অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपस्मार ( Epilepsy )

वारंवार आकडी, फेपरे वा बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. याची कारणे व प्रकार अनेक असल्यामुळे हा एकच रोग आहे,  असे असू शकत नाही. हा चेतासंस्थेतील बिघाड आहे. त्यांत येणारी आकडी वा बेशुद्धी कोणत्याही बाह्य कारणामुळे येत नाही. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी ०.३% ते ०.५% लोक अपस्माराने ग्रासलेले आढळतात. 

अपस्माराचे प्रकार

मर्यादित किंवा लाक्षणिक अपस्मार

या प्रकारामध्ये मेंदूला झालेल्या जखमेतून निर्माण झालेल्या विकृतीमुळे आकडी वा झटके येतात. हा प्रकार एखाद्या भागापुरता मर्यादित असतो. याला चेतापेशींचा क्षोभ कारण ठरतो. या क्षोभाची सुरुवात लहानशा भागापासून होऊन तो पसरतो. उदा., बोटापासून सुरुवात होऊन सबंध हातावर परिणाम होतो. ह्यूकिंग्ज जॅक्सन या शास्त्रज्ञांने याचे प्रथम निरीक्षण केले. म्हणून याला जॅक्सेनियन अपस्मार असे म्हणतात. याचा केंद्रबिंदू मेंदूच्या बाह्यांगात असतो. काही वेळा यात विवक्षित स्नायूंचा लुळेपणा जाणवतो. हा लुळेपणा काही मिनिटे ते काही तास राहतो.

अज्ञातहेतूक अपस्मार

या प्रकारात बाह्यांगात किंवा चेतातंतूत विकृती आढळून येत नाही. बाह्यांगात केंद्रबिंदू आढळला नाही तरी झटक्याच्या संवेदनांची निर्मिती दोन्ही बाजूंच्या बाह्यांगात एकाच वेळी होते. विद्युत् मस्तिष्क आलेखातही दोन्ही बाजूंचे बदल येतात. या अपस्माराचे लघु-अपस्मार व बृहत् अपस्मार असे दोन प्रकार केले जातात :

लघु-अपस्मार

यात क्षणिक बेशुद्धावस्था येते, पण झटके येत नाहीत. बेशुद्धावस्था क्षणात येते तशी क्षणात जाते. असे असूनही तेवढ्या वेळातही डोळ्यांची फडफड, ओठ चावल्याची हालचाल किंवा हाताची थरथर जाणवते. लघु-अपस्मार लहानपणापासून सुरू होतो. या अपस्माराचे क्षणिक झटके वारंवार आले तरी त्या व्यक्तीला ते जाणवत नाहीत. विद्युत् मस्तिष्क आलेखात मात्र याचे बदल दिसतात.

बृहत् अपस्मार

यामध्ये रोग्याला फेपरे येते. ते येण्याआधी पूर्वसूचना मिळतात. कानात आवाज येतात किंवा डोळ्यापुढे काजवे चमकतात. क्षणिक प्रकाशाचे झोत डोळ्यासमोर येऊन जातात, विचित्र वास येतात किंवा स्नायू थरथरतात. थोड्याच वेळात याने ग्रस्त व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडते. शरीराचे स्नायू ताठरतात व नंतर शिथिल होतात. स्नायू ताठरल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. स्वरयंत्राचे स्नायू ताठरल्यामुळे ओरडल्यासारखा आवाज येतो. तोंडात लाळ जमून फेस येतो. जीभ चावली गेल्यास रक्तामुळे फेसाला लाल रंग येतो. फेपर्‍यातून आलेली बेशुद्धावस्था काही मिनिटांपासून तासांपर्यंत राहते. रोगी शुद्धीवर आल्यावर त्याचे डोके दुखते, सबंध अंग दुखते व अतिशय थकवा येतो.

भावनिक उद्रेकामुळेही अपस्माराचे झटके येतात. त्याला मनःकायिक अपस्मार असे म्हणतात.

अपस्माराची व्याधी बहुधा बाल्यावस्थेपासूनच होते. प्रौढावस्थेतील अपस्मार चेतासंस्थेच्या अथवा मेंदूच्या विकाराने होतो. उदाहरणार्थ, डोक्याला मार लागून, अर्बुदामुळे, अन्य रोगामुळे व चेतासंस्थेच्या जाळीबंधात बदल झाल्यामुळे तो होतो अलीकडील संशोधनात अपस्माराचा उगम जनुकीय दोषात आढळला आहे.

अपस्माराचे निदान करण्यासाठी मेंदूचा विद्युत् मस्तिष्क आलेख (ई.ई.जी.), चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्. आर्. आय्.= मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग), मस्तिष्क रोहिणीत क्ष-किरणरोधी औषधे टोचून क्ष-किरण तपासणी इ. पद्धती वापरतात. प्रामुख्याने (आकडी व फेपरे) लक्षणे थांबविण्यावर औषधांचा रोख असतो. औषधे चालू केल्यावर पाच वर्षांपर्यंत लक्षणे कमी दिसली तर औषधे थांबवून बघतात.

फेपरे आल्यास त्या व्यक्तीला एका कुशीवर झोपवावे म्हणजे लाळ श्वासनलिकेत जात नाही. शक्यतो जीभ चावली जाणार नाही, हे पहावे. अपस्मारग्रस्त व्यक्तीने पोहणे, अग्नीजवळ जाणे, वाहन चालविणे तसेच झा़डावर चढणे टाळावे. ओळखपत्र सतत सोबत बाळगावे.

प्रधान, शशिकांत

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate