अतिसार हा सुयोग्य व वेळेत उपचार केल्यास निश्चित आटोक्यात येवू शकतो. अतिसार रुग्णांची घ्यावयाची दक्षता, त्यांना करावयाचे उपचार याबाबत जनजागृती व्हावी यासाठी 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2017 या कालावधीत अतिसार पंधरवडा राबविला जात आहे. अतिसार झाल्यास याबाबत घ्यावयाची दक्षता याची माहिती या लेखातून घेऊया...
अर्भक मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूचे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये जात असते. अतिसारामुळे होणारे मृत्यू हे टाळता येण्यासारखे असून क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंकच्या वापरामुळे हे सहज शक्य होते. मागील दोन वर्षापासून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला व त्याला चांगले यशही आले. त्याचसाठी केंद्र शासनाने दिनांक 1 ऑगस्ट 2017 ते 13 ऑगस्ट 2017 या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा ही योजना राबविण्याचे निश्चित केले आहे.
नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पातळ शौचास होणे म्हणजे अतिसार होय. अशुद्ध पाणी, अस्वच्छ हात, अस्वच्छ अन्नाचे सेवन इत्यादी कारणांमुळे अतिसार होतो. अतिसारामध्ये शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन शुष्कता येते. अशा प्रकारच्या शुष्कतेवर वेळीच उपचार केला नाही तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. अतिसारामुळे आलेली शुष्कता ओआरएससारख्या साध्या उपचाराने कमी करता येते व अतिसाराने होणारे मृत्यू टाळता येतात. ओआरएसचा शोध हा अलीकडील 100 वर्षांतील सर्वात मोठा शोध आहे असं म्हटल तरी ते चूक ठरु नये कारण कोणत्याही एका औषधामुळे किंवा लसीमुळे जेवढे जीव वाचले असतील, त्याच्या कितीतरी पट जास्त जीव केवळ ओआरएसच्या वापरामुळे वाचले आहेत.
सोडियम क्लोराईड (2.6 ग्रॅम), डेक्स्ट्रोज (13.5 ग्रॅम), पोटॅशियम क्लोराईड (1.5 ग्रॅम) व सोडिअम सायट्रेट (2.9 ग्रॅम) या घटकांचा समावेश असलेले व जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेले ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस) हे सर्व शासकीय आरोग्य संस्था, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे. ओआरएसचे पाकीट 1 लीटर स्वच्छ पाण्यात मिसळून हे द्रावण करावे व अतिसार झालेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वजनाला 75 ने गुणून मिली द्रावण पहिल्या 4 तासात द्यावे. (उदा. 10 किलो वजनाच्या बालकास 10x75= 750 मिली) त्यानंतरही आवश्यकतेनुसार ओआरएस द्रावण देणे सुरु ठेवावे. असे केल्याने 90 टक्के बालकातील अतिसार इतर कोणतेही औषध न घेताही बरा होतो. दरम्यान अतिसार झालेल्या बाळाला ताप आहे का? बाळ जास्त आजारी झाले आहे का? पाणी पिण्यास असमर्थ किंवा स्तनपान करीत नसल्यास व शौचामध्ये रक्त येत असल्यास अशा बालकांना वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) यांच्याकडून उपचार करुन घेण्याची आश्वयकता असते.
अतिसार झालेल्या बाळाला ओआरएससोबत झिंक सल्फेट दिल्यास बाळामधील जुलाबाची वारंवारता कमी होते. जुलाबाचे प्रमाण कमी होते, जुलाब / अतिसार लवकर बरा होतो. पुढील तीन महिन्यांपर्यंत अतिसार न्युमोनिया होण्यापासून बचाव होतो. जागतिक आरोग्य संघटनेने हे प्रमाणित केले आहे. झिंकची मात्रा दोन महिने ते सहा महिने वयातील बाळाला अर्धी गोळी (10 मि.ग्रॅ) आईच्या दुधाबरोबर दिवसातून एकवेळ अशी 14 दिवस (जुलाब बंद झाल्यानंतरही ) दिली पाहिजे. आवश्यकतेनुसार झिंकच्या गोळ्या सर्व आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याकडे तसेच सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.
वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छता राखावी. बाळाला भरविण्यापूर्वी तसेच शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वच्छ व निर्जंतुक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पिण्याचे पाणी उंचावर व झाकून ठेवावे, पाणी घेण्यासाठी ओघराळ्याचा वापर करावा. ताजे व स्वच्छतापूर्वक बनविलेले अन्न खावे/ बाळास भरवावे.
दिनांक १ ते १३ ऑगस्ट २०१७ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत आशा स्वयंसेविका पाच वर्षांआतील बालक असलेल्या प्रत्येक घरास भेट देतील व ओआरएसचे पाकीट मातेकडे देतील. तसेच 8 ते 10 मातांचा गट तयार करुन त्यांना ओआरएसचे मिश्रण कसे तयार करावे व बाळाला ते कसे द्यावे याबद्दल माहिती देतील. ओआरएसबरोबरच झिंकच्या वापराचे महत्व समजावून सांगतील. प्रत्येक अंगणवाडीमध्ये व शाळेमध्ये आरोग्य कर्मचारी, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम (आरबीएसके) पथकातील कर्मचारी स्वच्छतेचे महत्व व हात धुण्याचे कौशल्य याबाबत माहिती देतील. आवश्यक तेथे प्रात्यक्षिक दाखवतील. अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की मोहिमेस सहकार्य करा, आपला जिल्हा अतिसार मुक्त होण्यासाठी आपण सर्वजन मिळून प्रयत्न करुया.
-पी.आर.चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020