অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्त्रीसंप्रेरके

स्त्रीसंप्रेरके चार प्रकारची असतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, गर्भसंप्रेरक, दूधसंप्रेरक असे मुख्य प्रकार सांगता येतील. यांतील गर्भसंप्रेरक गरोदरपणाच्या काळात व दूधसंप्रेरक स्तनपानाच्या सुरुवातीस काम करतात आणि इतर वेळी ती नसतात. गर्भसंप्रेरक सुरुवातीच्या काही आठवडयांत स्त्रीबीजांडातून तर नंतरच्या महिन्यात वार व गर्भाच्या आवरणातून येते. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही मासिक पाळीसाठी व स्त्रीत्वाच्या इतर शरीरक्रियांना आवश्यक असतात आणि ती स्त्रीबीजांडातून येतात. दोन्ही बाजूंची बीजांडे काढून टाकली तर स्त्रीत्वाची अनेक लक्षणे व क्रिया बंद पडतात. म्हणून निदान एका बाजूचे तरी स्त्रीबीजांड असणे आवश्यक असते. पाळी थांबल्यावर स्त्रीबीजांडातून ही संप्रेरके पाझरण्याचे प्रमाण कमी होते, पण पूर्ण थांबत नाही. स्त्रीसंप्रेरकाची रक्तातील पातळी मासिक चक्राप्रमाणे थोडी बदलते आणि तेवढया फरकानेही काही स्त्रियांना त्रास होतो. उदा. मासिक पाळीच्या आधी काही स्त्रियांना 'पाळीआधीचा त्रास' जाणवतो. पाळी कायमची थांबताना होणारा त्रास हा बहुतांशी स्त्रीसंप्रेरकांच्या घटत्या प्रमाणामुळे होतो.

स्त्रीसंप्रेरके कृत्रिमरित्या बनवता येतात व स्त्रीजननसंस्थेच्या निरनिराळया तक्रारींमध्ये यांचा उपयोग होतो. हा उपयोग कसा होतो हे थोडक्यात पाहू.

पाळीच्या चक्रामध्ये मासिक स्रावाच्या चार दिवसांनंतर रक्तातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे प्रमाण हळूहळू वाढू लागते. दोन पाळयांच्या साधारण मधोमध बीजनिर्मिती होते. त्यानंतर हे प्रमाण हळूहळू घटू लागते. स्त्रीसंप्रेरकांचे प्रमाण ठरावीक पातळीच्या खाली गेले, की गर्भपिशवीच्या आत तयार झालेले अस्तर एकसंध राहू शकत नाही, ते टाकून दिले जाते व परत पाळी येते.

म्हणूनच पाळीच्या चक्रातील अनेक बिघाडही कृत्रिम संप्रेरके वापरून दुरुस्त करता येतात. उदा. पाळी लवकर लवकर येणे, अंगावरून अतिशय कमी किंवा जास्त जाणे,अनियमित पाळी, दोन पाळयांच्या मध्ये अंगावरचे जात राहणे, इत्यादी अनेक प्रकारांमध्ये या कृत्रिम संप्रेरकांचा औषध म्हणून उपयोग होतो.

पाळणा लांबवण्यासाठी

पाळणा लांबवण्यासाठी ज्या गोळया वापरतात तीही कृत्रिम संप्रेरकेच असतात. या गोळया पाचव्या दिवसापासून 21दिवसांपर्यंत घेतल्यास स्त्रीबीजनिर्मिती होत नाही व बीजरहित पाळी येते. यासाठी जरा जास्त शक्तीच्या गोळया वापरल्या जातात. त्यामुळे संप्रेरकांच्या शरीरातील नेहमीच्या पातळीपेक्षा अधिक पातळी गाठली जाते. या पातळीच्या फरकावरच बीजांडातून स्त्रीबीज बाहेर पडणे अथवा न पडणे अवलंबून असल्याने या संततीप्रतिबंधक गोळयांनी स्त्रीबीज बाहेरच पडत नाही व ते मासिक चक्र 'निर्बीज' जाते

हा उपाय जवळजवळ शंभर टक्के हमखास आहे, पण यात अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. या स्त्रीसंप्रेरकांमुळे रक्तदाब वाढणे, वजन वाढणे, हृदयावर ताण, रक्तात गाठी होणे, स्तनांचा कर्करोग वाढणे, इत्यादी त्रास संभवतात. म्हणून या गोळया सरसकट देण्याऐवजी संबंधित स्त्रीची नीट तपासणी करूनच या गोळया दिल्या गेल्या पाहिजेत. एवढी काळजी कुटुंबनियोजन कार्यक्रमात अद्याप घेतली जात नाही. इंजेक्शनावाटे प्रोजेस्टेरॉनचा मोठा डोस टोचण्याचे तंत्र उपलब्ध आहे. ही इंजेक्शने घातक असल्याची दाट शक्यता असल्याने पाश्चात्त्य देशांत यावर बंदी आहे. असे इंजेक्शन एकदा घेतल्यावर त्याचा तीन-चार महिने परिणाम टिकतो व त्यानंतर पाळी येते. असे करणे वैद्यकीयदृष्टया निसर्गाविरुध्द तर आहेच, पण गोळयांनी त्रास होत असेल तर जशा गोळया बंद करता येतात तसे इंजेक्शनच्या बाबतीत शक्य नसते.

गैरवापर

या संप्रेरकांचा वापर गर्भपातासाठीही गैरसमजुतीने केला जातो. पाळी लांबल्यावर'पाळीच्या गोळया' म्हणून या संप्रेरकांच्या गोळया दिल्या आणि खाल्ल्या जातात. प्रत्यक्षात गर्भ राहिल्याने पाळी लांबलेली असेल तर ती या गोळयांमुळे येत नाही. पाळीच्या चक्रातील इतर काही बिघाडांमुळे पाळी लांबली असेल किंवा मूल अंगावर पीत असेल तरच लांबलेली पाळी या गोळयांमुळे येते. पण गर्भ राहिल्यामुळे लांबलेली पाळी गोळयांमुळे येत नाहीच पण गर्भावर विकृत परिणाम होण्याचीही शक्यता असते. म्हणून पाळी लांबल्यास, दिवस आहेत की नाहीत याची खात्री झाल्याशिवाय (पाळी लांबल्यावर 2 दिवसांत लघवी तपासणी करून हे ठरवता येते.) या गोळया वापरू नयेत. अशा गैरवापरामुळे या गोळया आणि इंजेक्शनांवर आता कायद्यानेही बंदी आलेली आहे.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate