पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ती अतिशय विकसित झालेली आढळून येते. अन्न शरीरात घेणे व त्याचे पचन करणे, पचलेल्या अन्नाचे अभिशोषण करणे आणि अनावश्यक व न पचलेला भाग शरीराबाहेर टाकणे इत्यादी क्रिया पचन संस्थेत घडून येतात. येथे मानवाच्या पचन संस्थेचे विवरण दिले आहे.
मानवी पचन संस्थेचे पचन नलिका आणि पचन ग्रंथी असे दोन प्रमुख भाग असतात. पचन नलिका ८-१० मी. लांब आणि स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते. वेगवेगळ्या भागांत तिचा व्यास वेगवेगळा असतो. पचन ग्रंथींमध्ये लालोत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो.
पचन संस्थेत अन्नाचे पचन (म्हणजेच विघटन) भौतिकीय (यांत्रिक) आणि रासायनिक अशा दोन पद्धतींनी होते. भौतिकीय पचनात अन्नातील मोठ्या तुकड्यांचे बारीक तुकडे होतात. रासायनिक पचनात अन्नातील कर्बोदके, मेद व प्रथिनांच्या जटिल रेणूंचे सरल रेणूत रूपांतर होते. हे रूपांतर जलापघटनाने होत असून त्यासाठी पचन विकरे आवश्यक असतात.
ही मुख, मुखगुहा, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार यांनी बनलेली असते. मुख (तोंड) म्हणजे एक आडवी फट असून ती वरच्या आणि खालच्या ओठांनी वेष्टिलेली असते. मुखाचा उपयोग अन्न घेण्यासाठी होतो. मुख हे मुखगुहेत उघडते. मुखगुहा पुढील बाजूला वरच्या आणि खालच्या जबड्यांनी सीमित झालेली असते. गुहेत वर तालू, खाली जीभ व दोन्ही बाजूंना जबड्यांवर दात असतात. मुखगुहेत लालोत्पादक ग्रंथी त्यांच्या नलिकांद्वारे उघडतात. जिभेमुळे अन्नाची चव कळते. त्याचा घास केला जातो. त्यात लाळ मिसळते आणि ते गिळले जाते. दातांमुळे अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि त्याची भौतिकीय पचनाची सुरूवात होते. लाळेमध्ये टायलिन व माल्टेज ही दोन विकरे असतात. या विकरांमुळे अन्नातील कर्बोदकांच्या रासायनिक पचनास सुरुवात होते. स्टार्च आणि ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. लाळेत असलेल्या श्लेष्मामुळे अन्नाचा घास गिळण्यास मदत होते. मुखगुहेनंतर अन्न घशात येते. घशाला ग्रासनी असेही म्हणतात. घसा हा पचन संस्था आणि श्वसन संस्था या दोन्हींच्या मार्गामध्ये असतो. घशामध्ये नासाद्वारे, यूस्टॅशियन नलिका छिद्रे, ग्रासिकाद्वार व कंठद्वार असतात. कंठद्वारावर कंठच्छद असल्याने अन्नकण स्वरयंत्रात जाऊ शकत नाहीत. घशानंतर ग्रासिका असते. ग्रासिका सु. २५ सेंमी. लांब व सरळ स्नायूची बनलेली नळी असते.ग्रासिकेला ग्रासनली असेही म्हणतात. चावून बारीक केलेले अन्न ग्रासिकेतून जठरात येते.
जठर एखाद्या पिशवीसारखे असून पचन संस्थेतील हा सर्वांत रुंद भाग असतो. साधारणपणे इंग्रजी व् अक्षरासारखा त्याचा आकार असून तो व्यक्तीनुसार वेगळा व अन्नसाठ्याप्रमाणे बदलत राहतो. प्रौढ व्यक्तिच्या जठरात सु.१ लि. अन्न सामावते. जठराचे पाच भाग असतात. ग्रासिकेच्या आणि लहान आतड्याच्या बाजूला झडपा असतात. जठरभित्ती अनैच्छिक स्नायूंच्या बनलेल्या असतात. जठरातील अस्तर श्लेष्माने बनलेले असते. जठरात जठर ग्रंथी असून त्या जठररस तयार करतात. जठररसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सीन, रेनिन आणि श्लेष्म असते. ग्रासिकेतून चर्वण झालेले अन्न जठरात ३-५ तास राहते. तेथे अन्न घुसळले जाते, त्यातील मेदाचे पायसीकरण (साबणीकरण) होते. घुसळलेल्या अन्नात जठररस मिसळला जातो व प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात होते. जठरातील पचनक्रियेत अन्नापासून अर्धद्रव पदार्थ तयार होतो. त्याला आंब (काइम) म्हणतात. ही आंब जठर निर्गमद्वारातून लहान आतड्यात पोहोचते. गॅस्ट्रिन आणि आंत्रगॅस्ट्रिन ही स्थानिक संप्रेरके जठर ग्रंथीचे नियंत्रण करतात (पहा : जठर).
जठरात अर्धवट पचलेले अन्न आंब स्वरूपात लहान आतड्यात येते. लहान आतडे अथवा लघ्वांत्र सु. ६ मी. लांब आणि २.५-५ सेंमी. रुंद असून ते मोठ्या आतड्याच्या तुलनेने अरुंद असते म्हणून त्याला लहान आतडे म्हणतात. ते नळीसारखे असून त्याची वेटोळी उदरपोकळीत असतात. लहान आतड्याचे आद्यांत्र अथवा ग्रहणी, मध्यांत्र आणि शेषांत्र असे तीन भाग असतात. आद्यांत्रात पित्तरस, स्वादुरस आणि आंत्ररस अन्नात मिसळतात. पित्तरसात पित्त क्षार व पित्त रंगद्रव्ये असतात. पित्त क्षारामुळे मेदाचे पायसीकरण होते. स्वादुरसात अनेक विकरे असतात. त्यातील ट्रिप्सीन, कायमोट्रिप्सीन, इरेप्सिन या विकरांमुळे प्रथिनांचे पचन होते. लायपेजमुळे मेदाचे पचन होते. माल्टेज, सु क्रेज व लॅक्टेजमुळे कर्बोदकांचे पचन होते तर न्यूक्लिनेज व न्यूक्लिओटाइडेजमुळे न्यूक्लिइक आम्लांचे विघटन व पचन होते. कोलेसिस्टोकायनिन हे संप्रेरक पित्ताशयाचे कार्य नियंत्रित करते. सेक्रेटिन आणि पॅनक्रिओझायमिन ही संप्रेरके स्वादुपिंडाचे कार्य नियंत्रित करतात. काही विकरे निष्क्रिय स्वरूपात स्रवली जातात, त्यांचे लहान आतड्यांत क्रियाशील विकरात रूपांतर होते. जसे, एंटरोकायनेज निष्क्रिय ट्रिप्सिनोजेनपासून क्रियाशील ट्रिप्सीन बनविते. कर्बोदके, मेद व प्रथिने यांचे पचन म्हणजे जलापघटन होते. त्यासाठी पाचक रसातील विकरे साहाय्य करतात. लहान आतड्यात पचन पूर्ण होऊन कर्बोदकांचे ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज यांमध्ये, मेदांचे मेदाम्ले व ग्लिसरॉल यांमध्ये आणि प्रथिनांचे अॅमिनो आम्लांत रूपांतर होते. लहान आतड्यात अन्नाचे पूर्ण पचन होते. या अन्नाला वसालसिका किंवा पयोरस (काइल) म्हणतात. या पचलेल्या अन्नाचे अभिशोषणही लहान आतड्यात होते. लहान आतड्याच्या भित्तिकांना बोटासारखे लहान उंचवटे असतात, त्यांना उद्वर्ध म्हणतात. यात (उद्वर्धात) रक्तवाहिन्यांचे जाळे आणि रसवाहिनी असते. रक्तवाहिन्या ग्लुकोज आणि अॅमिनो आम्ले शोषून घेतात, तर रसवाहिन्या मेदाम्ले व ग्लिसरॉल शोषतात. अभिशोषणानंतर हे अन्न शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठविले जाते. न पचलेले अन्न मोठ्या आतड्याकडे जाते.
मोठे आतडे (बृहदांत्र) सु. १.५ मी. लांब आणि ६ सेंमी. रुंद असते. लहान आतड्याच्या शेवटी आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला कृमीसारखे दिसणारे आंत्रपुच्छ निघते. मोठ्या आतड्यात असंख्य जीवाणू असतात. मनुष्यात आंत्रपुच्छ अवशेषांग स्वरूपात व निष्क्रिय असते. त्याचा शरीराला काही उपयोग नसतो. मात्र त्याला सूज येऊन आंत्रपुच्छदाह होऊ शकतो. न पचलेल्या अन्नातील काही पाणी व क्षार यांचे मोठ्या आतड्यात अभिशोषण होते आणि नको असलेला भाग मलाच्या रूपात गुदद्वारातून बाहेर टाकला जातो. गुदद्वाराभोवती परिसंकोची स्नायू असून ते मलविसर्जनाचे कार्य करतात (पहा : आंत्र).
या तीन असतात : लालोत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. लालोत्पादक ग्रंथीच्या तीन जोड्या मुखगुहेभोवती असतात. त्यांना अनुकर्ण ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजिव्हा ग्रंथी म्हणतात. त्या अनुक्रमे कानापुढे, खालच्या जबड्यातील आणि जिभेखाली असून लाळ स्रवतात. यकृत ही सर्वांत मोठी ग्रंथी असून त्याचे वजन सु. १.५ किग्रॅ. असते. यकृताचा रंग लालसर तपकिरी असून ते उदरपोकळीत उजव्या बाजूला व जठराला थोडेसे झाकून असते. त्याला डावे आणि उजवे असे दोन खंड असतात. यकृतात पित्तरस तयार होतो आणि पित्ताशयात साठविला जातो. यकृत पित्त निर्माण करते तसेच ते ग्लुकोज, प्रथिने, जीवनसत्त्वे, मेद, क्षार इ. साठवून ठेवते. वापरून झालेले रक्तातील घटक, औषधे, विषारी द्रव्ये यांची विल्हेवाट यकृतामार्फत लावली जाते. यकृत ही ग्रंथी शरीरातील ‘जीवरसायन’ प्रयोगशाळा आहे. स्वादुपिंड ही ग्रंथी असून वनस्पतीच्या पानाप्रमाणे जठर आणि लहान आतड्यातील ग्रहणी यांमध्ये पसरलेली असते. ती अंत:स्रावी आणि बहिस्रावी अशी दोन्ही कार्ये करते. अंत:स्रावी भाग इन्शुलीन आणि ग्लुकागॉन संप्रेरके तयार करतो, तर बहिस्रावी भाग स्वादुरस तयार करतो (पहा : अंत:स्रावी ग्रंथी). मानवी पोषणात पचन संस्था निर्णायक मानली जाते (पहा : चयापचय).
सोहनी, प. वि.
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...
उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदा...
ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) व ...