অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोलिओ झाला भारतातून हद्दपार

पोलिओ झाला भारतातून हद्दपार

जागतिक आरोग्य संघटनेने भारतास पोलिओमुक्त घोषित केले. भारताने मिळविलेले हे फार मोठे यश आहे. 18 जानेवारी 2015 रोजी पोलिओ दिवस आहे. महाराष्ट्रातील 84 हजार 387 पोलिओ बुथवर पोलिओ पाजण्याची सोय करण्यात आली आहे. एक कोटी 34 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.

पोलिओच्या विषाणूला भारतातून हद्दपार करायचं, असा निर्धार भारताने 1995 मध्ये केला आणि हा निर्धार खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला. 28 ऑगस्ट 2014 रोजी. दरवर्षी हजारो बालकांना अपंगत्वाच्या बेडीत अडकवणाऱ्या पोलिओला त्याच्या मुळासकट हद्दपार करुन थांबायचे नाही तर सतत जागल्याचा पहारा देत त्याला डोके वर काढूच द्यावयाचे नाही, असा निर्धारच भारताने केलाय. ' होय आम्ही करुन दाखवणारचं !' असा निर्धार केलेल्या भारताने सतत 19 वर्षे पोलिओच्या विषाणूला अतिशय सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात पोलिओ मुक्त भारताचे स्वप्न रुजवून अखेर 'पोलिओमुक्त भारत' केलाच.

भारतासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या, भौगोलिकदृष्ट्या खडतर असलेल्या, बहुविध संस्कृतीने, हजारो भाषांच्या जटिलतेने व्यापलेल्या, धार्मिक-सामाजिक प्रथा, परंपरा, रुढी, श्रध्दा,अंधश्रध्दांचा धाडोळा सातोपहर सोबत घेऊन त्यावर चोविसोपहर चर्चा करणाऱ्या, प्रसंगी वादंग घालणाऱ्या भारतीय समाजाने "याबाबत आम्हाला कुणाचेही वेडवाकड ऐकायच नाही"; असे धर्म-परंपरांच्या ठेकेदारांना ठणकावून सांगितल. पोलिओच्या अपंगत्वावर ' दो बुंद जिंदगी के लिए ' हेच खरे औषध आहे; आता आम्हाला कोणीही ' उल्लू ' बनवू शकत नाही, असेही बजावलं. अन् शंभर ते सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशातील माता, भगिनी, आई - बाबा, आजी - आजोबा, मामा - काका, यांची पावले पोलिओचा डोस पाजण्यासाठी ठरलेल्या तारखेला पोलिओ बुथकडे आपोआप वळली.

कार्यालयात कार्यालयीन वेळ असो की शेतावर काम करण्याची वेळ, मालकाने बाळाला पोलिओचा डोस पाजण्यास जाण्यास कुणी अटकाव केला नाही. बाळ आजारी असले तरी आईने डोस पाजविण थांबवल नाही. 'पोलिओ निर्मुलन ' म्हणजे अपंगत्त्वाच्या आजारापासून आपल्या बाळाला वाचविणे असेच जणू भारतीय समाजाची भावना झालीय. भारतीय समाज पोलिओमुक्त करण्यात जनतेचा खूप-खूप मोलाचा वाटा आहे, तसाच मोठा वाटा ' संवाद माध्यमांचा ' ही आहे. पोलिओमुक्ती ही भारतीय समाजाचे जसे यश आहे तसेच ते माध्यमाचही यश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पोलिओच्या विषाणुमुळे जगभरात एक कोटी वीस लाखांपेक्षा अधिक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व आले आहे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टेटिस्टिक्सच्या माहितीनुसार संयुक्त राज्य अमेरिकेत दहा लाखांपेक्षा अधिक लोक पोलिओग्रस्त आहेत. यापैकी 4 लाख 33 हजार लोकांना पोलिओमुळे अपंगत्व आले आहे. पोलिओ हा शब्द युनानी भाषेतील आहे. पोलिओ संक्रमणाच्या कालावधीत प्रामुख्याने 90 टक्के रुग्णांमध्ये या आजाराची कारणे त्वरित लक्षात येत नाहीत. परंतु पोलिओचा विषाणू रुग्णाच्या रक्तात प्रवेशित झाला तर मात्र पोलिओच्या आजाराची सर्व लक्षणे दिसू लागतात. पोलिओच्या विषाणूचा माणसाच्या शरीरात शिरकाव झाला की माणसाचे स्नायू कमजोर होतात. त्यामुळे संबंधित रुग्णास पक्षाघात होतो. ज्या रक्तवाहिन्या पोलिओच्या विषाणुमुळे अधिक प्रभावित होतात त्या अवयवास पक्षाघात होतो. त्यामुळे पोलिओच्या पक्षाघाताचे वेगवेगळे प्रकारही वैद्यक शास्त्रात सांगितले आहेत.

पोलिओ हा आजार पूर्वी महामारीचे रुप धारण करीत असे. सर्वप्रथम 1840 मध्ये शास्त्रज्ञ जैकब हाइन यांनी पोलिओची शास्त्रीय ओळख जगाला करुन दिली. त्यानंतर 1908 मध्ये शास्त्रज्ञ कार्ल लैडस्टीन यांनी पोलिओच्या आजाराच्या कारणांसह पोलिओच्या विषाणूचा शोध लावला. जगभरात एकोणीसाव्या शतकापूर्वी पोलिओने महामारीचेच उग्ररुप धारण केलेले असे. परंतु विसाव्या शतकात बालकांमध्ये या आजाराची लक्षणे अधिक दिसू लागली अन् हा बालकांचाच आजार म्हणून त्याची ओळख झाली. या आजारामुळे मोठ्या प्रमाणात अपंगत्वाचे जीणे पोलिओग्रस्तांना येत असे. त्यातही लहान बालकांची संख्या अधिक असे. एकेकाळी पोलिओमुळं अपंगत्व येत असे किंवा मृत्यूला जवळ करावे लागे.

हजारो वर्ष जगभरातील मानव या आजाराचा त्रास सहन करत होता. 1910 पर्यंत जगातील बहुतेक भागाला पोलिओच्या विषाणूने कवेत घेतले होते. जगभरात पोलिओ रुग्णांच्या संख्येत अफाट वाढ झाली होती. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात जगातील बहुतेक शहरामध्ये दरवर्षी पोलिओच्या रुग्णात वाढ होत असे. पोलिओच्या महामारीमुळे लाखो मुले आणि वडिलधाऱ्यांना अपंगत्व येत होते, त्यांच्या जगण्याचे हाल-हाल होत होते, त्यातूनच पोलिओच्या लसीच्या शोधाची प्रेरणा शास्त्रज्ञांना मिळाली. जोनास सॉल्क या शास्त्राज्ञाने 1952 मध्ये आणि अल्बर्ट साबिन यांनी 1962 मध्ये लावलेल्या पोलिओ लसीच्या शोधामुळे पोलिओ रुग्णात मोठ्या प्रमाणात घट होत गेली. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या भरीव योगदानामुळे तसेच त्यांनी जगभर राबविलेल्या पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेमुळेच आज जग पोलिओमुक्तीच्या जवळ आले आहे.

जागतिक आरोग्य सभेने 1988 मध्ये विश्वातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचा ठराव पारित केला. त्यानंतर 1995 मध्ये भारत सरकारने देशभरात पोलिओ लसीकरणाची मोहिम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. देशभरातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या मुलांना पोलिओचा ड्रॉप राष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमात आणि पोलिओ रुग्णांची वाढ होऊ शकणाऱ्या काही ठराविक ठिकाणी विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रत्येक राष्ट्रीय लसीकरणाच्या दिवशी भारतातील 17 कोटी 20 लाख बालकांना पोलिओच्या लसीचा डोस पाजण्यात आला.

दक्षिण - पूर्व आशिया भागातील देश पोलिओमुक्त झाल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. रिजन सर्टीफिकेशन कमिशनने (आरसीसी) 27 मार्च 2014 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात राष्ट्रीय प्रमाणपत्र समितीने सादर केलेल्या पुराव्यानुसार अकरा सदस्य राष्ट्रातून पोलिओचा विषाणू नाहीसा झाला आहे, असे प्रमाणपत्र दिले आहे. पोलिओला भारतीय भूमीतून घालविण्याचे ध्येय भारताने साध्य केले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये, म्हणजेच 13 जानेवारी 2011 पासून भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळेच जागतिक आर्रोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पोलिओचा विषाणू सक्रिय असलेल्या देशाच्या यादीतून भारतास 24 फेब्रुवारी 2012 रोजी वगळले आहे. सबंध भारतात 24 लाख पोलिओ डोस पाजणारे आणि एक लाख पन्नास हजार या मोहिमेवर लक्ष ठेवणारे निरीक्षक पल्स पोलिओची मोहीम यशस्वी करण्याचे काम करीत असतात.

भारतातून हद्दपार झालेल्या पोलिओचा भारतात पुन्हा कधीही शिरकाव होऊ नये म्हणून दरवर्षी पोलिओ लसीकरणाची मोहिम राबविण्यात येते. यावर्षी 18 जानेवारी 2015 रोजी देशभरात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आजही पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरीया, इथोपिया, केनिया, सोमालिया आणि नायजेरिया आदी देशांमध्ये एक हजारपेक्षा अधिक पोलिओचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवरुन पोलिओ समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 18 जानेवारी 2015 रोजी पुणे जिह्यातील 3 लाख 30 हजार बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे; तर महाराष्ट्रातील 1 कोटी 34 लाख बालकांचा यात समावेश असणार आहे. महाराष्ट्रात 84 हजार 387 पोलिओ बुथवर पोलिओ डोस पाजण्याची सोय करण्यात आली आहे. 18 जानेवारी रोजी प्रवासात असणाऱ्या बालकांनाही पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ येथे करण्यात आली आहे. एकही बालक सुटू नये म्हणून 19 ते 23 जानेवारी 2015 दरम्यान घरोघरी जाऊन पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकास पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे.

भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि म्यानमारच्या सीमेवरही पोलिओ डोस पाजण्याची खास सोय करण्यात आली आहे. प्रामुख्याने पंजाबमधील वाघा बॉर्डर, अट्टरी रेल्वे स्टेशन आणि राजस्थानातील मुनाबो रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांच्या पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्याची विशेष सोय असणार आहे. देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, कोलकाता या शहरातील आणि पंजाब व गुजरातमधील पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी खास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिओच्या ' चले जाव ' नंतरही दरवर्षी येणाऱ्या पोलिओ डोस पाजण्याच्या दिवशी प्रत्येक भारतीयाने सजग राहून प्रत्येक बालकास पोलिओचा डोस पाजला जाईल, हे पाहिलं पाहिजे.

- यशवंत भंडारे
उपसंचालक (माहिती), पुणे.

माहिती स्रोत: महान्यूज, शनिवार, १७ जानेवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate