অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाऊल

पाऊल

उभे असताना जमिनीवर टेकणाऱ्या पायाच्या घोट्याखालच्या शरीरभागाला पाऊल म्हणतात. पायाच्या घोट्याच्या वरचा भाग आणि पाऊल यांच्यामध्ये सु. ९०० कोन असतो .

रचना

पावलाचे तीन भाग आहेत : (अ) मागील म्हणजे टाचेकडील भाग, याला ‘गुल्फ’ म्हणतात; (आ) मधला लांबट हाडे असलेला ‘प्रपाद’ आणि (इ) पुढचा बोटांचा किंवा ‘पादांगुली’.

गुल्फ हा भाग सात हाडे मिळून बनलेला असतो. पावलाचा पश्च अर्धा भाग त्यांनीच बनतो, त्यांची नावे अशी आहेत :

  1. पार्ष्ण्यास्थी किंवा टाचेचे हाड,
  2. गुल्फास्थी,
  3. घनास्थी,
  4. नौकाकार अस्थी,
  5. अभिमध्य कीलाकार अस्थी,
  6. मध्यस्थ कीलाकार अस्थी आणि
  7. पार्श्व कीलाकार अस्थी.

ही सर्व हाडे जवळजवळ घनाकार असतात.

टाचेचे हाड सर्वांत मोठे असून ते शरीराचे वजन तोलण्यात प्रमुख भाग घेते. त्याच्या मागील पृष्ठभागावर पोटरीतील मोठ्या स्नायूंची कंडरा (अस्थीला वा उपास्थीला स्नायू घट्ट बांधणारे तंतुसमूह) जोडलेली असते. तिला ‘पार्ष्णिका कंडरा’ किंवा ‘आकिलीझ कंडरा’ (ट्रोजन युद्धातील आकिलीझ या ग्रीक योद्धयाच्या नावावरून) म्हणतात. पार्ष्ण्यास्थीच्या पुढच्या अर्ध्या भागावर गुल्फास्थी टेकलेली असते. तिचा अग्र पृष्ठभाग घनास्थीशी संधी तयार करतो. गुल्फास्थी, पोटरीतील आतल्या बाजूची अंतर्जंघास्थी व बाहेरच्या बाजूची बाह्य जंघास्थी मिळून गुल्फसंधी किंवा घोट्याचा सांधा तयार होतो.

पायाच्या प्रमुख सांध्यांत त्याचा समावेश होतो. शरीरवजनाचा अंतर्जंघास्थीतून खाली उतरणारा भार पावलाच्या वजन पेलणाऱ्या इतर हाडांमध्ये पोहोचविण्याचे कार्य गुल्फास्थी करते. घनास्थीचा मागचा पृष्ठभाग पार्ष्ण्यास्थीशी संधी बनविण्यात भाग घेतो. त्याच्या अग्र पृष्ठभागाशी चौथी व पाचवी प्रापादास्थी संधी करतात. मागे गुल्फास्थी आणि पुढे तीन कीलकार अस्थी यांच्या दरम्यान नौकाकार अस्थी असते. तीन कीलकार अस्थींच्या पुढे पहिली, दुसरी व तिसरी या प्रपादास्थी असतात. प्रत्येक प्रपादास्थीच्या पुढे बोटांची हाडे असतात. आंगठ्याची दोन व इतर प्रत्येक बोटातील तीन मिळून पाच बोटांत चौदा हाडे असतात. गुल्फाची सात, प्रपादाची पाच आणि पादांगुलीची चौदा अशी एकूण सव्वीस हाडे मिळून पावलाचा सांगाडा बनलेला असतो.

पावलातील ही सर्व हाडे तळपायाच्या आणि पृष्ठीय बाजूकडे एकमेकांस अनेक छोट्या संधिबंधांनी जोडलेली असतात (आ. १ व २).

बोटांच्या पेऱ्यांमधील सांधे वगळल्यास इतरत्र बहुतेक सर्वच सांधे जवळजवळ अचल प्रकारचे असतात; परंतु एकाच किंवा दोन-तीन मोठाल्या हाडांपेक्षा ही अस्थिरचना पावलास अधिक लवचकिता आणते. याशिवाय मागच्या बाजूस प्रपादास्थींची पुढील टोके यांच्या दरम्यानची अस्थिरचना अशीच असते की,तीमुळे दोन कमानी बनून लवचिकतेत अधिक भर पडते. यांपैकी उभ्या कमानीचा (मागून पुढे बाक असलेली) आतील भाग (अभिमध्य बाजू) बाहेरील (पार्श्व बाजू) भागापेक्षा अधिक उंच असतो. पावलाच्या जवळजवळ मध्यावर दुसरी आडवी कमान असते.

वरील वर्णन हे रचना समजण्याच्या दृष्टीने सुलभ असले, तरी या दोन्ही कमानी मिळून कार्य सुलभ अशी एकच जटिल कमान प्रत्येक पावलात असते. या रचनेमुळे अभियांत्रिकी तत्त्वाप्रमाणे शरीराचे वजन कमानीच्या निरनिराळ्या भागांच्या उंचीच्या प्रमाणात विभागले जाते. म्हणून कमानीतील सर्वांत उंच भागी असलेल्या गुल्फास्थीवर सर्वांत जास्त भार पडतो. या कमानी अगदी दृढ नसून त्यांमध्ये अल्पशी लवचिकता असतेच. पावलाच्या विशिष्ट हालचालीकरिता थोडी तरी सांध्यातील हालचाल आवश्यक असते. गुल्फास्थि आणि पार्ष्ण्यास्थि-नौकाकार अस्थी यांमधील संधी बरेचसे चलनक्षम असतात. हे सांधे पावलाच्या अंतर्वलन व बहिर्वलन या हालचालींमध्ये प्रामुख्याने भाग घेतात.

पावलाच्या अंतर्वक्रतेमुळे जो खड्डा झालेला असतो, तो पुष्कळसा स्नायूंच्या थरांनी भरला जातो. ही अंतर्वक्रता आणि कमानी टिकविण्यास हाडांचा आकार व रचना, जाड संधिबंध, स्नायू, पोटरीतील स्नायूंच्या पावलात गेलेल्या लांब कंडरा आणि जाड पदतलीय कंडराकला (कंडरेचा चपटा किंवा फितीसारखा विस्तार) या सर्वांची मदत होते. पावलाची प्रमुख हालचाल गुल्फसंधीच्या स्थानी होते. हा संधी बिजागरी प्रकारचा असून त्या ठिकाणी पृष्ठीय अंतर्नयन (पावलाचा पुढचा भाग वर उचलणे) व पदतलीय अंतर्नयन (पावलाचा पुढचा भाग खाली वाकवणे) या हालचाली होतात. बोटांच्या हालचालीत पृष्ठीय अंतर्नयन (बोटे वर उचलणे) आणि पदतलीय अंतर्नयन (बोटे तळ पायाकडे वाकवणे) या प्रमुख हालचाली असल्या, तरी अल्पप्रमाणात त्यांचे अभिवर्तन (मध्यरेषेजवळ येणे किंवा एकमेकांजवळ येणे) आणि अपवर्तन (मध्यरेषेपासून किंवा एकमेकांपासून दूर जाणे) होते.

पावलाचा रक्तपुरवठा पोटरीतून येणाऱ्या प्रमुख रोहिण्यांपासून होतो. त्याच्या पृष्ठ भागापेक्षा तळपायामध्ये अधिक स्नायू इ. मऊ ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचे समूह ) असल्यामुळे त्या भागास भरपूर रक्तपुरवठा असतो. आतील घोट्याच्या खालून पश्च अंतर्जघीय रोहिणी पावलाच्या तळभागात शिरते आणि तिच्या शाखा व उपशाखा रक्तपुरवठा करतात. गुल्फसंधीच्या पुढून अंतर्जंघीय रोहिणी पावलाच्या पृष्ठभागावर येते. तिलाच पाद अभिपृष्ठ रोहिणी म्हणतात आणि तिच्या शाखा व उपशाखा पावलाच्या पृष्ठभागास रक्तपुरवठा करतात. तळपायातील एका रोहिणी शाखेचे व पाद अभिपृष्ठ रोहिणीचे पावलात वाहिनीमीलन होते.

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate