांतून ग्रसिका जात असल्यामुळे वर्णनाच्या सुलभतेकरिता तिचे तीन भाग पाडले आहेत. वक्षीय भागात श्वासनाल (मुख्य श्वासनलिका), उजवी फुप्फुस रोहिणी, परिहृदय (हृदयावरील आवरणातील) महारोहिणी चाप, डावे व उजवे परिफुप्फुस (फुप्फुसावरील आवरण), लशीका (ऊतकातून म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहातून रक्तात जाणारा रक्तद्रवासारखा पातळ पदार्थ वाहणारी) महावाहिनी या महत्वाच्या शरीर भागांशी ग्रसिका थोड्याफार प्रमाणात संलग्न असते.
चार थरांची बनलेली असते. (१) बाह्य किंवा तंतुमय थर, (२) मांसल थर, (३) अधःश्लेष्म (बुळबुळीत पदार्थ स्त्रवणाऱ्या अस्तर त्वचेखालील थर) वा अवकाशी ऊतकमय (सैलसर रचना असलेल्या तंतूच्या जाळीने बनलेल्या संयोजी ऊतकाचा) थर. (४) अंतः स्तर किंवा श्लेष्मकलास्तर (बुळबुळीत पदार्थ स्त्रवणारा अस्तर त्वचेचा थर).
(१) तंतुमय थर : हा थर अवकाशी ऊतक आणि लवचिक तंतूंच्या सरमिसळीने बनलेला असतो.
(२) मांसल थर : दोन प्रकारचे स्नायू व त्यांची दोन तऱ्हेची मांडणी मिळून हा थर बनलेला असतो. ग्रसिकेच्या वरच्या २/३ भागाचे स्नायू रेखित (पट्ट्यांचे बनलेले) आणि खालच्या१/३ भागाचे अरेखित (पट्टे नसलेले) असतात; वरचे इच्छानुवर्ती (इच्छेप्रमाणे हालचाल होणारे) तर खालचे अनिच्छानुवर्ती असतात. काही स्नायू उभे व लांब तर काही वर्तुळाकार असतात. त्यांच्या क्रमसंकोचामुळे (क्रमाक्रमाने पुढील भाग संकोच पावण्यामुळे) अन्न जठराकडे ढकलले जाते. ग्रसिकेच्या सुरुवातीस तसेच जठराजवळील भागातील स्नायुभाग परिसंकोची (वलयाकार व मधील भोक आकुंचनाने बंद करणारे) बनलेले असतात.
(३) अधःश्लेष्म : या थरामुळे मांसल थर आणि अंतःस्तर एकमेकांशी ढिल्या स्वरूपात जोडले गेलेले असतात. या थरात मोठ्या रक्तवाहिन्या, तंत्रिका आणि श्लेष्मग्रंथी (बुळबुळीत पदार्थ स्त्रवणाऱ्या ग्रंथी) असतात.
(४) अंतःस्तर : श्लेष्मकलेचा बनलेला हा थर वरच्या भागात लालसर रंगाचा व खालच्या भागात त्याहून फिक्कट रंगाचा असतो. निष्कियावस्थेत त्याच्या अनेक उभ्या घड्या पडलेल्या असतात. अन्न गिळताना ग्रसिका फुगते तेव्हा त्या उलगडतात.
गिळण्याच्या क्रियेचा तिसरा टप्पा ग्रसिका पूर्ण करते [→ ग्रसनी]. ग्रसिकेच्या सुरुवातीस असलेला परिसंकोची स्नायुभाग गिळण्याची क्रिया सुरू होताच ०·२ ते ०·३ सेंकदात ढिला पडतो व त्या अवस्थेत सु. अर्धा ते एक सेकंद राहून संकोच पावतो. ग्रसिकेचा क्रमसंकोच ग्रसिकेच्या चार ते आठ सेंमी. लांब भागापुरता मर्यादित असतो. आणि त्याच्या तरंगांचा वेग दर सेकंदास दोन ते चार सेंमी. एवढाच असतो. क्रमसंकोच सुरू होण्यास अन्नाचे अस्तित्व असावेच लागते असे नाही . गिळण्याची क्रिया सुरू झाल्यानंतर १·५ ते. २·५ सेकंदांत जठरागमी परिसंकोची स्नायुभाग ढिला पडतो व ग्रसिकेतून येणारे पदार्थ जाणीव न होता जठरात शिरतात. गिळण्याची क्रिया पुन्हा सुरू होईपर्यंत हा परिसंकोची स्नायुभाग संकोचावस्थेत राहतो. त्यामुळे जठरास, जठरातील अन्न किंवा जठरामधील हवा ग्रसिकेत परत येऊ शकत नाही.
ग्रसिकेच्या विकारात जन्मजात, बाह्य पदार्थ अडकणे, जंतुसंसर्ग इ. कारणे आढळतात.
ह्या विकारात श्वासनाल आणि ग्रसिका एकमेकांशी जोडलेल्या असतात. परिवर्धनीय (भ्रूणावस्थेतील वाढ होताना निर्माण झालेल्या) दोषामुळे हा विकार उद्भवतो. प्रत्येक स्तनपानानंतर लगेच उलटी होणे व तोंडातून एकसारखी लाळ वाहत राहणे मुख्य लक्षणे होत. जन्मानंतर पहिल्या अट्ठेचाळीस तासांत निदान होऊन शस्त्रक्रिया केल्यासच रोगी बचावण्याची शक्यता असते.
येथे ‘आखूड ’ शब्द लांबीदर्शक वापरलेला नाही, तर अंतःस्तराची कमतरता सुचविण्याकरिता वापरलेला आहे. ग्रसिकेची श्लेष्मकला आणि जठराची श्लेष्मकला निरनिराळ्या कोशिकास्तरांच्या (पेशींच्या थरांच्या) बनलेल्या असतात. जेव्हा जठर श्लेष्मकला ग्रसिकेच्या खालच्या भागातील अंतःस्तराचा प्रमाणापेक्षा जास्त भाग व्यापते तेव्हा ‘आखूड ग्रसिका ’ म्हणतात. जठरातील पदार्थाच्या प्रत्यावर्तनामुळे (नेहमीच्या उलट बाजूकडे जाण्यामुळे) तेथे शोध (दाहयुक्त सूज) उत्पन्न होतो. त्या ठिकाणी पचनज व्रण (अम्लीय जाठररसाच्या क्रियेमुळे निर्माण होणारी जखम) होण्याची शक्यता असते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्...
आजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी
आजीबाईचा बटवा-इतर आजारांसाठी