अवयवदानाचं महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन मागील काही महिन्यापासून याच विषयाचं चिंतन, मनन आणि लेखन सुरु असतांना, हा विषय गतिमान करण्यासाठी राज्यातील गावागावात चर्चिला जावा हे पटलं. ऑगस्ट 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे अवयवदान हा विषय ग्रामसभेत समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली, त्यांनी तात्काळ समर्थन केलं. त्यानंतर मराठवाडा विभागाचे आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना सुद्धा विनाविलंब विनंतीची दखल घेतली आणि मराठवाड्याच्या आठही जिल्हा परिषदांना लेखी आदेश दिले, त्यामुळे आता अवयवदान हा विषय मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात ग्रामसभेतून चर्चिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्वत:पासून सुरु केलेल्या अभियानाला आपण सर्वांनीच समजून घेतलं पाहिजे. भारत सरकारनं अवयवदानाचा कायदा 1994 मध्येच मंजूर केला. पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशाला अवयवदान करण्याचं आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये मुंबईत सपत्नीक अवयवदान संकल्प करुन या अभियानाला सुरुवात केली. मराठवाड्यात औरंगाबाद वगळता अन्य ठिकाणी अवयवदानाच्या बाबतीत काहीच घडलं नाही. औरंगाबादचे काही खाजगी हॉस्पिटल आणि संस्था यांच्या प्रयत्नातून अवयवदान आणि प्रत्यारोपणाचे काही प्रयोग झाले. मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या जनतेला प्रथम अपरिचित वाटणारा अवयवदानाचा विषय कळू लागला. लोकांतील अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मराठवाड्यात सर्वप्रथम अवयवदान करण्याचा लातूरला संकल्प केला. त्यामुळे अवयवदानाचे महत्व आता लातूरकरांना समजले आहे.
अवयवदानाचा विषय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशासाठीही महत्वाचा आहे. अपघातातील गंभीर जखमींना तसेच सिमेवर प्राणाची बाजी लावत शत्रुशी सामना करणाऱ्या जखमी सैनिकांना किडनी, हृदय अशा वेगवेगळ्या अवयवाची गरज असते. आज अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना अवयवांची गरज आहे. त्यांना वेळेवर अवयव मिळाले तर त्यांचे प्राण वाचविता येऊ शकतात.
पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल केला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. अवयवदानाची चळवळ ग्रामीण स्तरातून पुढे येण्यासाठी ग्रामसभेतील चर्चा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
- माधव अटकोरे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020