एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या शरिरातील काही अवयव इतर गरजू रुग्णांसाठी अथवा व्यक्तीसाठी एक प्रकारचा आशिर्वादच ठरतो. कारण आपल्या सर्वच धर्म संस्कृतीमध्ये एखादे चांगले काम केले तर सर्वाच्या तोंडून कौतूक तर होतेच. पण जर व्यक्तीकडे द्यायला काहीच नसेल त्याच्याकडे सर्वात मोठी संपत्ती असते ती म्हणजे आशिर्वाद आणि हा आशिर्वाद देण्याची संधी अवयवदान करुन मिळेल. आपण जिवंत असतो तेव्हाच आपण आपल्या इच्छेने, आपला अपघाती मृत्यू अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तर, शरिरातील काही अवयव सुस्थितीत असतात. ते अवयव गरजूसाठी दान करता येतात. ते अवयव गरजूंना जीवन जगण्याचा आधार बनलेले असतात. हा एक प्रकारचा आशिर्वादच आहे. हे समजून समाजातील इच्छूक व्यक्तीने अवयवदान केले तर मोठ्या प्रमाणात आपण अनेकांचे जीवन वाचवू आणि जगवू शकू. एखाद्याला जीवनदान करण्याचा आशिर्वाद आहे असे म्हणता येईल. अवयवदानाविषयी काही सविस्तर बाबी खालीलप्रमाणे आहेत.
अवयवदान म्हणजे नेमकेपणाने असं म्हणता येईल :- जिवंतपणी किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे 'अवयवदान' होय. अवयवदानाद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करुन अंतिम-स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. तसेच त्यांचे जीवन जगण्यासाठी सुसह्य करु शकतो.
अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया :- एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजू रुग्णामध्ये प्रत्यारोपीत करतात. ज्याचा एखादा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो.
मेंदू स्तंभ मृत्यू :- मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालू आहे. पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप व कानाचे ड्रम यांचे दान करू शकतो.
सामान्य मृत्यू :- मृत व्यक्तीची जिची हृदयक्रिया बंद पडली आहे. अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते.
जिवंत व्यक्ती :- जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करु शकते. रुग्ण दात्याच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी यांना करु शकतो. या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्ती काही मर्यादित अवयवाचे दान करु शकते. उदा :- मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतात.
ब्रेन डेड मृत्यू :- एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित केले जाते. चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ या भागात असतो. अपघातात डोक्याला मार लागल्यास मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायम स्वरुपी इजा झाल्यास या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेंड) मृत्यू होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवले असेल तसेच काही ठराविक प्रमाणित चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे हृदय जास्तीत-जास्त 16 ते 72 तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवता येते. याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होऊ शकते. यासाठी त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने मान्यता दिलेल्या प्रतिरोपण रुग्णालयातच करता येते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयवदान कायदेशीर बाबी :-
1. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना खालील बाबीला अनूसरुन कायदेशीर मान्यता आहे.
अ) मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणेकरुन मृत्यूनंतर अवयवदान होऊ शकेल.
ब) रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे साठवणे व प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे.
क) मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, कायद्याने अवयव विकणे व विकत घेणे, त्यासाठी जाहिरात करणे किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
अवयवदान करायचे असल्यास काय करायला हवे :- एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपले अवयवदान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर जवळच्या सज्ञान नातेवाईकांची सही घेणे देखील आवश्यक आहे.
संमतीपत्र भरुन दिल्यानंतर त्या व्यक्तीस 'डोनर कार्ड' दिले जाते व हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
अवयवदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून अवयवदान करा. ज्यामुळे मृत्यू पश्चात काहींच्या जीवनात आशेचा किरण येऊ शकतो.
अवयवदान करणाऱ्या व्यक्तीने कोठे संपर्क करावा : अवयवदानासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय जिल्हा रुग्णालयातील अवयवदान विभाग या ठिकाणी संपर्क करावा. लातूर जिल्ह्यासाठी श्री. संतोष गित्ते, अवयवदान लातूर जिल्हा समन्वयक यांच्याशी 9404642208 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच csnrhmlatur@rediffmail.com व npcb.latur@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल पाठवू शकता.
मराठवाड्यातील अवयवदान करु इच्छिणाऱ्यांनी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, औरंगाबाद, नेफ्रालॉजी विभाग, एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, एन-6 सिडको, औरंगाबाद येथे यासाठी 0240-2333591 तसेच 9422713691 व sudhirku1979@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा . तसेच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, मुंबई, एल.टी.एम.जी. हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल), कॉलेज बिल्डींग, 2 रा मजला, औषध भांडारच्या बाजूला, सायन (पश्चिम), मुंबई-32 यांना संपर्क साधण्यासाठी www.zlccmumbai.org , organtransplant@ztccmumbai.org , 022-24028197, 9320063468, 9167663469 संपर्क साधावा. विभागीय प्रत्यारोपण समन्वयन समिती, पुणे द्वारा केईएम हॉस्पिटल, रास्ता पेठ, पुणे-11 यांना संपर्क साधण्यासाठी www.ztccpune.com , ztccpune@gmail.com आणि 9890210011 या क्रमांकावर संपर्क साधावा. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,मानेवाडा , नागपूर-४४०००३ यांना संपर्क साधण्यासाठी raviwankhede@gmail.com, gmcssh@gmail.com, 9423683350 वर संपर्क साधावा .
लेखिका: मीरा ढास
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/6/2020