अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर ओकार्या होतात. या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण संस्थेचा त्यात महत्त्वाचा सहभाग असतो. अर्धशिशीने त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ ६० % स्त्रिया असल्याचे आढळून आले आहे.
अर्धशिशीचे दोन मुख्य प्रकार आहेत : पहिल्या प्रकारात पूर्वसूचना देणार्या संवेदना उद्भवतात. याचा केंद्रबिंदू अनुमस्तिष्कात असल्यामुळे दृष्टिभास होतात. हे भास डोके दुखत असताना होत नाहीत, पण त्यापूर्वी होतात. काही वेळा सुरूवातीस तात्पुरते अंधत्व आल्यासारखे वाटते, मळमळते व पोटातील आम्लता वाढते. हा प्रकार वयात येणार्या मुलींमध्ये जास्त आढळतो. दुसर्या प्रकारात पूर्वसूचना नसते. डोकेदुखी एकाएकी सुरु होते. केंद्रीय चेतासंस्थेचा बिघाड दिसून येतो. यात मळमळणे, ओकार्या, एकाच बाजूची डोकेदुखी आणि डोक्याची त्वचा हुळहुळी होणे ही लक्षणे आढळतात. ४०-७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींमध्ये ही अर्धशिशी जास्त आढळते. आनुवंशिकतेचा यात मोठा सहभाग असतो. स्त्रियांमध्ये हा प्रकार आढळतो. बहुधा, या अर्धशिशीला सकाळी सुरुवात होते. खाण्यातील काही पदार्थांची अधिहर्षता (अॅलर्जी), काही वास, मासिक पाळी यांमुळे अर्धशिशीला सुरूवात होते. काहींना प्रकाश सहन होत नाही.
वय वाढले की अर्धशिशीची तीव्रता कमी होते. शरीरातील इतर संस्थांच्या रोगांमुळेही (उदा., यकृताचे रोग, अपस्मार ) अर्धशिशी होऊ शकते. मानसिक ताण, काही हृदरोग, रक्तवाहिन्यांचे रोग (विशेषत: मस्तिष्क रोहिणीचे रोग), थकवा, हवामानातील बदल, उपवास, तसेच गर्भनिरोधक औषधे, चीज, अल्कोहॉल, चॉकलेट यांसारख्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करणार्या पदार्थांचे सेवन या कारणांनीही अर्धशिशी सुरू होऊ शकते.
लक्षणांवरून अर्धशिशीचे निदान करता येते. मेंदूवरील निरनिराळ्या तर्हेच्या चाचण्या उपयोगी पडतात. डोक्याची डॉप्लर चिकित्सा, स्पेक्ट चिकित्सा, मस्तिष्क रक्तप्रवाह चिकित्सा, ‘पी.ई.टी.’ (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) व एम्.आर्.आय्. (चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन) या सर्व तपासण्यांमुळे अर्धशिशीच्या झटक्याच्या वेळच्या रक्तप्रवाहाची माहिती मिळते. ‘पी.ई.टी.’ मुळे मेंदूच्या बाह्यकातील व पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाह कळतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020