অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डोळा


प्राणिशरीरातील प्रकाशग्राही कोशिकांच्या (पेशींच्या) समुच्चयाला डोळा म्हणतात. दृष्टिज्ञान हे बहुतेक सर्व प्राण्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अतिशय साध्या संरचनेचे प्राणी सोडून सगळ्यांत ज्याच्या योगाने सर्व वस्तू पाहता येतील, असे ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाल्याचे दिसून येते. प्रस्तुत नोंदीत प्रारंभी मानवी डोळ्यासंबंधी माहिती दिलेली असून नंतर इतर प्राण्यांच्या डोळ्यांचे वर्णन दिले आहे. डोळ्यांच्या विविध विकारांकरिता ‘नेत्रवैद्यक’ ही नोंद पहावी.

मानवी शरीरातील ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. त्यामुळे प्रकाश, वस्तू, त्यांचे रंग, आकार व रूप, दोन वस्तूंमधील अंतर वगैरे गोष्टींचा बोध होतो. ज्ञानार्जन, निसर्गाचे अवलोकन करणे, परिसरात घडोघडी होणाऱ्या बदलांची जाणीव होणे इ. गोष्टी आपणास बहुतांशी डोळ्यांच्या साहाय्याने करता येतात.

डोळ्यांची हालचाल, उघडझाप, त्यांचे तेज यांच्या द्वारे विविध मनोभावना व्यक्त होतात. चेहऱ्याचे सौंदर्य पुष्कळ अंशी डोळ्यांवरच अवलंबून असते. डोळा हे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याची निगा राखणे फार महत्त्वाचे आहे. अंधत्व ही एक भयानक आपत्ती असून अंध माणसास जगामध्ये वावरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्याचे जीवन अत्यंत खडतर होऊन बसते.

भ्रूण विज्ञान

(गर्भाची उत्पत्ती आणि वाढ यांच्या अभ्यासाचे शास्त्र). भ्रूणाच्या अग्रमस्तिष्क (मेंदूच्या पुढच्या) विभागापासून डोळ्यांची आद्यांगे तयार होतात. भ्रूणाच्या पृष्ठावर लंबोत्तर दिशेतील तंत्रिका तंतू (मज्जातंतू) प्रणाली आत दुमडून एक नलिका बनते. या नलिकेपासूनच केंद्रीय तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) उत्पत्ती होते. डोळ्याच्या आद्यांग असलेल्या जागी असणाऱ्या कोशिकांचा अग्रभाग गाठीसारखा घट्ट होतो व त्याला ‘चाक्षुषपट्ट’ म्हणतात. या गाठी मागील बाजूच्या पृष्ठाकडे वाढत जाऊन त्यांच्यापासून अक्षिवृंतकांचा (ज्यांपासून पुढे डोळ्याची तंत्रिका तयार होते त्या भागांचा) विकास होतो.

पुढच्या भागी दोन्ही बाजूंस विकसित होणाऱ्या मेंदूच्या या भागापासून व त्यांना लागून असणाऱ्या भ्रूण मध्यस्तरातील रचनेपासून डोळ्यांची उत्पत्ती व विकास होतो. अक्षिवृंतकाची वाढ होत जाऊन तो भ्रूणबाह्यस्तराला भिडल्यानंतर त्याच्या खालच्या भागाचे अंतर्वलन (आत मुडपणे) होते (रबरी चेंडूला भोक पाडून त्यातील हवा काढून त्याचा एक भाग दुसऱ्या मुडपल्यास त्याला असाच वाटीसारखा आकार येतो).

अक्षिवृंतकाच्या अंतर्वलनामुळे जो वाटीसारखा भाग बनतो त्याला अक्षिचषक म्हणतात. ज्या ठिकाणी हे अंतर्वलन होते ते स्थान काही काळ उघडेच राहते व त्याला भ्रूणविवर म्हणतात. अक्षिचषकाच्या आतल्या पदरापासून जालपटलाच्या (डोळ्यातील प्रकाशग्राही ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणारा कोशिकांचा समूह व दृक्‌तंत्रिकेचा म्हणजे मेंदूकडून डोळ्याकडे येणाऱ्या मुख्य तंत्रिकेचा शेवटचा भाग यांचा मिळून बनलेल्या भागाच्या) मुख्य घटकांचा विकास होतो. अक्षिचषकात विकसित होणारे तंत्रिका तंतू मागे जाऊन मस्तिकात प्रवेश करतात.

अक्षिचषकाच्या बाहेरच्या पदरापासून एककोशिकी रंजकयुक्त अधिस्तर (एका शेजारी एक रचलेल्या, रंगीत द्रव्य असलेल्या कोशिकांचा एकपदरी थर) तयार होतो व तो पदर तसाच राहतो. म्हणजेच संपूर्ण वाढीनंतरही जालपटलाचा रंजक थर तोच असतो. चषकाच्या अग्रवर्ती काठापासून लोमशकाय (केसल पिंड) आणि कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेले डोळ्यातील रंगद्रव्ययुक्त वर्तुळाकार पटल) यांचा विकास होतो.

अक्षिवृंतकाच्या पुढील भागाजवळ असलेल्या भ्रूणबाह्यस्तरापासून काचपुटक (ज्यापासून काच किंवा भिंग तयार होते तो भाग) बनतो. काचपुटकाच्या पश्चभित्तीजवळील कोशिकांपासून काच तंतू तयार होतात व अग्रभित्तीजवळील कोशिकांपासून काचेवरील अधिस्तर बनतो. काचाभ रोहिणी (जालपटलाच्या प्रमुख रोहिणीचा पुढचा भाग) गर्भविवरातून अक्षिचषकात शिरते व पुढे सरकत जाऊन काचेच्या पश्चभागावर शाखित होते. या भागातील विकसित होणाऱ्या कोशिकांचे तात्पुरते पोषण या रोहिणीमुळे होते. पुढे ह्या रोहिणीची अपपुष्टी होऊन (पोषणाअभावी रोडावत जाऊन) ती दिसेनाशी होते.

नेत्रगोलाचा ४/५ भाग व्यापणारा गरासारखा पदार्थ असलेला पारदर्शक भाग म्हणजे सांद्रजलपिंड हा काच व अक्षिचषक यांच्या दरम्यान विकसित होतो. काच आणि जालपटल तयार करणारा चषकाचा पडदा एकमेकांपासून अलग होतात; परंतु नाजूक जीवद्रव्य प्रवर्धांनी (जिवंत कोशिकेतील चैतन्यमय द्रव्ययुक्त वाढींनी) जोडलेली राहतात. हे प्रवर्ध व जालपटलाच्या काही कोशिका मिळून बनलेल्या जाळीपासून सांद्रजलपिंड बनतो. काच ज्यापासून बनते त्या मध्यस्तराचा काही भाग सांद्रजलपिंडाच्या विकासात भाग घेत असल्यामुळे सांद्रजलपिंडाच्या विकासात भ्रूणीय बाह्यस्तर आणि मध्यस्तर दोन्ही अंशतः भाग घेतात.

श्वेतपटल (नेत्रगोलाचे बाहेरील टणक पांढरे आवरण) आणि वर्णपटल (नेत्रगोलाचे रक्तवाहिन्यायुक्त आवरण) भ्रूणमध्यस्तरापासून तयार होतात. लोमशकाय स्नायू मध्यस्तरापासून तयार होतात, परंतु कनीनिका स्नायू (छिद्र लहान किंवा मोठे करणारे) बाह्यस्तरापासून बनतात. त्वचा तयार होणाऱ्या दुमडलेल्या पडदेवजा भागापासून पापण्या विकसित होतात. त्या गर्भाच्या तिसऱ्या महिन्याच्या मध्यास स्वच्छमंडलासमोर (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागासमोर) वाढून एकमेकींस भिडतात आणि भिडलेल्या अवस्थेतच सहाव्या महिन्याच्या शेवटापर्यंत राहतात.

रचना

(पहा : चित्रपट ४९). चेहऱ्यावरील डोळ्याच्या खाचेत (अक्षिकोटरात) नेत्रगोल, त्याला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या, तंत्रिका, नेत्रगोलाची हालचाल करणारे स्नायू व काही मेदोतके (स्निग्ध पदार्थयुक्त ऊतके) एवढे भाग असतात. डोळ्याच्या पुढील भागात उघडझाप करणाऱ्या पापण्या व अश्रुस्त्राव यंत्रणा असते [⟶ अश्रु ग्रंथि].

पापण्या (अक्षिपक्ष्म) ह्या उघड-झाप करणारे डोळ्यांचे दरवाजे आहेत. प्रत्येक पापणीत तंतुमय घट्ट ऊतकाचे पातळ पट्ट असतात. या पट्टाला वर्त्मपट्ट म्हणतात. या पट्टांमुळे पापण्यांना टणकपणा व अर्धवर्तुळाकार येतो. वरच्या पापणीतील हा पट्ट मोठा असतो व मध्यभागी त्याची रुंदी १० मिमी. भरते. खालच्या पापणीतील पट्ट लहान असून रुंदी ५ मिमी. असते. पापण्यांच्या मोकळ्या कडांवर वाकलेले केस असून डोळे अर्धवट मिटले असता या केसांमुळे धुरळा, कचरा वगैरे डोळ्यांत जाऊ शकत नाही. पापणीची त्वचा फार पातळ असून तीत पुष्कळ स्पर्शग्राहके असतात.

त्यामुळे पापण्यांना तीव्र स्पर्शज्ञान होते. पापणीच्या आतील भागावर नेत्रश्लेष्मकला (नेत्रगोलाच्या पुढील भागावरील बुळबुळीत पातळ पटल) असते. वर्त्मपट्ट आणि ही श्लेष्मकला यांमध्ये लांबट आकाराच्या पुष्कळ ग्रंथी असतात. त्यांना वर्त्म ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींचा स्निग्ध स्त्राव पापणीच्या कडा ओलसर ठेवून अश्रुद्रव्य गालावर ओघळू देत नाही. पापण्यांच्या भोवती संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकामध्ये परिनेत्र स्नायू आणि पापणी उचलून धरणारा स्नायू असतात. त्यांच्यामुळे पापण्यांची हालचाल होते. या स्नायूंना आननतंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या सातव्या तंत्रिकेच्या) शाखांपासून प्रेरणा मिळते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate