डोके आणि धड यांना जोडणाऱ्या स्तंभावर शरीरभागाला ग्रीवा अथवा मान असे म्हणतात.
बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मानेतील कशेरुकांची (मणक्यांची) संख्या सातच असते. मान नसलेल्या देवमाशाच्या (व्हेलच्या) मानेच्या जागी सात कशेरुक एकमेकांत सायुज्जित (एकत्रित) झालेले असतात, तर जिराफासारख्या उंच मान असलेल्या प्राण्याच्या मानेतही सातच कशेरुक असतात. ग्रीवेचे कशेरुक नेहमी सातच असतात. या नियमास फक्त चारच प्राणी अपवाद असल्याचे माहीत आहे. तीन बोटांचे अस्वल (ब्रॅडिपस) व मुंगीखाऊ अस्वल (तमांडूआ ) यांमध्ये नऊ व आठ कशेरुक असतात; दोन बोटांचे अस्वल (कोलोपस) व अमेरिकन सागरी गाय (ट्रायकेकस) यांना प्रत्येकी सहाच कशेरुक असतात. मानेची रचना निरनिराळ्या प्राण्यांच्या गरजेप्रमाणे झालेली असते. छछुंदर या प्राण्याच्या मानेतील कशेरुकांची रचना जमीन पोखरण्यास उपयुक्त अशीच असते.
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपैकी मासे, बेडूक ह्यांत मान नसते, तर पक्ष्यांच्या कशेरुकामध्ये उड्डाणक्षमतेकरिता योग्य असे बदल झालेले असतात. पक्ष्यांना हात नसल्यामुळे पुष्कळ वेळा भक्ष्य मिळविण्याकरिता चोचीचा उपयोग करावा लागतो म्हणून मान पाहिजे तशी वळणारी असावी लागते. मान जवळजवळ नाहीच असा घुबडासारखा प्राणी आपले डोळे व नजर सहज इकडे तिकडे फिरवू शकतो. कारण त्याच्या आखूड मानेत पुष्कळ सांधे असतात.
मानवी मानेच्या पश्चभागी असलेल्या सात ग्रैव कशेरुकांचा मानेला आधार असतो. पहिल्या कशेरुकाच्या आधारावर डोके असून सातव्या कशेरुकाच्या खाली पृष्ठवंशाचा छातीतील भाग असतो. मानेतील कशेरुकांच्या भोवती चापट, गोल, लांब व आखूड अशा अनेक भक्कम स्नायूंचे समूह असून त्यांच्या आकुंचनामुळे मान व डोके यांची हालचाल होते. पहिला कशेरुक व डोके यांच्या मधील सांध्याच्या हालचालीने मान होकारार्थी हलविता येते तर पहिला व दुसरा कशेरूक यांच्या मधील सांध्याच्या हालचालीमुळे मान नकारार्थी हलविता येते. स्नायूंमुळे मानेचे अग्र व पश्च असे दोन विभाग झालेले दिसतात.
डोक्याकडून छातीकडे व छातीतून डोक्याकडे जाणाऱ्या अनेक संरचना मानेमध्ये असतात. त्यांपैकी स्वरयंत्र, श्वासनाल (मुख्य श्वासनलिका), अन्ननलिका आणि अवटू ग्रंथीचा सेतू (श्वासनालाच्या पुढे व बाजूंना असलेल्या ग्रंथीच्या दोन भागांना जोडणारा भाग) या संरचना मध्यरेषेत असून ग्रैव रोहिण्या, नीला, प्राणेशा (मेंदूपासून निघणारी दहावी प्रमुख मज्जा) व इतर तंत्रिका (मज्जा), लसीका ग्रंथी (ऊतकातून म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहातून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रवपदार्थ वाहणाऱ्या नलिकांतील ग्रंथीसारखे भाग), ⇨ग्रीवा पिंड (श्वसनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी), लसीका वाहिन्या व अवटू खंड (अवटू ग्रंथीचा एक भाग) हे भाग दोन्ही बाजूंस असतात.
मानेच्या तळापाशी खांदे, दंड व छातीचा वरचा भाग यांना रक्तपुरवठा करण्याच्या रोहिण्या असून ग्रैव तंत्रिका मूल (तंत्रिका रज्जूपासून निघालेले तंत्रिका तंतूंचे समूह) व त्यापासून बनलेल्या भुजा तंत्रिका जालिका (भुजात जाणारे तंत्रिका तंतूंचे जाळे) हे भागही असतात.
संदर्भ : 1. Davies D. V., Davies, F. Eds., Gray’s Anatomy, London, 1962.
2. Walter, H. E.; Sayles, L. P. Biology of the Vertebrates, New York, 1957.
लेखक : वा. रा. ढमढेरे / य. त्र्यं. भालेराव
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/13/2020
सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर ...
सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या लॅसर्ट...
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
सजीव सृष्टीतील चेतनायुक्त विभागातील [⟶ जीव] क्रिया...