অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्युदर


(पेरिटोनियम). उदर-श्रोणी गुहेत (उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्‍या पोकळीत) भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर (अंतर्गत इंद्रियांवर) कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ लस्सी-कलेला (अस्तरासारख्या पटलाला) ‘पर्युदर’म्हणतात. सर्व सस्तन प्राणी आणि इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या उदर-श्रोणी गुहेचे पर्युदर हे अस्तर असते. मानवी शरीरातील सर्वांत मोठी लसी-कला म्हणूनही तिचे वर्णन करता येते. तिची रचनाही जटिल (गुंतागुंतीची) असून समजण्यास सुलभ नाही. भ्रूणावस्थेत साध्या पसरलेल्या या पडदेवजा या लसी-कलेला उदरगुहेतील अंतस्त्यांच्या वाढ आणि रचनात्मक बदलांबरोबरच फुगवटे आणि घड्या पडत जातात. या पडद्यामुळे आंत्रासारख्या (आतड्यासारख्या) लांब नळीला आधार मिळून ती पश्चोदर (उदराच्या मागील बाजूच्या) भित्तीशी काहीशी घट्ट बांधली जाते. त्यामुळे आंत्रनलिका उदरगुहेत लोंबकळत राहून तिच्या अनेक हालचाली सुरळीत चुलू शकतात [⟶ पचन तंत्र]. पर्यदर ही संक्षक लसी-कला असून तिच्या आतील ओलसर गुळगुळीत पृष्ठभागामुळे उदरगुहेतील अंतस्त्यांच्या हालचाली घर्षणविरहीत व सुरळीत चलतात. ओलसर राहण्याकरिता पर्युदर कोशिकांचे (पेशींचे द्रवस्त्रवण सतत चालू असते. पर्युदर पृष्ठभाग जसा स्त्रवणक्षम असतो तसाच तो अभिशोषणक्षमही असतो. पाणी आणि स्फटिकाभ पदार्थ त्यातून रक्तात आणि लसीकेत (रक्तद्रवाशी साम्य असलेल्या व ऊतकांतून–समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतून–रक्तात जाणाऱ्‍या द्रव पदार्थात) अभिशोषिले जातात. शरीराच्या संबंध त्वचेचे पृष्ठफळ १.९ चौ. मी. आहे, तर संपूर्ण पर्युदराचे पृष्ठफळ ६ चौ. मी.एवढे मोठे आहे. उदरगुहेतून सर्वसाधारणपणे दर ताशी ३० ते ३५ मिलि. द्रव पर्युदरातून रक्तद्रवात मिसळत असतो. मूत्रलता (लघवी होण्याचे प्रमाण) कितीही वाढवली, तरी या क्रियेत कोणताही बदल होत नाही. पर्युदराची अभिशोषणक्षमता (प्राण्यावरील) प्रायोगिक शस्त्रक्रियेकरिता नेम्बुटालासारख्या शुद्धिहारक औषधाचे पर्युदरगुहेत अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन उपयोगात आणतात. मूत्रविषरक्तेत (मूत्रातील घटक रक्तात शिरल्यामुळे निर्माण होणाऱ्‍या विषारी अवस्थेत) पर्युदराची अर्धपारगम्यता पर्युदर अपोहनाकरिता [विद्रावातील स्फटिककाभ व कलिल द्रव्ये अलग करण्याकरिता; ⟶ अपोहन] वापरता येते. शोथाच्या (दाहयुक्त सुजेच्या) सान्निध्यात पर्युदराची प्रतिक्रिया प्रथिनसमृद्ध निःस्त्राव उत्पन्न करण्याची आणि तंतुमय बंध तयार करून शोथ रोखण्याची असते.

पर्युदलाबद्दलची माहिती ईजिप्तमधील ३,५०० वर्षांपूर्वीच्या एबर्स पपायरसमध्ये (एका विशिष्ट वनस्पतीपासून तयार केलेल्या लेखन पत्रावरील नोंदीमध्ये) आढळते. १७३० मध्ये एडिंबरो येथील जेम्स डग्लस या शरीररचना आणि प्रसूतिविद्या तज्ञांनी पर्युदराचे प्रथम प्रसिद्ध केलेले सखोल वर्णन आजतागायत जसेच्या तसेच ग्राह्य असून त्यात कोणताही फरक आढळलेला नाही.

आ. १. भ्रूणाचा अग्रपश्च किंवा उभा छेद : (१) परिहृदय गुहा, (२) पर्युदरगुहा, (३) अनुप्रस्थपट (भावी मध्यपटल) - अपूर्ण वाढलेला, (४) अग्र भाग, (५) पश्च भाग.

भ्रूणविज्ञान

भावी मध्यपटल (उदरगुहा व वक्षीय गुहा यांना विभागणारे पटल) ज्यापासून बनते त्या ‘अनुप्रस्थपटां’मुळे भ्रूणातील आद्य देहगुहेची दोन भागांत विभागणी होते व भ्रूणावस्थेच्या चौथ्या आठवड्यात हा पट अपूर्णावस्थेत असल्यामुळे दोन्ही गुहा एकमेकींशी जोडलेल्याच असतात. या दोन भागांपैकी मोठ्या भागापासून पर्युदरगुहा बनते व ती छोट्या भागापासून (भावी परिहृदय गुहेपासून) कालांतराने पूर्ण निराळी होते. सुरुवातीस पर्युदरगुहेचे आद्य आंत्रामुळे (आतड्यामुळे डावा आणि उजवा असे दोन भाग पडतात. आद्य आंत्राच्या दोन बंधांपैकी अभ्युदरीय (उदराच्या बाजूचा) भाग नाहीसा होऊन एकच गुहा बनते.

रचना व कार्य

 

 

 

 

 

पर्युदर हा एक सलग पडदा असला, तरी त्याचे उदरभित्तीच्या आतल्या पृष्ठभागावरील एक व उदरातील अंतस्त्यांशी निगडित असा एक मिळून दोन विभाग वर्णितात. भित्तीशी निगडित असलेला तो ‘भित्तिस्तर’ व अंतस्त्यांवर कमी अधिक प्रमाणावर आच्छादलेला तो ‘अंतस्त्यस्तर’ अशी वर्णनसुलभ नावे त्यांना दिलेली आहेत. हे दोन्ही स्तर प्रत्यक्षात एवढे संलग्न असतात की, जेव्हा ‘पर्युदरगुहा’ हा शब्द वापरला जातो तेव्हा फक्त ‘संभाव्य पोकळी’चाच उल्लेख केला जातो, हे लक्षात ठेवावयास हवे. शिवाय या गुहेत कोणतेही अंतस्त्य नसते. पर्युदरगुहेसंबंधी रेखाचित्रेही अशी पोकळी खरोखरच असल्याचा केवळ भासच निर्माण करतात. पर्युदर ही एक बंद पिशवीच असून तिचा पुरूषाचा बाह्य हवेशी अजिबात संबंध नसतो. स्त्रीमध्ये मात्र या पिशवीचा अंडवाहिन्यांची दोन मोकळी तोंडे ⟶ गर्भाशय गुहा ⟶ योनिमार्ग या मार्गाने बाह्य हवेशी संबंध येतो म्हणजेच अंडवाहिन्यांची मोकळी तोंडे पर्युदरगुहेतच उघडतात.

पर्युदरगुहेचे दोन भाग पाडता येतात : (१) उदरगुहेचा अधिकांश भाग व्यापणाऱ्‍या मोठ्या भागाला ‘बृहतकोश’ आणि (२) जठराच्या मागे यकृताखालून मध्यपटलापर्यंत गेलेल्या छोट्या भागाला ‘लघुकोश’ म्हणतात. हे दोन्ही भाग ज्या रंध्रामुळे एकमेकांस जोडलेले असतात त्याला ‘वपा रंध्र’ किंवा जे. बी. व्हिन्सलौ या फ्रेंच शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘व्हिन्सलौ रंध्र’ म्हणतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate