অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेरुरज्जु

तंत्रिका तंत्राच्या केंद्रीय विभागापैकी मेंदू वगळता उरलेल्या, १ सेंमी., व्यास आणि ४२ ते ४५ सेंमी. (प्रौढात) लांबीत मेरुनालातील (पाठीच्या कण्यातील मणक्यांमधील पोकळ मार्गातील) भागाला : मेरुरज्जू’ म्हणतात. मेरुरज्जूचे स्थूल वर्णन व रचना यांबद्दल ‘तंत्रिका तंत्र’ या नोंदीत माहिती दिली आहे. या ठिकाणी मेरुरज्जूच्या काही प्रमुख विकृतींबद्दल माहिती दिली आहे.

मेरुरज्जूचा आडवा छेद

जलद वाढणारी आणि मेरुरज्जूची अखंडता पूर्णपणे खंडित करणारी ही विकृती बहुधा आघातजन्य असते;उदा., बंदुकीच्या गोळीमुळे किंवा पृष्ठवंशाच्या (पाठीच्या कण्याच्या) अस्थिभंगामुळे वा स्थानभ्रशांमुळे. कधी कधी तीव्र अनुप्रस्थ मेरुरज्जूशोथ (मेरुरज्जूच्या आडव्या छेदाची दाहयुक्त सूज) या रोगातही मेरुरज्जू पूर्णपणे खंडित होतो. ज्या ठिकाणी खंड पडला असेल त्याच्या खालच्या शरीरभागातील सर्व ऐच्छिक हालचाली तंत्रिका पुरवठा नसल्यामुळे बंद पडतात. दोन्ही पायांच्या हालचाली बंद पडण्याला ‘अधरांगघात’ आणि दोन्ही हात व दोन्ही पाय यांच्या हालचाली बंद पडण्याला ‘चतुरांगघात’ म्हणतात. मेरुरज्जूच्या ग्रीवा (मानेतील) भागात कवटीच्या जवळ झालेली अशी आघातजन्य विकृती बहुधा प्राणघातक असते कारण अंतरापर्शुक (दोन बरगड्यांमधील) स्नायू व मध्यपटल (उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्यामध्ये असलेला स्नायूचा पडदा) या श्वसनाशी संबंधित असलेल्या स्नायूंचा मेंदूतील श्वसनकेंद्राशी असलेला संबंध तुटून ते निष्क्रिय बनतात.

सर्व आघातजन्य विकृतींत रुग्णास रुग्णालयात हालवणे आवश्यक असते. सुरुवातीच्या मेरुरज्जुजन्य अवसादाच्या (सार्वदेहिक प्रतिक्षोभाच्या) सर्व अनावश्यक हालचाली टाळणे किंवा रुग्णाची तपासणीही न करणे हितावह असते. रुग्णाला प्राथमिक मदत किंवा प्रथमोपचार करणाऱ्यांना रुग्णास कसे हाताळावे याचे संपूर्ण ज्ञान असणे अत्यंत जरूर असते. अयोग्य हाताळणी रुग्णास अपायकारक ठरण्याचा नेहमी संभव असतो.

मेरुरज्जु-विवर विकार

चिरकारी (दीर्घकालीन), हळूहळू वृद्धिगंत होणाऱ्या, पुष्कळ वेळा आनुवांशिकता व जन्मजात विकृतनिर्मित मेरुरज्जूशी संबंधित असलेल्या, मेरुरज्जूच्या गाभ्यात जलमय अनुदैर्घ्य (लांबीला समांतर असलेली) पोकळी (विवर) निर्माण करणाऱ्या विकृतीला ‘मेरुरज्जु-विवर विकार’ म्हणतात. मस्तिष्क विवराशी संबंधित असलेल्या मन्रो रंध्र किंवा माझँदी रंध्र [→तंत्रिका तंत्र] यांच्या जन्मजात विकृतीमुळे हा विकार पुष्कळ वेळा उद्‌भवतो. चौथे विवर व निमस्तिष्क (लहान मेंदू) यांच्याशी संबंधित असलेली आणि जे. आर्नोल्ट व एच्. किआरी या जर्मन विकृतीवैज्ञानिकांच्या नावांवरून ओळखण्यात येणारी आर्नोल्ट-किआरी विकृत निर्मितीही कारणीभूत असू शकते. विकृती बहुधा ग्रीवा भागातील करड्या भागात सुरू होते आणि दोन्ही बाजूंच्या पश्च शृंगांवर (मेरुरज्जूच्या छेदात दिसणाऱ्या करड्या भागाच्या इंग्रजी H अक्षरासारखा आकारातील मागील दोन भागांवर) परिणाम होतो.

बहुधा विशीत किंवा तिशीत सुरू होणारा हा विकार स्त्रियांपेक्षा पुरुषांत तिप्पट प्रमाणात अधिक आढळतो. या विकाराचे कारण अजूनही अनिश्चितच आहे. भ्रूणावस्थेत मेरुरज्जूच्या मध्य नालाच्या रचनेतील दोषापासून तो उद्‌भवत असावा, असे बहुसंख्य शास्त्रज्ञांचे मत आहे. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये हाताच्या बोटांना उष्ण व थंड यांतील फरक आणि वेदना न जाणवण्यापासून होत असल्यामुळे जागजागी भाजते व व्रण उत्पन्न होतात. उष्णता व वेदना जाणवत नसल्या तरी स्पर्श संवेदना अबाधित असते. याला‘वियोजित संवेदनाहरण’ म्हणतात व या विकाराचे ते एक खात्रीचे लक्षण समजतात. पुष्कळ वेळा १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहणारा हा विकार अनेक संवेदना व प्रेरक कार्यासंबंधीच्या लक्षणांनंतर शेवटी मारक ठरतो. रोगी बहुदा श्वसनासंबंधीच्या स्नायूंच्या पक्षाघातामुळे मृत्युमुखी पडतो. योग्य तपासणी व विकृत निर्मितीची निश्चिती करता आल्यास, आधुनिक शस्त्रक्रिया काही रोग्यांना आराम देऊ शकतात.

अल्पतीव्र संयुक्त मेरुरज्जू अपकर्ष

पाश्चिमात्य देशांतून मारक ⇨ पांडुरोगामध्ये (ॲनिमियामध्ये) एक उपद्रव म्हणून ही विकृती अधिक प्रमाणात आढळते. भारतात क्वचित आढळणाऱ्या या रोगास ब१२ जीवनसत्त्वाची न्यूनता कारणीभूत असते. मेरुरज्जूतील पश्च व पार्श्व स्तंभांतील तंत्रिका तंतूंच्या वसावरणाचा (स्निग्ध पदार्थांच्या आवरणाचा) व अक्षदंडांचा अपकर्ष होतो. संवेदना व प्रेरक येत्रणेतील निरनिराळे बिघाड उत्पन्न होतात. गतिविभ्रम (झोकांडेयुक्त चाल) हे प्रमुख लक्षण असते. अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) ब१२ जीवनसत्त्व काही महिने द्यावे लागते. लवकर निदान आणि लवकर उपचार उपयुक्त असतात.

 

संदर्भ : 1. Berkow. R. and others, The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rahway, N. J., 1982.

2. Datey, K. K.; Shah, S. J., Ed. A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1979.

3. Petersdorf, R. G. and others, Harrison’s Principles of Internal Medicine, Singapore, 1983.

भालेराव, य. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate