ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) व ग्रहणी (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) यांच्यामधील पचननलिकेच्या विभागाला जठर असे म्हणतात. जठर ही एक फुगीर पिशवी असून चर्वण होऊन मऊ झालेले अन्न तिच्यामध्ये काही काळ साठविले जाते. या पिशवीत अन्नावर जठररसांची पाचकक्रिया सुरू होते.
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) कनिष्ठ प्राण्यांमध्ये जठर पचननलिकेच्याच आकाराचे असते. काही पक्षांमध्ये जठराचे दोन विभाग असून त्यांपैकी एका विभागातील ग्रंथींच्या स्रावामुळे पचनक्रिया सुरू होते; दुसऱ्या विभागात बळकट स्नायू असल्यामुळे तेथे अन्न मऊ केले जाते. काही पक्षी या क्रियेसाठी लहान खडे गिळतात.
सस्तन प्राण्यांमध्ये जठराचे अनेक प्रकार दिसून येतात. त्यांच्या जठराचे एकापासून चार कप्पे असतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हा प्रकार विशेषत्वाने दिसतो.
मानवी शरीरात मध्यपटलाच्या (छाती व उदर यांना अलग करणाऱ्या आडव्या पटलाच्या) डाव्या कमानीखाली उदरात जठर असते. मध्यपटलाचा भेद करून ग्रसनी जेथे उदरात प्रवेश करते त्या ठिकाणी जठराची सुरुवात होऊन खाली उदराच्या उजव्या बाजूस ग्रहणीपाशी ते संपते. त्याचा आकार आकड्यासारखा किंवा इंग्रजी J या अक्षरासारखा असून वरच्या आखूड कडेला लघुवक्र कडा व खालच्या लांब कडेला दीर्घवक्र कडा म्हणतात. प्रौढ वयात लघुवक्र कडेची लांबी सु. ७.५ सेंमी. आणि दीर्घवक्र कडेची लांबी २२.५ सेंमी. असते. नवजात बालकामध्ये त्याची धारणाक्षमता ३० घ.सेंमी. असून प्रौढ वयात ती १,५०० घ. सेंमी.पर्यंत वाढते. व्यक्तीचा आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर ही क्षमता पुष्कळ अंशी अवलंबून असते.
जठराच्या पुढच्या व मागच्या पृष्ठभागांना अनुक्रमे अग्र पृष्ठ आणि पश्च पृष्ठ अशी नावे आहेत. ग्रसिका जेथे जठराला मिळते त्या द्वाराला जठरागमी द्वार आणि जेथे जठर आणि ग्रहणी यांचा संयोग होतो त्या द्वाराला जठरनिर्गमी द्वार असे म्हणतात.
वर्णनाच्या सोईसाठी जठराचे पाच विभाग कल्पिले आहेत : (१) बुध्न, (२) काय, (३) जठरनिर्गम-कोठर, (४) जठरनिर्गम-नाल आणि (५) जठरद्वार-कपाट.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव...
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदा...
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...